पाऊस आणि गलबलुन येणारा मूड

Submitted by सामो on 10 July, 2020 - 10:33

---------------------------------------------------पूर्वप्रकाशित-----------------------------------------------------------------------------------------------
आज आमच्या भागात अक्षरक्षः मुसळधार पाऊस पडला. सकाळी सकाळी लवकर ऑफीसात आले म्हणून पावसाच्या तडाख्यातून वाचले. खूप काळा-कुट्ट अंधार दाटून आला होता, आभाळ भरुन आले होते. नंतर मग जी संततधार लागली. ऑफिसमधले आम्ही सर्वचजण मोठ्या मोठ्या खिडक्यांपाशी जमून बाहेरची गंमत पहात होतो. वीजा चमकत ,पाऊस स्वतःच्या तालावरती धो धो कोसळत राहीला.
.
मला मुख्य सांगायचं आहे ते मूडबद्दल. जसं आभाळ भरत गेलं, तसा मूड उदास होऊ लागला. खरं तर उदास म्हणताच येणार नाही पण असं दाटून आलं, गलबलल्यासारखं झालं, खूप कासाविस झाले. ऑफिसात जे करता येणं शक्य होतं ते केलं, मूडबद्दलचं साग्रसंगीत वर्णन मैत्रिणीला लिहून पाठवलं आणि कानाला हेडफोन लावून संगीताच्या जीवघेण्या सुंदर विश्वात निघून गेले. अर्थात अशा वेळी ऐकावीत ती हृदयनाथांची गाणी - जैत रे जैत ची सर्व गाणी ऐकली - आम्ही ठाकरं ठाकरं, कोण्या राजानं राजानं, लिंगोबाचा डोंगुर, त्यानंतर कसा बेभान हा वारा, घन तमी शुक्र , मालवून टाक दीप, जाईन विचारीत रानफुला, कशी काळ नागीणी. प्रत्येक गाण्याच्या चालीने, संगीताने फक्त मनोमन शहारत गेले- कोणत्या मानसिक प्रतलावरती हृदयनाथांना संगीत सुचले होते? इतकं अनाम आर्त, हळवं संगीत कसे काय निर्माण करु जातात? केवळ दैवी देणगी.

ते झरे चंद्रसजणांचे ती धरती भगवी माया
झाडांशी निजलो आपण झाडांत पुन्हा उगवाया

दु:खाचे महाकवि ज्यांना म्हटले जाते, त्या ग्रेस यांच्या ओळी. असे कवि ज्यांचे शब्द कळू येतात पण अर्थ लागत नाही. छे छे अर्थ लागतो की पण तो असा इन्टेलेक्च्युअल, बौद्धिक पातळीवर कळत नाही.काहीतरी आवडतं, व्याकुळ करतं पण बोट ठेवता येत नाही.
.
एक बरच आहे की प्रत्येकाला, प्रत्येक गोष्ट हातात घेऊन त्याचे विच्छेदन करता येत नाही. काही गोष्टी फक्त मनाने, चेतनेने अनुभवाव्या लागतात. अन तरीही विच्छेदन करण्याची "कन्या जातकी" ओढ माझी सुटत नाही. मग मनाशीच खूणगाठ बांधली की आपला मूड टोटल नेप्च्युनिअन झाला आहे. पकडीत न येणारा, आर्त व पाण्यात प्रतिबिंब पडावे तसा वेडावाकडा, झिगझॅग. मग मनातील काहूर शमविण्याकरता, ज्योतिषाकडे वळले, नेपच्युन बद्दलच्या माहीतीच्या सर्व साईटस पालथ्या घातल्या. पंचेंद्रियांत न सामावणार्‍या अनुभूतींचा मालक वरुण = नेपच्युन. चॅनलिंग, मिडीअम्स, निर्मितीक्षमता, गूढ अनुभवांचा यांचा कारक पण त्याचबरोबर एस्केपिझम, मादक द्रवांचा (ड्रग्स), हॅल्युसिनेशनचा देखील. हे सर्व वाचता वाचता मूड अधिकाधिक डार्क झाला. मोठमोठ्ठे जलाशय यांचाही हा कारकच. ऑफिसच्या खिडकीतून विस्तीर्ण सुपिरीअर लेक दिसतो. निळा, आकाशाचे प्रतिबिंब दिसणारा. तो पहाता पहाता, वरुण गायत्री मंत्रही आठवला-

जलबिम्बाय विद्महे, नीलपुरुषाय धीमहि
तन्नो वरुण प्रचोदयात||
किंवा
जलबिम्बाय विद्महे, नीलपुरुषाय धीमहि
तन्नो अम्बु: प्रचोदयात||

पाण्यात बुडणे, अगतिकता, असहायता यांचाही मालक जलदेव वरुणच. हिंदी सिनेमात दाखवितात तसे "बचाओ बचाओ" असे ओरडत व्यक्ती कधीच बुडत नाही. हातपाय काम करेनासे होतात, नाका-तोंडात पाणी जाऊ लागते. व्यक्ती पार पार हतबल, अगतिक होते. हळूहळू पाण्यात धसू लागते, बुडू लागते. पाणी, पंचमहाभूतांपैकी, एक भूत गिळू लागते. एकदा तरी हा अनुभव घ्यावा किती सटली, वरवर काहीही न दिसता, दाखविता, पाणी व्यक्तीला गिळंकृत करतं ते कळून येईल. इतक्या नकळत काळमुखात व्यक्ती ओढली जाते की शेजारी पोहणार्‍या माणसालाही थांग लागत नाही त्या व्यक्तीच्या बुडण्याचा.
ते एक असोच.
.
१२ वाजता लंच टाईममध्ये, पोस्ट ऑफिससमोरच्या कारंज्यांपाशी जाऊन शांत बसले. ५-६ दुधाच्या रंगांची दाट फेसाळणारी कारंजी आणि पाऊस पडून गेल्याने न्हालेली झाडे व हिरवळ. अतिशय प्रसन्न व शांत वाटलं. अगदी मुसळधार पाऊस पडून गेल्यावर जसं उजाडतं तसं. कधीकधी विस्मय वाटतो की माणसाचं मन सृष्टीशी तिच्या बदलांशी किती अट्युनड (जोडलेले) असते.
_________
आज, हवेची "मोंगलाई" अनुभवली.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त!
पाऊस पडला की 'भागे रे मन कही' ऐकावं आणि मस्त आल्याचा चहा प्यावा. काय मस्त जमलाय म्हणून स्वतःच्याच प्रेमात पुन्हा एकदा पडावं. आता तशी पावसाची म्हणून एक प्लेलिस्ट ही होती पण कुठेतरी वाहून गेली... 'पूछे जो कोई मेरी निशानी' नक्की होतं त्यात एवढ मात्र आठवतयं.

>>>>बाकी हे ज्योतिष मध्ये का आहे? कन्या जातक म्हणून??>>>>
सीमंतीनी, ते वरूण प्रधान वर्णन ज्योतिषाच्या संदर्भात आहे.

@सुनीधी, आमच्या कडे न्यु जर्सीत आज "लगी आज सावनकी फिर वोह झडी है ..." असा मौसम आहे. मी झटपट पोहे (पातळ पोह्यांचा चिवडा) केलेला आहे व त्यावर ताव मारत वाचते आहे. मज्जा च मज्जा.

बाकी हे ज्योतिष मध्ये का आहे? कन्या जातक म्हणून??....
हाच प्रश्न मलाही पडला होता.

लेख आवडला. मनाची वेगवेगळी प्रतलं दाखवते ढगाळ वातावरण .

ज्योतिषाचाच धागा आहे, पाऊस एक निमित्त आहे. डिपीतला सूर्य पाहा. उत्साहवर्धक आहे ना?
वरुणाच्या हातात त्रिशुळासारखे काही असते ना? पाताळाचा राजा? पाश्चिमात्य पद्धतीने?

सुरेख लिहिलं आहे.
वातावरण आणि त्यासोबत वाहत जाणार मन... हे नातंच अतुट.

लांब दाट थेंबाट दिसतय राच्चाला पडतोय अस आमच्या शेतातल्या गोविंदा गड्याने डोळ्यावर हात ठेवुन लांबवर पहात वडिलांना सांगितल अन तो गुरांच्या गोठ्याकडे व्यवस्था करायला गेला. संध्याकाळ दाटून येत होती. आम्ही घराकडे परतलो. रात्री जेवण झाल्यावर निजानीज झाली अन थोड्यावेळात जबरदस्त पावसाला सुरवात झाली. चांगला कोसळला. गोविंदाच्या भविष्याची आठवण झाली. पाउस म्हटल की मला ती आठवण येते.

सुरेख लिहिलं आहे.
वातावरण आणि त्यासोबत वाहत जाणार मन... हे नातंच अतुट.>>>+१.

सर्वांचे आभार. घाटपांडे आम्हाला 'वळीव' म्हणुन शंकर पाटील वाटतं त्यांचा धडा होता. मला फार आवडायचा तो धडा. वळवाच्या पावसाची, इतकी सुंदर वातावरणनिर्मीती होती त्यात.
भारतातला पाउस व त्याची रुपे मिस करते मी. इथला संयत पाउस त्यात काही मजा नाही. हां न्यु जर्सी ला वादळी पाऊस पडतो परंतु एकंदर त्यात तो मातीचा वास व हस्ताचा, हत्तीच्या पायांसारखे, थेंब ताडताड कोसळणारा, लहान लहान वावट्ळी उठवत जाणारा नाहीच.
माझ बालपण कॅ न्टॉनमेन्टअरीयात, निसर्गरम्य ठिकाणी गेले. टेकडी, मेंढ्या चरायला आणणारे धनगर, रानफुले, पक्षी, बेडूक व साप, गांडूळेही इतकी मजा होती. आय रियली मिस इट.

एखादा दिवस उजाडतो जेव्हा रॅशनॅलिटी पूर्ण झुगारुन देउन, फक्त अमूर्त मनात, समाधीत डुंबत रहावसं वाटतं. कदाचित ढगाळ हवेचा परिणाम असेल, पण मूड निव्वळ कोमल-सुगंधी होउन जातो. ज्याप्रमाणे, सूर्य उघडे नागडे सत्य, प्रत्येक गुणावगुण स्वतःच्या प्रखर दीप्तीमध्ये अधोरेखित करतो याउलट चंद्र तेच अवगुण शीतल प्रकाशात झाकून टाकतो, आईने मायेने दुर्गुणांवर पांघरुण घालवे अगदी तसे. तो चंद्र, ती निशा हवीहवीशी वाटणारा दिवस असतो. सगळं सहाव्या इंद्रियाने म्हणजे मनाने 'फील' करावेसे वाटणारा दिवस. इन्ट्युइटिव्ह - तरल - ओघवता नेपच्युनिअन दिवस असतो आम्हा स्त्रियांना, एकमेकींचा सहवास आवडतो , गरजेचा वाटतो, कारण न बोलताही बरच आम्ही 'फील' करतो. प्रत्येक गोष्ट स्पेल आऊट करायची गरजच नसते. या हृदयीचे तय हृदयी कळून जाते. मनमनांचा संवाद होतो.
पण दर वेळेस मैत्रिणीचा सहवास कुठुन मिळणार मग मी दुर्गा सप्तशतीचे माझे पुस्तक उघडते. त्यातील श्लोक वाचते. क्वचित वासवी कन्यकेचे अथवा योगेश्वरीचे सहस्रनाम वाचते. आदिम स्त्रीशक्तीशी , प्रिमॉर्डिअल फेमिनाईनशी संलग्न होण्याचा, तिच्या सोज्वळ, चितीमध्ये न्हाऊन निघण्याचा प्रयत्न असतो हा.
अँड शी नेव्ह्हर नेव्ह्हर फेल्स मी. ने-व्ह-र!!
खूप मस्त कोमल, वाटत रहातं. एखादी गुबगुबीत, स्तनांची घळ उघडी टाकून, घट्ट टीशर्ट घातलेली स्पॅनिश पुरंध्री कशी मऊमऊ वाटते तसं काहीसं. मृदू, मऊ,कोमल, मायाळु, प्रेमळ, आश्वासक, मातृमय.
आजचा दिवस तसा आहे.

सामो , पावसाच्या आगमनाने, मनःपटलावर उमटणारे भावनांचे संगीत-झुल्यावरचे हिंदोळे खूप छान लयीत पकडलेत तुम्ही , मल्हाराच्या बंदिशी सारखे ! अप्रतीम!!

भारतासारख्या मोसमी वाऱ्यांच्या टप्प्यात किंवा तडाख्यात येणाऱ्या देशातल्या संवेदनाशील माणसांच्या भावनांची गोष्ट जरा वेगळीच असते !एप्रिल मे या दोन महिन्याच्या तळपत्या सूर्याला रोज बघून भाजून निघालेले मन अचानक संध्याकाळी जमून आलेल्या काळ्या ढगांनी व्यापून गेलेल्या आकाशाला पाहिल्यावर आणि प्रथमच बरसलेल्या टपोऱ्या थंड थेंबांचा प्रत्यक्ष आणि दृष्टि निववणारा गारवा अंगावर घेतल्यावर मनाला जी शीतलता मिळते आणि त्याहीपेक्षा त्या मातीतून आलेला सुगंध वर्षानुवर्ष जुन्या कुठल्या अशा रमवणाऱ्या आठवणीमधे घेऊन जातो ... तो सोहळा अवर्णनीय!
मग दोन-तीन महिने संततधार या पृथ्वीला भिजवत राहते. धरा खोलपर्यंत ओली होते. शरीर - मन आणि सर्व भवताल ओला होऊन जातो आणि पावसात चिंब भिजलेले गाईचं वासरू जसा आडोशाला येऊन उभे राहते तसे आपलं मन भीतीयुक्त सावटाला नजरेआड करण्याचा प्रयत्न करत राहते आणि रमते उबदार प्रकाशमान घरात .
त्यानंतर विविध सण एकदा जीवनात प्रवेश करते झाले की मग पाऊसही हळूहळू काढता पाय घेतो, मन हळूहळू प्रफुल्लित होऊ लागते आणि या पावसाने सजवलेल्या तृप्त केलेल्या आणि भरारून हिरव्यागार केलेल्या पृथ्वीचे स्वागत करायला आपण आनंदाने सामोरे जातो.. पण तरी या पावसाची आपल्याला आठवण येतच राहते म्हणून की काय हस्ताच्या वृष्टीच्या निमित्ताने तो परत परत येऊन आपल्याला त्याच्या आठवणीची भेट देत राहतो...
आणि पुढच्या वर्षी परत भेटूया हे आश्वासन देऊन हळूच या निळ्याशार क्षितिजाच्या पलीकडे आंतरधान पावतो

अहाहा पशुपत काय मस्त वर्णन केलत.
पावसाळी हवेचा खरच माझ्या मूडवरती खूप प्रभाव पडतो. आई सुद्धा तशीच होती. ती म्हणायची असं ढगाळ झालं की तुला गलबलून गेतं का गं?

सुंदर, तरल.. लेखन..!
मनातल्या भावना सुंदररित्या शब्दांत उतरवल्यात..!

सामो जी ,

निसर्गाच्या या ऊन, पाऊस, हिवाळा, पानगळ, श्रावण या विविध रूपांची
बिंबे आपल्या मनावर ठसलेली असतात..
आणि ती कुठल्यातरी गंधाने , दृष्याने एकदम छेडली जातात ! तद्वतच संगीताच्या वेगळ्या वेगळ्या स्वरावटींनी, स्वरांनी , शब्दांनी सुद्धा मन असेच क्षणार्धात वेगळ्या विश्वात जाते! रमते.. वेगळ्या भावनांनी ग्रासून जाते.. तुम्हालाही हा अनुभव येत असेल तर जीवनातील फार मोठी देणगी तुम्हाला मिळालेली आहे असे समजा ! त्याचा पुरेपूर आनंद घ्या.
मी एखाद्या गाण्याच्या स्वरांच्या अधिपत्याखाली दिवसेंदिवस अडकून पडतो .. त्याचा झाकोळ संपतच नाही..

उदाहरणादाखल काही गाणी अशी

आंख से आंख मिलाता है कोई
दिल को खिचे लिये जाता है कोई : लता मंगेशकर

ये दिल तुम बिन कहीं लगता नही हम क्या करें : रफी आणि लता

आवारगी बरंगे तमाशा बुरी नही : गुलाम अली

उसकी हसरत है जिसे दिल से मिटा भी ना सकूं : जगजीत सिंग

पाऊस आवडत नाही मला, का कोण जाणे अतिशय काहूर माजत मनात, डोक्यात पाऊस आला की.लोकांसाठी रोमँटिक सुंदर, हिरवा, सुख देणारा,आशा देणारा असा आणि बरच काही सुंदर सुचवणारा पाऊस मला मात्र कायम आर्त च वाटत आलाय आजतागायत. पाऊस पडायला लागला की खोलवर खूप काही ढवळून निघाल्या सारखं वाटत उगाच. मला पाऊस आणि पावसाळा दोन्ही नाही आवडत त्यामुळे Sad
माझी आणि पावसाची पत्रिका जुळत नसावी एकमेकांशी.
आज पुन्हा पाऊस पडतोय..... Sad