पाटील v/s पाटील - भाग २२

Submitted by अज्ञातवासी on 23 May, 2020 - 00:45

नमस्कार!
तब्बल वर्षभराने हा भाग येतोय, माफी असावी. ही कथा आता लवकरच पूर्ण होईल.

पाटील v/s पाटील - भाग २१

https://www.maayboli.com/node/70134

वसंतराव तडक आत आले, ते इकडेतिकडे न बघता सरळ कृष्णरावांकडे गेले...
... आणि फाडकन त्यांच्या मुस्कटात लगावली.
"तद्दन मूर्खपणा, फालतूपणा होता हा. काहीही गरज नव्हती इथे परत येण्याची. हे लोक कायम आपलं सर्वस्व हिरावून घेत आलेत. अनेकदा समजावलं मी, पण सगळं सोडून या मातीमोल लोकांमध्ये तुम्ही इतका वेळ गमावला. याना सत्याची चाड नाही. याना माणसाची कदर नाही. लवकरात लवकर एअर ऍम्ब्युलन्सची तयारी करा. आपल्याला युक्रेनला निघायचंय... परत..."
ते आयसीयूकडे निघाले. मध्ये डॉक्टर दिसल्याने ते बाहेरच थांबले.
डॉक्टर बाहेर आले. वसंतरावानी त्यांच्याकडे बघितले.
"प्रकृती कशी आहे?"
"स्थिर आहे."
"तुमच्या डिसचार्जच्या फॉर्मॅलिटीज लवकर पूर्ण करा."
"अहो पण...?"
"एक मिनिट, पैशाची चिंता करू नका, आणि जितके लागतील तितके घ्या. पेशंटची जबाबदारी मी घेतोय."
"मी या गोष्टीला मान्यता देऊ शकत नाही." डॉक्टर म्हणाले.
"ओके. दोन मिनिटात वरून फोन येईल, मग तयारी चालू केली तरी चालेल."
वसंतरावानी डॉक्टरकडे बघितलंही नाही, व ते सरळ आत गेले.
आत मोहन शांतपणे पडला होता. त्याची छाती हळुवारपणे वरखाली होत होती.
वसंतराव आत गेले. त्यांनी एक स्टूल ओढला, व ते मोहनजवळ बसले.
सर्व जुन्या आठवणी आज राहून राहून वर येत होत्या.
त्यांनी मोहनचा हात हातात घेतला.
"सगळं ठीक होईल. सगळं..." ते स्वतःशीच पुटपुटले.
तेवढ्यात दार उघडून एक स्त्री आत आली.
"या स्थितीत मोहनला इथून हलवलं, तर किती अनिष्ट परिणाम होतील याची तुम्हाला कल्पना तरी आहे का?" ती स्त्री म्हणाली.
"हो आहे... पण..." वसंतराव तिच्याशी बोलण्यासाठी मागे वळले.
"आनंदी...' त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला, व त्यांचे पुढचे शब्द घशातच अडकले.
आनंदीबाईंच्या तोंडातून शब्दच फुटत नव्हता...
वसंतराव काही क्षणांनी भानावर आले.
"हे बघा बाई," त्यांनी नजर दुसरीकडे वळवली. "तुम्ही डॉक्टर असाल. खूप हुशार डॉक्टर असाल. इतक्या कि तुमचा हात लागताच पेशन्ट खणखणीत बरा होत असेल. तुमच्या औषधांपेक्षा पेशन्टला तुमचे शब्द..."
ते अचानक थांबले.
'काय बोलतोय मी...' ते स्वतःशीच पुटपुटले.
"तर आमचं पेशन्ट आम्ही नेतोय. सगळी औपचारिकता करून. काळजी घ्या."
ते तसेच बाहेर निघून गेले.
एव्हाना हॉस्पिटलला छावणीच स्वरूप आलं होतं. युक्रेनकमधून एक अतिशय मोठे उद्योगपती आले आहेत, व त्यांना कडेकोट सुरक्षा देण्याच्या सूचना लोकल पोलिसाना गृहमंत्रालयाकडून आल्या होत्या.
अण्णांची गाडी हॉस्पिटलपासून काही अंतरावर पोलिसांनी अडवली.
"ये, वेडा झाला का? नीट वाग जरा. सोड."
"अण्णा गृहमंत्राचें आदेश आलेत. सगळं परिसर सील केलाय."
"काय? अरे काय बोलतोय.. सोड गाडी."
तेवढ्यात अण्णांना एक विमान खाली उतरताना दिसलं.
"आईशपथ... निघालेत कि काय?"
अण्णा गाडीतून उतरले, आणि हॉस्पिटलच्या दिशेने धावत सुटले.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप छान आहे पण भाग छोटासा आहे आणि कृपया कथा सलग लिहून काढा कारण खूप अंतराने भाग येतात आणि मग परत सर्व वाचून काढावे लागते.

Interesting गोष्ट आहे. सलग अन लवकर वाचायला अधिक छान वाटेल. चांगली रंगवता गोष्ट तुम्ही.