मनाचा लॉकडाऊन

Submitted by अमृताक्षर on 12 August, 2020 - 02:43

मनाचा लॉकडाऊन

घरात बसून बसून कंटाळा आला म्हणून जरावेळ गच्ची वरच्या झुल्यावर बसले..
तिथून आजूबाजूचे सगळे रस्ते आणि दुकान दिसत होती..दूरदूरपर्यंत कुणीही दिसत नव्हत..सगळ बंद..सगळ शांत..वेळ जणू थांबूनच गेली होती..
कितीतरी दिवसाने पक्षांचा किलबिलाट, पानांची होणारी सळसळ, चेहऱ्याला स्पर्शून जाणारी वाऱ्याची मंद झुळूक, विंडचैन चा होणारा मधुर नाद, घरामागच्या मंदिरातील वाऱ्याने वाजणाऱ्या घंटी चा सुरेल नाद, झेंडावंदन ला गॅलरी मधे लावलेल्या पताकांची फडफड, झुला झुलताना हळूच येणारा वरच्या कडीचा लयदार आवाज, बाहेर दोरीवर चिमटे लावून वाळत घातलेल्या कपड्यांची तडफड असे कितीतरी आवाज जे रोजच्या जगण्यात कुठेतरी विरून गेले होते ते आज कानावर पडत होते..
या धकाधकीच्या जीवनात घड्याळाच्या काट्यांच्या तालावर नाचणारे आपण आज चक्क सगळी घड्याळे बंद करून ' काहीही न करता ' घरी बसलोय..
सतत भविष्याचा वेध आणि भूतकाळाचा पाठपुरावा करणारे आपण वर्तमानात कधी जगूच शकलो नाही..सतत धावपळ, काळजी आणि चोवीस तास मनात असलेली कशाची तरी चिंता..नेहमी धावतच असायला पाहिजे नाहीतर या स्पर्धेच्या युगात आपण मागे पडून जाऊ हा विचार..सतत स्वतःला प्रत्येक पातळीवर सिध्द करण्यासाठी केलेली वेडी धडपड..या सगळ्यातून स्वतःसाठी वर्तमानात जगायला एक क्षणही आपण काढू शकलेलो नसतो..
कधीतरी विकांताला फिरायला जाणं किंवा इतर तत्सम गोष्टी आपण करतो पण खरच तेव्हा त्या क्षणी आपण मनाने कायम तिथे असतोच का?
कारण कुठलही असो (सध्यातरी या शांततेचं कारण अगदी ना आवडत आहे..कोरोनो तू जा बाबा लवकर) हे असं रिकाम बसून राहायला आपल्याला जमेल अस कधीच कुणाला वाटल देखील नसेल (अपवाद वगळता)..पण आज पटलंय की या विश्वाच्या पसाऱ्यात सगळ्यात महत्वाचं काही असेल तर ते आहे आपलं ' असणं ' बाकी सगळ्या गोष्टी मग गौण आहेत..
परीक्षेच्या वेळी सगळे म्हणायचे मन शांत ठेव ध्यान कर पण ध्यान धारणा करून सुद्धा मनाला पाहिजे तशी शांतता कधीच अनुभवता आली नाही पण आजची बातच काही और होती..
काही विशेष प्रयत्न न करता सुद्धा एकदम शांत वाटत होत..
कारण...कारण..
आज फक्त निसर्ग चालू होता आणि माणसांचं कृत्रीम जग बंद पडलेलं होत....

प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users