फिरभी कभी अब नाम को तेरे आवाज मै ना दूंगा...

Submitted by अतुल ठाकुर on 21 July, 2020 - 22:06

108100926_2290303864448006_2027992235025065311_n.jpg

काही गाण्यांचं असं असतं की ती सुरुवातीला खुप आवडतात. मग त्यांचं आकर्षण कमी होतं. काही गाणी सणासुदीला हमखास लावली जातात. सतत कानावर पडली तर त्यांचंही आकर्षण तितकं उरतंच असं नाही.काही क्लासिक म्हटली जाणारी गाणी आवडणारा ठराविक चोखंदळ असा चाहता वर्ग असतो. अनेकांना ती माहितही नसतात. काही गाणी मात्र या सार्‍यापलिकडे गेलेली असतात असे मला नेहेमी वाटते. मग ती कितीही वेळा वाजु देत, ती सर्वांना माहित असु देत, त्या गाण्यांबद्दलचं आकर्षण कधीही कमी होत नाही. ती कायम हिरवीगार आणि तरूणच राहतात. "चाहूंगा मै तुझे सांजसवेरे" हे रफीने गायिलेलं दोस्तीतलं गाणंही असंच आहे. बहुतेकांना हे गाणं माहीत असतं. किंबहूना जेव्हा ऑर्केस्ट्राजची चलती होती तेव्हा मी हे गाणं त्यातही ऐकल्याचं आठवतंय. अनेकांना माहित असलेलं गाणं म्हणून हे त्या अर्थाने "कॉमन" झालेलं नाही. हे आजही "क्लासिक" म्हणूनच ओळखलं जातं. काय असेल याचं कारण?

राजश्री प्रॉडक्शनचा १९६४ साली आलेल्या "दोस्ती" चित्रपटातील हे गाणे. मी "दोस्ती" चित्रपट पाहिलेला नाही. हे गाणं मात्र पाहिलेलं आहे. असंख्य वेळा ऐकलेलं आहे. लक्ष्मीकांत प्यारेलालच्या सुरुवातीच्या चित्रपटांपैकी हा एक चित्रपट. या लेखात मला खरं सांगायचं तर चित्रपटाबद्दल किंवा नेहेमीप्रमाणे गाण्याचं छायाचित्रण कसं झालंय त्याबद्दल लिहायचं नाही. तो एका स्वतंत्र लेखाचा विषय आहे. धडपडत जाणारा अंध सुधीर कुमार, त्याचे रक्ताळलेले पाय, त्यावर कृष्णधवल रंगाची जादु आणि सुधीरकुमारच्या आर्त चेहर्‍यावरील दु:ख जास्त गडद करणारा रफीच्या आवाजातील मूक आक्रोश असे रसायन ज्या गाण्यात आहे त्याच्या चित्रीकरणाबद्दल लिहिणे हे मला पटकन जमणारे नाही कारण सध्या आजुबाजुला इतक्या करुण कहाण्या ऐकु येत आहेत की त्यात आणखी एक भर घालाविशी वाटत नाही. शिवाय त्याबद्दल लिहिताना सुधीरकुमार या कलाकाराची झालेली शोकांतिकाही दुर्लक्षित करता येत नाही. हा देखणा गडी पुढे हिन्दीत काय किंवा मराठीत काय फारसा दिसलाच नाही.

पण आता हे गाण ऐकताना वेगळं काहीतरी वाटतं. कदाचित चित्रपटात हे गाणं मित्राला उद्देशून गायिलेलं असेल. आपल्यालडे लक्ष न देणार्‍या मित्राबद्दल तक्रार केल्याप्रमाणे "तुझ्यावर मी अहोरात्र प्रेम करेन पण आता तुझ्या नावाने कधीही साद घालणार नाही..."हे म्हणणारा माणूस मित्रावर रागावलेला नाही तर तो मित्राच्या वागण्यामुळे अतिशय दु:खी झालेला आहे. आमच्या काव्यशास्त्रात अनेकदा उअत्तम काव्यात ध्वनिची संकल्पना मांडलेली आहे. म्हणजे सरळ शब्दार्थ एक आणि त्यातून ध्वनित होणारा अर्थ वेगळाच. हे मजरूह सुलतानपुरींचे गीत आहे. ही कवि मंडळी अगदी खर्‍या अर्थाने "जे न देखे रवि ते देखे कवि" म्हणतात अशीच असतात आणि त्यांच्या प्रतिभेच्या झेपेने मला नेहेमी थक्क व्हायला होतं. मजरूहजींचा भारतीय तत्त्वज्ञानाचा अभ्यास असेलही कदाचित पण त्यांनी थेट या गीतात भक्तीच्या माध्यमातून अद्वैताला हात घातला आहे.

दर्द भी तू, चैन भी तू
दरस भी तू, नैन भी तू

सुखही तू आणि दु:खही तूच, इतकंच नव्हे तर पाहणे आणि पाहणारे नेत्रही तूच हे म्हणणारा कवि हा फक्त व्यवहाराचा पातळीवर काही बोलत असेल यावर माझा विश्वास नाही. हे गाणे जर एखादा भगवंतावर रुसलेला, त्याच्याकडे तक्रार करणारा भक्त म्हणतो आहे अशी कल्पना केली तर त्यातील ओळ न ओळ त्या भावनेशी चपखल जुळते. भक्तीच्या एका पातळीवर मी तू पणाची भावना उरतच नाही आणि सारे काही एक होऊन जाते. अगदी हेच या गीतात सांगितले आहे. आणि अशातर्‍हेची भावना जर एखाद्याची मित्राबद्दल असेल तर ते मित्रप्रेमही फारच उच्च दर्जाचे असणार यात शंका नाही. बाकी गाणे नूसते जरी ऐकले तरी त्यातील आर्तता मनाला भिडते हे नक्की. याचे कारण गीत, संगीत आणि स्वर यांचा अजोड संगम या गाण्यात झाला आहे. गीताबद्दल तर लिहिले आहेच. संगीताबद्दल काय बोलणार?

व्हायोलिनचा जबरदस्त प्रभावी वापर या गाण्यात एलपींनी केला आहे. रफीच्या "मितवा...." या आर्त हाकेला लगेचच तितकीच आर्त अशी व्हायोलिनची जोड आहे. गाणे गुणगुणावेसे वाटते पण चाल तितकीशी सोपी नाही. या गाण्याच्या शेवटी रफीने निरनिराळ्या ढंगात म्हटलेले "आवाज मै ना दूंगा...." तर खास ऐकण्याजोगे. त्यात रफीने "दूंगा" म्हणताना गाण्याचा गंभीर बाज जराही न सोडता हा शब्द वेगवेगळ्या तर्‍हेने उच्चारला आहे. या सार्‍या करामतीचे श्रेय रफीइतकेच एलपींनाही द्यावे लागेल. शेवटी आमचे रफीसाहेब. या शहेनशहाबद्दल बोलताना मला शब्दच सुचत नसतात. गाण्याच्या अथपासून इतिपर्यंत एक उदास भावना रफीने आवाजात ठेवली आहे. ती गाण्याच्या पार्श्वभूमीवर सतत जाणवते. आणि आक्रोश हा आक्रस्ताळेपणा वाटू नये तर ते मूक रुदन वाटावं अशी भावना आवाजात ठेवण्याची अत्यंत अवघड गोष्ट फक्त रफीसाहेबच करु जाणेत. काय आणखी बोलणार त्यांच्याबद्दल? या गाण्यासाठी रफीच्या पायावर डोके ठेवेन..इतकंच करु शकतो...

अतुल ठाकुर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अतुलजी फार छान लेख. लहानपणी रफींपेक्शा मला किशोर कुमार यांची गाणी जास्त आवडायची. पण जसजशे मोठे होत गेले तसतशे रफींची गाणी अधिक गोड वाटू लागली. इतकी गोड कि एखाद्याला डायबिटिज व्हायचा ऐकून ऐकून..काय तो मखमली आवाज .. त्यांनी गायलेलं अजून एक आवडीचं गाण “युही तुम मुझसे बात करती हो, या कोई प्यार का इरादा है“
आणि रफींच्या गाण्यांविषयी अजून एक निरीक्शण असं कि त्याच्या गाण्यांच्या स्टांझाज मध्येही भरपूर इमोशन्स आणि अर्थ असायचा. ह्याच्या अगदी विरूद्ध म्हणजे बरीचश्या गाण्यांमधे खासकरून नवीन गाण्यामधे ध्रुवपदच महत्वाचं आणि स्टांझाज फक्त फिलर म्हणून वापरल्यासारखे वाटतात.

रफीसाब! जवाब नहीं और सवाल भी नहीं. गायकांच्या अनेक पिढ्या आणि शैल्या (शैली) आल्या आणि गेल्या पण रफीसाब अमर हैं.

खूप छान लेख, रफींचा आवाज इतका ब्लेंड इन व्हायचा की काही उरायचे नाही फक्त मार्दव जाणवायचा. 'दिवाना मसताना हुआ s दिल , जाने कहां होके बहार आयी ' कित्येक आवडत्या गाण्यांपैकी एक ! बाकी समकालीन गायकांचा आवाज डिस्टिंक्ट ओळखू यायचा पण रफी म्हणजे अद्रुष्य जादू.

इतकी गोड कि एखाद्याला डायबिटिज व्हायचा ऐकून ऐकून..काय तो मखमली आवाज
म्हाळसा मस्तच Happy
ज्येष्ठागौरी धन्यवाद Happy
हीरा, आपली आवड जुळते पाहून खुप आनंद वाटला.
मी_अस्मिता आभार Happy
भरत अशा ध्वन्यार्थ्यांच्या दृष्टीने आता मला विचार करायचा आहे Happy

सुंदर लिहिलंय!
रफीचा आवाज म्हणजे स्वर्गीय. दुसरा शब्दच नाही.

आवडला लेख. ध्वन्यार्थाबद्दल जे जाणवत होतं ते तुम्ही नेमकं मांडलंत. + १११११
मितवा बद्दल तर अगदी अगदी. ऐकताना सोपे वाटते पण गाताना समजते.
मी खूप लहान होते तेव्हा बाबा टेप वर गाणी लावत त्यातूनच मला रफी भेटले. ते वयही नव्हते ही गाणी ऐकण्याची पण सुर ताल , संगीत आणि गायकाचा आवाज सगळचं इतके अप्रतिम असायचे की नकळत मी जुन्या गण्यांकडे खेचले गेली.
रफी, किशोर कुमार यांनी गायलेली बहुतेक गाणी माहीत आहेत पण पिक्चर मात्र मी एखाद दुसराच पहिला असेल.
आमच्याकडे रफीच्या खूप साऱ्या कॅसेट्स होत्या हे आठवतंय.
आवाज में ना दुंगा हे गाणं तर मला नेहमीच प्रियकर प्रेयसी वर चित्रित झाले असेल असे वाटायचे. बाबांनी सांगितले तेव्हा समजले की हे दोन मित्रांचे गाणे आहे. बाबांकडे ही पडद्या मागच्या खूप रंजक कथा असायच्या. तेव्हा समजत नव्हते म्हणून कधी नीट लक्ष नाही दिले.

मूडस्स ऑफ रफी, लिजंड रफी आणि ट्रिब्युट टू रफी अशा अनेक भाग असलेल्या कॅसेट्स होत्या...