ती संध्याकाळ अन निसर्गाशी तादात्म्य पावलेली माझ्या जिव्हाळ्याची माणसं

Submitted by रेव्यु on 4 August, 2020 - 22:56

१९९७ साली मी लिहिलेल हे पत्र रूपी मनोगत आहे.तसच्या तसं पुनः प्रकाशित करीत आहे
प्रिय-----व सौ----- यांस स न.वि.वि.
गेल्या खेपेस मी पाठविलेल्या पत्रास आपण दिलेला उत्स्फूर्त अन उत्तेजनात्मक प्रतिसाद पाहून मी पुनः लेख वजा पत्र लेखनास बसलोय.
गेल्या वीकांतास मी अनुभवलेल्या ,बेफाम वेडावून नेणार्‍या सृष्टी सौंदर्यास शब्दात बांधण्याचा हा एक खुळा प्रयत्न आहे.
आपण मित्रलोक कोणत्या जातीचे???
"या जगण्यावर -या जन्मावर शतदा प्रेम करावे"या ओळी लिहिणारे मंगेश पाडगांवकर वेडे की काय असे सदोदित वाटणार्‍या लोकांच्या जातीतले आपण्-फॅक्टरीजिवी ( बुध्दिजीवी,श्रमजीवी बरोबर हा एक शब्द प्रचलित होण्यास हरकत नाही-).
थोडे विषयांतर होतेय.पण "फॅक्टरी जिवी" म्हणजे कोण्??वैयक्तिक आयुष्यात केंव्हाही व्यत्यय करू देण्याचा हक्क सर्वांना-विशेषकरून ग्राहकाच्या सर्व लोकांना कुठल्याही करार पत्राविना देवून्(गमावून) चुकलेला,कंपनीने दिलेल्या घरातील टेलिफोन ला वाईट बातम्या अवेळी -कमीत कमी ९०% वेळा न दिल्यास तुझ्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल अशा ताकिदीवर चालू ठेवणारा,व आपले व्यक्तिमत्व व व्यक्तिगत आयुष्य फॅक्टरीस स्वाहा केलेला असा अश्राप जीव म्हणजे फॅक्टरी जीवी.त्यात तो जर तिथला जनरल मॅनेजर असला तर मग वरील परिस्थितीवर शिक्का मोर्तबच!!
तर असा हा फॅक्टरीजिवी अर्थात अस्मादिक अन कुटुंबिय परवा सायंकाळी इथून २० २५ मैलावर असलेल्या नौकुचिया ताल या उतारांचलातील एका अत्यंत निसर्ग रम्य ठिकाणी गेलो होतो.(आमचे वास्तव्य तेंव्हा हल्द्वानी-काठगोदाम -कुमाऊ हिमाचल्-उत्तरांचल मध्ये होते.पत्नी ,दोन लहान मुली अन मी असे चारजण त्या स्वर्ग तुल्य भूमीत वास्तव्याला होतो.)
तत्पूर्वी
आम्ही हल्द्वानीला आल्यावर आम्हाला कळले की नैनितालला एक खेर रहातात्.लगेच पत्ता काढला अन लौकरात लौकर नैनिताल गाठले.अत्यंत दुर्गम अशा रस्त्यावर्(डोंगरातील रस्ते चुकले की काय होते हे सूज्ञांस सान्गणे न लगे)गाडी फर्स्ट गेयर चढतेय अन अचानक अक्षरशः रस्त्याचा शेवट आला असा प्रकार झाला-समोर ट्रान्स्फर सीन.२७० अंशात मान फिरवली तरीही हिमालयाची श्रुंखला संपत नव्हती,तिथे दिवसा १ वाजता शेकोटी भोवती कोंडाळे करून बसलेल्या ३ ४ पहाड्यांना विचारले.ते म्हणाले-"खेर साब?? आप तो उलटे आ गये!! मुड जाओ-पास मे ही है."आता त्या ६० अंशाच्या कलत्या अरुंद रस्त्यावर गाडी वळवताना त्या थंडीतही घाम फुटला-त्या घसरगुंडी वरून गाडी उतरू लागली अन लगेचच "पॅरॅमॉउन्सी" या नावाच्याएका बंगल्यासमोर एक अत्यंत रुबाबदार ,प्रसन्न व्यक्तिमत्व एका अवाढव्य अन तितक्याच मवाळ अन मयाळू दिसणार्‍या कुत्र्यासह अम्हाला हातवारे करून थांबवत होती .मी मग प्रतिप्रश्न केला
"आपण खेर साहेब का"
"हां जी ,मैं खेर और यह लिशा"अशी ओळख झाली
एवढ्यात -"अरे बाबा-ते लोक आले का?"अशी मंजुळ हाकारी आली .तितक्याच प्रसन्न्,मार्दव पूर्ण अगत्यशील अन पहिल्याच फेरीत "अपनानेवाल्या'(काही शब्द शोधून सापडत नाही हे मराठीत्-त्यातला हा एक) सौ खेर प्रकट झाल्या.या वयाने वयस्क अन मनाने चिर तरुण दांपत्याशी आमच्या अशा सुसंवादी तारा जुळल्या की"कुठे होता इतके दिवस्"असे राहून राहून वाटू लागले.
हे खेर साहेब मूळचे झांशीचे.व्यवसायाने धातू शास्त्रज्ञ-मेटेलर्जिस्ट्.स्वभावाने अत्यंत सुशील्,ज्ञानसाधनेत असा व्यासंगी विरळां असा निसर्ग प्रेमी,पक्षीप्रेमी,साहित्यप्रेमी असा साधक ,वाचक मिळणे नोहे.वनस्पती,पक्षी,फुले,डोंगर्,प्राणी,घरची कुत्री,बागकाम्,स्वयंपाक ---अलेक्सांडर पोप्,सॉमरसेट मॉम्,शेक्स्पीयर्,पर्ल बक ,मिल्टन्,वर्डस्वर्थ,भीमसेन्,जगजीत,फोटोग्राफी सगळ्याशी असा सुसंवाद साधलाय की त्यांच्या सान्निध्यात नुसती निखळ 'आनंदाचे डोही आनंद तरंग "ची अनुभूती असायची.मुलां बरोबर मूल मुलींबरोबर एन्साक्लोपिडिया घेऊन बसतील -.मुलीनी अर्थ्रायटीस वर प्रॉजेक्ट करायचे म्हटल्याबरोबर बाबांनी "आत्ता,आत्ता"अशा बालसुलभ उत्साहाने रीडर्स डायजेस्ट चा टेल् मी नाऊ सारखी ७-८ पुस्तके तक्ते ,चित्रे काढतील,स्वतःच्या स्टडी मधून धावपळ करीत पुस्तके काढतील अन रमून जातील हो.अन वय काय असावे बरे -सत्तर वर्षे,
याना जोडीदार ही अशाच प्रसन्न अन समाधानी साधक्-सौ मंजरी.मूळच्या चिपळूणच्या.झांशीच्या खेरांशी विवाह्.त्यांचे सासरे म्हणजे खेर साहेबांचे वडील ब्रिटिशांच्या काळात नैनिताल ला सरकारी नोकरीत आले अन तिथेच घर बान्धून स्थायीक झाले.मंजरी ताई स्वतः प्रथित यश डॉक्टर -त्यानी त्या भागातील पहाडी गरीब लोकांच्या सेवेसाठी वाहून घेतले आहे.
हे सर्व लिहिणे आवश्यक आहे कारण इतके सुसन्स्क्रुत अन प्रेमळ ,उत्साही दांपत्य आम्हाला लाभले अन आमच्या जीवनाचे संदर्भ ,द्रुष्टीकोन अन सौन्दर्य मूल्येच बदलली यांचा परिस स्पर्श होवून्.आजही बाबांचे एक वाक्य माझ्या अंतर्मनात कोरले आहे" रवी-लोकांना कंटाळा कसा येऊ शकतो ,इतके सारे करायचे राहून गेले असताना?" हाऊ ट्रू???
या उभयतानी एक घर बांधले आहे त्याच उत्साहाने अन सौन्दर्य द्र्ष्टीने,नौकुचियातालला.खूप दिवसा पासून अगत्याने अन आग्रहाने ते बोलावीत होते.वर सांगितल्याप्रमाणे एका शनिवारी सायंकाळी ४-४-३० ला गाडी काढली.मनातील फॅक्टरीच्या कप्प्यास जेवढे भले मोठ्ठे लावता येईल तेवढे मोठे कुलूप लावले,किल्ली दूर भिरकावून दिले अन निघणार तेवढ्यात --अचानक---"नभ मेघानी आक्रमिले".झंझावाती वारा,कडाडणार्‍या वीजा अन मग "बादरवा बरसन लागी".वीकांताला आणखी काय सॉल्लीड सलामी मिळावी महाराजा!!
मग गाडीत "भरल आभाळ ,पावसाळी पाहुना गं"" घर आजा घिर आये बदरा सावरिया","रिम्झिम बरसे सावन बुन्दिया" ची बहारदार अंताक्षरी सुरू झाली.--वा काय गाणी !
गाडी मार्गाला लागली.डोन्गरी वळणावळणाचा रस्ता-सूर्य आच्छादलेला.साडेतीन चार हजार फूट उन्चीवरून हल्द्वानीच्या रामगन्गा नदीचे प्रचंड पात्र दिसू लागले.या कुमाऊं प्रदेशात घनदाट जंगल आहे. हिरव्या रंगाच्या किती छटा असाव्यात्.कोंदण्यातल्या या पाचूला किती पैलू असावेत्,मन मोहरून जाते.क्षणोक्षणी द्रुश्य बदलत होते.खाली सपाट प्रदेशात भिरभिरणार्‍या वावटळी-इतक्या उंची वरून प्रचंड भोवर्‍यासारख्या दिसत होत्या.इतका मनोहर प्रवास क्वचितच नशिबी असतो,पदरी पडतो ,याचाच आम्हा सर्वाना अमाप आनंद होता.
नैनिताल पासून २५ मैलाच्या वर्तुळात अनेक सुंदर लेक्स( लेक्स्---लेक्स्----म्हणजे---मराठीत्----अरे हो सरोवर्---न आठवून जाते कुठे "लेकाचे" :))आहेतं नौकुचिया ताल,भिमताल्,सात ताल,खुर्पा ताल इ. अशी अनेक सरोवरे या परिसरात आहेत्.आपल्या देशात ,खेड्यात ,विशेषतः निसर्गाच्या सान्निध्यात पहुडलेल्या लहान लहान पाड्यात अनेक सुंदर आख्यायिका पिढ्यान पिढ्या प्रवास करून जतन केल्या गेल्या आहेत्.कुठे पांडव आले होते,कुठे यक्ष्,कुठे किन्नर अन कुठे जलकन्या अन पर्‍या. निरागस सुंदर कथा असतात्,अन त्यात भर पण पडत असते.या नौकुचिया तालाची ही अशीच गोष्ट आहे.याची नऊ टोके म्हनजे नवग्रहांचे दालन/वास्तव्य्,अथवा नऊ यक्षिणी पोर्णिमेच्या रात्री तिथे जलविहार करून नृत्य करतात म्हणे.या प्रदेशात चित्ते अजूनही धुमाकूळ घालतात.
असो,मेघाच्छादित "घनघोर घटा छायी" अशा आकाशाखाली आम्ही नौकुचिया तालला पोहोचलो.सात वाजत आले होते.एका दुर्गम वळनावरून गाडी घराच्या फाटकात शिरली.डोंगरातील घरे म्हणजे वरच्या मजल्यावर वरच्या वळणावरून प्रवेश अन तलमजल्यावरून खालच्या वळणावरून प्रवेश.चारी बाजूना अत्यंत सुंदर बगीचा.अवताली भवताली असलेल्या निसर्गास कुठल्याही प्रकारची विद्रूप बाधा न आणणारे कुंपण्.घराच्या सरळ समोर सरोवरापलिकडे घनदाट असलेले जंगल्.घरासमोर अंगणातच ते भव्य सरोवर जणू काही खेरांच्याच मालकीचे -त्याच्या मन मोहक हिरव्या अन निळ्या संमिश्र छटा.डोंगरावरून येणारा मलय मारूत -शीतल वारा.या सरोवराचे वर्णन करायला शब्द पुरत नाहीत हो.किनार्‍यावर एक छोटेसे देऊळ्.मधेच किणकिणणारी घंटा.मधेच दूरून ऐकू येणारी घुबडांची हांकारी वा जंगली पक्षांची कुजबूज्. हल्द्वानीच्या ३६ अंश से. वरून १५ अंशापर्यंत उष्मा उतरला होता.सूर्य मलूल झाला होता.असे शांत गूढ वातावरण साद घालीत होते.
आमची चाहूल लागताच मंजिरीताई बाहेर आल्या,ऊबदार स्वागत झाले,बाबा ही आले,वाफाळणारा चहा आला.सरोवरासमोर गच्चीवर बसलो.बाबानी त्यांच्या आणखी एका नातेवईकांची-म्रुणाल ताईंची ओळख करून दिली.
समोर ते भारावणारे निसर्ग चित्र्,इतकी प्रेमळ अन जिव्हाळ्याची माणसे,वाफाळणारा चहा,अन हळू हळू होणारा सूर्यास्त्,नीरव शांतता,घरट्यात परतणारे खगगण्,--या पक्षांना पाहून स्वच्छंद या शब्दाचा अर्थ कळला.त्या जंगलात "ते" मालक होते.शहरातील पक्षी किती झाले तरी दबकत वावरतात्-कुठल्यातरी तणावात्.याची प्रचिती या जंगली पक्ष्याना पाहून झाली.एका फांदीवरून दुसर्‍या फांदीवर कलरव करीत ते कल्पनातीत नृत्य करीत होते.मुलं अन ही फूल वेडी,पक्षी वेडी-त्यांची जिज्ञासा पूर्ण करणारे खेर बाबा.एका झाडावर वेळोवेळी एकाच प्रकारचे ६-७ पक्षी यायचे अन लगेच उडून जायचे.बाबानी संगितले यांचे नाव जंगल बॅबलर्स किंवा सेवन सिस्टर्स्,साताचा घोळका होईपर्यंत ते एकत्र जमतात अन उडून जातात. त्यांचा हा खेळ पहाण्यात मीहि रमून गेलो,हरवून गेलो.
अन पुनः झंझावाती वारे सुरू झाले.गर्द जंगलात सुसाट्याचा वारा हुं हूं करीत पिंगा घालू लागला.वर धिप्पाड काळेभोर ढग थैमान घालू लागले.वीजांचे नर्तन सुरू झाले अन गच्चीवर बसलेले आम्ही ते टपोरे थेंब पडताक्षणीच आत पळालो.
तळ्यातील नि:श्चल स्तब्ध पाण्यावर पडणारे ते टपोरे थेंब अन असंख्य वलये,त्यावर पडणारे -ढगातून चोर पावलाने डोकावणारे -सोनेरी सूर्यकिरण्-एक आनंद यात्राच म्हणा की.पु.लं च्या जपानयात्रेच्या पूर्वरंगात जपानी लोक निक्कोला निस्र्ग सौन्दर्य डोळ्याने कसे प्राशन करतात याचे वर्णन आहे-वाचताना फारसे कळले नव्हते-आता अनुभूती झाली.मन वीस वर्षानी मागे गेले्ई आणी मी सापुतार्‍याला गेलो होतो.तिथली संध्याकाळही सुंदर होती,निसर्ग एवढा सुंदर नव्हता पण आमची मने तरुण अन सौन्दर्याच्या शोधात अन प्रेमात होती.तेंव्हा भा.रा.तांब्यांची "तिन्ही सांजा सखे मिळाल्या" कानात ,मनात कूजन करीत होती.आज प्रौढ वयात्,इतक्या भावमय्,चिरतरुण्,स्वर्गतुल्य अन पवित्र वातावरणात मने पुनः तरुण्,हळूवार अन निरागस झाली अन त्याच पंक्ती कनात्,मनात पुनः कूजन करू लागल्या.
आम्ही दोघे आमच्या भाव विश्वात हरपून गेलो होतो्. मुले ते निसर्गाचे लेणे पेहेरावून नाचत होती.
अन व्यवहाराच्या दुनियेत सर्व वीज बोर्डांच्या परंपरेनुसार वीज गायब झाली होती्, अन काही वेळाने "जेवायला बसूया का?इतक्यात काही दिवे यायची लक्षणे नाहीत "अशी मंजिरीताईंची साद येताच आम्ही खडबडून भानावर आलों. निसर्ग सौंदर्याने पोट थोडेच भरते याचीही प्रचिती लगेच झाली.
साधा पन अत्यंत रुचकर स्वैपाक्,गप्पा.बाबांच्या व माझ्यामध्ये "तूपाशिवाय वरण भात नाही,कमीत कमी किती (३ चमचे)तूप हवे,जिलबी कुठे उत्तम मिळते ,रबडी श्रेष्ठ की बासुंदी " अशा जिव्हळ्याच्या अन "जिव्हा लाळेच्या " विषयावर तह्,व एकमत झाले.घायल की गत घायल जाने प्रमाणे "खवय्याचे कौतुक खवय्यानेच "करावे नाही का?
एव्हाना पाऊस पण दंगा घालून नुसताच पिर्पिरीवर उतरला अन मग एकदाचा थांबला.ढग पांगले अन चक्क चांदणे पडले.
उत्स्फूर्त गाण्याचा कार्यक्रम ठरला.स्वतः मंजिरीताई छान गातात्,त्यांच्या पाहुणेबाई नलिनी ताई देखील गातात हे कळले.वरच्या खोलीत मैफील जमली.बाजापेटी अन तंबोरा आला.मुली बेसिक काही राग गायिल्या.एव्हाना सएवच जण मोकळे झाले होते,संकोच संपला होता.
अन मग नलिनी ताईनी सा-- लावला.चंद्र कौंस सुरू झाला-ती पूर्व रात्र मोहोरून गेली.एकेका आवर्तनाबरोबर रात्रिचे ते प्रहर उजागर होत होते,धुंद होत होते,स्वरात नहात होते..स्वरांचे गांभीर्य,आसमंत भरून अन भारावून टाकणारी ती स्वरांजली,ती साधना -सर्व काही अनोखा अविष्कार होता.वेळेचे बंधन तुटले होते.कर्णेंद्रिये सुखावत होती. निखल आनंदाचा हा झरा मला आयुष्यभर साथ देणार आहे.केवळ दैवी अनुभव -बस्स या क्षणी इतुकेच मागणे होते.
चन्द्र कौंसानंतर माझ्या फर्माइशीवर आर्त जोगिया झाला.भैरवी केंव्हा संपली कळलेच नाही.आकंठ बुडालो होतो आम्ही.
मध्यरात्र आम्हाला मधात न्हायला घालून उलटून गेली होती.पाऊस पूर्ण थांबला होता,ढग पांगले होते.अर्ध कोर चंद्र होता.मोजकीच लखलख्णारी नक्षत्रे अन स्फटिकाप्रमाणे तळपणारे सरोवर ---
बिछायती तया पण झोपायला मन अन शरीर तयारच नव्हते.पुनः पुनः समोरच्या वनराईकदे,तळ्याकडे,अन मोहोरणार्‍या आकाशाकडे नजर वळत होतीं. नि:स्तब्ध्,निश्चल्,नीरव शांतता,पण संवाद होता.आपल्या वांग्मयात्,वेदोपनिषदात अनहताचे फार महत्त्व आहे.त्या अनहताची प्रचिती मनाच्या निसर्गाशी संवादातून आली. निसर्गाशी आत्म्याने साधलेला हा संवाद अन नाद अंतर्मुख करून गेला..
भारावलेल्या मनाने अन किंचित क्लांत ,श्रांत शरीराने अंथरूणावर पाठ टेकली अन डोळा लागला.
असंख्य पक्ष्यांच्या चिवचिवाटाने भल्या पहाटे जाग आली.आदल्या दिवसाची धुंदी ,तो जुनून उतरत नव्हता.
ईश्वराने मला चान्गले कान दिले पण गळा दिला नाही .याची प्रकर्षाने उणीव मला त्या सकाळी जाणवली.कारणे दोन .मंजिरीताईंचा अन मृणाल ताईंचा एकत्र गायिलेला रियाज वजा राग ललित ,इतकी सुरेल पहाट अन मुक्त झालेल्या माझ्या मनात त्या जगन्नियंत्याचे ऋण फेडण्यासाठी "तू गा" म्हणून डोकावणारी असंख्य गीते-आनंद गीते.'तुझे गीत गाण्यासाठी" पासून "आनन्दी आनन्द गडे"पर्यंत.
अन हो आता या अनुभवानंतर पूर्णतः स्वीकारलेले पाडगांवकरांचे "या जन्मावर्,या जगण्यावर शतदा प्रेम करावे" सुद्धा!!!
हा उत्सव तुमच्या सान्निध्यात पुनः साजरा करायचाय!!
येणार ना??
उभयतांना सप्रेम नमस्कार
---रेव्यु

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अफाट सुंदर!
पत्र असल्यामुळे एक आगळा जिव्हाळा लागला आहे लिखाणाला

किती छान लिहिलयं.
वातावरण निर्मिती तर इतकी सुंदर, डोळ्यासमोर उभे राहिले वाचताना.

माझा एक प्रसंग आठवला, मागच्या वर्षीचा.
मला माहेर आणि सासर दोन्ही दूर,आम्ही फ्लाईट/ट्रेन किंवा बसने जायचं म्हटलं तरी लगेज सांभाळा,मुलांना सांभाळा त्रासदायक आणि खर्चिक पण.
मग आधीची सेकन्ड हैन्ड घेतलेली कार विकून आम्ही दूरच्या प्रवासासाठी म्हणून नवीन कार घेतली.
आणि आम्ही होसुर हून, सासरी गुंटुरजवळ गावी जायला निघालो पहिल्यांदा कारने, अंतर 750किमी.
पहाटे 5.30 ला निघालो, गुगल अम्माच्या मदतीने.
कर्नुल पर्यंत अगदी हाय वे ने वेगात गेलो. 2वाजता पोचलो.
3वाजता शॉटकर्ट म्हणून, नल्लामल्ला फोरेस्टमधुन आत शिरलो. सिंगल मातीचा रस्ता. रहदारी नाहीच.
तुरळक मोठीमोठी वाहने येत होती, त्यावेळी कार पुर्णपणे रस्त्याच्या कडेला घेऊन गाड्यांना जागा द्यावी लागत होती.
एक तास झाला, दोन तास झाले, मातीचा रस्ता संपेचना,कुणी माणूस दिसेना,एखादे होटेल पण दिसेना. मुलगी दिड वर्षांची तीही त्रास देऊ लागली.
पुढे 30-40 घरे दिसली, काही माणसे दिसली. मनात आले, कार थांबवून लुटणारे तर नसतील ना.
मला जाम टेन्शन आले होते पण काही बोलले नाही, नवरा एकटाच पहाटेपासून ड्रायव्हिंग करत होता.
तब्बल साडेतीन तासांनतर आम्ही त्या जंगलातून बाहेर पडलो.पुढचा रस्ता हि छोट्या छोट्या गावांतून होता,जपून गाडी चालवावी लागत होती.लंचनंतर आम्ही कुठेही थांबलो नव्हतो.
शेवटी रात्री 9.30वाजता आम्ही घरी पोहोचलो आणि सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. त्यांनाही दिवसभर काळजी लागली होती.
त्यानंतर मला कुणीही विचारले प्रवास कसा झाला कि मी हा किस्सा सांगायचे.
मुलगा मला चिडवायला लागला, आम्मा सब को नल्लामल्ला फोरेस्ट,नल्लामल्ला फोरेस्ट बताती है। Happy

>>>आम्मा सब को नल्लामल्ला फोरेस्ट,नल्लामल्ला फोरेस्ट बताती >>>> मस्त
असाच अनुभव आम्ही अलमोड्याहून मुक्तेश्वरला जातान आआला होता.... पावसाळ्याचे दिवस... कोणीतरी शॉर्टकट म्हणून जंगलातून जायला सांगितले, दोन कार होत्या. आभाळ गच्च भरलेले... डावीकडे खोल दरी... पूर्ण निर्मनुष्य अन वीजा कड्कडू लागल्या, मध्ये फाटे फुटणारे जंगलातील रस्ते, तेव्हा गूगल वगैरे काही नव्हत.... अन दुसर्ञा गाडीतला डायव्हर म्हणतो पेट्रोल संपत आलय..... झालं .... देवाचा धावा घेत कसे पोहोचलो अन कुमाऊंच्या गेट हाऊस मध्ये पाय ठेवल्याबरोबर आकाश कोसळले..... बापरे !!!

खूप सुंदर लिहिलेय. एवढे सगळे तुम्ही पत्रात लिहिलेय, ही गोष्ट विशेष भावली. यातला अकृत्रिम जिव्हाळा मनाला स्पर्शून जातो.