पूर्णविराम

Submitted by तो मी नव्हेच on 26 July, 2020 - 14:45

दोन शब्दांतील अवकाशाचे अर्थ शोधीत आहे
दोन वाक्यात दडलेले गर्भित वाक्य शोधीत आहे

मी दररोज हे जगण्याचे पुस्तक वाचताना
मागील पानांवरती पुढचा मार्ग शोधीत आहे

भूत, हा क्षण, भविष्य सारे या पुस्तकी तोललेले
मी माझ्याच लेखणीने ते पारडे तोलीत आहे

पान पलटता अखेरचे, पहिला भाग मिटवताना
संचिताचे जू मी दुसऱ्या भागी ओढीत आहे

मीच लेखक-पथिक-वाचक माझ्याच पुस्तकाचा
या प्रवासवर्णनासाठी पूर्णविराम शोधीत आहे

- रोहन

Group content visibility: 
Public - accessible to all site users