पाककृती स्पर्धा १- मोदक बनवणे ( सुकुर मोदक) - वावे

Submitted by वावे on 26 August, 2020 - 08:28

सर्वप्रथम मनीमोहोर यांचे खास आभार. त्यांच्या उकडीच्या पाककृतीमुळे माझं काम एकदम सोप्पं झालं. Happy कारण मोदकांसाठी आणलेली पिठी गणेश चतुर्थीचे मोदक करतानाच संपली होती. त्यांची उकडीची कृती अत्यंत सोपी आहे. मी प्रथमच केली आणि चांगली जमली.

आता सुकुर मोदक या नावाविषयी. या मोदकांच्या आतलं सारण हे सुकुरउंडे (सुकरुंडे) या कारवारी/कोकणी पदार्थात वापरलं जाणारं सारण आहे. ते गोल असतात म्हणून उंडे, हे मोदक आहेत म्हणून मी सुकुर मोदक असं नाव दिलंय Happy मला सुकुर या शब्दाचा अर्थ माहिती नाही.

सुकुर मोदकांसाठी लागणारं साहित्य-

सारणासाठी
१ वाटी चण्याची डाळ,
१ वाटी ओला नारळ,
दीड वाटी चिरलेला गूळ
जायफळाची पूड स्वादापुरेशी,
सुकामेवा- बदाम, पिस्ते वगैरे आवडीनुसार.

पारीसाठी
अर्धी वाटी इंद्रायणी तांदूळ,
अर्धी वाटी बासमती तांदूळ,
दीड वाटी पाणी
एक छोटा चमचा तूप,
एक छोटा चमचा तेल,
चिमूटभर मीठ.

सारणाची कृती
चण्याची डाळ दुप्पट पाणी घालून कुकरला १५ मिनिटं शिजवून घेतली. त्यात गूळ आणि नारळ घालून पुरण शिजवून घेतलं. शेवटी जायफळाची पूड घातली. पुरण वाटायचं नाही. ढवळताना डाळ जेवढी मोडते तेवढी पुरे. सुकामेवा जाडसर तुकडे/ काप करून घेतले. पुरण गार करत ठेवलं.

आता उकड.
(ही उकड मी मनीमोहोर यांच्या कृतीने केली आहे. पिठी वापरून पारंपरिक पद्धतीने केली तरी अर्थातच चालेल)

उकडीसाठी दोन्ही प्रकारचे तांदूळ एकत्र करून, धुवून रात्री भिजत ठेवले. सकाळी ते पूर्ण निथळून घेतले आणि मिक्सरमध्ये थोडं थोडं पाणी घालून (यासाठी दीड वाटीतलंच पाणी वापरलं) अत्यंत बारीक, गंधासारखे वाटले. दीड वाटीपैकी उरलेलं पाणी या वाटलेल्या तांदुळात घातलं. मीठ, तेल आणि तूप घालून ते मिश्रण नॉनस्टिक पॅनमध्ये घालून सतत ढवळत राहून शिजवलं. थोडं घट्ट झाल्यावर झाकण ठेवून दोन वाफा काढल्या.

उकड हाताला सोसेल इतकी गार झाल्यावर थोडी मळून घेतली. छोटे गोळे करून आपण नेहमी मोदकाची पारी करतो तशी पारी करून, आत पुरण भरून मोदक केले.

500013100409_400210.jpg

ही उकड थंड झाली तरी मोदक व्यवस्थित करता येतात, पारीला चिरा वगैरे अजिबात जात नाहीत. फारशी मळावीही लागत नाही.

5_6210596171136631071.jpg

नेहमीसारखे मोदक करून वाफवून घेतले.

DSCN6067.JPG

सोबत तूप्/दूध/ नारळाचं दूध घ्या नाहीतर नुसतेच खा ..आपापल्या आवडीनुसार Happy

DSCN6063.JPG

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान दिसताहेत.
पिठीपेक्षा ही पद्धत सोपी आणि कमी जोखमीची वाटली का?

मस्त दिसतायत
मला ममो पद्धतीने उकड करुन बघायचीच आहे एकदा
ही रेसिपी पुपो उमो कोलॅबोरेशन वाटते. (मारुति सुझुकी किंवा हिरो होंडाप्रमाणे)

वावे मस्त मोदक बनवले तुम्ही..कल्पना चांगली आहे.. सुकरुंडे चे सुकर मोदक करायची.. माझी आई पुरण उरले तर सुकरुंडे करायची..

सर्वांना धन्यवाद _/\_

पिठीपेक्षा ही पद्धत सोपी आणि कमी जोखमीची वाटली का?
> हो, खूपच सोपी! काहीच कठीण नाही. फक्त सतत ढवळत रहायला पाहिजे. फारशी मळायला लागली नाही की गरम राहिली पाहिजे असं कंपल्सरी नाही. आता याच्यापुढे मी मोदक करताना अशीच उकड काढणार. एरवी माझे दुपारी केलेले मोदक रात्री कडकसर होतात. हे अगदी मऊ राहिलेत. ते तांदूळ गंधासारखं वाटणं कारणीभूत असावं. Happy

ही रेसिपी पुपो उमो कोलॅबोरेशन वाटते. (मारुति सुझुकी किंवा हिरो होंडाप्रमाणे) >> Lol करेक्ट

ओके. करून पहायला हवं.
पुरणाचे कणकेचे तळून मोदक करतात -कडबू?
सुकरुंडे म्हणजे पुरणाचे गोळे तांदुळपिठीच्या पेस्टमध्ये बुडवून तळायचे ना?
असाच उडदाच्या डाळीचा पेस्टमध्ये बुडवून तळायचा एक प्रकार पाहिलाय. नाव आठवत नाही.

सुकरुंडे म्हणजे पुरणाचे गोळे तांदुळपिठीच्या पेस्टमध्ये बुडवून तळायचे ना? >> इंटरनेटवर मैद्याच्या पेस्टमध्ये बुडवून तळण्याची रेसिपी आहे. पण मला माझ्या एका बहिणीने अशी कृती सांगितली होती की पुरणाचे चपट पॅटीससारखे गोळे करायचे. कव्हरसाठी कणीक सरसरीत भिजवायची (बटाटेवड्याच्या कव्हरसाठी बेसन भिजवतो तशी) , तेलाचं मोहन घालायचं आणि हे पुरणाचे चपटे गोळे त्यात बुडवून तुपावर shallow fry करायचे. मस्त लागतात असे. मी असेच करते.

शुगोल, धन्यवाद Happy

सुकुर मोदक सुबक दिसतायत! Happy
डाळ आणि तांदूळ म्हणजे कम्लीट प्रोटीन झालं!

कडबू म्हणजे पुरणाच्या करंज्या असतात - मोदक नव्हे ना?
आणि कानवले म्हणजे तळण्याऐवजी वाफवलेले कडबू.
मात्र दोन्हींत खोबरं नसतं - हे खोबरं घातलेलं सुकुर-सारण नवीन आहे माझ्यासाठी.

मस्त दिसतायत !

ही रेसिपी पुपो उमो कोलॅबोरेशन वाटते. >>>> अगदी Happy

भारी आहेत !
मला खायलाही आवडतील . ...

अय्या ! "सुकुर मोदक" कसलं cute नाव आहे. सुरुवातीला मी सुकुमार वाचलं चुकून ..
आणि नंतर मोदक बघून सुकुमार हे विशेषण लागू होतंय असं हि वाटलं Happy
आणि मोदक पण मस्तच ! कळीदार !!
वावे , तुमचा मिक्सर उत्तम प्रतीचा दिसतोय एवढं गंधा सारखं वाटता आलं म्हणजे .. कारण ते सगळ्यात महत्वाचं आहे !!

पुपो उमो कोलॅबोरेशन वाटते >> Biggrin

मस्त झालेत मोदक. वेगळ्या सारणाची कल्पना आणि नाव दोन्ही आवडलं.

उकड छान झाली म्हणून मलाच छान वाटतय. तांदूळ भिजवून वाटून केलेली उकड खूप च छान होते, मळावी लागत नाही फार, पिठी नसेल तरी मोदक करता येतात वैगेरे वैगेरे ...

Pages