कुंडल

Submitted by वावे on 27 June, 2020 - 06:23

"हॅलो सारिका"
"आदित्य, कधीपासून फोन करतेय. रूमलाही कुलूप होतं. ट्रेकवरून परवाच येणार होतास ना?"
"हो, माझा मोबाईल बंद पडला होता. अगं आम्ही तिकडे वाट चुकलो."
"बापरे!"
"एवढं काही नाही गं, रात्री रानात झोपलो. सकाळी एकजण भेटला, त्याने वाट दाखवली आणि आलो मुंबईला. परवाऐवजी काल रात्री पोचलो, एवढंच"
"छान!! मग आज ऑफिसला येतोयस?"
"येतोय ना.भेटूच"
आदित्यने फोन ठेवला. खरं म्हणजे हे एवढंच नव्हतं. खाण्याचे डबे आणणार्‍याचा अंदाज चांगलाच चुकला होता. त्यात आणखी रस्ता चुकल्यामुळे दोन दिवस त्या चौघांनाही फारसं काहीच खायला मिळालेलं नव्हतं. शिवाय उन्हातून पायपीट. सगळे सवयीचे ट्रेकर होते, पण उपाशी राहण्याचा अनुभव नसल्यामुळे बाकी तिघेही कासावीस झाले होते. आदित्य मात्र काटक होता. लहानपणीही बर्‍याच वेळा दुपारी शाळेतून आल्यावर न जेवताच तो खेळायला पळायचा आणि मावशींनी झाकून ठेवलेलं ताट संध्याकाळी उशीरा बाबा दवाखान्यातून आल्यावर त्यांना दिसायचं. कळवळून, कधी रागावून बाबा त्याला हाका मारायचे आणि जेवण परत गरम करायचे.
डेस्कवर दोन्ही कोपरं टेकवून तर्जन्यांनी कानांमागचे उंचवटे कुरवाळत आदित्य विचारात बुडाला होता. कानांमागचे सुपारीएवढे टपोरे उंचवटे, काल काहीसे मऊ आणि मलूल झाले होते हे त्याला जाणवलं होतं. त्याच्या लक्षात काहीतरी येत होतं. एकदा बाबांना फोन करून त्यांच्याशीच बोलूया असं त्याने ठरवलं. पण त्याआधी तो स्वतःवर एक प्रयोग करून पाहणार होता.
आदित्यचे बाबा म्हणजे डॉ. सुभाष साळगावकर. सुरुवातीला दहाबारा वर्षं त्यांनी डॉ. बंग पतीपत्नींपासून प्रेरणा घेऊन मेळघाटात कोरकू आदिवासी भागात डॉक्टरकी केली. तिथे शाळाही सुरू केली. नंतर एक वर्षाच्या आदित्यला घेऊन ते पुण्याला आले आणि स्थायिक झाले. आदित्य खरं तर बुंद्या नावाच्या एका आदिवासीचा मुलगा. साळगावकरांनी शर्थीचे प्रयत्न करूनही बुंद्याची ॲनिमिक बायको बाळंतपणातच वारली होती. बाळ मात्र वाचलं. डॉक्टरांनीच त्याचं नाव ’आदित्य’ ठेवलं. सहासात महिन्यांनी बुंद्याही साप चावून गेला. डॉक्टरांनी आदित्यला रीतसर दत्तक घेतलं. हाताखाली तयार झालेल्या डॉ. दीक्षितांवर दवाखान्याची आणि शाळेची जबाबदारी सोपवून ते पुण्याला आले. स्वतः लग्न केलं नाही, पण मायेने, जबाबदारीने आदित्यला वाढवलं. त्याचा कल बघून त्याला आर्किटेक्ट केलं. आदित्य आठवीत असतानाच त्यांनी त्याला त्याचा इतिहास सांगितला होता. नंतर ते त्याला मेळघाटात घेऊनही गेले होते.

आदित्य लहान असताना शाळेतले, वाड्यातले मित्र त्याच्या कानांमागच्या उंचवट्यांकडे कुतूहलाने बघायचे. कुणाच्याच कानामागे असे उंचवटे नव्हते. बाबांना विचारल्यावर बाबांनी त्याला कर्णाच्या कवचकुंडलांची गोष्ट सांगितली होती आणि म्हटलं होतं, बघ तुलापण कुंडलं आहेत, फक्त कानामागे आहेत! आदित्यचं तेव्हा समाधान झालं, पण नंतर मेळघाटात गेल्यावर त्याने पाहिलं की तिथल्या वस्तीवरच्या सगळ्यांच्याच कानांमागे असे उंचवटे होते. त्याला ते ’घुंटु’ म्हणत. आदित्यला आपल्या ’कुंडलांचं’ रहस्य कळलं, पण नंतर त्याने त्याबद्दल फारसा विचार केला नाही. तो मेळघाटात अधून मधून जाऊन यथाशक्ती तिथल्या कामाला हातभार तेवढा लावायचा.
आता मात्र त्याला घुंटुंबद्दल बाबांशी बोलायचं होतं. तीन दिवसांनी आपल्या निरीक्षणांबद्दल खात्री पटल्यावर त्याने बाबांना फोन केला.
"बाबा, तुम्हाला एक विचारायचंय"
"बोल"
"माझे घुंटु नक्की कशासाठी आहेत?"
"म्हणजे?"
"त्यांचा उपयोग काय? डोळ्यांचा उपयोग दिसण्यासाठी, कानांचा ऐकण्यासाठी, तसा घुंटुंचा उपयोग काय?"
"..."
"मला वाटतं घुंटु हा माझ्या शरीराचा ’इमर्जन्सी साठा’ आहे. मला भूक सहन होते, कारण खायला नाही मिळालं तरी माझं शरीर घुंटुंमधून एनर्जी वापरतं. मी आत्ता ट्रेकला गेलो होतो, तेव्हा आम्ही जवळजवळ दोन दिवस फारसं काहीही खाल्लं नाही. बाकीच्यांचे हाल झाले, पण माझे नाही. माझे घुंटु मात्र थोडे मलूल झाले. मुंबईला पोचून नेहमीसारखं जेवलो आणि सकाळपर्यंत घुंटुही नेहमीसारखे झाले. मग मी मुद्दाम गेले तीन दिवस काहीच खाल्लं नाही. मला अजिबात थकवा आला नाहीये, पण आता माझे घुंटु आणखी मऊ झालेत."
"आदित्य, भलतेसलते प्रयोग करू नकोस. आधी जाऊन जेव."
"पण तुम्हाला काय वाटतं?"
"बरोबर आहे. घुंटु एनर्जीचे साठेच आहेत. मला मेळघाटात असताना हे लक्षात आलं होतं. दीक्षित आणि बाकीच्या दोन्ही डॉक्टर्सनासुद्धा हे माहीत आहे."
"पण मला नाही सांगितलंत"
"तसा कधी विषय नाही निघाला आपला. थोडं संशोधनही मी केलंय, पण कुठे प्रसिद्ध केलं नाही."
"का?"
"कारण आदिवासींचे खरे महत्त्वाचे प्रश्न वेगळे आहेत. तू आधी जेवायला जा. शनिवारी पुण्याला ये, आपण सविस्तर बोलू."

पुण्याला गेल्यावर आदित्य बाबांशी बराच वेळ बोलला. बाबांनी केलेल्या संशोधनाचे निष्कर्षही त्याने वाचले. तो डॉक्टर नसल्यामुळे त्याला त्यातल्या गुंतागुंतीच्या बाबी समजल्या नाहीत, पण जे समजलं ते असं:
एखाद्या विशिष्ट हवामानात, विशिष्ट भौगोलिक परिस्थितीत राहताना तिथल्या सजीवांच्या शरीरात परिस्थितीला जुळवून घेण्यासाठी काही बदल होतात. हे बदल अचानकपणे होत नाहीत, तर हजारो वर्षांमध्ये होतात. जिथे भरपूर हिमवर्षाव होतो, तिथल्या झाडांचा आकार शंकूसारखा असतो, ज्यामुळे पडणारा बर्फ लगेच खाली घसरून जातो. याला अनुकूलन, म्हणजेच adaptation म्हणतात. उंटाच्या पाठीवरचा उंचवटा हे अनुकूलनच आहे. या उंचवट्यात चरबी साठवलेली असते. त्यामुळेच उंटाला अनेक आठवडे खायला मिळालं नाही, तरी या चरबीच्या आधारावर तो जगतो. आदित्य ज्या आदिवासींमध्ये जन्मला होता, ती तिथे पिढ्यानपिढ्या रहाणारी कोरकू आदिवासींचीच एक जमात होती. पण त्याआधी ते कदाचित कुठल्यातरी वाळवंटी प्रदेशात रहात असावेत. काही कारणाने ते स्थलांतर करून मेळघाटात येऊन राहिले असणार. इथल्या इतर आदिवासींपेक्षा त्यांच्या चेहर्‍याची ठेवणही लक्षणीयरीत्या वेगळी होती. पूर्वी वाळवंटी भागात खडतर परिस्थितीला तोंड देताना त्यांच्या शरीरात अनुकूलन होऊन कानामागे हे चरबीचे घुंटु आले असणार. लहान लहान पाड्यांमध्ये विभागलेली ही विशिष्ट वस्ती अगदीच दुर्गम भागात होती आणि इतर वस्त्यांशी त्यांचा फारसा संबंध नसल्यामुळे हे वैशिष्ट्य त्यांच्यापुरतंच राहिलं. या घुंटुंमुळे पाचसहा दिवसही काही न खाता ते राहू शकत होते.

आदित्य थरारून गेला. उत्क्रांती, अनुकूलन या बाबी तो शाळेत शिकला होता. पण आपले घुंटु ही हजारो वर्षांपूर्वी आपल्या पूर्वजांच्या शरीरात झालेल्या बदलाची निशाणी आहे, आपल्याकडे, आपल्या भाऊबंदांकडे उत्क्रांतीने दिलेली ही विशेष देणगी आहे याची जाणीव त्याला झाली. आदिवासींच्या खर्‍या प्रश्नांकडे दुर्लक्ष होऊ नये ही बाबांची काळजी रास्तच होती, पण यावर अधिक संशोधन व्हावं असंही आदित्यला वाटू लागलं. दीक्षितांबरोबर काम करणारे डॉ. म्हात्रे घुंटुंवर संशोधन करण्यासाठी उत्सुक असल्याचं बाबांकडून त्याला समजलं.

मुंबईला आल्यावर तो सारिकाशी बोलला. त्यांनी एकमेकांशी लग्न करण्याचं ठरवलेलं असल्यामुळे तिचं मत त्याच्यासाठी महत्त्वाचं होतं. सारिकाचीही प्रतिक्रिया आश्चर्यमिश्रित कुतूहलाची होती. तिने त्याला प्रोत्साहनच दिलं. पुढच्याच महिन्यात तो मेळघाटात गेला आणि त्याने डॉ. म्हात्र्यांशी बोलून स्वतःवर प्रयोग करण्याची तयारी दाखवली. घुंटुंची बायॉप्सी करून आतल्या पेशींचं पृथक्करण केल्यानंतर, घुंटु मुख्यतः चरबीचे बनले असावेत या डॉ. साळगावकरांच्या अंदाजाला पुष्टीच मिळाली. काहीही न खाता, नेहमीसारखं काम करत राहून फक्त पाणी पिऊन तब्बल सहा दिवस आदित्यच्या रक्तातली साखर धोकादायक पातळीच्या खाली उतरत नाही, हेही त्यांच्या लक्षात आलं.

तीन वर्षे बंगळूरच्या नॅशनल बायोलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूटशी विचारविनिमय करत, आदित्यच्या आणि अजून चार सुशिक्षित आदिवासींच्या अनेक चाचण्या करून डॉ. म्हात्र्यांनी आपले निष्कर्ष लॅन्सेट या आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रसिद्ध केले. उत्क्रांतीवर संशोधन करणार्‍या जीवशास्त्र‍‍ज्ञांमध्ये आणि जनुकशास्त्रज्ञांमध्ये खळबळ उडाली. शास्त्रज्ञांची एक आंतरराष्ट्रीय टीम मेळघाटात आली. संशोधनाची चाकं फिरू लागली.

मधल्या काळात आदित्य आणि सारिकाने लग्न केलं. त्यांना दोन मुलंही झाली. मुलाला नाही, पण मुलीला अगदी आदित्यसारखेच घुंटु होते.

उत्क्रांतीच्या देणगीने आदिवासींच्या विश्वाबाहेर पाऊल ठेवलं होतं.

ही कथा मी आयुकाच्या विज्ञानकथा स्पर्धेसाठी पाठवली होती. (स्पर्धेत निवड झाली नाही) त्यांची १००० शब्दांची मर्यादा असल्यामुळे कथा कदाचित थोडी त्रोटक झाली आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छानच लिहिली आहे. हा आपला अभ्यासाचा विषय दिसतो आहे. हे कधी ऐकले / वाचले नव्हते. अनवट विषय विज्ञान कथेतून वाचायला मिळाला. ह्या विषयावर अजून वाचेन. म्हणजे आपण लिहिलेल्या कथेचे सार्थक होईल. आता सुरुवात केली आहे तर मागे वळू नका. मागे जाऊन आपले जुने लिखाण वाचून काढले, GMRT विशेष आवडले.
पु .ले.शु

सर्वांना धन्यवाद! फिक्शन पहिल्यांदाच लिहिली आहे त्यामुळे जमतेय की नाही अशी धाकधूक होती.
अस्मिता, हे घुंटू प्रकरण पूर्णपणे काल्पनिक आहे.
प्रभुदेसाई, उत्क्रांती हा विषय वाचनासाठी आवडीचा आहे नक्कीच Happy

छान. आवडली.
मुलाना वाचायला मस्त आहे. मानवी भावभावना आणि वैज्ञानिक संकल्पना एकत्र करून फार सुंदर समतोल साधला आहे.
आणखी लिहा.

अमितव, किल्ली, प्राचीन, चंद्रा, फारएण्ड, तुषार, हर्पेन, स्वाती, च्रप्स, विनी, सर्वांचे मनापासून आभार!
च्रप्स, माझ्या डोक्यात यापुढचंही कथानक होतं, पण शब्दमर्यादेत बसलं नसतं. पूर्ण कथा परत लिहून काढली तर तेही कथानक घेईन मग. Happy

.>>>.>कथा सत्य घटना वाटावी अश्या कौशल्याने लिहिली आहे! आवडली. पुलेशु!

Submitted by चंद्रा on 27 June, 2020 - 15:11>>>>>>
अगदी ,अगदी !
फुल अॅॅग्रीमेंट

सायन्स फिक्शनसाठी लिहिलेली ही कथा वाचताना इतके समरसुन जायला झालं की कुठलीच घटना / प्रसंग अजिबात काल्पनिक वाटले नाही आणि हेच ह्या लिखाणाचे यश आहे त्यामुळे ह्याच्या पुढील भागाची आखणी करत एक सिरीज लिहिली तर वाचायला भारी मजा येईल.

च्रप्स, माझ्या डोक्यात यापुढचंही कथानक होतं, पण शब्दमर्यादेत बसलं नसतं. पूर्ण कथा परत लिहून काढली तर तेही कथानक घेईन मग.
>>> नक्की लिहा वेळ असेल तर... खूप पोटेन्शियल आहे कथानकेत... शुभेच्छा !!!!!

लिहिली छान आहे पण कथेला क्लोझजर नाहीय.......+1.

मलाही काही काल ते घुंटू प्रकरण खरंच वाटले होते.

कथा आवडली .
मला पहिल्यांदा ते घुंटू प्रकरण खरं आहे असे वाटले .

मस्त.
मला आधी वाटलं हे घुंटु मला कसे माहित नाहीत. मेळघाट इतका फिरुन Lol
खरंच खूप छान कथा आहे.

Pages