हिरो

Submitted by बिपिनसांगळे on 28 June, 2020 - 02:42

हिरो
----------------------------------------------------------------------------------------------------------
शनिवार होता. सकाळची शाळा . शाळा सुटल्यावर आम्ही पोरं पोरं मारुतीच्या देवळात गेलो होतो. दर्शन घ्यायला अन प्रसाद खायला ! तर देवळापाशी ही गर्दी .
त्यावेळी मी पहिल्यांदा हिरोला पाहिलं .
देवळाबाहेर एक तरुण होता. डोक्यावर भलीमोठी, चॉकलेटी, चामड्याची हॅट. अंगात पांढरा घोळदार शर्ट. त्यावर राखाडी रंगाचा पॉन्चो. खाली शिकाऱ्यासारखी तुमान . आणि पायात, पोटऱ्यापर्यंत येणारे पिवळसर चामड्याचे बूट .
तो गोरापान व देखणा होता. त्याच्या डोळ्यात जगाचा राजा असल्याचे भाव होते. तो काऊबॉयच्या वेशात होता . अर्थात हे नंतर , मोठा झाल्यावर कळलं .
पण एवढंच नव्हतं - त्याच्या डाव्या खांद्यावर एक बहिरी ससाणा होता. भेदक डोळ्यांचा. बाकदार चोचीचा. अन गंमत म्हणजे तो तरुण एका काळपट विटकरी खेचरावर बसलेला होता. घोडा मिळाला नसल्याने त्याने खेचराची निवड केली होती. ना घोडा ना गाढव, असं गाढवाच्या उंचीचं,घोड्यासारखं दिसणार खेचर.
दर्शन घेण्यासाठी तो खाली उतरला नाही. देवळासमोर खेचर उभं करून, त्याच्यावर बसूनच त्याने दर्शन घेतलं. झुकून, दोन्ही हात जोडून मारुतीरायाला नमस्कार केला. कोणीतरी त्याला प्रसाद आणून दिला. तो त्याने डोळे मिटून, भक्तिभावाने खाल्ला . लोकांना आश्चर्य वाटत होतं अन गंमतही. गर्दीतल्या एका मजुराने विचारलं, “ हा बाबा हिरो हाय का ?”
त्यावर एक माणूस हसला व त्याला म्हणाला , “हिरो ? अरे, येडाय तो ! त्याची नेहमीच असली नाटकं चाललात !”
हिरोने ससाण्याचं डोकं कुरवाळलं. खेचराची मान थोपटली. हे त्याने कुठून पैदा केलं असावं ? देव जाणे. मग तो निघाला. खेचर दुडक्या चालीने चालू लागलं . हिरो निघाला होता. रुबाबात ! त्याने गर्दीला हात उंचावून दाखवला.
पोरं ओरडली, हिरो- हिरो ! आणि आम्हीही त्या ओरडण्यात सामील झालो.
ढगाळ वातावरणाच्या पार्श्वभूमीवर, त्याचा खेचरावरून लांब जाणारा गडद ठिपका, माझ्या बालमनावर कायमचा कोरला गेला.
मला घडलेलं हिरोचं हे पहिलं दर्शन.
---

तो आमच्या दोन गल्ल्या पलीकडे रहायचा. त्याचं खरं नाव प्रशांत. पण कोणी त्याला कधी प्रशांत म्हणलं नाही कि पश्या . लोक त्याला हिरो म्हणूनच ओळखायचे आणि हाकदेखील तशीच मारायचे.
तो खरोखरी एक देखणा तरुण होता .गोरापान. मध्यम उंचीचा, मध्यम बांध्याचा. तरतरीत नाक अन टपोऱ्या काळ्या डोळ्यांचा. दाट वळणदार केसांचा.
पण प्रत्यक्षात तो एका साध्या घरातला तरुण होता. शाळा अर्ध्यावर सोडलेला. कधी बेकार तर कधी काम करणारा. बोलण्यात हिरोचा रुबाब असणारा पण भाषेत तो रुबाब नसणारा. त्याला स्वतःच्या सौंदर्याचा अभिमान होता. पण थोडा जास्तीचा. त्यामुळे स्वतःबद्दलच्या अवास्तव कल्पना.
सिनेमा नाटकात जाता तर नाव कमावलं असतं त्याने. पण तो मार्ग त्याला गवसण्यापलीकडचा होता. ना आयुष्यात काही ध्येय ना काही मार्गदर्शन. अन एक रूप सोडता तो इतर बाबतीत उणाच होता.
बिचारा ! मागेच राहिला. पण तो कधी निराश नसायचा. हिरो दिसण्याच्या बाबतीत तो कायम पुढेच राहिला. पडद्यावर हिरो जसे कपडे घालतात, रंगीबेरंगी, चित्रविचित्र. तसे कपड़े प्रत्यक्ष जीवनात कोणी घालत नाही. जर घातले तर लोक अशा माणसाला , त्याच्या कपड्यांना हसतात, नावं ठेवतात . पण तो तस्सेच कपडे कायम घालायचा. वेगवेगळे, नवनवीन. ज्या काळात लोकांकडे चार-पाच शर्ट्स असायचे, त्याकाळात तो दर महिन्याला नवीन फॅशन करायचा.
तो हे कपडे कुठून आणायचा ? कोणत्या टेलरकडे शिवायचा ? अन त्यासाठी लागणारे पैसे ?....... राम जाणे !
---

त्यानंतर थोड्याच दिवसात गणपती होते. पहिलाच दिवस. प्रतिष्ठापनेचा. मंडळाची लगबग चालू होती. मंडळ मिरवणूक घेऊन मूर्तिकाराकडे जाणार होतं. नवीन मूर्ती आणण्यासाठी. गणरायाच्या स्वागताला पावसाने थोडा शिडकावा केलेला .अंधार पडलेला,पण लाईटिंगने उजळलेला .
त्यावेळी मिरवणुकीत ढोल - ताशाचाच मान असायचा. आणि वाजवणारी पथकं असायची, ती पुण्याच्या आसपासच्या गावांमधली. ही नव्वदच्या दशकातली गोष्ट .
मंडळी भन्नाट वाजवायची आणि पोरं तर्राट नाचायची ! सगळाच रांगडा कारभार !
यावर्षी मंडळाची वर्गणी कमी जमली होती. त्यामुळे पथक बोलावता आलं नव्हतं. मग मंडळाने स्पीकर लावले. ते पाहून हिरो आमच्या मंडळात नाचायला आला. खरं तर त्यांच्या मंडळाची आणि आमची जाम खुन्नस ! पण हिरोला काय त्याचं ? तो तर सगळ्या दुनियेचा मित्र.
त्यादिवशी त्याने टेरिकॉटची, काळ्या रंगाची टाइट पॅन्ट, त्यावर तसाच काळा शर्ट, पाठीवर पांढऱ्या रंगाचा मोठा स्टार, पायात चकचकीत लेदरचे काळे बूट. घोट्याच्या वर येणारे, त्याला बाजूला बकल्स ,असे कपडे घातले होते.
तो नाचायला यायचं अजून एक कारण म्हणजे ढोल ताशावर साधं नाचावं लागायचं . रांगडं . आणि स्पिकरवरच्या वेस्टर्न किंवा फिल्मी संगीतावर, तसा डान्स करता यायचा. हिरो तसा नाच भारी करायचा.
मिरवणुकांवर लक्ष ठेवायला पोलीस फिरत होते. दोन पोलीस आमच्या मंडळापाशी आले. ढांगचिक म्युझिक सुरु झालं. हिरोची नाचायची ती नुकतीच सुरवात होती. पहिल्या दणदणाटानंतर मोठ्ठा पॉझ होता. हिरोने त्यावेळी जॅकी चॅनसारखी कुंगफूची ॲक्शन केली. एक पाय वर उचलला आणि ताठपणे तो जमिनीला समांतर ठेवला. पण तो पाय- पोलिसाच्या अंगापासून फक्त एक वीत अंतरावर होता . कदाचित, अजून काही अंगविक्षेप हिरो करता तर त्या पोलिसाला पाय लागला असता आणि त्याच्या पाठीत दांडकं पडलं असतं ! …
आम्ही लहान पोरं घाबरून ,अवाक होऊन ते दृश्य पाहत होतो. तर मोठी पोरं त्याच्या आचरटपणाला हसत होती . बरं, मागे पोलीस उभा आहे हे त्याच्या गावीही नव्हतं .
पोलीस हलला. मग ते दोघे पोलीस हसतच निघून गेले. त्यांनाही हिरोच्या चाळ्यांमुळे हसू आलं होतं . पोरं ' ह्येS ' करून ओरडली. पुन्हा ढांगचिक संगीत दणाणलं आणि नाचण्याचा एकच धिंगाणा सुरु झाला . पुढे हिरो नाचण्याचा आनंद लुटत होता. त्याच्या नाचण्याचा आनंद बाकी पोरं लुटत होती आणि खिडकीतून डोकावणाऱ्या आयाबाया देखील.
---

हिरो तसा टपोरी प्रकारात मोडणारा असला तरी मवाली कधीच नव्हता. बेकार असला, गल्लीत पडीक असला तरी भांडण -मारामाऱ्या यामध्ये त्याचं नाव कधी ऐकायला आलं नाही. व्यसन करताना तो कधी दिसला नाही. त्याला व्यसन एकच - ते म्हणजे हिरोसारखं रहायचं.
त्याला वडील नव्हते. आई कुठेतरी काम करायची. त्यावर घर चालायचं. म्हणजे जेमतेमच . धाकटा भाऊ शाळेत जायचा. तो याच्या अगदी विरुद्ध. शांत, बुजरा अन अभ्यासू . आईला पोराची काळजी वाटायची. नुसती हिरोगिरी करून पोट कसं भरणार ? अन पुढे सारंच की ! …
हिरो छोटी-मोठी कामं करायचा. ती सोडायचा, धरायचा. जी काही थोडीफार कमाई होईल ती फॅशनवर उधळायचा. तो असा भेटत राहिला. विविध रूपात.
आपल्या देशात क्रिकेट आणि सिनेमा म्हणजे जीव की प्राण. एखाद्याला क्रिकेट एकवेळ आवडणार नाही. पण सिनेमा म्हणजे विषयच संपला. पण ती झगमगाटी दुनिया एखाद्यावर किती खोल परिणाम करू शकते याचं उत्तम उदाहरण होता हिरो !
त्यावेळी जितेंद्र फॉर्मात होता. त्याची श्री देवी -जयाप्रदा बरोबर जोडी जमलेली होती. हिरोचा तो आवडता हिरो ! त्यामुळे त्याचे कपडे, हेअरस्टाईल, त्याच्या नाचाच्या स्टेप्स तो बरहुकूम कॉपी करायचा. त्याचा पिक्चर लागला की तो ‘फर्स्ट डे फर्स्ट शो’ बघायचा. त्यावेळी हिट पिक्चरची तिकिटं सहज मिळत नसत. मवाली पोरं तिकिटं ब्लॅकने विकायची. आत्ताच्या मल्टीप्लेक्क्सच्या जमान्यात सिनेमांचा तो सुवर्णकाळ मागे पडला. पण त्या काळी, पहिल्या दिवशी पहिला शो बघणं म्हणजे आषाढी एकादशीला पांडुरंगाचं दर्शन,याची देही याची डोळा घेण्याची निष्ठा असायची ! हे सांगायचं कारण म्हणजे हिरो तो पहिला शो बघायचा. तिकीट मिळालं नाही तर ब्लॅकने घेऊन. त्याला परवडत नसताना !
---

नवरात्र आलं. त्यावेळी नुकतीच चौकाचौकात दांडिया खेळण्याची सुरुवात झाली होती. पलीकडच्या गल्लीत देवी बसवलेली. आणि दांडिया ! हे गल्लीत पोरं -पोरी जमली . घणो मज्जा !
शरदऋतू. रात्रीची गार हवा सुटलेली.
आणि हिरो आला -
अंग उघडं. त्यावर लाल रंगाचा, रेशमी शेला सोडलेला. तो सुटू नये म्हणून अंगाशी बांधलेला. खाली रेशमी पितांबर. पायात मोजडी. गळ्यात, दंडात खोटे ; पण भरगच्च दागिने. आणि डोक्याला एक नारंगी, वेलबुट्टी असलेली कापडी पट्टी बांधलेली. त्यामध्ये एक मोरपीस मोठ्या झोकदारपणे खोचलेलं . नखशिखांत कृष्ण ! एक अंगाचा निळा रंग सोडता .
फॅन्सी ड्रेसला लहान मुलं असा पोशाख करतात. पण ते शाळेत. हा मोठा माणूस. हे असे कपडे घालून रस्त्यावर नाचायला आलेला. त्यात हातामध्ये सुशोभित केलेल्या टिपऱ्या घेऊन. साऱ्या गर्दीच्या आकर्षणाचा विषय झाला, यात काय नवल !
मग तो असा काही झोकात टिपऱ्या खेळायला लागला , की बस ! आधीच तो देखणा, त्यात कृष्णाचा अवतार अन त्याचं लयबद्ध, दिलखेचक नाचणं.
पोरं त्याच्यावर जळत होती तर पोरी त्याच्या सौंदर्याचं रसपान करत होत्या !
त्यावेळी ती आली. अख्ख्या गर्दीचं आकर्षण असलेली- शेफाली. रेकॉर्ड लावणाऱ्याने मुद्दाम गाणं लावलं - परी हूं मैं !आणि खऱोखरीच आकाशी रंगाच्या घागरा चोलीमध्ये तिचं सौंदर्य एखाद्या परीसारखं खुलून दिसत होतं .
तीही दांडिया छानच खेळायची . दोघांच्या टिपऱ्या लयदारपणे एकमेकांवर आघात करत होत्या . आणि दोघांच्या तरुण मनांवरदेखील ! दोघांची खेळण्यात जोडी जमली आणि जमलीच. ती त्याच्यावर भाळली. हे नवरात्रीच्या पहिल्याच माळेला. अन पुढे रोज.
दोघेही एकमेकांवर आशिक झाले. पण त्यावेळी मुला-मुलींना एवढं सहजपणे भेटता यायचं नाही.मोबाईलचं युग अजून अवतरायचं होतं. एकमेकांची फार माहिती नव्हती त्यांना .
अशी एक परीकल्पना आहे की रात्र झाल्यावर पऱ्या धरतीवर उतरतात . नृत्य करण्यासाठी . सकाळ झाली की निघून जातात . तसा तो काळ होता , त्या दोघांसाठी. नवरात्रींमधल्या त्या रोमांचित करणाऱ्या रात्रींचा .
नवरात्र संपलं .
---

ती चार चौक पलीकडं रहायची. एका पैसेवाल्या बापाची लाडावलेली पोर.
एकदा ती गिरणीत गेली. गहू दळायला . साधं दळणासाठी जातानाही तिच्या अंगावर चांगले कपडे होते .
तिथला कामगार पाठमोरा होता. नखशिखांत पीठाने माखलेला. चेहऱ्यासहित. त्याने चेहऱ्यावरचं पीठ झटकलं. रुबाबदारपणे केस मागे केले. तो वळला आणि शेफालीकडे पाहतच राहिला. तो हिरो होता... तो तिच्याकडे बघून कसनुसं हसला… त्याच्या त्या हसण्यात सारंच येऊन गेलं होतं . हास्य , करूणा अन वेदनाही ! …
त्याला गिरणीत ,या अवस्थेत , एक कामगार म्हणून पाहणं हा तिला एक धक्काच होता. एक क्षण दोघे एकमेकांकडे पहात राहिले. तो खजील होऊन तर ती आश्चर्याने ! मागे गिरणीचा पट्टा फाडफट-फाडफट आवाज करतच होता .
पण ती त्याच्याकडे पाहून गोड हसली.
प्रेम आंधळं असतं ! …
मग काय ? आधी कामाचा कंटाळा करणारी ती , सारख्या गिरणीत चकरा मारू लागली. मुद्दाम दळायला थोडं -थोडं धान्य नेऊन. जेणेकरून जास्त खेपा घालता येतील. तोही तिचं दळण लवकर द्यायचा नाही . तिला जास्त वेळ तिथे थांबता यावं म्हणून .
पण जिथे हिरो तिथे खलनायक असायचाच. त्याच्या बाबतीत , परिस्थिती खलनायक होती. सिनेमात हिरो जिंकतो. पण प्रत्यक्ष आयुष्यात परिस्थिती नेहमीच वरचढ ठरते.
घरच्यांनी तिचं कुठेतरी लांब लग्न लावून टाकलं.
अन हिरो ? - तो मनातून कोसळला. शांत झाला. त्याचा रसरशीतपणा संपला. त्याची हिरोगिरी संपली. तो देवदास झाला. दारूत बुडालेला देवदास ! लव्हस्टोरीमध्ये प्रेम असतं तसंच प्रेमभंगदेखील !
हिरो आहे तसाच राहिला . बेकार, बिन लग्नाचा . पुढे त्याची दारू कमी झाली. तो कसाही, गबाळ्यासारखा राहू लागला. वय झालं . पोरं त्याच्या विषयी चर्चा करायची बंद झाली. त्याच्या विषयीचं कुतूहल ओसरलं. पुढे त्याची आई गेली. भावाचं लग्न झालं . तो वेगळा राहू लागला.
हिरो एकटा पडला.सर्वार्थाने एकटा !
मग खूप दिवसांनी तो वेगळ्या अवतारात दिसला. भगव्या कपड्यात. पांढऱ्या दाढी -मिशांचं जंजाळ. अंगात भगवी कफनी. गळ्यात रुद्राक्षांच्या माळा. तोंडात बम भोले आणि चिलीम ! या वयातही त्याची स्टाईल सुटली नव्हती.
एकदा गल्लीतला एक जुना मित्र भेटला . त्याच्याबरोबर हिरो होता . चहासाठी एका हॉटेलमध्ये शिरलो . बोलताना कळलं की तो मला चेहऱ्याने ओळखतो . मला आश्चर्य वाटलं. त्याच्याशी बोलावं असं एक सुप्त आकर्षण मनात बालपणासून होतं. आज खुद्द तो माझ्यासमोर बसला होता .
गप्पा सुरु झाल्या . त्याचं बोलणं थेट , मनमोकळं . तो कोणाशीही तसंच बोलत असावा . जुनी ओळख असल्यासारखा . मी त्याला त्याच्या जुन्या आठवणी सांगितल्यावर तो खुश झाला . खुलला . मग त्याने आणखीही किस्से सांगितले. एकसे एक नमुनेदार ! मजेशीर , हसवणारे आणि रडवणारे . अर्थात मला माहित नसलेले .
मी त्याच्या भगव्या कपड्यांकडे पाहत विचारलं , " हे कपडे ? काय गुरु वगैरे केलाय का ? "
" गुरु ? कसला गुरु ? जिंदगीमें गुरु एकही और वो है खुद जिंदगी ! राजा , जिंदगीच आपल्याला शिकवते . पण माणूस शिकल्यावर शहाणा होतो . इधर तो आपुन सिखनेके बादभी फेलच है ! "
त्याने डायलॉग मारला होता . पण खरा . त्याच्या बिकट परिस्थितीचा आरसाच जणू .
तो पुढे म्हणाला ,” भई , आता जगात कायपण राह्यलं नाय बघ . आधी आई गेली आणि मागच्या महिन्यात ती पण गेली रे. साला पिक्चर कधी संपला कळलंच नाय . अन ह्ये - ह्ये कपडे माणूस उगाच घालतो . काय अर्थ नाय . आता सगळं संपलं म्हणून हे भगवं घातलंय. पण मनाला शांती ?... थोडीसुद्धा नाय रे !”
मी मूकपणे ,कपड्यांवर प्रेम करणाऱ्या माणसाचं ते कपड्यांबद्दलचं निराश तत्वज्ञान ऐकत होतो. शेवटी कपड्यांचा उपयोग तो काय ? तर अंग झाकणे ! शेवटी कपड्यांच्या आत तर माणूस नागडाच. हे कटू सत्य त्याला आयुष्याच्या शेवटी परिस्थितीने , टोकदारपणे शिकवलं होतं .
तो कोरड्या डोळ्यांनी बोलत होता. आणि मी मात्र डोळ्यातलं पाणी लपवण्याचा प्रयत्न करत होतो.
नायकाची प्रतिमा ‘लार्जर दॅन लाईफ’ रंगवण्याचा प्रयत्न केला जातो . पण नायक बनण्याच्या नादात हिरो कधी ‘स्मॉलऱ दॅन लाईफ ’ झाला होता , त्यालाही कळलं नव्हतं .
बिचाऱ्या हिरोच्या भाळी फ्लॉपचा एक अदृश्य शिक्का कायमचाच बसलेला होता .
-------------------------------------------------------------------------------------------------------------

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

खूप छान.. आवडली खूपच !
अश्या काही पाहिलेल्या हिरोंशी रिलेटही झाली.. किंबहुना काही लिहायची उर्मीही दाटून आली. बघू जमल्यास. हल्ली सुटलेय लिहिणे.

वाह मस्त लिहिलंय!
आमच्या शाळेत असा एक हिरो होता. त्याला सगळे 'अमिताभ' किंवा 'बच्चन' म्हणायचे. तोही अमिताभच्या स्टाईलने डायलॉग वगैरे मारायचा. अगदी शाळेतले सरसुद्धा त्याला नावाने हाक मारायचे नाहीत. योगायोग म्हणजे त्याचंही खरं नाव प्रशांतच. पुढे काय झालं त्याचं काय माहिती!

Super

सुरेख व मन हळवं करणारी कथा.
दामिनी सिनेमात मीनाक्षी शेषाद्री च्या मेहुण्याची व्यक्तिरेखा काहीशी अशीच होती. अशा कलाकारांना संधी मिळतेच असं नाही आणि मग परवड होत जाते आयुष्याची.

ऋन्मेऽऽष
कथा वाचून लिहावंसं वाटलं हे उत्तम .
लवकर लिहा
पुलेप्र
असे खूप लोक असतात कि काय न कळे

वावे
भारी वाटलं
तुमची शाळेची आठवण वाचून .

अभ्या
प्रतिसादाबद्दल आभारी आहे
आणि नेहमीच

उशीर प्रतिसाद देतोय

तुमची लिंक दिलेली कथा वाचली
छान आहे , भारी , विशेषतः तुमची लेखन शैली . मस्त .

फक्त - गैरसमज नसावा .
कथेमध्ये पात्र सोडता , काही साम्य सोडता वेगळेपण आहे

सगळ्यात महत्त्वाचं - हि कथा नाही तर मी हे वास्तव लिहिलं आहे
यामधे फारच थोडा भाग काल्पनिक आहे .
कदाचित - कथेत म्हणल्याप्रमाणे आपल्या देशात सिनेमा चे वेड घेऊन जगणारी खूपच माणसं असावीत
तसा उल्लेख वावे आणि ऋन्मेश यांच्या प्रतिसादात आला आहे .
कळावे
स्नेह असावा

प्राचीन
खूप आभार .
दुर्दैवाने हे वास्तव आहे . काल्पनिक नाही

अभ्या... >> लेख वाचताना माझ्या डोळ्यासमोर अगदीच तुमची कथा आली. दोन्ही गोष्टी चांगल्या आहेत.