सावलीचं झाड

Submitted by चिऊ.परब on 7 July, 2020 - 05:46

श्रावणी आणि मुकेश दोघं तशी शाळेपासून एकमेकांच्या ओळखीचे. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण होताच, एक प्रायव्हेट कंपनीत नोकरीला जाऊ लागले. अनायसे दोघांची कार्यालय एकाच कॉम्प्लेक्स मध्ये आणि येण्या जाण्याची वेळ एकच असल्याने दोघेही सोबतच असायचे. दोघांची मैत्री खूप छान होती. पण आता रोजच्या भेटीमुळे त्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात होण्याच्या वाटेवर होत.

नेहमी प्रमाणे दोघंही ऑफिस मधून घरी येत होते. "श्रावणी आपण एकमेकांना खूप चांगले ओळखतो. मी सुद्धा आता पूर्णपणे सेटल आहे तर मला अस वाटत, आतापर्यंत तू मैत्रीण म्हणून खूप छान साथ दिलीस तशी आता ह्यापुढे तू माझ्याशी लग्न करून बायको म्हणून साथ देशील का?" अस विचारत मुकेश ने श्रावणीला लग्नासाठी मागणी घातली. श्रावणी साठी तो एक सुखद क्षण होता. श्रावणीला खूप आनंद झाला आणि तो तिच्या चेहऱ्यावर मुकेश ला दिसत होता. पण काही क्षणातच अचानक तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले आणि तिने "मुकेश मी तुझ्याशी लग्न नाही करू शकत" असं सांगून घरी निघून गेली. आनंदी झालेली श्रावणी अचानक नाही असं बोलून का निघून गेली हे मुकेशच्या समजण्यापलीकडच होत. रात्रभर त्याने विचार केला पण त्याला काही उत्तर सापडत नव्हत. उद्या ऑफिस मध्ये जाताना आपण श्रावणी सोबत बोलू असा विचार त्याने केला.

मुकेश नेहमी प्रमाणे ऑफिस मध्ये जाण्याकरता निघाला पुढे बघतो तर श्रावणी दिसली. रोजसारखे दोघं एकत्र जात होते पण आज दोघांमध्ये बोलणं अजिबात नव्हतं. मुकेशने न राहून श्रावणी ला विचारल "आज बोलायचं नाही का माझ्याशी ? काल मी तुला लग्नासाठी विचारल म्हणून राग आला आहे का?" तिने फक्त त्याच्याकडे पाहिलं आणि पुढे चालत राहिली. पुन्हा मुकेशने "श्रावणी आपण कॉफी घेऊया का?" विचारल. तिने होकारार्थी मान हलवली. दोघं कॉफी घेण्यासाठी बसले होते तेव्हा मुकेशने कालचा विषय पुन्हा काढला. " श्रावणी तुला नसेल माझ्याशी लग्न करायचं तर तसं सांग पण अशी अबोल राहू नकोस.. मला तू अशी शांत शांत नाही आवडत. काही तरी बोल ना ग...फक्त नसेल लग्न करायचं तर का नाही तितकं उत्तर मात्र मला दे म्हणजे मी कुठे कमी पडतोय ते मला समजेल." आता मात्र श्रावणीचा अश्रूंचा बांध फुटला ती रडायला लागली आणि तिच्या रडण्या मागचं काहीच कारण मुकेशला समजत नव्हतं. तो तिला जवळ घेऊन शांत करण्याचा प्रयत्न करत होता. तेवढ्यात श्रावणी बोलली "मुकेश मला पण तू आवडतोस पण मी तुझ्याशी काय इतर कोणाशीच लग्न नाही करू शकत...तुला कारण हवं ना? तर कारण हे आहे की मी आई नाही होऊ शकत कधी...." तिच्या शांततेमागाच खरं कारण मुकेश ला समजल आणि काही क्षणासाठी तो हि शांत झाला.

त्यादिवशी दोघं पण ऑफिसला गेले नाही. मुकेशने आजचा दिवस आपण सोबत राहू जेणेकरून श्रावनीला बरं वाटेल म्हणून ठरवल आणि त्यावर तिने होकार दिला. दोघांनी तो दिवस एकमेकांसोबत घालवला. संध्याकाळी परतीच्या वेळी मुकेशने श्रावनीचा हात हातात घेऊन तिला सांगितल "श्रावणी माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तू आज जे सांगितल ते ऐकून सुद्धा माझं तुझ्यावर असलेल प्रेम कमी नाही झालं ग...राहिला प्रश्न मुल न होण्याचा तर काही हरकत नाही. आपला श्लोक आहे ना माझ्या दादाचा मुलगा आपण त्यालाच प्रेम देऊ ना मुलाचं" हे सगळं ऐकून श्रावाणीच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं तिने विचारल " मुकेश किती रे प्रेम करतोस तु माझ्यावर. हे सत्य ऐकून दुसऱ्या कोणत्याच मुलाने पुन्हा विचारल नसत. तू जे आता बोललास सर्व मान्य, पण तुझ्या आईच काय? त्यांना हे सर्व नाही ना पटणार." तिचं बोलणं मध्येच थांबवत "तू तुझ मत सांग. मला तुझ्याशी लग्न करायचं आहे आणि आई ला कधी आणि कसं सांगायचं ते आपण नंतर बघू" असं मुकेश ने उत्तर दिलं. तिने उत्तर देण्याआधी त्याच्या कडून वेळ मागितला.

श्रावणीच्या मनात मुकेश बद्दलचा आदर खूपच वाढला होता. पुढे कोणत्याही परिस्थितीत माझी साथ सोडणार नाही हे वचन घेऊन तिने लग्नासाठी तयार असल्याचं मुकेशाला सांगितल. दोघांनी आपल्या घरी सांगण्याच्या निर्णय घेतला. दोन्ही कुटुंब तशी एकमेकांना ओळखत होती. श्रावणी आणि मुकेशची असलेली मैत्री हि घरीसुद्धा माहित होती. त्यामुळे दोघांनी घेतलेल्या लग्नाच्या निर्णयात तेही सहभागी झाले. कुटुंबियांच्या आशीर्वादाने विवाह सोहळा पार पडला. घरात सासू, दिर- जाऊ आणि छोटा श्लोक यांच्या सोबत श्रावणी आणि मुकेश चा आनंदाने सुखाचा संसार सुरू झाला. महिन्या मागे महिने संपले आणि बघता बघता आनंदी संसाराची दोन वर्ष कधी पूर्ण झाली ते समजलच नाही.

मुकेशच्या आईने एकदा श्रावणीला त्यांच्या खोलीत बोलवलं. श्रावणीला आई काय बोलणार याचा अंदाज होता, तरी ती धीराने त्यांच्या रूम मध्ये गेली. "आई बोलावलत" दार उघडत तिने विचारल. "हो ये ना आत मध्ये थोडं बोलायचं होत म्हणून बोलवलं" त्यांनी उत्तर दिलं. श्रावणी आत गेली. त्यांनी दार बंद करून बसायला सांगितलं. "श्रावणी आता तुमच्या लग्नाच्या दोन वर्ष होऊन गेली. तुला समजलच असेल मला काय बोलायचं आहे. मी कधीच तुला ह्या विषयी विचारल नाही... पण आता तुम्ही बाळाचा विचार करावा अस मला वाटतं. मुलगा असो किंवा मुलगी, आपल्या घरात अस काही नाही ग...फक्त एक बाळ होऊ द्या आता. बघ ना आपल्या श्लोक सोबत सुद्धा खेळायला एक भावंड होईल" आई तिला जवळ घेऊन समजावून सांगत होत्या. श्रावणीला काय बोलू, काय उत्तर देऊ काहीच समजत नव्हतं त्यात मुकेश पण आज रविवार असताना सुद्धा घरी नव्हता. "श्रावणी बाळा तुला बाळ झाल्यावर बाळावर लक्ष कोण देणार, तुला पुन्हा जॉब करता येईल की नाही, ती काळजी नको ग करू.. बाळाला सांभाळायची काहीच चिंता करू नको.. मी आहे अजुन व्यवस्थित, सर्व नीट करेन. पण तुम्ही आता थोडा ह्याबद्दल विचार करा." श्रावणीच्या डोक्यावर हात फिरवत आईने तिला सांगितल. "हो आई" इतकंच उत्तर देवून श्रावणी तिच्या रूम मध्ये गेली. तिला आता काहीच समजत नव्हत. आईना कस सांगू की मी आई नाही होऊ शकत, त्यांना आजी बनण्याचा आनंद मी नाही देऊ शकत.. हे असे अनेक प्रश्न तिला त्रास देत होते. कुठे आपण त्यांना फसवल ह्याच दुःख तिच्या मनाकडे सारखं येत होत. त्या दिवशी श्रावणी जेवली सुद्धा नाही. रात्री मुकेश आला तेव्हा तिने आधी त्याला घट्ट मिठी मारली. भरपूर रडली आणि झालेलं सर्व बोलणं तिने रडत रडतच मुकेशला सांगितल. "तू आता शांत झोप आपण उद्या आई सोबत बोलू" अस सांगत मुकेश ने तिला जवळ घेतलं.

सकाळ झाली तसं नेहमी प्रमाणे सगळे नाष्टा करायला एकत्र बसले होते. मुकेश आणि श्रावणी दोघं रूम मधून बाहेर आले. "आई आम्हाला थोडं बोलायचं आहे सर्वांशी, काही गोष्टी सांगायच्या आहेत" मुकेश दबक्या आवाजात बोलला. "आई काहीतरी आनंदाची बातमी आहे वाटत" खोडकरपणे मुकेशच्या वहिनीने मस्करी केली. "थांब ग बोलू दे त्यांना आधी काय ते....तुम्ही बोला काय सांगायचं आहे ते" अस म्हणत आईने परवानगी दिली. "आई मी एक गोष्ट लपवली आहे तुम्हा सर्वांपासून, खरतर श्रावणीने ह्या गोष्टी साठी मला लग्नासाठी नकार दिला होता. पण मीच तिला आयुष्यभर तू जशी आहे तशीच साथ देईन. हे वचन देऊन लग्नासाठी तयार केलं. मला तुमच्या पासून लपवायच नव्हतं, पण मला श्रावणी सोबतच लग्न करायचं होते म्हणून मी हे सांगितल नव्हत" मुकेश हे सर्व शांतपणे सांगत होता. "अरे जे काही आहे ते सरळ सांग म्हणजे आम्हाला समजेल अस कोड्यात बोलू नकोस" आई मुकेशच बोलण मध्येच तोडत बोलल्या. मुकेशने दिर्घ श्वास घेतला, श्रावणीचा हात घेऊन सर्व सांगायला सुरुवात केली. "आई श्रावणी आई होऊ शकत नाही, आम्ही तुला आमच्याकडून आजी व्हायचं सुख नाही देऊ शकत आम्हाला माफ कर." हे ऐकुन आईना खूप वाईट वाटलं. आजी होऊ शकणार नाही हे दुःख आणि मुलांनी लपवलेल सत्य ह्या दोन्ही गोष्टींचा राग त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. "खूप मोठी गोष्ट तुम्ही माझ्यापासून लपवली, माझा तुमच्यावर जो विश्वास होता तो तुम्ही आज गमावला. अरे नालायका... हे काय ऐकतेय मी? तुझी जीभ कशी झडली नाय रे हे सांगताना. अरे देवा, आता काय करू रे मी? मी काय पाप केलेलं जे ह्याला माझ्या पोटी जन्माला घातलंस?" आईचा राग आता अनावर झाला होता. त्यातुन श्रावणी तरी कशी सुटणार होती? "श्रावणी तुला आजपर्यंत मुलगी मानलं मी... पण आज तू जो विश्वासघात केलास त्यासाठी तुला आयुष्यात कधीच माफ करणार नाही मी" हे वाक्य म्हणत आई रागाने आपल्या खोलीकडे गेल्या आणि दरवाजा जोरात आपटून स्वतःला कोंडून घेतलं. घरात स्मशान शांतता पसरली, श्रावणी कोसळली आणि रडायला सुरुवात झाली. कोणालाच त्याक्षणी काय बोलावं हे समजतच नव्हत कारण परिस्थितीच तशी झाली होती. मुकेशने श्रावणी बद्दल जे काही सांगितल ते ऐकून सर्वांना धक्काच बसला होता. एकमेकांसोबत हसत खेळत राहणार कुटुंब त्यादिवसानंतर खूपच शांत शांत झालं.

त्या प्रसंगानंतर आई खूपच शांत असायच्या. कोणाशीच फारस बोलायच्या नाहीत. आईनी आपल्याशी बोलावं, राग व्यक्त करावा असं सतत श्रावणीला वाटत होत. तिने अनेकवेळा त्यांची माफी मागितली पण तरीही त्या शांतच असायच्या आणि त्यांचं हे शांत राहणं श्रावणीला अजून त्रास देत होत. ज्या गोष्टीची श्रावणीला भीती होती तीच गोष्ट घडली होती. त्यामुळे तिचीही मनःस्थिती खालावत होती. संसाराची पाहिलेली सारी स्वप्न कुठे तरी संपणार कि काय असं सतत तिला वाटत होत. एकेदिवशी आई बाहेरून आल्या तेव्हा कोणत्यातरी गोष्टीच त्यांना वाईट वाटलं होत आणि त्यांच्या मनात काहीतरी वादळ चाललंय हे जाणवत होत. वहिनी आणि श्रावणी घाबरतच काय झालं ते त्यांना विचारायला गेल्या. आधी त्या शांतच बसल्या होत्या आणि नंतर मात्र त्यांचा संयमाचा बांध फुटला आणि त्या रडू लागल्या. नक्की काय झालं ह्याची कोणालाच कल्पना नव्हती. थोडं शांत झाल्यावर आईनी सांगितलं " झालेल्या गोष्टीच मला खूप वाईट वाटत होत. थोडं शांत वाटावं म्हणून मी मंदिरात जाणून थोडा वेळ जाऊन बसायची. आज मंदिरासमोरच्या बागेत जाऊन एका बाकावर बसली होती. तिथे एक लहान मुलगी फुगे विकत होती. फुगे विकत असतात ती माझ्या जवळ आली आणि मला म्हणाली "आजी फुगे घ्या ना.." त्या मुलीच्या तोंडून आजी ऐकून माझ्या अश्रूंचा बांध फुटला. स्वतःला सावरत तिला विचारलं "आई बाबा असं कसं ग काम करून घेतात तुझ्याकडून..?" त्यावर ती मुलगी म्हणाली "मला आई बाप नाय." हे ऐकून त्या गोंडस मुलीकडे बघतच राहिली. ती पुन्हा म्हणाली "आजी फुगे घ्या ना..मला खूप भूक लागली हाय. तुम्ही फुगे घेतलात तर पैसे मिळतील आणि मी काय तरी खाऊ शकेन." मी काही फुगे घेतले नाही पण तिला खाऊसाठी पैसे दिले ती गोड हसली आणि निघून गेली. त्यामुलीकडे बघून मला जाणीव झाली की, ह्या जगात अशी कितीतरी अनाथ मुलं आहेत ज्यांना आई वडिलांचं छत्र सुद्धा नशिबात नसत. अशी किती तरी माणसं आहेत ज्यांना दोन वेळेचं जेवण सुद्धा मिळत नाही ना मूलभूत गरजा, तरी ते कोणाला दोष न देता स्वतःच आयुष्य जगत असतात आणि माझ्याकडे सर्व असून सुद्धा एका गोष्टीसाठी मी..." दुसऱ्याच क्षणी त्यांनी श्रावणीला जवळ घेतलं आणि म्हणाल्या "आजी न होण्याचं जेवढं दुःख मला झालं तेवढच तुझ्या मनाला आई न होण्याचं वाईट वाटलं असणार ना? लहानपणापासून मला सर्व सांगणारा मुकेश त्याने हि गोष्ट मला सांगितली नाही,लपवून ठेवली त्याच हे वागणं मला आवडलं नाही आणि त्यामुळे तुम्हा दोघांवर रागावली, बोलणं बंद केलं तरीही तुम्ही दोघांनी कधीही माझा द्वेष केला नाही उलट मला समजून घेत होतात. एक स्त्री म्हणून मी तुला समजून घ्यायला हवं होत, पण तस केलं नाही. माझ्या आनंदासाठी मी तुमचा आनंदसुद्धा हिरावून घेतला आणि घराची सुख शांती महत्वाची हे विसरून गेली." आईंच्या ह्या बोलण्याने सगळ्यांच्या मनावरचं मळभ दूर झालं

मधले काही दिवस आई रोज बाहेर जात असत, त्या कुठे जायच्या ते त्याबद्दल कोणालाही माहिती नसायची. आईने एक दिवस दोघांना खोलीत बोलावलं. आता सर्व काही सुरळीत सुरू होतच होत मग आईने आपल्याला अस अचानक का बोलवलं असेल असा प्रश्न दोघांच्या मनात डोकावत असताना दोघं आईच्या रूम मध्ये गेले. "श्रावणी तुला आई व्ह्यायची इच्छा आहे का?" सरळच प्रश्न त्यांनी श्रावणीला केला. "आई कोणत्या बाईला हे सुख नको असत? पण माझ्या नशिबात ते सुख नाही...आई खरच आम्ही खूप डॉक्टरांचे सल्ले घेतले पण माझ्या पदरी निराशाच पडली." रडत रडत श्रावणी ने उत्तर दिलं. श्रावणी तुला आई व्हायची संधी मिळत असेल तर तुला आई व्हायची इच्छा आहे की नाही? " पुन्हा आईने विचारल. "हो आई मला आवडलं असत पण..." "मला हो की नाही इतकंच सांग" श्रावणीच बोलणे मध्ये तोडत त्यांनी पुन्हा तिला विचारलं. "हो आई आहे माझी इच्छा आई व्हायची" अस उत्तर श्रावणीने आईंना दिलं. "आपल्याला उद्या एका ठिकाणी जायचं आहे तर तुम्ही दोघेही सकाळी तयार रहा. आता कुठे आणि का हे प्रश्न विचारू नका. उद्या सांगेन मी" आईने आनंदाच्या स्वरात दोघांच्याही डोक्यावर हात फिरवत सांगितले. दुसऱ्या दिवशी नक्की काय घडणार होते ते दोघांना पण माहीत नव्हतं पण आई खूप आनंदी होती म्हणजे काहीतरी चांगलीच गोष्ट घडणार हे नक्की होत म्हणून दोघेपण जायला तयार झाले होते.

आईने सांगितल्या प्रमाणे दोघं पण सकाळी तयार झाले. आईने देवपूजा करून दोघांना प्रसाद दिला आणि म्हणाल्या "चांगल्या कामासाठी जाणार आहोत तर आधीच तोंड गोड करून घ्या." आईंच्या मनात नक्की काय सुरू होत ह्याचा अंदाज काही लागत नव्हता. आई, मुकेश आणि श्रावणी तिघे पण गाडीने निघाले. थोड्या वेळाने एका अनाथ आश्रमाकडे पोहचले. "गेले काही दिवस मी इथेच येत होती " दोघांकडे बघून आईने सांगितलं. अनाथश्रमाच्या कार्यालयात जाण्याआधी आईने जरावेळ बाहेरील बागेत बसुया असं सांगितलं आणि श्रावणी ला म्हणाल्या "बाळा प्रत्येक झाड हे फळ देण्यासाठीच असत असं नाही ना , काही झाडं हि सावली देण्यासाठी पण असतात.. " आईंना काय सांगायचं होत ते श्रावणीला समजलं होत पण काय बोलावं हे तिला सुचत नव्हतं. फक्त डोळ्यातून अश्रू येत होते. श्रावणीचे अश्रू पुसत तिला जवळ घेऊन त्या म्हणाल्या "अग रडतेस काय वेडे... तुला काय वाटत होत, बाळ होणार नाही हे ऐकुन मी रागवली होती आणि त्यानंतर तुझ्याशी कधीच बोलणार नाही असच ना? हो..पण त्या प्रसंगाने माझे डोळे उघडले आणि मला समजल की किती चुकीचं वागत होती. आता मी तुझी फक्त सासुच नाही तर आई पण आहे. तुझं दुःख एक बाई म्हणून मी समजू शकते आणि खर सांगू फळ देणाऱ्या झाडा इतकंच सावली देणाऱ्या झाडालाही मानायला हवं." श्रावणी आणि मुकेशचा हात हातात घेऊन त्यांनी "ठीक आहे ना आपल्या घरात बाळाला जन्म नाही देऊ शकत पण आपण एका बाळाला दत्तक घेऊन त्याला त्याच हक्काचं घर तरी देऊया. माझी ही इच्छा पूर्ण कराल ना? " अस आईने विचारल. आपण एक बाळ दत्तक घेऊया असा दोघांच्याही मनात हा विचार कधीच आला नव्हता. आज आईंच्या विचारामुळे त्यांना आई वडील होण्याची संधी मिळणार होती त्यांनी क्षणाचाही विचार न करता "हो आई" अस म्हणत आईला मिठी मारली.

आनंदाने तिघेही कार्यालयात गेले. आईनी एक मुलगी दत्तक घ्यायची अस ठरवलं होत. अनाथ आश्रमातली एक लहान गोड बाहुली त्यांना आवडली होती त्यांनी तिच्याबद्दल मुकेश आणि श्रावणी ला सांगितल दोघेपण खूप खुश झाले. मूल दत्तक घेण्यासाठी जी काही कागदपत्र लागतात त्या सर्व तयारीने आई आल्या होत्या. सर्व काही कागदपत्र झाली, अनाथ आश्रमाच्या नियमांप्रमणे सर्व प्रोसिजर झाली आणि त्या आनंदाच्या क्षणी त्यांनी त्या गोड बाहुलीला दत्तक घेतल. इथे झालेलं सर्व घरी असलेल्या सुनेला आईने फोन करून सांगितल्याने घरी ती बाळाच्या स्वागतासाठी तयारी करू लागली. घरी गेल्यावर बाळाच्या काका, काकू आणि दादाने खूप आनंदाने स्वागत केलं. हळूच श्लोक दादा म्हणाला "आजी अग माझ्या बहिणीच नाव काय ठेवायचं ? मी तिला काय हाक मारू?" खरतर हा विचार कोणीच केला नव्हता. श्रावणी आईला म्हणाली "आई आज तुमच्यामुळेच मी हे सुख अनुभवू शकते आहे. तुम्हीच तुमच्या नातीच नाव ठरवा." बाळाच्या डोक्यावरून हात फिरवत "मला वाटतं आपण हिच नाव पल्लवी ठेवूया कारणआज ह्या बाहुलीच्या येण्यामुळे तुमच्या संसाराला नवीन पालवी फुटली, हिच्यावर आता तुमची अखंड मायेची सावली राहू दे." सगळे खूप आनंदी झाले. आणि काही दिवसांपूर्वी शांत झालेलं कुटुंब आता पल्लवीच्या येण्याने पुन्हा पल्लवीत झाले.

Group content visibility: 
Use group defaults

अप्रतिम लिखाण चिऊ... मायबोलीवर आपले स्वागत.... पुढील लिखाणासाठी शुभेच्छा

सुरेख!! आवडली कथा. सर्वांनी एकमेकांना समजून घेतले तर औषधे न घेता सुद्धा माणुस आनंदी निरोगी जीवन जगु शकेल. ( कुटुंबातील हेवे-दावे, रुसवे- फुगवे, अहंकार हे नष्ट झाले तर मन पण निरोगी राहील )