सकारात्मकता पेरणारी माणसे - निलिमा बोरवणकर

Submitted by अतुल ठाकुर on 12 August, 2020 - 06:28

neelimatai.jpg

शैक्षणिक क्षेत्रात अनेक सेमिनार्समध्ये विद्वानांची अनेक भाषणं ऐकण्याचा योग आला. बहुतांशी चर्चांमध्ये टिकेचा सूर होता. विषय कुठलाही असो. जेव्हा तो शेक्षणिक वर्तूळात चर्चिला जातो तेव्हा त्याच्या सर्व बाजू तपासल्या जातात. त्यामुळे एखाद्या मुद्द्याला लावून धरणारे जितके विद्वान असतात तितकेच त्यावर प्रखर टिका करणारेही आढळतात. माझे संशोधन व्यसनमुक्ती आणि स्वमदत गटांवर झाले आणि ते अजूनही संपले लेनाही. नवनविन गोष्टी उजेडात येत राहतात. अशा विषयांवर काम करीत असताना सकारात्मकतेचं महत्त्व लक्षात आलं. एखादा लेख, एखादी मुलाखत, एखादा प्रशंसेचा शब्द, एखादी पाठीवर पडलेली कौतूकाची थाप ही माणसाला फार मोठी उर्जा आणि सकारात्मक प्रेरणा देऊ शकते हे लक्षात आलं. त्यामुळे व्यसनमुक्ती आणि स्वमदतगट क्षेत्रात काम करीत असताना मी माझा दृष्टीकोण सेमिनारियन विद्वानांचा न ठेवता सर्वसामान्य माणसाचा, कौतुकाचा ठेवला. चांगलं दिसलं की त्याबद्दल लिहायचं ठरवलं. याचा मला फार उपयोग झाला. काल पार्किन्सन्स मित्रमंडळाच्या मासिक सभेत निलिमाताई बोरवणकर वक्त्या म्हणून आल्या होत्या. त्यांनी घेतलेल्या मुलाखतींवर आधारित त्यांचे व्याख्यान ऐकले आणि आपण योग्य मार्गावर चाललो आहोत याचे समाधान वाटले. निलिमाताईंनी असंख्य मुलाखती घेतल्या आहेत. त्यातील काही ठराविक मुलाखतींचे किस्से त्यांनी सांगितले. मूळातच त्या पार्किन्सन्स मित्रमंडळाच्या सभेत बोलत होत्या. वेळेआधीच आल्याने ही मंडळी एकमेकांशी कशी बोलतात, वागतात हे त्यांनी पाहिले आणि अचूकपणे तोच धागा पकडून पुढील भाषण केले.

त्या म्हणाल्या एका आजाराबरोबर आपण जगत आहोत अशावेळी मनात नैराश्य येणे स्वाभाविक असते. मात्र अशीही माणसे जगात आहेत जी भयंकर समस्यांशी लढत असताना, परिपूर्ण आयुष्य जगतात आणि दुसर्‍यालाही मदतीचा हात देतात. त्यांनी सर्वप्रथम एका लावणीकार्यक्रमाची हकीकत सांगितली. त्यात प्रेक्षकांमध्ये बसलेल्या एका बाईंनी लावणीला अगदी शिट्टी वाजवून दिलखुलास दाद दिली होती. त्या बाईंच्या या मोकळ्या वागण्याने निलिमाताईंचे लक्ष त्यांच्याकडे वेधले गेले. माहिती काढली असता कळले की त्या बाईंचा मुलगा अपंग होता. पण हे दु:ख असतानाही त्या बाई सकारात्मक दृष्टीकोण ठेवून जगत होत्या. जगण्यातला आनंद उपभोगत होत्या. या छोट्याशा घटनेतून प्रेरणा घेऊन अशा तर्‍हेने दु:खात देखिल भरभरुन आयुष्य जगणार्‍यांच्या मुलाखती घेण्याची प्रेरणा त्यांना मिळाली. पुढे त्यांनी अशा एका कुटुंबाची मुलाखत घेतली ज्यांनी दत्तक घेतलेला मुलगा अपंग निघाला. संस्थेने ते मुल परत घेण्याची तयारी दर्शविली होती पण त्या आई म्हणाल्या जर हे माझं स्वतःचं मूल असतं तर मी परत केलं असतं का? आणि त्या दांपत्याने ते मुल वाढवलं. पुढे त्यांचे पती वारले त्यानंतर त्या आईंनी एकट्याने त्या मुलाला वाढवले. ही मुलाखत प्रसिद्ध झाल्यावर निलिमाताईंना एक फोन आला. त्या फोनवरुन कुणीतरी त्या आईंचा संपर्क मागत होतं. श्रावणात साडीचोळी देण्याची पद्धत आहे. त्या फोनवरील मंडळींना या आईंना साडीचोळी देण्याची इच्छा होती. दत्तक घेतलेल्या आणि नंतर अपंग निपजलेल्या मुलाला वाढवणार्‍या आईची मुलाखत एवढी प्रेरणा देऊन गेली. या मुलाखतीतील माहिती वाचून आचार्य अत्रे प्रतिष्ठानाचा आदर्श माता पुरस्कार या मुलाच्या आईला मिळाला. हे घडत असतानाच या आईंना साडीचोळी देणार्‍या कुटुंबाबद्दल निलिमाताईंना कुतुहल वाटत होते.

माहिती काढली असता कळले की त्यांचा मुलगा मंगोल चाईल्ड होता. ही मुले मतीमंद असतात. त्यांची वाढ खुंटलेली असते. केस सरळ उभे असतात. समाजात अशांना चिडविणारे टवाळ असतातच. पण हे दांपत्य आपल्या मुलासाठी धडपडत होते. त्यांचीही मुलाखत निलिमाताईंनी घेतली. या मुलाचे नाव प्रथमेश. हा पुढे कंप्युटरवर टायपिंग शिकला आणि लायब्ररीत कामाला लागण्याईतकी त्याने प्रगती केली. नंतर निलिमाताईंना कुणीतरी फोन करून अशा मुलांना मिळणार्‍या राष्ट्रीय पुरस्काराची माहिती दिली. मुलाच्या आईवडिलांनी अर्ज भरला आणि भारत सरकारकडून सर्वोत्कृष्ट अपंग कर्मचारी या राष्ट्र्पती पुरस्कारासाठी प्रथमेशची निवड झाली. हा पुरस्कार स्विकारण्यासाठी प्रथमेश आणि त्याचे आईवडीलच नव्हे तर त्यांच्या भागातील अनेक लोक स्वतःच्या पैशाने तिकिट काढून प्रथमेशचे कौतूक पाहण्यासाठी दिल्लीला गेले होते. येताना हे कुटूंब मुद्दाम पुण्याला उतरुन निलिमाताईंना भेटले. कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी. निलिमाताईंना धन्य धन्य वाटले. पुढे सोन्याला कस्तूरीचा घमघमाट सुटावा त्याप्रमाणे प्रथमेश या पुरस्कारानंतर आंतरराष्ट्रीय पारितोषिकासाठी पात्र ठरला आणि त्या पारितोषिकासाठी त्याची निवडही झाली. प्रथमेशच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तूरा खोचला गेला. हे सारे निलिमाताईंनी घेतलेल्या मुलाखतीमुळे झाले. त्या मुलाखतीपासून इतरांनी प्रेरणा घ्यावे असा भला उद्देश डोळ्यासमोर ठेवून पुढे या मुलाखतीचे अनेक भाषांमध्ये भाषांतरही झाले. पुढे प्रथमेशचा मुख्यंमंत्र्यांच्या हस्ते सत्कार झाला. प्रथमेश आणि त्यांचे कुटूंबिय आयुष्यात पहिल्यांदा विमानाने प्रवास करून आले. त्यावेळी गंमत म्हणजे विमानातल्या मासिकामध्ये प्रथमेशचे कौतूक छापून आले होते. पुढे या सुगंधी सोन्याचा सुरेख दागिना घडून त्याची परिपूर्ती झाल्याप्रमाणे प्रथमेशच्या विकाराशी संबंधित एक आंतरराष्ट्रीय कॉन्सफरन्स भारतात झाली आणि त्याचा ब्रँड अ‍ॅम्बॅसिडर म्हणून प्रथमेशची निवड झाली. निलिमाताईंच्या मुलाखती घेणे सुरुच होते. या प्रवासात आणखी एक वेगळे कुटूंब त्यांनी पाहिले.

त्यातील दांपत्याला पहिला मुलगा होता आणि नंतर जुळ्या मुली झाल्या. त्यातील एक अपंग होती. मात्र हा मुलगा आपल्या दोन्ही बहिणींना खुप जपत असे. आईवडिलांना त्याची या मुलींना सांभाळण्यासाठी फर मदत होत असे. आयुष्य असे चालले असताना हा मोठा मुलगा परदेशी शिक्षणासाठी गेला आणि कॅन्सरने तेथेच त्याचे निधन झाले. हा दु:खाचा डोंगर कोसळला असताना त्या आईवडिलांनी त्यातून बाहेर येऊन अपंगांसाठी काम सुरु केले. शाळा काढली. त्यात अपंगांना निरनिराळी कौशल्यं शिकवून त्यांना रोजगार मिळावे यासाठी ही मंडळी प्रयत्नशील असतात. निलिमाताईंना एका अंध मुलाचाही असाच प्रेरणादायी अनुभव आला, त्याच्यासकट त्याची तिनही भावंडं अंधच निपजली. आणि त्या दु:खात वडिल गेले. आईने हिमतीने सर्वांना वाढवले. निलिमाताईंनी ज्या अंध मुलाची मुलाखत घेतली तो रेडियो जॉकी आहे. त्याचे भरपूर वाचन आहे, तो स्वयंपाक करु शकतो. पैसा कमवतो आणि आता एका अंध मुलीशी तो लग्न करणार होता. त्याला फक्त पोळ्या करता येत नाहीत असे तो म्हणाला मात्र त्याच्या होणार्‍या पत्नीला पोळ्या करता येतात. त्याच्यातल्या सकारात्मकतेबद्दल निलिमाताई भरभरून बोलल्या. तो म्हणत होता आम्हाला देवाने डोळे दिले नसले तरी ती कमतरता इतर इंद्रिये तीक्ष्ण करून भरून काढली आहे. त्याला सर्वसामान्य डोळस माणसांपेक्षाही इतर इंद्रिये वापरून अनेक गोष्टी लगेच कळतात. निलिमाताई तर स्वतःच त्याच्याकडे त्याची मुलाखत घ्यायला जाणार होत्या पण हा इतका उत्साही की हाच त्यांच्या घरी आला. त्याला आपल्या अंधपणासाठी कुणाची दया नको होती.

पुढे मस्क्युलर डिस्ट्रॉफी नावाचा आजार असलेल्या मुलाच्या पालकांची त्यांनी मुलाखत घेतली. ही मुले सर्वसामान्य मुलांसारखीच जन्मतात मात्र वयाच्या पाचव्या सहाव्या वर्षी या आजाराचे निदान होते. त्यानंतर काही वर्षांनी त्यांचे एकेक अवयव अशक्त होऊ लागतात आणि शेवटी हृदय बंद पडून या मुलांचा मृत्यु होतो. अगदी नॉर्मल असणारा आपला मुलगा हळुहळु अवयव निकामी होत शेवटी जाणार आहे हे हलाहल पालकांना पचवत जगावं लागतं. अशा एका मातेचे उद्गार निलिमाताईंनी आम्हाला संगितले. त्या आई म्हणाल्या माझा मुलगा फक्त सोळाच वर्ष माझ्या बरोबर होता पण तो इतका गुणी होता की त्याने माझ्या मातृत्वाला परिपूर्णता दिली. पूर्वी देव वर मागितल्यावर विचारायचे अल्पायुषी सद्गुणी मुलगा हवा कि दीर्घायुषी दुर्गुणी हवा? मला सद्गुणी मुलगा मिळाला. आईपणाचे समाधान त्याने दिले. मुलाच्या मृत्युकडे त्या बाई किती सकारात्मकपणे पाहात होत्या. या मुलाखतीनंतर निलिमाताई स्वतःच्याच उपचाराकरीता एका सुप्रसिद्ध डॉक्टरांकडे गेल्या असता त्यांना कळले की या डॉक्टरांकडे मस्क्युलर डिस्ट्रॉफीचे रुग्ण येतात. अशावेळी त्या आईवडिलांना तुमचा मुलगा बरा होणार नाही हे सांगणं डॉक्टरांना फार कठीण वाटत असे. या डॉक्टरांच्या वाचनात निलिमाताईंनी घेतलेली मुलाखत आली. आणि आता डॉक्टरांनी त्या मुलाखतींच्या काही प्रती काढून ठेवल्या आहेत. मस्क्युलर डिस्ट्रॉफीचे रुग्ण आले की ते त्यांना ही मुलाखत वाचायला देऊन त्यांच्या मनाची तयारी करून घेतात. निलिमाताईंकडून डॉक्टरांनी आपली फी घेतली नाही. असे असंख्य अनुभव निलिमाताईंच्या गाठीशी आहेत.

निलिमाताईंनी अनेक मान्यवर आणि लोकप्रिय व्यक्तींच्या मुलाखती घेतल्या. त्यात डॉ. जयंत नारळीकर, स्मिता तळवलकर, प्रशांत दामले,आरती अंकलिकर, विक्रम गायकवाड अशी सुप्रसिद्ध नावे आहेत. यातील अनेकांशी त्यांची मैत्री झाली आहे. यापैकी रंगभूषाकार विक्रम गायकवाड यांचा संघर्ष निलिमाताईंनी काही मिनिटात आमच्यासमोर उलगडला आणि त्यांच्या आयुष्याच्या सुरुवातीचे कष्ट समोर आले. त्याचप्रमाणे आपापल्या क्षेत्रात जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेल्या परंतु सर्वसामान्यांना माहित नसलेल्या साखरेची गोडी या विषयात तज्ञ असलेल्या वसुधा केसकर यांच्यासारख्या संशोधकाच्याही मुलाखती निलिमाताईंनी घेतल्या आहेत. मात्र आज बोलायचे होते ते पार्किन्सन्स मित्रमंडळातील सदस्यांबरोबर. त्यामुळे त्यांनी आपल्या बोलण्याचा रोख दु:खांवर मात करून जी मंडळी पुढे आली यावर जास्त ठेवला होता. व्याख्यानाची वेळ संपत आली होती आणि निलिमाताईंकडून किस्से कितीही ऐकावेसे वाटले तरी थांबणे भाग होते. शेवटी पुन्हा येण्याचे आश्वासन देऊन निलिमाताईंनी आपले व्याख्यान संपवले. संपवताना त्यांनी असे किस्से सांगताना आपल्यालाही कशी सकारात्मक उर्जा त्यातून मिळत गेली हे आवर्जून नमूद केले. पार्किन्सन्स मित्रमंडळातील सदस्यांचे आपापसात आपुलकिने भेटणे, या वयातही आधुनिक तंत्राशी मैत्री करून आजच्या लॉकडाऊनवर मात करून एकमेकांना ऑनलाईन भेटून आनंद मिळवणे या वृत्तीची त्यांनी प्रशंसा केली. निलिमाताईंचे व्यक्तीमत्व कुणालाही त्यांच्याशी चटकन मैत्री कराविशी वाटेल असेच आहे. त्यांचा स्वभाव बोलका आहे. आपल्या येण्याने, असण्याने वातावरणात चैतन्य आणणार्‍या काही व्यक्ती असतात. मला त्या अशा वाटल्या. त्यांनी बोलताना नम्रतेची पराकाष्ठा केली. त्यांच्या मुलाखतींचा इतरांच्या आयुष्यावर इतका परिणाम झाला पण त्या मात्र त्याचे फारसे श्रेय घ्यायला तयार नाहीत. इतक्या मुलाखतींनंतरही आणखी अशा अनेक माणसांना भेटण्याची त्यांची ओढ मला महत्त्वाची वाटली. कालच्या त्यांच्या व्याख्यानामुळे आपल्या दु:खाचे आपण जरा जास्तच कोडकौतुक करत असतो याची मला तरी पुन्हा एकदा नव्याने जाणीव झाली. आपले दु:ख क्षुद्र वाटावे अशी झंझावाताप्रमाणे आयुष्य उलथून टाकणारी दु;खं पचवून माणसे नुसती उभीच राहात नाहीत तर दुसर्‍यांसाठी मदतीचा हातही पुढे करतात हे पाहिले. खरंच त्यासाठी निलिमाताईंसारख्या सकारात्मकतेची पेरणी करून उर्जा देणार्‍या माणसांचे मला फार आभार मानावेसे वाटतात.

अतुल ठाकुर

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेख आवडला.
निलीमा ताईंनी घेतलेल्या मुलाखती बघा- ऐकायला / वाचायला आवडतील. कुठे मिळतील.

या लेखात उल्लेख केलेल्या साखरेची गोडी या विषयात तज्ञ असलेल्या वसुधा केसकर .या आपल्या मायबोली सदस्य असलेल्या सई केसकर यांच्या आई आहेत ना? जाणकारांनी प्रकाश टाकावा pls .

पुढे मस्क्युलर डिस्ट्रॉफी नावाचा आजार असलेल्या मुलाच्या पालकांची त्यांनी मुलाखत घेतली. ही मुले सर्वसामान्य मुलांसारखीच जन्मतात मात्र वयाच्या पाचव्या सहाव्या वर्षी या आजाराचे निदान होते. त्यानंतर काही वर्षांनी त्यांचे एकेक अवयव अशक्त होऊ लागतात आणि शेवटी हृदय बंद पडून या मुलांचा मृत्यु होतो...
****
हाच आजार आहे माझ्या मुलीला 'आदिश्री' (वय १२) ला , तिचे चालणे दहाव्या वर्षी बंद झाले. मानेखाली अजिबात शक्ती नाही, एका हातात थोडी आहे. आता पॉवर व्हिलचेअर मध्ये.... पण प्लीज ते आयुष्य मर्यादा बदलणार का , आम्हाला doctor ने तसे कधीही म्हटले नाहीये. खूप प्रकार असतात , genes प्रमाणे , ours in LGMD 2E. It is progressive. तुम्ही पण तुमच्या बाळासोबत तीळातीळाने मरता Sad !
पुढे लेख वाचू शकले नाही. But there is a research going on in Ohio , by Dr. Jerry Mendall on putting an artificial gene inside the body so it will make the necessary protein. We got rejected for the first genetic trial, because she couldn't meet the criteria.
मी स्वतः एकदा लिहिणार आहे याबद्दल but it throws me off the cliff every time I speak about M.D.
मला निदान व्यक्त तरी होता येतं ज्यांना येत नाही त्यांना तर किती एकटं वाटत असेल म्हणून लिहिणार नक्की.
धन्यवाद अतुल.

अस्मिता माझ्या कडे शब्द नाहियेत की काय लिहावं.. ज्या सकारात्मकतेने तू लिहितेस खरचं खूप कौतुक वाटतं मला.. काळजी घे..

धन्यवाद वावे आणि रूपाली,
पण प्लीज अतुल यांच्या ललितावर प्रतिसाद देणे ही विनंती माझ्यामुळे अवांतर नको.
सगळ्यांना धन्यवाद. मायबोलीचा फार आधार आहेच !!

चांगली ओळख!
मी_अस्मिता, more power to you! Take care!

मी_अस्मिता तुमचं दु:ख सर्वांच्या प्रतिसादामुळे कणभरही कमी होत असेल तर असले माझे अनेक लेख मी त्यावरुन ओवाळून टाकेन. प्लिज संकोच करु नका.योग्य कारणांसाठी धागा वाहावत गेला तरी चालेल. येथे तुम्ही स्वत:चं काही म्हणणं मांडलंत तरी काहीही हरकत नाही. अहो शेवटी बोलण्याने थोडं तरी हलकं वाटत असेल तर संकोच कसला.

आता पॉवर व्हिलचेअर मध्ये.... पण प्लीज ते आयुष्य मर्यादा बदलणार का , आम्हाला doctor ने तसे कधीही म्हटले नाहीये.
काही बदल केले आहेत आता लेखामध्ये. तुम्हाला त्रास झाला त्याबद्दल हात जोडून क्षमा मागतो.

No worries Atul, I am a tough cookie!
मला अजिबात वाईट वाटले नाही खरंच , क्षमा वगैरे कशाला !! Please don't feel bad.
But I think it is unprofessional and unethical to predict about someone's lifespan.
बाकी काही नाही वाचणाऱ्यांना चुकीचे /नकारात्मक वाटू नये म्हणून. Happy Thanks.

धन्यवाद अतुल जी. तुमच्या मुळे आभाळाच्या उंचीची माणसं समजतात, त्यांचं कार्य कळतं. प्रेरणासुध्दा मिळते. खूप धन्यवाद!

कितीही कौतुक केलं तरी कमीच आहे अशा माणसांचं, देव त्यांना उदंड आयुष्य देवो.
मी_अस्मिता खूपच सकारात्मक आहेत तुमचे विचार, god bless you and your princess.
Happy

खूप छान लेख आहे. वाचूनच खूप सकारात्मक वाटलं.

अस्मिता, तुम्हीसुद्धा ह्या लेखात सांगितलेल्या पालकांप्रमाणेच सकारात्मक आणि धैर्यशील आहात. तुमचं इतर लेखन वाचून तुम्ही खूप आनंदी आणि मिश्कील स्वभावाच्या वाटता. खरंच, ज्या सकारात्मकतेने तुम्ही हे सत्य स्वीकारुन आयुष्य खऱ्या अर्थाने जगताय, त्याला सलाम. खूपच कौतुक तुमचं.

अस्मिता तू जेव्हा कधी लेख लिहीण्याचा निर्णय घेशील तेव्हा नक्की अभ्यासपूर्ण तसेच पर्सनल टच असलेला असा दोन्ही मेळ खाणारा लिहीशील, याची खात्री आहे. लुकिंग फॉर्वर्ड टू इट.
तुझ्याही धैर्याला, चिकाटीला आणि कठीण काळातही आनंदी रहाण्याच्या वृत्तीला सलाम. आम्हाला तुझ्या मनःस्थितीची कल्पनाच येणे शक्य नाही. जावे त्याच्या वंशा हेच खरे.

खूप छान लेख अतुल Happy

अस्मिता, आम्ही आहोत! खंबीर रहा Happy
सई, अभिनंदन...मला माहीत नव्हते हे Happy

खुप छान लेख अतुल जी . तुम्हीसुद्धा खुप चांगलं काम करताय.

अस्मिता काय म्हणू तुझ्या बद्दल, वर सामो यांनी म्हटल्याप्रमाणे जावे त्याच्या वंशा! तुला लागेल ती सगळी मदत मिळो आणि शक्ती मिळो आणि यात यशही मिळो.

लेख खरंच छान आहे. आज शांत चित्ताने पूर्ण वाचला. तुम्ही केलेला बदल पण सकारात्मक वाटतोयं. तुमचे विशेष आभार अतुल , तुमच्यामुळे मलाही थोडी फार वाचा फुटली. तुम्ही मला समजूनही घेतले. तुमच्या कुठल्या उपक्रमासाठी माझा काही उपयोग होऊ शकत असेल तर जरूर कळवा., मी माझा फोन नंबर देईन. धन्यवाद.
****
सर्वांना सदिच्छांंबद्दल खूप खूप आभार.

सुरेख लेख!

Submitted by सामो on 13 August, 2020 - 00:07>>>+१.

सुंदर लेख.
Submitted by सामो on 13 August, 2020 - 00:07>>>+१.

Pages