मला नवरा लागतो

Submitted by पूजा जोशी on 2 September, 2020 - 03:16

मला नवरा लागतो

'मला नवरा लागतो' ऑफिसच्या लिफ्ट मध्ये चढले आणि हे वाक्य कानावर पडले. चमत्कारिक नजरेने मी त्या मुलीकडे पाहिले. मला ठसका लागणे, तहान लागणे, भूक लागणे फार फार तर ठेच लागणे माहित होते. मग नवरा लागणे हे प्रकरण आहे तरी काय? हेच जाणून घेण्यासाठी मी कान देऊन ऐकू लागले. खरे तर कान देण्याची गरजच नव्हती. त्या छोट्याशा जागेत ठरवून सुद्धा कान बंद ठेवणं शक्य नव्हते. तसेच माझे संस्कार सुद्धा दुसर्‍याचे बोलण चोरुन ऐकू नये हेच सांगतात.असो

तर तिला शाॅपिंग साठी मग ते कपडे असोत ज्वेलरी किंवा भाजी, प्रत्येकवेळी नवरा (सोबत) लागतो असं काहीसं ती मैत्रिणीला सांगत होती. त्याचा choice तिच्या पेक्षा बरा आहे असे त्याचे स्पष्टीकरण पण देवून झाले तिचे. खरंच choice बरा होता का बॅगा उचलणे, पैसे भरणे ह्या उद्देशाने त्याची गरज होती मला माहित नाही. जावू द्या ना आपल्याला काय? पण मला त्या निमित्ताने 'नवरा लागणे' म्हणजे काय हे तर कळलं.

मग मी विचार करायला लागले. मला नवरा शाॅपिंग साठी लागतो का? नाही बुवा मला एकटीला शाॅपिंग करायला जास्त आवडत. नवरा आला तर आनंदच आहे पण मनसोक्त मार्केट फिरत एकट्याने शाॅपिंग करण मला जास्त आनंद देऊन जात. काही प्रमाणात आपण निर्णय घेतला ह्याचाही आनंद असतो आणि घेतलेली वस्तू योग्य की नाही, किंमत बरोबर कि नाही ह्याच टेंशन पण येत. त्यामुळे असेल कदाचित पण मला आवडत असं एकटंच शाॅपिंग करण.

आपण स्वतः select केलेल्या गोष्टींच कोणी कौतुक केले तर मग 'सोने पे सुहागा'.

पण स्वतः आणलेल्या वस्तू पेक्षा गिफ्ट म्हणून
मिळणार्‍या वस्तू तून मिळणार आनंद कित्येक पटीने जास्त आहे. आणि गिफ्ट देण्यासाठी नवरा तर लागतोच ना?

पण त्याचा पेक्षा जास्त नवरा लागतो तो ऑफिसमधून थकून आल्यावर विचारपुस करण्यासाठी. अगदि पापणीचा केस जरी दुखत असेल तरी काळजी घेण्यासाठी, जेवलीस का? पैसे आहेत ना? पोहचल्यावर फोन कर असे सांगण्यासाठी. खडतर प्रसंगात पाठीशी उभ राहण्यासाठी आणि दुःखात डोळे पुसण्यासाठी नवरा हा लागतोच. पाककृती बिघडल्या तरी मनापासून केलेल्या प्रयत्नाना दाद देण्यासाठी. List खूप मोठी आहे.

एकटं शाॅपिंग करायला आवडणार्‍या मला नम्रपणे कबूल करावे लागेल ह्या सगळ्यासाठी मलाही नवरा लागतो.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मला नवरा शाॅपिंग साठी लागतो का? नाही बुवा मला एकटीला शाॅपिंग करायला जास्त आवडत.
<><> तुम्हाला कल्पना नाहीय तुम्ही केवढे उपकार करत आहात तुमच्या नवऱ्यावर.
बायकोमुळे तासनतास शॉपिंग मध्ये काढणाऱ्या अखंड पुरुष जातिला तुमच्या नवऱ्याचा हेवा वाटतोय.

सिम्बा+१
दवणीय अंड्याचा भरवसा नाही

बायका खरेच नशीबवान असतात
हे नवरयाचे सुख आम्हा पुरुषांच्या नशिबी नाही Sad
शॉपिंग एकतर एकट्यानेच करावी लागते.
आणि जरी बायको नेली सोबत तर आपल्यापेक्षा जास्त ती करून येते Sad
आणि मग पिशव्याही दोघांच्या उचला ते वेगळेच

शिर्षकाचा घाणेरडा अर्थ घेऊ शकतात बरेच लोक.शिर्षक बदला.
>>>>>

मायनस ७८६
ज्यांना घाण विचार सुचतात त्यांना घेऊ द्या घाण अर्थ
आपली बोलीभाषा मराठीनुसार आपण योग्य शब्द वापरला असेल तर तो बदलायची गरज नाही
हल्ली कुठल्याही शब्दाचे घाणेरडे डबल मिनिंग अर्थ बनले आहेत. अश्यांना घाबरण्यात अर्थ नाही.

>> प्रत्येकवेळी नवरा (सोबत) लागतो असं काहीसं ती मैत्रिणीला सांगत होती.

हो. गप्पांच्या ओघात पट्कन बोलताना असे उद्गार निघतात अनेकदा. पण यावरून मला "बस लागणे" हा वाक्प्रचार आठवला. म्हणजे बराच काळ बसमध्ये बसल्यानंतर काहीना चक्कर/उलटी येते. पूर्वी हे प्रकार घडत. त्या अर्थाने घेतले तर "नवरा लागणे" म्हणजे नवरा दीर्घकाळ सोबत असल्यास चक्कर वगैरे येते कि काय असे वाटले Lol

असो. छोटा आणि छान लेख.

>>>>नवरा दीर्घकाळ सोबत असल्यास चक्कर वगैरे येते कि काय असे वाटले Lol>>> सेम हियर.

तुम्हाला नवर्‍याचा पाठींबा काही बाबतीत लागतोय कारण तुम्ही नोकरी करताय आणि बर्‍याच पातळीवर स्वावलंबी असाल पण बर्‍याच नोकरी न करणार्‍या मुली / बायका यांना सतत मानसिक , भावनिक गोष्टींसाठी नवर्‍याची गरज पडत असु शकेल उदा. आर्थिक दृृृृष्ट्या , प्रवासासाठी वैगरे...

<<< पण बर्‍याच नोकरी न करणार्‍या मुली / बायका यांना सतत मानसिक , भावनिक गोष्टींसाठी नवर्‍याची गरज पडत असु शकेल उदा. आर्थिक दृृृृष्ट्या , प्रवासासाठी वैगरे...>>> ईथे तुम्हाला आर्थीक म्हणायचे आहे का?

मानसिक अन भावनिक गरज ही दोघांनाही असु शकते / रादर असते. हीच तर ह्या नात्याची खासियत असते, तुझ्यासाठी मी अन माझ्यासाठी तु Happy

कविता१९७८ <<< पण बर्‍याच नोकरी न करणार्‍या मुली / बायका यांना सतत मानसिक , भावनिक गोष्टींसाठी नवर्‍याची गरज पडत असु शकेल उदा. आर्थिक दृृृृष्ट्या , प्रवासासाठी वैगरे...>>> ईथे तुम्हाला आर्थीक म्हणायचे आहे का?

exactly

काय घाण अर्थ आहे कोणी समजावून सांगेल का... >>>> परवा माझ्या मैत्रीणीच्या कॉलेज WA ग्रुपमध्ये माबो पानाचा स्क्रीनशॉट आला आणि या लेखाचं शीर्षक सर्कल केलं होतं. तिला याचा अर्थ माहीत नाही आणि मलाही. मी फार वेगवेगळ्या अँगलने विचार करूनही यात अश्लील अर्थ सापडला नाही. असो. एवढे सगळे म्हणताहेत तर शीर्षकात एक जास्तीचा 'शॉपिंग' शब्द घालून, ' मला नवरा शॉपिंगसाठी बरोबर लागतो' असं काही तरी करता आलं असतं.
लेख ठीक आहे. मी सुद्धा शॉपिंग नवऱ्याबरोबर न करणारी कॅटेगरी. एकटीने किंवा मैत्रिणीबरोबर जाऊन तासनतास बघण्यात जी मजा ती नवऱ्याबरोबर जाण्यात नाही. त्याला तासभर झाला की भूक लागते, झोप येते, पाय सुद्धा दुखतात. (फुल मॅरेथॉन पळणारा माणूस आहे)

ज्यांना अश्लील अर्थ कळत नाहै त्यांनी शांत बसा.
तो अर्थ कधी ना कधी वाचण्यात येईल आणि कळेल Happy
पण तोवर जर या शीर्षकाचा स्क्रीनशॉट इकडे तिकडे फिरला तर मजेत घ्या.ऑफेंड होऊ नका.(मी कोणालाही पाठवलेला नाहीये हां.लेखकी वाचला.चांगला आहे.
इथे आणि दवणीय अंडे वर जाण्याची शक्यता लेख शीर्षक पाहिल्यावर लक्षात आली म्हणून सांगतेय)

तसं माझंही काय अडत नाहीं म्हणा तुमच्याशिवाय ! पण नांवाला 'सौ.' असल्याने नवरा लागतोच ना !! 20200914_172734_2.jpg