कसे एका दिशेला नेमके उडतात हे पक्षी

Submitted by सुप्रिया जाधव. on 6 September, 2020 - 01:05

कवेमध्ये हवेला घेत, झिंगत चालले पक्षी
गगन चुंबायचे आहे, धरेला व्हायचे पक्षी

निसर्गाने रुजवले कोणत्या भाषेस ऐक्याच्या
?
कसे एका दिशेला नेमके उडतात हे पक्षी

हताशा दाटली की फक्त मी ह्यांचे स्मरण करते
न संचय अन्न-पाण्याचा, तरी गातात हे पक्षी

त्वचेचा रंग, जाती-धर्म, सीमा... भांडतो आपण
जिथे जातात हे होतात तिथल्या गावचे पक्षी

विचारांचे खुले अंबर निमंत्रण धाडते आहे
भरारी घ्यायची आहे मलाही व्हायचे पक्षी

मुलींची कावळा शिवला म्हणत निर्भत्सना करतो
अकाली मारतो त्यांच्या मनांचे कोवळे पक्षी

तिच्या डोळ्यांत थिजली पाखरे दारात घुटमळती
तिन्हीसांजेस फिरणारे बघत घरट्याकडे पक्षी

सुप्रिया मिलिंद जाधव

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्वचेचा रंग, जाती-धर्म, सीमा... भांडतो आपण
जिथे जातात हे होतात तिथल्या गावचे पक्षी>>> अगदी खरं लिहिलयं..