वडाभोवताली कशाला फिरू मी

Submitted by सुप्रिया जाधव. on 23 August, 2020 - 23:37

त्रिलोकी विहरते अमर पाखरू मी
तुझ्या मर्त्य देही किती वावरू मी ?

नको हात घेऊस हातात माझा
अताशा कुठे लागले सावरू मी

किती काळ दुस्वास करशील इच्छे ?
लुचू दे सडान्ना तुझे वासरू मी

मनाचा किनाराच उध्वस्त करते
त्सुनामी स्मृतींची कशी आवरू मी

तुझे वीर्य पण उदर-संस्कार माझे
तुझे नांव-अडनांव का वापरू मी?

नजर भिडवते मीच नजरेस माझ्या
कशाला उगाचच तुला घाबरू मी ?

स्वतःभोवती घेतली एक गिरकी
वडाभोवताली कशाला फिरू मी

सुप्रिया मिलिंद जाधव

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह
कमाल
शेवटचा शेर विशेष आवडला

मस्त.
नजर भिडवते मीच नजरेस माझ्या.. वाहवा !
खरेच जर आपण आपल्या मनाशी प्रामाणिक असलो, तर बाकी कुणाची पर्वा करण्याची गरजच काय? तीच सर्वात मोठी कसोटी आहे ना, आपण योग्य मार्गांवर असल्याची !मला सर्वात जास्त आवडला हा शेर.