डॉल्फिन्स-बालकथा

Submitted by बिपिनसांगळे on 5 April, 2020 - 10:55

बालकथा
---------------
चित्रक यक्षाच्या कथा
--------------------------------
खास मुलांसाठी
( घरात अडकून पडलेल्या )

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
डॉल्फिन्स
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
सोनाली कारमधून मागे पळणारी हिरवीगार दाट झाडं पहात होती. तिला कधी एकदा पोचतोय, असं झालं होतं. बाबांना जोडून सुट्टी आली होती. म्हणून त्यांनी कोकणात जायचं ठरवलं होतं. दापोलीच्या समुद्रकिनाऱ्यावर- डॉल्फिन्स पहायला !
त्यांना पोचायला रात्र झाली . त्यांचं रिसॉर्ट अगदी किनाऱ्यावरच होतं . नारळी-पोफळीच्या वाडीत . पण अंधारात त्यांची शान कळत नव्हती . जेवण झाल्यावर ते किनाऱ्याकडे गेले. सुरुची झाडे मागे टाकून .लाटांच्या आपटण्याचा आवाज येत होता. चंद्रप्रकाशात लाटांची फेसाळती पांढरी नक्षी दिसत होती.
तिथे त्यांना दुसरे एक काका भेटले . त्यांच्याशी बोलणं झाल्यावर बाबा म्हणाले, " चला, आता झोपायला हवं . सकाळी लवकर उठलो तरच ते पहायला मिळतील ."
सकाळी आई-बाबा लवकर उठले. पण सोनाली उठली नाही. आईने खूप उठवलं ,तरी ती उठली नाही . मग त्यांचा नाईलाज झाला.
ती उशिरा उठली . ते आवरून किनाऱ्यावर गेले . सूर्य वर आला होता .तरी गार वारं होतं . बरीच गर्दी होती. त्यांना समुद्रावर जाऊन आलेली , परत फिरणारी मंडळी भेटत होती .
त्यांना बोटवाला भेटला . तो म्हणाला ,"अहो, उशीर केलात ! आता कुठले डॉल्फिन्स ?"
सोनालीला खरंतर डॉल्फिन्सच पहायचे होते . पण आता तिच्याच आळशीपणामुळे ते मिस होणार होतं !
आई म्हणाली ,"बघू या तरी ! नाहीतर बोटीमध्ये चक्कर होईल ."
सोनालीसारखी बरीच मुलं त्यांच्या आई-बाबांबरोबर हळूहळू जमत होती . सोनाली एकटीच आळशी नव्हती … बरेच जण जमल्यामुळे बोटवाला तयार झाला - समुद्रात जायला . नसलेले डॉल्फिन्स दाखवायला .
डॉल्फिन्स पहायला मिळणं आता अवघड होतं .अन याला कारण ठरणार होता आळशीपणा . तरी ?...
पलीकडे उभा राहून एक प्रेमळ म्हातारा हे पाहत होता . गरगरीत ढेरी व जाडजूड पाय असलेला. फिका आकाशी रंगाचा टी शर्ट व जीन्स घातलेला.
सगळे बोटीत बसले . बोटीत रंगीबेरंगी कपडे , टीशर्ट , टोप्या घातलेल्या मुलांची गर्दीच झाली . डिझेल इंजिन सुरु झालं . भर्रर्र आवाज करत बोट निघाली . मुलांना मजा वाटली . पाणी हेलकावे घेत होतं. बोट अगदी हळूहळू जात होती . बोटवाला इंजिनही बंद करत होता . मुलांना शांत बसायला सांगत होता. आवाज नको म्हणून . नाहीतर आवाजांनी डॉल्फिन्स लांब गेले असते . पण व्यर्थ . मुलांची गडबड अन बडबड थांबते काय ? अन डॉल्फिन्स ? ते तर सकाळीच निघून गेले होते . खोल पाण्यात ! …
पुन्हा इंजिन सुरु झालं . बोट पाणी कापायला लागली . बोटीच्या मागे दोन्ही बाजूला इंग्रजी ' व्ही ' अक्षराच्या आकारात कापलेल्या पाण्याची पांढरी नक्षी दिसू लागली .
डॉल्फिन्स दिसेनात म्हणून मुलं हिरमुसली . तरीही बोटीतून फिरण्याचा आनंद वेगळाच होता .
सोनाली लांबवर पाहत होती ... अन ... तिला एक प्रचंड धूड पाण्यात तरंगताना दिसलं . ती ओरडली ,” आई,ते बघ !”
बोटवाल्यानेही ते पाहिलं होतं . त्याने धडधडणारं इंजिन बंद केलं . क्षणार्धात सगळ्यांचं लक्ष तिकडे गेलं . गलका सुरु झाला . आश्चर्याने चित्कार उमटले . साऱ्यांनी मोबाईल्स व कॅमेऱ्यांमध्ये फोटो घ्यायला सुरुवात केली .
तिथे एक डॉल्फिन होता. डार्क ग्रे रंगाचा. लांबुळक्या तोंडाचा. पण तो खरा डॉल्फिन नव्हता . तर तो प्रेमळ म्हातारा होता . गरगरीत ढेरी असलेला एक यक्ष !
यक्ष म्हणजे कनिष्ठ देवता. ते उदार पण खोडकर असतात. मायावी ! जादू करण्यात अन रूप बदलण्यात पटाईत !
तो चित्रक यक्ष होता.कुठलीही जादू करू शकणारा. मुलांना मदत करणारा , त्यांच्यावर प्रेम करणारा प्रेमळ यक्ष ! त्याला लहान मुलं दुःखी झाली की कसंतरी व्हायचं .
केला मुलांनी थोडा आळशीपणा ,तर काय झालं ?असं त्याच मत होतं.
सोनालीला व इतर मुलांना वाईट वाटू नये म्हणून, त्यांचा हिरमोड होऊ नये म्हणून त्याने हे रूप धारण केलं होतं .
पण ? … पुढे त्याने काय गंमत केली असावी ?
खोल पाण्यात असलेल्या खऱ्या माश्यांना या डॉल्फिन ने त्याचे पर, त्याची शेपटी समुद्राच्या पाण्यावर आपटून इशारे दिले . डॉल्फिन्स हुशार असतात .ते झपाट्याने त्याच्याकडे येऊ लागले . कारण ते चटकन मैत्री करतात . माणसाशी सुद्धा !
अन दहा-बारा डॉल्फिन्सची झुंड तिथे जमा झाली . पाण्यामध्ये त्यांची सूरउडी सुरु झाली . पाण्यातून हवेत व पुन्हा धपकन पाण्यात . त्यांच्या मस्तीने तिथलं पाणी खळबळु लागलं . फेसाळून गेलं . अन - त्यांच्यामध्ये एक छोटं क्युट पिल्लूही होतं. सारे डोळे विस्फारून ते पाहत होते . बच्चेकंपनी तर अगदी खुश झाली होती .
चित्रक डॉल्फिन तर बोटीच्या अगदी जवळ आला होता . अन आश्चर्य ! ... सोनालीला अन एकदोघांना तर त्याला हातही लावायला मिळाला . ओझरता स्पर्श का होईना… त्यामुळे आई खुश झाली . अन ती खुश झाल्यामुळे बाबांना खूप बरं वाटलं !…
बोटवाला म्हणाला ,” इतके डॉल्फिन्स एका टायमाला ? तेही जवल ? - मी तर कधीच पायले नव्हते ! “
चित्रक यक्ष डॉल्फिन झाला होता तोच मुलांसाठी . त्यांना तो पहायला मिळावा म्हणून . बरेच डॉल्फिन्स जमलेले पाहून तो वेगाने सुळकांडी मारून खोल पाण्यात गेला व अदृश्य झाला .
बराच वेळ झाला ,तशी बोट परत फिरली . तेव्हा किनाऱ्यावर उभा राहिलेला तो प्रेमळ म्हातारा मुलांना हात दाखवत होता . त्याच्या कपड्यांमधून खारं पाणी ठिबकत होतं ! पण मुलांना एवढ्या लांबून ते कुठलं दिसायला ? अन त्याने केलेली गंमत तरी कोणाला कळणार होती ?
खरे डॉल्फिन्स पाण्यामध्ये त्यांच्या नव्या मित्राला उगा शोधात बसले होते .
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Bip499@hotmail.com

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

छान

छान, मी तुमच्या बालकथा माझ्या मुलाला हिंदी मधे भाषांतर करुन सांगते, त्याला फार आवडतात, त्याला मराठी समजत नाही ना

मृणाली समद
आभार .
किती वयाचा आहे छोकरा ? त्याला मी आठवण काढली म्हणून सांगा .
आपण माझ्या बऱ्याच बालकथा वाचल्या आहेत का ?
आणि आपण त्या हिंदीतून सांगता , कौतुकास्पद आहे .

7 वर्षांचा आहे मुलगा आणि मुलगी अडीच वर्षे, ती पण ऐकते, बाकीच्या कथा ही वाचून दाखवल्या आहेत मुलांना.

साहित्य संमेलनातील सासणे सरांच्या भाषणातील काही भाग -
सकाळ २३..०४. २२

मराठी बालसाहित्यामधून आपण अदभूत रस हद्दपार केलेला आहे . सध्याचे बालसाहित्य निरस झालेले आहे. संस्कारवादी बालसाहित्याच्या आग्रही निर्बुद्धतेतून हि घटना घडलेली आहे .

सरांशी सहमत आहेच

आणि अनेक उत्तम म्हणवणाऱ्या संपादकांकडून मी याचा अनुभव घेतलेला आहे