निसणी आणि करोली

Submitted by योगेश आहिरराव on 16 July, 2020 - 04:39

निसणी आणि करोली

मकर संक्रांत गेली तरी ट्रेक ठरत नव्हता. तीन आठवडे झाले तांबट पक्ष्याचा आवाज कानी पडून. बास्स आता काहीही होऊदे येत्या विकेंडला बाहेर पडायचं. आठवडा ऑफिसात, घरी इतर कामात नुसती दगदग त्यात शनिवारी पूर्ण दिवस शाळेतल्या मित्रमैत्रिणी सोबत गेट टुगेदर येताना प्रचंड ट्रॅफिकचा मनस्ताप सहन करत खूपच दमछाक झाली. खरंतर जावं की नाही असाही विचार मनात आला. ‘पाथरा गुयरी’ आणि ‘कोंडनाळ हातलोट’ या दणकट ट्रेक नंतर अशीच एखादी दमदार वाट खुणावत होती. घरी आल्यावर फोनाफोनी करून रात्री ठिकाणं ठरलं. ‘निसणी’ उर्फ निसणदाराने वर जाऊन पुन्हा ‘करोली’ घाटाने उतराई. पुण्याहून ‘राजेश मास्तर’ सोबत ‘शरद पवळे’ तसे तर मास्तर माझ्या सोबत बहुतेक घाटवाटा ट्रेकला असतात पण एवढ्या थंडीत भल्या पहाटे बाईकवर ट्रेकसाठी येणं हे एक रसिक दर्दीच समजू शकतो. त्यात कधी नव्हे तर मित्रवर्य माजी ट्रेकर ‘सौरभ आपटे’ स्वतःहून तयार झाला. आता माघार नाही….
रविवारी पहाटे बरोब्बर साडेपाच वाजता ‘जितेंद्र खरे’ आणि ‘सौरभ आपटे’ बाईकवर आले. पुढे माझ्या गाडीतून नॉनस्टॉप टोकावडे, गाडी बाहेर येताच थंडी जाणवली. मग काय एक चहा दोन चहा करत राजेश आणि शरद यांची वाट पाहत बसलो. सव्वाआठच्या सुमारास दोघे बाईकवर आले. तिथल्याच ढाबावाल्याला सांगून बाईक सुरक्षित ठेवत, माझ्या गाडीतून एकत्र जात डोळखांब डेहणे रस्ता पकडला. यावेळी सरळ डोळखांब मार्गे न जाता शिरोशीहून उजवी मारून ‘अळावे’ ‘गुंडा’ ‘कांबे’ लहान गावं मागे टाकत थेट ‘वोरपडी’ गाठलं. आप्पा यांच्या अंगणात गाडी लावली. आप्पा घरी नव्हते पण खरे साहेबांची जुनी ओळख होती. सोबतचा नाश्ता संपवला तोवर अप्पांच्या घरातून कोरा चहा आला. पिट्टू पाठीवर घेत निघेपर्यंत दहा वाजले.
वोरपडीतून समोरच सह्याद्रीची भव्य रांग. अगदी बघत राहावं असं. देखणा रतनगड, कात्रा, करोंदाचे रौद्र कडे, उजव्या हाताला थोरला आजा उर्फ आजोबा तर डावीकडे थोडक्यात वायव्येला शिपनुर उर्फ शुपनाक डोंगर उठावलेला. याच शिपनुर डोंगराच्या उजवीकडे लहान खिंडी सारखा भाग दिसतो त्यातूनच निसणीची वाट जाते. सह्यशिरोधारेवर असलेला शिपनुर हाही एक भला मोठा डोंगर याच्या वायव्येला ‘घाटघर’ तर पूर्वेला ‘साम्रद’ असं साधारण म्हणता येईल. थोडक्यात शिपनुर डोंगराला उजवीकडे ठेवत याच चोंढे वोरपडी भागातून ‘उंबरदार’ वाटेने घाटघर तर डावीकडून ‘निसणीने’ साम्रद जाता येते. येथील लहान पाडे, आदिवासी वस्तीतील मंडळी आजही याच वाटेने घाटावर येजा करतात.
मुख्य ओढयावरील पुल पार करून खोकरीची वाडीचा कच्चा रस्ता सोडून समोरील धारेवर चढलो. खरे साहेबांनी ही वाट आधी केली असल्याने चुकण्याचा प्रश्नच नव्हता. फक्त सांभाळायचं होतं ते वेळेचं भान.
दहा मिनिटांची चढाई संपवत आडवी वाट डावीकडे खाली कामतपाडा (जामरूंख जवळील नव्हे) लहानशा पाड्यातील आखीव रेखीव घरे एकदम मस्त. सपाट चाली नंतर पुन्हा चढाई, वाट एकदम मळलेली. काही भागात सागाची तसेच हिरडा व छोटी झुडुपे सोडली तर वाटेवर जंगल असे नाहीच. अधून मधून येणारा वारा मात्र सुखावणारा. पुढच्या टप्प्यात डावीकडून चोंढे कुंडाची वाडी (पाथरा घाटाची नव्हे) व धनगर पाडा येथून येणारी वाट मिळाली. अधून मधून काही ढोरवाटा चकवतात पण मुख्य खिंडीची दिशा हेच टारगेट. थोडक्यात सांगायचं झालं तर शिपनुर कडून जी सोंड उतरली आहे त्याच सोंडेवरून वाट जाते. जसे वर जाऊ लागलो तसा आजू बाजूचा भाग चांगला न्याहाळता आला, खाली उजव्या हाताला करोली, सांधण, बाण या भागातून एकत्र येणार मोठा ओढा.
काही अंतर गेल्यावर वाटेत खालच्या धनगर पाडातील गुर चारणारे मामा भेटले, पावसाळा सोडला तर त्यांची याच निसणदारा वाटेने ये जा ठरलेली. छोटा ब्रेक गप्पा मग सुका खाऊ तोंडात टाकून निघालो. आता पर्यंतची सौम्य चाल इथून पुढे मात्र दमवणारी.
त्यात एके ठिकाणी सौरभचा बुट फाटला म्हणजे सोल निघाले, नशीब सुई दोरा होता. राजेश मास्तरने शिवून दिले. शिपनुर डोंगर आता जवळ भासू लागला, खिंडीत जाणारा मार्ग अगदीच दृष्टिक्षेपात. मधला झाडी भरला पण तीव्र चढण असलेला टप्पा चढून खिंडीत जाणाऱ्या नाळेसमोर आलो. नाळेच्या एन्ट्री वरच मोठा डोह त्यामधून व पलीकडून जाणं शक्यच नाही, उजवीकडे छोटा पॅच चढून घसारा युक्त आडवी मारून नाळेत घुसलो. हा टप्पा थोडा जपून कारण काही गडबड झाली तर थेट डोहात. टिपिकल दगड धोंडेवाली नाळ जसं जिथून जमेल तसे ढांगा टाकत सुटलो. अर्थात चढ तीव्र होताच आणि सहाजिकच नाळेत हवा लागत नसल्यामुळे उन्हात घामाच्या धारा निघून दम लागू लागला. चार पावलं गेलं की उभ्याने फोटो काढत क्षणभर थांबून पुन्हा चालू पडायचं. तीस चाळीस मिनिटात एका अरुंद जागेत अंदाजे वीस फुटी सरळ भिंत आडवी आली. उगाच भिंतीला न भिडता, तिच्या डावीकडून कातळाला चढाई करता येणं शक्य पण साठ अंशापेक्षा अधिक तीव्र तिरकी चढाई या जागी असलेला ठिसूळ कातळ पाहता सावधगिरी हवीच. तसेही कुठलीही नाळ असो त्यातून जाणारा मार्ग हा दरवेळी पावसानंतर थोडाफार बदलतोच. ही बाब लक्षात घेत रोप सोबत घेतला होताच. शरदराव झटपट पुढे जात वरच्या बाजूला असणाऱ्या उंबराच्या बुंध्याला रोप बाधून खाली सोडला. नेमकं काही वेळापूर्वी रेंज चेक करायला फोन काढला तेव्हा आम्हाला ज्येष्ठ गिर्यारोहक ‘अरुण सावंत’ सर यांच्या निधनाची बातमी कळली. एक सौरभ सोडला तर बाकी आम्ही चौघेही अरुण सरांना ओळखणारे. त्यावेळी तिथे असं ऐकल्यावर काहीशी खिन्नता आली.
काही वेळ एकदम वेगळीच स्थिती त्यात समोर हा पॅच, सावकाश पुरेशी काळजी घेत एकेक जण वर गेला. वर जाताच उजवीकडे आडव जात पुन्हा नाळेत आलो. दुसरा एक चिमणी टाईप पॅच राजेश व शरद दोघेही अजय देवगण स्टाईलने पाय स्ट्रेच करत वर गेले. मी आपला उगाच क्रॅम्प यायची त्यापेक्षा उजव्या बाजूने हॉल्ड घेत गेलो. जसे वर जाऊ लागलो तशी नाळ थोडी रुंद होऊ लागली. शेवटच्या टप्प्यातील चढाई अगदी पिसारनाथ शिडीच्या वाटे सारखी. काही ठिकाणी पावठ्या सारखं कातळात कोरीव काम. खिंड समीप आल्यावर उजवीकडे वळून एका दमात माथा गाठला. वरती आल्यावर समोरचा नजारा पाहून डोळेच विस्फारले.
खुट्टा रतनगड, कात्राबाई, करोंदा, पठाराचा डोंगर, गुयरीदार पासून आजोबा पर्यंत अगदी ब्रेड स्लाईज कापतात तसेच कापलेले कडे. या आधी असाच नजारा रतनगडहून पाहिलेला आता त्याचा अगदी विरूद्ध दिशेला. खाली साम्रदच पठार, त्याही पेक्षा खोलवर डोकावले असता करोली घाटाचा भाग तसेच बाण सुळक्याच्या दरीतून येऊन एकत्र होणारा मोठा ओढा. त्या पलीकडे असणाऱ्या धारेवरील त्रिकोणी डोंगर जो चिंचवाडीतून स्पष्ट दिसतो. करोली घाट उतरल्यावर याच ओढ्याच्या काठाने आम्ही वोरपडीत जाणार होतो. मनसोक्त पाहून फोटोग्राफी झाल्यावर याच शिपनुरच्या पदरात जेवायचं ठरवलं. हा नजारा पाहत या पेक्षा चांगली जागा तशीही मिळणार नाही. प्रश्न होता पाण्याचा. आमच्याकडे प्रत्येकी एक लिटर पाणी होते पण जेवण करताना वापरलं जाणार. करोली घाटात पिण्यालायक ओढ्यात मिळालं तर ठीक नाहीतर गावात जावं लागणार यात आणखी वेळ जाणार. पण हा प्रश्न सोडवला तो एका आदिवासी माणसाने. आम्ही फोटो काढत असताना तो अचानक प्रकटला, त्याने जेमतेम वीस पावलांवर शुध्द पाण्याचा छोटासा झरा दाखवला. मग काय तिथेच पंगत मांडली, जेवण अर्थातच घरून आणलेले. पुढची वाट सांगून तो माणूस झटपट निघूनही गेला. भर दुपारी कड्याच्या सावलीत पोटभर जेवण करून माथ्यावरील गार हवा खात मस्त पैकी झोप काढावी पण काय करणार वेळेचं नियोजन महत्वाचं. घड्याळात पाहिलं तर साडेतीन झालेले. पाणी भरून सॅक पाठीवर आता ट्रेकचा सेकंड हाफ सुरू. ओढ्याच्या बाजूने वाट कारवीत शिरून उतरू लागली. निसणी पासून साम्रदचे पठार गाठण्यासाठी अंदाजे शे दीडशे मीटर उतराई सहज असावी. खालच्या भागातला ओढा पार करून रानात उजवीकडे जात मोकळं वनात आलो. आम्ही होतो तिथून क्रेस्ट लाईन धरून थेट करोलीत जाता येईल का! या हेतूनं तसा प्रयत्न ही केला. अधे मध्ये येणारे जंगलाचे टप्पे, बऱ्यापैकी चढ उतार आणि खाली झेपावणारे लहान मोठे ओढे हे सारं बरच वेळ खाऊ निघालं. शेवटी वनखात्याची मोठी पायवाट पकडून गावच्या वाटेला लागलो. गावात सांधणसाठी आलेल्या गाड्यांची गर्दी. दूरवर मागे ‘कुलंग’ ‘मदन’ ‘अलंग’ ते ‘कळसूबाई’ पर्यंतची रांग.
डावीकडे खुट्टा रतनगड त्र्यंबक दरवाजाची बाजू. मळलेल्या पायवाटेने पावणेपाचच्या सुमारास करोली घाटात आलो. संत्री, खजूर, बिस्किटे सुका खाऊ यासाठी छोटा ब्रेक झाला. इथे थांबलो असताना एक ग्रुप सांधण उतरून घाटाने वर येत होता. आता वोरपडीत जाई पर्यंत अंधार होणार हे तर १००% किमान बाण आणि सांधणची वाट जिथे खाली मिळते तिथवर जरी उजेडात गेलो तरी मिळवलं. थंडीच्या दिवसात वन डे घाटवाटांच्या ट्रेकला वेळेचं नियोजन फार महत्वाचं.
सुरुवातीचा सोपा पॅच उतरून डावीकडे कड्याला बिलगून जाणारी वाट आणि उजव्या हाताला घाटातला ओढा. ओढ्यात अजूनही बारीक धार वाहत पाणी. वाट एकदम प्रशस्त आणि मळलेली. तिरक्या रेषेत उतरणारी वाट ओढा पार करून पुन्हा डावीकडे वळली. बारा वर्षांपू्वी जेव्हा करोली घाट केला होता त्यावेळी आणि आता बराच फरक जाणवला. खटकणारी गोष्ट म्हणजे या वाटेवर झालेला प्रचंड प्लास्टिकचा कचरा. याला कारण सांधण व्हॅलीचे आठवडे बाजार ट्रेक. ट्रेक करण्याबद्दल मुळीच आक्षेप नाही, पण थोडे तरी पर्यावरण आणि सुरक्षेचे भान हवे ! पाणी पिऊन बाटली कुठेही फेकून देणे, स्वतःची शारीरिक क्षमता नसताना अनाठायी धोका पत्करणे. अश्या ग्रुपचे लीडर त्यांनी मुळात यात लक्ष देणं गरजेचं. आता आम्हाला मघाशी वाटेत जो ग्रुप भेटला त्यातील बहुतेक सर्वच फक्त नेटवर फोटो आणि कुणीतरी सांगितलं किंवा घेऊन आलंय म्हणून आलेले वाटत होते. इस्त्री केलेला टी शर्ट आणि हाफ चड्डी घालून मोकळ्या हाताने ट्रेक ? विकेंडला तीन चारशे लोकं सांधणला जाणे ही कदाचित बातमी होणार नाही पण जर दुर्दैवाने एखादा अपघात झाला तेव्हा मात्र मोठी बातमी होऊन गिर्यारोहण बदनाम होणार. यावर किती लिहिणार असो...
थोड आडवं जात पुढे लहानसा कारवीचा टप्पा मग पुन्हा फार मोठी नाही पण दगडातून उतराई. निघाल्यापासून तासाभरात या वाटेवर असणाऱ्या मोठ्या ओढ्याच्या मध्यभागी आलो. ब्रेक असा घेतला नव्हताच, वेळ पाहता मुळीच न रेंगाळत लगेच निघणार होतो पण खरे साहेबाचा डबा टाकायचा कार्यक्रम आणि सौरभच्या दुसऱ्या बुटाचा सोल शिवणकाम यात वीस मिनिटे गेली. त्या निमित्ताने का होईना थोडा आराम मिळाला. आता वाट उजवीकडे वळली थोडा घसारा पुन्हा कारवी मग दाट रानातील टप्पा पार करून मुख्य ओढ्यातून डावीकडे गेलो. आधी म्हणालो तो धारेवरचा त्रिकोणी डोंगर आता बराच उंच याचा अर्थ आता उतराई संपल्यात जमा. एव्हाना सूर्यास्त झाला होता संधीप्रकाशात बरोब्बर पावणेसातच्या सुमारास सांधणची वाट जिथे खाली एकत्र येते तिथे आलो.
मुख्य म्हणजे काळोखाच्या आत जंगलाचा टप्पा संपवला थोड पुढे जात डावीकडे बाण सुळक्याचं दर्शन. आता इथून पुढची चाल ओढ्याला उजवीकडे ठेवत ठळक अशा पायवाटेने. टॉर्च बाहेर काढत अंधारात वोरपडीत पोहचेपर्यंत सव्वानऊ वाजले. एवढ्या रात्री ही फलटण कुठून आली विचारपूस करत ‘नरेश हरड’ यांच्या घरात पाणी आणि कोरा चहा मिळाला. खरंच तो चहा पिऊन तरतरी आली. पुढच्या पंधरा मिनिटांत ‘आप्पा ठाकरे’ यांच्या घरी. त्यांचा निरोप घेऊन गाडी काढे पर्यंत पावणेदहा. टोकावडेहून दोघा पुणेकरांचा घरी जाईपर्यंत दुसरा ट्रेक सुरू. मॅप चेक केला तर जवळपास सतरा किमीहून अधिक चाल नऊशे मीटर चढाई उतराई झालेली. खरंतर करोली घाट (चढाई उतराई) साठ टक्केच उरलेले चाळीस टक्के पूर्ण ओढ्याला समांतर अशी वाट. पूर्ण दिवसभर ट्रेक करून हि चाल म्हटलं तरी शेवटी थोडं जीवावर येतंच पण तरीही सह्याद्रीच्या ओढीने पुन्हा पुन्हा आमच्या पायाला खाज सुटतेच..

फोटोसाठी हे पहा : https://ahireyogesh.blogspot.com/2020/02/nisani-karoli.html

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा , खूप दिवस असं काही वाचायला मन आसूसलं होतं ..
वाचून आणि फोटो पाहून शांत वाटलं..