दहीहंडी - २
आठवणीतील गोविंदा (भाग-१)
शब्दांकन - तुषार खांबल
"दहीहंडी" या शब्दात काय जादू आहे माहीत नाही, पण नुसतं नाव जरी वाचलं तरी रक्त सळसळून उठतं.... याचं कारण पाहिलं तर दहीहंडीचे बाळकडू लहानपणीच आम्हाला पाजले गेले हे असावे... घरात नवीन कॅलेंडर आल्यावर पहिली दहीहंडीची तारीख बघण्याचा आनंद घेतो तोच खरा गोविंदपटू असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही.....
माझा दहीहंडीचा प्रवास हा वरळी ते विरार असा झाला..... वरळी बी.डी. डी. चाळ ५८ मधील 'अमर क्रीडा मंडळ' ह्याचा मी एक भाग होतो. लहानपणी आम्ही मोठ्यांच्या दहीहंडी पासून काही अंतरावर आमची छोटीशी हंडी बांधायला सुरुवात केली... हळू हळू कधी त्या हंडीचे स्वरूप मोठे झाले हे समजलेच नाही... सुरुवातीच्या काळात पायी चालत वरळी, प्रभादेवी आणि दादर या परिसरात आपली कला सादर करणारा आमचा गोविंदा कालांतराने ट्रक आणि बसेस मधून नवी मुंबई, पनवेल, पेण पर्यंत जाऊन पोहचला....
या मंडळात असतानाचा आठवणीतील प्रसंग म्हणजे पनवेल मधील 'रसायनी' येथील हंडी.... आमच्याच मंडळातील एका गोविंदाच्या ओळखीतून आम्हाला त्याठिकाणी निमंत्रित करण्यात आले होते.... मुंबईतील एक पथक आपल्या गावात येणार आहे याची चर्चा संपूर्ण रसायनी गावात पसरली होती... गावाच्या मुख्य वेशीपासून जवळपास २० मिनिटांच्या अंतरावर एका मोठ्या मैदानात दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते... अनेक उत्साही बालगोपाल आमच्या मंडळाच्या स्वागतासाठी गावच्या वेशीवर उपस्थित होते.....
आमच्या ट्रकने जसा गावात प्रवेश केला तसा आमच्या मंडळाच्या ब्रास बँड वाजू लागला.... त्याबरोबर गावातील आमची वाट पाहत असलेले सर्व बालगोपाल आमच्या ट्रकच्या सोबत येऊ लागले..... सर्व जनतेचे अभिवादन आणि अंगावर पडणाऱ्या पाण्याचा आशीर्वाद स्वीकारत आम्ही अखेर कार्यक्रमाच्या स्थळी पोहचलो.... आम्हाला पाहण्यासाठी तोबा गर्दी उसळली होती.... मैदानात माईक वरून "आपण ज्यांची वाट बघत आहोत ते 'अमर क्रीडा मंडळ' या ठिकाणी आले आहे अशी अनाउसमेंट करण्यात आली...
मैदानाच्या प्रवेशद्वारातून आत जाताना टाळ्या वाजवून आमचे स्वागत केले जात होते... चारी बाजूने पाहिलं तर संबंध गाव आमचा गोविंदा पाहण्यासाठी आला होता.... स्टेजवर गावातील मान्यवर मंडळी बसले होते.... आणि 'सेलिब्रेटी' म्हणून खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी फक्त गोविंदा पथकांला मान देण्यात आला होता... समालोचकाने उपस्थितांना आमच्या मंडळाची ओळख करून दिली.... आणि सात थर लावून ही दहीहंडी फोडणार असल्याचे सांगितले..... इतका जनसमुदाय आणि त्यांच्या मनात तयार झालेली आमची 'इमेज' पाहता सात थर लीलया लावत असणाऱ्या आमच्या मंडळाच्या मनावर काहीस दडपण आलं होत.... पहिल्याच प्रयत्नात हंडी फुटली पाहिजे असा चंग बांधून आम्ही सर्व तयार झालो....
प्रशिक्षकाने सर्व रचना केली आणि आमचे श्रद्धास्थान असलेल्या 'भोगदेवी' मातेचा जयजयकार करीत एकएक थर रचण्यास सुरुवात केली.... एखाद्या क्रिकेट सामन्याप्रमाणे माईकवर समालोचन सुरू होते... प्रत्येक जण आपली संपूर्ण शक्ती त्याठिकाणी पणाला लावून होता.... सातवा थर उभा राहिला आणि हंडी फुटली असा आवाज कानावर पडला.... जसे थर उभे केले त्याच पद्धतीने खाली उतरले..... आणि एकच जल्लोष त्याठिकाणी सुरू झाला....
गावकऱ्यांच्या टाळ्यांच्या आवाजापुढे स्पीकरही शांत वाटत होता.... सर्व बेभान होऊन नाचत होतो..... पारितोषिक देण्यात आलं..… राष्ट्रगीत होऊन कार्यक्रमाची सांगता झाली.... तिथून निघाल्यावर काही हौशी मुले आपापल्या गाड्यांवरून वेशीपर्यंत आम्हाला निरोप देण्यासाठी आली होती.... पुढील वर्षी पुन्हा भेटण्याचे आश्वासन देऊन आम्ही त्या ठिकाणाहून पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झालो.... त्यानंतर आजही वरळीतील नामांकित गोविंदा पथकांमध्ये "अमर क्रीडा मंडळ" हे नाव आदराने घेतले जाते...
खूप छान लिहिलियं.. तुषार.
खूप छान लिहिलियं.. तुषार. रोमांचक प्रसंग उभा केला आहेस डोळ्यासमोर. लहानपणी खूप आनंद लुटला आहे दहिहंडीचा.
खूप छान लिहिलियं. रोमांचक
खूप छान लिहिलियं. रोमांचक प्रसंग उभा केला आहे डोळ्यासमोर. >>> +१
धन्यवाद रुपाली.... यावर्षी
धन्यवाद रुपाली.... यावर्षी खूप मिस करतोय दहीहंडी..... पण पुढल्या वर्षी तोच उत्साह आणि जल्लोष घेऊन पुन्हा उभे राहू....
धन्यवाद हर्पेन
धन्यवाद हर्पेन
अप्रतिम लिखाण तुषार सर.
अप्रतिम लिखाण तुषार सर. प्रत्यक्ष अनुभव घेत आहोत असं वाटतं होत
धन्यवाद प्रितु
धन्यवाद प्रितु