पाककृती स्पर्धा १ - मोदक बनवणे - मिल्कमेड च्या सारणाचे पारंपारीक मोदक - स्मिता श्रीपाद

Submitted by स्मिता श्रीपाद on 31 August, 2020 - 04:29

मोदक...
अत्यंत जिव्हाळ्याचा पदार्थ..
IMG_20200822_123512.jpg
स्पर्धा जाहीर झाल्यापासुन वेगळं काय करता येइल बरं असं म्हणुन बराच विचार केला पण मोदक म्हणजे ...उकडीचेच...
नारळ, गुळ, वेलची, तांदुळ पिठीची उकड हे कॉम्बिनेशन सोडुन दुसरं काही सुचेचना...
त्यामुळे सादर आहेत यावेळी बाप्पाला प्रसाद म्हणुन केलेले हे मोदक.
आपले पारंपारीक उकडीचेच मोदक फक्त सारण थोडं वेगळं बनवायचा प्रयत्न केलाय.
तर कृती..

साहित्य :
दोन नारळ खवणुन ( साधारण ४.५ ते ५ वाट्या होतात)
२ वाट्या गुळ
१ वाटी मिल्कमेड
२-३ चमचे बदाम- काजु भरड (ऑप्शनल)
वेलची पुड
केसर
४ वाट्या तांदुळ पिठी
४ वाट्या पाणी
२ चमचे तुप
चवीपुरते मीठ

कृती:

सारण : नारळाचा चव आणि गुळ एकत्र करुन १ तासभर ठेवायचं. मग बारीक गॅस वर शिजवायला ठेवायचे. गुळ विरघळत आला की १ वाटी भरुन मिल्कमेड घालायचे. सुरवातीली मिश्रण चिकट झालं असं वाटेल पण घाबरायचं नाही. हळुहळु होईल कमी. मिल्क्मेड घातलं की साधारण ५ मिनिटात मिश्रण घट्ट होत जाइल. मिल्कमेड मुळे मिश्रण ओलसर राहतं. कोरडं पडत नाही. आणि एकदम क्रीमी लागतं सारणं. शेवटी काजु बदाम पुड आणि केशर काड्या घालुन गॅस बंद करायचा. हे सारण नुसतं खायला खुप मस्त लागतं त्यामुळे अदल्या दिवशी केलं असेल तर घरच्यांपासुन लपवुन ठेवा नाहीतर मोदकात घालायला शिल्लक राहाणारच नाही Happy

उकडः
थोडं तांदुळ पिठी बद्दल - उत्तम न चिरणारी उकड निघण्यासाठी ताजी आणि फक्त ताजीच पिठी हवी. मी पुण्यात अग्रज ची पिठी वापरते आहे गेले काही वर्ष. अतिशय सुंदर उकड निघते आणि मोदक संध्याकाळपर्यंत छान मऊ लुसलुशीत राहातो.
उकड करायची पद्धत सेमच पण तरी माझ्या आईची एक खास टीप.
उकड करताना पाणी गॅस वर ठेवलं की पाणी उकळायची वाट बघायची नाही. पाण्याला तळाशी थोडे बुडबुडे आलेले दिसले की लगेच पिठी पाण्यात टाकायची.आणि भराभर हलवुन झाकण ठाकायचे. २-३ वाफा दिल्या की उकड चकचकीत दिसायला लागते. एक छोटी गोळी हातावर घेउन बघितली की कळतच उकड शिजलेली.( अर्थात हा थोडा सरावाचा भाग आहे पण जमतं हळुहळु)
तेल पाण्याचा हात घेउन उकड छान मळुन घेतली की झालंच. पुढचं सगळ्यांना माहित आहे.:-)...लिंबाएवढा गोळा, पारी, मुखर्या करणे, मोदक तयार करुन वाफवणे ई ई ई...
आणि हो मोदक वाफवायला ठेवायच्या आधी प्रत्येक मोदकावर एक केशर काडी जरूर घाला...मोदक वाफवताना त्याचा सुरेख केशरी रंग मोदकावर उतरतो आणि एकदम छान पारीजातका सारखे दिसणारे मोदक तयार होतात Happy

बाप्पाचा प्रसाद आहे...छान तर होणारच...:-)
गणपती बाप्पा मोरया Happy
Screenshot_2020-08-31-13-08-17-376_com.miui_.videoplayer_new.png
सारण थोडेसे पांढरट दिसेल.
Screenshot_2020-08-31-13-08-24-883_com.miui_.videoplayer_new.png
कलाकुसर
Screenshot_2020-08-31-13-08-47-115_com.miui_.videoplayer_new.png
तय्यार
IMG_20200822_124842_new.jpg
पारीजातकाची फुलेच जणु
IMG_20200822_134242.jpg
नैवेद्य
IMG_20200822_134824.jpg
मोदक खाउन बाप्पा खुश

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

सुंदर
हे केशर वाले मोदक मी सगळीकडे पहिल्यांदाच यावर्षी पाहतेय
मागच्या वर्षे पर्यंत नुसतेच पांढरे मोदक फेसबुक आणि इथे बघत होते.
केशर छान दिसतं पांढर्‍या वर.

मस्त. पारी किती सुंदर दिसतेय.

अन्य एका कृतीत पाणी रटारट उकळल्यावर पिठी घालायची आहे. इथे तळाशी बुडबुडे आल्यावर.
प्रत्येकाची पद्धत निराळी.

हे केशर वाले मोदक मी सगळीकडे पहिल्यांदाच यावर्षी पाहतेय
मागच्या वर्षे पर्यंत नुसतेच पांढरे मोदक फेसबुक आणि इथे बघत होते.>>>>>> अगदी अगदी.माझी पहिली सुरुवात मधुराज किचनने झाली.मलाही करायचे होते.पण मोदकासाठी खाली बसल्यावर केशराची आठवण झाली.मग राहूनच गेले.
सॉरी फॉर अवांतर. मोदक मस्तच झाले आहेत.केशराची एकेक काडी मोदकावर लावणे पेशन्सचे काम आहे.
भरतना धन्यवाद.त्यांच्या पिठीच्या प्रतिसादामुळे नीट वाचले गेले.

मस्त!!
केशराच्या काडीसाठी अनु +१

मस्त!!

हे केशर लावलेले मोदक पाहिले नि प्राजक्ताच्या फुलांची आठवण आली. सुंदर झाले!
(नाहीतर एरवी "मोदकाला मेकअपची गरज नाही" गटात... फारच "गार्निश"ची हौस असेल तर तुळशीपत्र ठेवा. शास्त्र असतं ते!)

बंगाली साबा बनवतात असे मिश्रण, आणि पारी सेम असते, त्यांच्यात सगळीकडे दूध, मावा घालायची पद्धत आहे. छान लागते.
दूध पुली म्हणतात.

एक सांगायचे राहिले, मुखर्‍या हा शब्द खुपच कमीजणांकडून
एकलाय, अगदी कोकणातल्या आजीची आठवण झाली.
कमी लोकांना माहिती असतो हा शब्द.

वाह सुरेख झालेत मोदक.

दोन्ही गणपतीबाप्पा अप्रतिम आणि बाप्पा आणि समोर मोदक ठेवलेत तो फोटोही अप्रतिम.

सर्वांचे प्रतिसादासाठी खुप खुप आभार. Happy

अन्य एका कृतीत पाणी रटारट उकळल्यावर पिठी घालायची आहे. इथे तळाशी बुडबुडे आल्यावर.
प्रत्येकाची पद्धत निराळी. >> हो खरय @भरत...आई चं लॉजिक नाही माहिती नक्की...पण मला वाटतं एखादी वाफ जास्त द्यावी लागत असेल या प्रकारात..आणि पाणी रटरट उकळले की पाण्याची वाफ होउन प्रमाण थोडे का होइना बदलत असावे असे मला वाटते Happy

केशराची एकेक काडी मोदकावर लावणे पेशन्सचे काम आहे. >> हो @देवकी , ते काम मुलीला दिलं होतं ..त्यामुळे जमलं Happy
कारण मोदक वळता वळता तेला पाण्याच्या हाताने केशर काडी लावायला अवघड जाते.

मुखर्‍या हा शब्द खुपच कमीजणांकडून एकलाय, >> होय @झंपी..बरेच जणांना पटकन कळत नाही...मला खुप आवडतो हा शब्द. Happy

बाप्पा अन मोदक दोन्ही पाहून मन प्रसन्न झाले

<<<हे केशर वाले मोदक मी सगळीकडे पहिल्यांदाच यावर्षी पाहतेय
मागच्या वर्षे पर्यंत नुसतेच पांढरे मोदक फेसबुक आणि इथे बघत होते.
केशर छान दिसतं पांढर्‍या वर.>>> +१११
मला केसर चव आवडत नाही, पण बघायला छान वाटतायेत