लाल रंगाचं विमान

Submitted by बिपिनसांगळे on 9 June, 2020 - 10:39

बालकथा
----------------
चित्रक यक्षाच्या कथा
------------------------------
लाल रंगाचं विमान
------------------------------------------------------------
त्या एका मोठ्या प्रदर्शनाच्या बाहेर बिशन उभा होता. तो एक साधा मुलगा होता . केसांना भरपूर तेल लावून चोपून बसवलेला . खांद्याला पिशवी लटकवून , खेळण्यातली उडणारी विमानं विकण्यासाठी . त्याच्याबरोबर आणखी बरीच मुलं होती, पण ती त्याच्यापेक्षा मोठी होती. सगळेच काही ना काही विकत होते.
उन्हाळ्याचे दिवस असल्याने प्रदर्शनाला गर्दी होती .
त्या लोकांचा एक मालक होता. रोज त्याच्याकडून माल घ्यायचा, तो विकायचा व त्याला हिशोब द्यायचा. आज विकण्यासाठी आलेल्या विमानांमध्ये एक लाल रंगाचं विमान होतं. ते पहिल्यांदाच त्याच्या हातात आलं होतं. त्याला ते खूप आवडलं. त्याला असं वाटलं की हे स्वतःसाठी ठेवून घ्यावं. पण त्याचे पैसे त्याच्या वडलांना भरावे लागले असते व ते त्याला परवडलं नसतं. त्यावर त्याला असं वाटलं की ते विमान विकलंच जाऊ नये…
त्या विमानाला खाली चपटी पट्टी होती . ती जोरात ओढली आणि सोडली की विमान चांगलं गिरक्या घ्यायचं .
समोरून एक छोटा मुलगा, छान छान कपडे घालून त्याच्या आई-बाबांबरोबर येत होता. त्याच्या आईला खरेदीची घाई झाली होती. बाबा बिशनजवळ थांबले. तशी ती पुढे गेली.
त्या माणसाने एक विमान विकत घेतलं. पण सोहमने- त्या मुलाने त्याच्याकडे ढुंकूनही पाहिलं नाही. ते लाल रंगाचं विमान होतं, बिशनला आवडलेलं.
सोहम आणि बाबा प्रदर्शनात गेले. तो बाबांना काही पाहू देत नव्हता. भयंकर मस्तीखोर मुलगा !
तो एका खेळण्यांच्या दुकानापाशी गेला. त्याने एक मोठी, चित्रविचित्र आवाज करणारी बंदूक उचलली, तिचा खटका दाबताच तिच्यातून आवाज येऊ लागले आणि लाल निळे दिवे उघडझाप करू लागले . पण त्याच्या बाबांनी ती बंदूक घेण्याऐवजी एक रोबो घेतला. चालणारा - बोलणारा . तो जास्त छान होता.
सोहमला राग आला. ते कंटाळून बाहेर आले. आई अजून आली नव्हती. बाबांनी सोहमला पॉपकॉर्न घेतले, पण त्याने ते खाल्ले नाहीत. त्याला ती बंदूकच हवी होती. त्याचे बाबा त्याची समजूत घालत होते. तर त्याने बाबांचा हात झिडकारला. सगळे पॉपकॉर्न खाली पाडले. बिशन हे सगळं पहात होता.
बाबांनी रागाने त्याला एक धपाटा ठेवून दिला, तर सोहमने रोबो जमिनीवर आपटला. एवढा महागाचा रोबो तो ! त्याचा एक हात तुटला. बिशनला कसंतरीच वाटलं.
लांब उभा राहून एक म्हातारा ते पहात होता. तो प्रेमळ म्हातारा गरगरीत ढेरी असलेला एक यक्ष होता!
यक्ष म्हणजे कनिष्ठ देवता. ते उदार पण खोडकर असतात. मायावी ! जादू करण्यात अन रूप बदलण्यात पटाईत !
तो चित्रक यक्ष होता.कुठलीही जादू करू शकणारा. चांगल्या मुलांना मदत करणारा , त्यांच्यावर प्रेम करणारा प्रेमळ यक्ष ! त्याला लहान मुलं दुःखी झाली की कसंतरी व्हायचं .
सोहमच्या बाबांना त्याचा राग आला होता व बोअर झालं होतं. त्यांनी मोबाईल लावला व सोहमच्या आईला बाहेर बोलावलं. तसंच येताना ती बंदूकही आणायला सांगितली. त्याची आई बाहेर आली. ती नाईलाजाने, खरेदी सोडून बाहेर आली होती. तरी- तिच्या हातामध्ये दोन-तीन पिशव्या होत्याच व ती बंदूक होती. ती पाहताच सोहम खूश झाला. बिशनला त्याची दिवसभर कष्ट करणारी आई आठवली. त्याला वाईट वाटलं. सोहम गेला.
प्रदर्शन संपल्यावर बिशन त्याच्या झोपडीत गेला. तिथे आठ-दहाजण एकत्र राहायचे. सगळे पोट भरण्यासाठी गावावरून आलेले. मोठया माणसांनी स्वयंपाक केला. जेवून बिशन त्याच्या जागेवर झोपला. त्याला झोप येत नव्हती. त्याला ते लाल रंगाचं विमान आठवत होतं. खूप वेळाने तो झोपी गेला.
गरम होत असल्याने झोपडीचं दार उघडंच होतं .
मग खूप रात्र झाली अन् चित्रक त्याच्या कामाला लागला. तो क्षणात सोहमच्या घरी पोहोचला. सगळे झोपले होते . त्या वाईट मुलाने आता विमानाचा पंखही मोडला होता. आता ?- यक्षाने चुटकी वाजवली आणि तो पंख दुरुस्त झाला व ते विमान थोडं वर उडालं. मग त्याने सोहमची एक भारी रंगपेटी वर उचलून त्या विमानावर ठेवली. तीही छान बसली न पडता. ती पेटी सोहमला मामाने आणून दिलेली होती. ते रंग भारी होते. त्यामध्ये ब्रशसुद्धा होते, पण त्याने ती फोडलीसुद्धा नव्हती. अशा चांगल्या गोष्टींचा अशा मुलाला काय उपयोग ?
खरं म्हणजे ते दहा-वीस फुटांच्या परिसरात उडू शकणारं साधं विमान होतं. पण आता ते खऱ्या विमानासारखं निघालं होतं. रंगपेटी जणू कोकरू होऊन विमानाच्या पाठीवर बसली होती . न पडता . चित्रकाची गंमत सारी !
अंधार होता. कोणाचं त्याकडे लक्ष नव्हतं. मात्र एका झाडाजवळून जाताना तिथल्या पक्ष्यांना त्याची चाहूल लागली. त्यांना वाटलं, वटवाघूळ असावं. ते दुर्लक्ष करून पुन्हा झोपले.
दिवसाची वेळ असती तर मुलांना ते ड्रोन वाटलं असतं .
विमान उडत उडत बिशनच्या झोपडीपाशी आलं. उघड्याच असलेल्या दारातून त्याच्या सामानाच्या लोखंडी पेटीवर ते उतरलं, रंगपेटीसहित. तुम्हाला वाटेल की ती कशासाठी ? तर बिशन शाळेत जात नसला तरी चित्रं सुरेख काढायचा. फक्त या वस्तू आल्या कशा हे कोडं त्याला उलगडणार नव्हतं.
सोहमला काही दुःख झालं नसतं. त्याने आणखी नव्या गोष्टींसाठी हट्ट केला असता, पण बिशन तर खूश होणार होता. आता ते विमान पैसे न भरताही त्याच्याकडेच राहणार होतं.
झोपेत बिशनला स्वप्न पडत होतं अन ते चित्रकाला दिसत होतं .
ते स्वप्न चित्रकाने पाहिलं अन् त्याला आनंद झालं.
स्वप्नात ते लाल विमान बिशनच्या गावाकडे असलेल्या हिरव्यागार शेतावरून गिरक्या घेत होतं आणि बिशनची छोटी बहीण, झिपऱ्या सावरत, टाळ्या पिटत होती. विमान गिरक्या घेऊन खाली उतरलं . त्यामधून बिशन बाहेर आला . त्याने बहिणीला मिठी मारली . त्याने तिच्यासाठी वेगवेगळे खेळ आणि खाउदेखील आणला होता . किती छान स्वप्न ना !
मग सांगा, तुम्ही नको त्या गोष्टींसाठी हट्ट करता का ? तुम्ही तुमचे सगळे खेळ मनापासून खेळता की नुसते कपाटात भरून ठेवता ? की आपटून धोपटून तोडता ?
बघा हं, तसं असेल तर चित्रक येईल रात्रीचा. ते घेऊन जायला !
----------------------------------------------------------------------------------

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

मन्या
वावे
आसा
अभ्या
मंडळी आभार

किट्टू
वाह किती सुंदर प्रतिक्रिया .
छान वाटलं .
किती वय आहे मुलाचं ?