लेखनस्पर्धा -- माझा अनुभव - कोविड-१९ लॉकडाउन-मुग्धमोहिनी

Submitted by मुग्धमोहिनी on 25 August, 2020 - 10:58

या लॅाकडाउन काळात माझ्यातील,दुसर्यांतील, परिस्थितील सुसंगती, विसंगती टिपण्याचा नादच जणू लागला आहे. आपल्याला एकाच वेळी अनेक मने आहेत असं सारखं वाटत राहतं . ही मने विविध मार्गांनी परिस्थिती जाणून घेतात, दाद देतात, नावे ठेवतात आणि काहीवेळा गेंड्याच्या कातडीसारखे फक्त स्वत:चा बचाव करत राहतात.

म्हणजे बघा हं, बाहेर विविध रूपातील कोविड योध्दे किती छान काम करतायत हे वाचून त्यांच्याबद्द्ल उर अभिमानाने भरून येतो,आदर वाटतो पण आपण शाररिक ,मानसिक द्रष्ट्या एवढं कणखर नाही म्हणून मन उदासही होतं.मग दुधाची तहान ताकावर भागवून विविध ठिकाणी आर्थिक,वस्तुरूपी मदत फक्त केली जाते.

मी हात धुणे या बाबतीत अगदी OCD कॅटेगरी मधली. पण का कुणास ठावूक या लॅाकडाउन काळात फळे, भाज्या, वस्तू, माणसे आम्ही अजिबात सॅनिटाईज करत नाही. नेहमी जशा या गोष्टी स्वच्छ करतो तशा आणि तेवढ्याच करतो. अर्थात बाहेर पडणं हे कमीत कमी आणि मास्क घालूनच आहे.

माझा मूळ स्वभाव हा अगदी माणसांपुढे लोटांगण घालायचा, स्वत:कडे कमीपणा घेऊन काहीही करून मैत्री,नाती टिकवायचा.अर्थात हे जास्त करून बोलण्यात आणि झेपेल त्या मार्गाने. मला न झेपणारी कृती दुसर्यांसाठी कधी केली असेल तर विरळाच. तर असो. या काळात सुध्दा लोकांना भरभरून फोन करणं, संपर्क ठेवणं चालू झालं. पण हळूहळू माझ्या लक्षात आलं की आपला आणि काहींचा सूर फारसा जुळत नाहीय. मग आपल्यातच काहीतरी दोष असेल म्हणून स्वत:ला दुषणे देणे ते आहे ती परिस्थिती स्विकारणे आणि थोडे का होईना जशास तसे वागणे सुरू झाले.

यातच कधीतरी मनात विचारांचे अफाट द्वंद्व सुरू झाले आणि मी लिहायला लागले.लॅाकडाउन काळाने मला जवळच्या लोकांबद्दल सावध बनवले आणि मनातील प्रत्येक गोष्ट दरवेळी भडभडून बोलून नव्हे तर कागदावर लिहून सुध्दा बरे वाटते हे शिकवले.

आमच्या कामवाल्या मावशीॅच्या कुटूंबाला आर्थिक मदत व्हावी म्हणून वेगवेगळ्या प्रकारे रोजगार उपलब्ध करून द्यायचा बराच प्रयत्न केला पण ‘खाईन तर तुपाशी नाहीतर राहीन उपाशी’ अशी त्यांची मनोवृत्ती दिसली त्यामुळे वाईट वाटलं.

या काळात अनेक संस्थांचा पर्यावरण, तंत्रज्ञान,शिक्षण,अध्यात्म,शाररिक आणि मानसिक आरोग्य अशा विविध विषयांवर ॲानलाईन ज्ञानयज्ञ सतत चालू आहे ही बाब खूपच प्रशंसनीय आणि कौतुकास्पद आहे.

कोणे एके काळी माझी सारखी नजर चुकवून गावभर उंडारणारा मुलगा घराबाहेर पाऊल ठेवायला घाबरतो तेव्हा काळजात कळ आल्याशिवाय राहत नाही.

यावेळी सोसायटीत १५ ॲागस्ट, गणेशोत्सव ॲानलाईन छान साजरे झाले पण चेअरमन जेव्हा आपण दिवाळी आणि २६ जाने. असेच ॲानलाईन दणक्यात साजरे करू असे म्हणाले तेव्हा क्षणभर काळजाचा ठोकाच चुकला.

इतरवेळी बिनधास्त असलेली मी मला किंवा घरातील कोणत्याही सभासदाला साधी शिंक जरी आली तरी आमच्या फॅमिली डॅाक्टरांचे डोके खात असते आणि २-३ दिवस बरे होईस्तोवर डोक्यावर सतत टांगती तलवार असते.

नात्यातील एक परदेशी राहणारी व्यक्ती तिला एकटेपणा सहन होत नाही म्हणून खुप जवळ यायचा प्रयत्न करू लागली.या व्यक्तीला इतरवेळी माणसं निक्षून नको असायची, आत्ताच्या वेळी पण तिला तिच्याच टर्मसवर मर्यादित काळात जवळ यायचयं, त्यावेळी कसा आणि कितपत संवाद साधावा कळत नाही.

लॅाकडाउन मध्ये एका परदेशी राहणार्या मैत्रिणीशी खुप वर्षांनी मनाच्या तळातून बोलायचा योग आला , त्यावेळी तिने काढलेले ‘माझा इतका विचार करणारं जगाच्या पाठीवर कोणातरी आहे या विचाराने माझी जगण्याची उमेद वाढली बघ’ हे उद्गगार माझ्या आयुष्यभर लक्षात राहतील.

एक अगदी गमतीशीर साधी गोष्ट म्हणजे या काळात आम्ही घरी दही लावायला लागलो , जे पूर्वी विकत आणायचो.मुलाने टाकाऊ-टिकावू-टाकाऊ अशा अनंत गोष्टी बनवल्या.

एक वर्षापूर्वी आम्ही सहज गप्पा मारत असताना असं विधान केलं होतं की आपल्याला सवयींबाबत मागे जाणं शक्य नाही. पण कोरोना काळाने या विधानावर मोठे प्रश्नचिन्ह उभे केले.

या काळानं मला कृतज्ञ, सावध, आत्ममग्न , विचारी केलं.

काही लोकांचा रोजगार कोरोनाने पूर्ण गेलाय , यापैकी एका जरी माणसाचा स्वाभिमान जपून त्या व्यक्तीला आयुष्यात पुन्हा उभे करू शकले तर स्वत:ला माणूस म्हणून घ्यायच्या योग्यतेचे समजेन.

कोरोना काळाने जशी संकटं निर्माण केलीत तशा संधीही.

हे संकट लवकरात लवकर दूर व्हावे आणि यातून एका माणुसकीने भरलेल्या आणि उत्साहाने भारलेल्या समाजाची निर्मिती व्हावी हीच गणेशचरणी प्रार्थना.

धन्यवाद.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काही लोकांचा रोजगार कोरोनाने पूर्ण गेलाय , यापैकी एका जरी माणसाचा स्वाभिमान जपून त्या व्यक्तीला आयुष्यात पुन्हा उभे करू शकले तर स्वत:ला माणूस म्हणून घ्यायच्या योग्यतेचे समजेन.
>>>>

आमीन
हा किमान संकल्प प्रत्येकाने करावा
छान लिहीलंय. मन फार दोलायमान अवस्थेत अनुभवलेय या दिवसांत.

आवडले लिखाण
बुलेट पॉईंट्स / ठळक बातम्या वाचल्याचे फिलिंग आले. Wink

धन्यवाद सर्वांना.
हर्पेन-हो, तशाच प्रकारचा फॅार्मॅट डोक्यात होता.

चांगलं लिहीलय,
>>>>> हळूहळू माझ्या लक्षात आलं की लोकांना आपण फारसे आवडत नाही. >>>>> फक्त हे एक वाक्य खटकलं! असं आपणच कशाला वाटून घ्यायचं?

धन्यवाद सर्वांना.
हो सामो-कोरोनातुन तावून सुलाखून मनाने/वृत्तीने आपण अधिक खंबीर, समाधानी व्हावे हा प्रयत्न.

सर्वांच्या प्रतिक्रिया उमेद वाढवणार्या आणि विचाराला प्रवृत्त करणार्या.
धन्यवाद.

धन्यवाद मामी.
हो ,म्हणजे साबणाच्या, टिश्यू पेपर च्या पुठ्ठयाच्या अनेक वस्तू(कुदळ,पहार) बनवल्या, त्या खर्या असल्याप्रमाणे वापरल्या ,त्यामुळे त्या परत टाकावू झाल्या.(smiley)

धन्यवाद कविन.