“आई” : एक ‘भरून पावलेली’ जनरेशन गॅप !

Submitted by Charudutt Ramti... on 31 May, 2020 - 07:02

सध्या मोबाईल ‘डेटा’ अक्षरश: पैश्याला ‘पासरी’ झालाय. परवा माझी आई (वय : साधारण सदुसष्ट / अडूसष्ट) आतल्या खोलीत दार बंद करून तिच्या मोबाईलवर कुणाशी तरी बराच वेळ बोलत बसली होती. सहजच फक्त अगदी कुतूहल म्हणून दार उघडून आत पाहिलं, तर चक्क व्हिडिओ कॉन्फरन्स कॉल सुरु होता तिचा. ती हाव भाव आणि हात वारे करून छान पैकी कुणाशी तरी बोलत बसली होती, मोबाईल स्वतःच्या चेहऱ्या पासून दोन अडीच फूट अंतरावर धरून.

मी क्षणभर आवाक होऊन विचारलं - “ आssई! कुणाशी व्हिडीओ कॉल सुरु आहे गं? ”

तर म्हणाली - “ अरे , कुणी नाही रे ! माझी बाल मैत्रिणी आहे 'ऑनलाईन' तिच्याशी…”

मी थक्क झालो. आईच्या सगळ्या बाल मैत्रिणींना मी चांगला 'ओळखून' आहे. नसायला काय झालं? ह्या तिच्या बाल मैत्रिणी म्हणजे माझ्या (पुतना!) मावश्याच की.

एक जणी दुसरीला धड साधा फोन (व्हॉइस कॉल) सुद्धा करू शकत नव्हत्या ह्या आईच्या मैत्रिणी पूर्वीच्या 'नोकिया' ३३१० किंवा ३३१५ मॉडेल च्या जमान्यात. मला आठवतंय तिच्या वाढदिवसाला भेट दिला होता, तेंव्हा बाजारात नवीन लाँच झालेला Qwerty key पॅड वाला फोन, तिला तो वापरतांच नाही यायचा.

तेंव्हा नवीन वस्तू भेट म्हणून दिल्याचं कौतुक तर दूरच, ती माझ्यावर काहीही कारण नसताना उगाचंच खेकसून…

“ 'कार्टी' कशाला एवढे पैसे खर्च करून असले महागडे मोबाईल मला भेट देतात काय माहिती? क्वार्टी की पॅड बी पॅड की काय म्हणतात ते ? मला मेलीला नाही रे वापरता येत ते तुमचे हे सॅमसंग आणि फॅमसंग, मला आपला तो बी.एस.एन.एल. वालाचं द्या बाबांनो फोन तो पूर्वीचा. हा तुमचा सॅमसंग की सत्संग मला नाही जमत तो वापरायला ! ” - असं ओरडली चक्क!

“ अगं! आssई!! नोकिया आणि सॅमसंग हॅन्ड सेट मॅन्युफॅक्चरर आहेत. आणि बी.एस.एन.एल. , वोडाफोन, आयडिया वगैरे टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत. ” - आई च्याच बोटांनी दगडी पाटी वर पेन्सिल धरायला शिकलेला मी, तिला थोडी शिकवता येतीय का नवी जगरहाटी आणि आधुनिक ज्ञान आणि काही उपकारांची परत फेड करता येतीय का, तिनं शिकवलेल्या 'ग' 'म' 'भ' 'न' ची ते चाचपून पाहत होतो.

“ अरे! मग ह्या मोठ मोठाल्या कंपन्या ही असली धेडगुजरी कामं का करतात? ह्या तुमच्या जागतिकीकरणात ह्या कंपन्या समजतात नं स्वतःला फार, ते ग्लोबल की काय तुम्ही म्हणता ते? मग तो कानापाशी धरायचा ‘फोन’ एकाचा आणि ते तुम्ही कसलं सिम की बीम म्हणतात तसलं कार्ड ते दुसऱ्याचं असं का? ज्याच्याकडून ‘गादी’चा कापूस घ्यायचा त्याच्याच कडून ‘उशी’चा घेतात नं, की उशीसाठी दुसरा ‘पिंजारी’ गाठतात मेल्यांनो? नावाला 'ग्लोबल' पण एवढं 'ढोबळ' गणित पण समजू नये? पैसे उकळायचे धंदे रे ‘तुमच्या’ पिढी कडून बाकी काही नाही.” - आई नं तिचा जुन्या पिढीतला खाक्या दाखवाला होता मला त्या Qwerty key pad च्या फोन वरून.

माझ्यापेक्षा चार काय चक्क चोवीस पावसाळे जास्तं पाहिलेल्या माझ्या आईला साधारण पंधरा सोळा वर्षांपूर्वी तिला मी मुंबईत असताना माझ्याशी संपर्क साधायला सोपं जावं म्हणून एक फोन घेऊन दिला होता…त्या नंतर तिनं जगातील द.कोरिया स्थित सॅमसंग पासून ते फिनलँड स्थित नोकिया पर्यन्त सर्व हॅन्ड सेट मॅन्युफॅक्चरर आणि फ्रान्सच्या वोडाफोन पासून ते अमेरिकेतील ए.टी.अँड टी. पर्यंत सर्व टेलिकॉम सर्विस प्रोव्हायडर कंपन्यांना वाहिलेली लाखोली मला अजून आठवतेय.

ह्या मोबाईल आणि टेली कॉम कंपन्यांना लाखोली वाहणारी माझी माय माउली आज मात्र चक्क तिच्या बाल मैत्रिणीला घेऊन व्हिडिओ कॉन्फरेन्स कॉल करतेय ? वा: शेवटी काय? तर कालाय तस्मै: नम: हेच खरं.

पाहुयातरी नक्की काय सुरु आहे? असं स्वतः शीच म्हणत मी तिच्या अवती भवती रेंगाळलो. तेव्हडीच जरा करमणूक. नीट स्क्रीन कडे पाहिलं तर, तिची एक जुनी मैत्रीण जणू काही आपल्याला पूर्वीच्या काळी मराठी बातम्या द्यायच्या मुंबई दूरदर्शन केंद्रावर त्या स्मिता तळवलकरांच्या सारखा आपल्यालाही तसांच जॉब लागल्या सारखी साडेचार बाय तीन इंचाच्या मोबाईल स्क्रीन वर बोलत होती, ओठांवर फिकट लिपस्टिक बिपस्टिक गिरवून.

“ आई अगं पण तुम्ही नक्की काय बोलताय तरी काय ? इतक्या वेळ ? ” - मी माझ्या जन्मदात्रीला विचारलं.

“ थांब एक मिनिट मी म्यूट वर टाकते फोन ” - आईनं तिचा फोन अगदी सराईत पणे म्यूट वर टाकला.

“ अरे काही नाही रे...सुमी मावशी नाही का तुझी , ती मला पारंपरिक पद्धतीने घरच्या घरी फ्रेंच चवीचा पास्ता कसा करतात त्याची रेसिपी शिकवतीय . तिची सून रे ती काय नाव तिचं बरं?.. सुमी चा धाकटा मुलगा 'साकेत' नाही का? त्या साकेत नं लव्ह मॅरेज केलं जिच्याशी ती फ्रेंच मुलगी रे, काय सांगत होती बरं नावं ? हा, आठवलं… "अलेक्सान्द्रा” नांव तीच ? ”

पाहता पाहता माझी 'जननी' आणि तिच्या साधारण त्याच वयाच्या तिची बाल मैत्रिण ह्या दोघी त्या मोबाईल कंपन्यांच्या सारख्याच 'ग्लोबल' झालेल्या पाहून मला पामराला क्षणभर गहिवरून आलं.

“ आ...ईsss पारंपरिक पद्धतीने पापड , लोणची, शेवया , कुरडया , मुरांबे वगैरे समजू शकतो ? पण ‘पारंपरिक’ पद्धतीचा ‘पास्ता’ मी कधी नाही ऐकला ह्या पूर्वी ! ” आई विषयी आणि तिच्यातल्या मातृत्वा विषयी माझ्या मनात असलेला ओलावा. तिच्या एकंदर बदलत्या काळा नुसार स्वतः बदलण्याची आंतरिक तळमळ, आणि त्या हिच्या स्वभाव वैशिष्ट्या मुळे मला तिच्याविषयी वाटणारा आदरभाव. तसेच जुन्या मतांना मुरड घालून कात टाकत नवीन वातावरणाशी मिळतं जुळतं घेण्याची तिची ही दुर्दम्य इच्छा शक्ती पाहून मला तिच्या बद्दल दाटून आलेला उमाळा आणि त्याहुनही महत्वाचं म्हणजे “पंधरा वर्षं पुण्यात राहिल्यामुळे माझ्या भाषेत आणि एकदंरच माझ्या व्यक्तिमत्वात आपसूकच आलेला एक तिरकसपणा” मी आईला माझ्या न कळत चटकन बोलून गेलो त्या माझ्या ह्या एकाचं वाक्यात अश्या अनेक विविध पैलूंचा मिलाफ होता.

इतरवेळेस कौसल्या बनून मला अनारसे खाऊ घालणारी माझी आई, माझ्या ह्या पुणेरी टिके वर मात्र राजा दशरथाच्याच जीवावर उठलेली “माता न तू वैरिणी” कैकयी भर दरबारात कडाडावी तशी “कार्ट्याss! म्माझी चेष्टा करतोस? " असं म्हणंत माझ्यावर ओरडली.

आई ला फोन म्यूट करायला उशीर झाला की तिला तो म्यूट करताच आला नाही कुणास ठाऊक? पण, आमच्या माय लेकरातहोऊ घातलेली ही संवाद कौमुदी, बहुदा तिच्या मैत्रिणीला ऐकू गेली असणार.

“ अगं 'सुलभे' फ्रेंच नाही काही, माझी सून स्पॅनिश आहे...आणि अगं खुळे ‘अलेक्सान्द्रा’ नव्हे कैsss अगं ‘अलेहान्द्रं’ आहे तिचं नावं. अंग 'स' सायलेंट असतो स्पॅनिश मध्ये.” तिकडून आईची मैत्रिण म्हणजेच माझी पुतना मावशी माझ्या आईला शहाणपण शिकवू लागली.

माझ्या आईने हिच्या नादी लागूनंच, हिच्या धाकट्या मुलापेक्षा माझी गणित आणि शास्त्रातील टक्केवारी चांगली वीस बावीस टक्क्यांनी ने कमी असून सुद्धा, फक्त हिच्याशी स्पर्धा म्हणून मला सुद्धा अभियांत्रिकीला शाखेला जाण्याची सक्ती केली होती. माझं नशीब त्यातल्या त्यात चांगलं असं की त्या तिच्या धाकट्या लेकानं म्हणजे त्या ओव्हर स्मार्ट अश्या स्वतःला राजा ‘हरिश्चंद्र’ समजणाऱ्या साकेत नं ती स्पॅनिश की फ्रेंच ‘अलेहान्द्रं’ नावाची सून करून आणली म्हणून माझ्या मातेनं मलाही तशी सक्ती केली नाही – “की तू सुद्धा आता मला अशीच एक 'क्लिओपॅट्रा' वगैरे नावाची रोमन वंशाची एखादी सुंदर सून आणून दे आता!” म्हणून. कारण सध्या ह्या माझ्या नशिबात राहू केतू सारख्या माझ्या सतत सभोवताली भ्रमण करणाऱ्या आमच्या घरातील ह्या सासवा सुना अगदी एकाच जिल्ह्यातल्या असून सुद्धा त्यांच्यात महिन्यातून किमान तीन चार वेळेस सीमाप्रश्ना वरून स्फोटक वाद आणि कधी कधी तर चक्क किरकोळ चकमकी सुद्धा सुरु असतात. आणि ह्या आमच्या आईच्या म्हणजे पुतना मावशीच्या मुला सारखी जर मी एकदम आंतर राष्ट्रीय स्तरावर ची सून करून आणली असती तरी तर मात्र माझ्या आयुष्यातले आधीच महाग असलेले 'सोनीयाचे' दिनू कायमचे संपून आमच्या घरात चक्क संसदीय कार्यकारिणीत पेटतात तसले वादंग पेटले असते.

“आई, पण तू असे हे व्हाट्सअँप किंवा गुगल टीम वरून व्हिडीओ कॉन्फरन्स कॉल करून , तुझ्या बी.एस.एन.एल. पॅक मधला महिन्या भराचा डेटा सगळा एका तासात संपवून टाकशील.” - केवळ स्वस्त आहे म्हणून अतिरेकी पणाने झालेल्या ‘मोबाईल डेटा’ ह्या राष्ट्रीय साधन सामग्रीचा वापर, ह्या अश्या तऱ्हेने ‘पास्त्या’च्या वगैरे रेसिपी शेयर करण्यासाठी होऊन त्याचा अतिरिक्त अपव्यय टाळण्याच्या दृष्टिने, लॉकडाऊन मुळे आधीच कमकुवत झालेल्या आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा पाया आणखी भुसभुशीत होऊ नये ह्याकरिता मी अगदी कळकळीने बोललो.

“अरे मी मोबाईल डेटा नाही वापरत आहे...तुझा तो आय फोन का काय आहे नं? , त्याचा हॉटस्पॉट केलाय , त्यावर विडिओ कॉल करतेय.” आयायाया…माझा आय फोन आणि त्याचा हॉटस्पॉट ?
‘माझी माय माउली, हा असा माझ्या आय फोन चा वापर कधी काळी 'हॉट स्पॉट' बनवण्या साठी करू शकेल’ असं कुणी मला पंधरा वर्षां पूर्वी सांगितलं असतं तर मी त्याला लवकरात लवकर सुप्रसिद्ध मानसोपचार तद्न्य डॉ. राजेंद्र बर्वेंना भेटण्याचा सल्ला दिला असता.

“ माझा आय फोन आणि हॉटस्पॉट ? - आई अगं बरी आहेस नं तू ? अगं कुणी शिकवलं तुला हे हॉटस्पॉट बिस्पॉट??” माझा मानसिक तोल ढळायला येण्याच्या बेतास असल्यासारखा मी कातर होऊन बोललो.

“ अरे मी कशाला करू, मला माझ्या ‘चिमु’नं करून दिलंय ” - मातु:श्री

“ काsssय? ” मी…जवळ जवळ किंचाळत.

“ हो…परवा चिमुरडीला म्हंटल - अगं चिमी हा माझा फोन जुना झालाय, थ्री जी आहे नं , आता पुढच्या महिन्यात पेन्शन झाली की जरा फोर जी घ्यावा म्हणतेय. अरे पूर्वी चालायचं, पण हल्ली हे व्हिडिओ कॉल्स वगैरे नाही होत बाबा तुझ्या त्या जुन्या पद्धतीच्या फोन वर, ते स्ट्रीमिंग ब्रिमिंग म्हणावं तितक्या वेगानं नाही होत... ! ”

“ काय, आईsss, अगं तू काय बोलतेस काय, फोर जी फोन ? ”

“ इवल्याश्या चिमीला माझी काळजी हो... तिनं कुठून दिशी शोधलं हे तुझ्या फोन चं हॉटस्पॉट प्रकरण आणि दिलं नं मला जोडून ह्या तू दिलेल्या जुनाट मोबाईलला! ”

“ आssss ई, असं नको लागट बोलूस... आतड्याला पीळ पडतो गं माझ्या ” - गारंबीच्या बापू मध्ये डॉ. काशिनाथ घाणेकरांनी एक प्रचंड टाळीबाज डायलॉग डिलिव्हरी करावी तसा मी स्वतःशीच बोललो.

पण माझं हे नाटकी वाक्य ऐकायच्या आतच आई पुन्हा परत त्या पुतना मावश्यांच्या व्हिडिओ कॉल मध्ये बिझी झाली.

“अच्छा! थोडं मोझरेला चीज का ?” - माझी स्वर्गादपि गरियासी जननी.

“ हो बरोबर, मोज्झरेला, ! करेक्ट उच्चारलांस हा फ्रेंच शब्द तू सुलभे अत्ता ! ” - आई गं , आलेहान्द्रां काय मोझरेला काय ? ह्या फ्रेंच आणि स्पॅनिश उच्चार करण्याच्या पद्धती ऐकून आता आई ऐवजी मलाच उच्चरक्त दाबाचा त्रास सुरु होईल की काय अशी मला भीती वाटू लागली.

“ आणि ते मोज्झरेला चीज थोडं असं ताणलं तरी तुटलं नाही पाहिजे हं !” – पुनःश्च पुत:ना मावशी.

“ चीज थोडं ताणलं तरी तुटलं नाही पाहिजे, बरं बरं? अग्ग मग सोप्पंय की. आपण गुलाब जाम ला करतो तसा साधारण एकतारी पाक का ? अगं सुमे मग सरळ एकतारी चीज म्हण की !” - माझी (रेणुका) माउली!

“ हो हो अगदी अगदी बरोबर सुलभे ” - पुत:ना मावशी ( प्यु:मा ). हे “एकतारी चीज” प्रकरण कानी ऐकू आलं असतं तर गुजरातेत आणंद मध्ये त्या अमूल डेअरीची स्थापन करणाऱ्या वर्गीस कुरियन साहेबांनी अक्षरश: दुधाच्या टँकर खाली उडी टाकत जीव दिला असता.

“ बरं बरं, आणि ओरेगॅनो किती ? चवीपुरते का ? बरं बरं ? ” - अर्थात , माझी आई!

“अगं काsssई होती नाही , घाल भरपूर ओरेगॅनो...जरा पित्त झाल्यासारखं होईल खाल्यावर पास्ता तुला, नंतर घे दोन सूतशेखर वटी झोपण्या पूर्वी ” – प्यु:मा

“ पास्ता रेड सॉस मध्ये करू की व्हाईट गं ? ” - दरवर्षी शाकंभरीचं नवरात्र करणारी आज माझी आई जगदंब….तुला झालंय तरी काय ?

“ आज व्हाईट सॉस मध्ये करून पहा, आवडला घरातल्या सगळ्यांना आणि संपला तर ठीक, नाही तर मग त्याच पास्त्यात एक पळीभर टोमॅटो सॉस घालून एक उकळी दे दुसऱ्या दिवशी सकाळी. म्हणजे होतो छान रेड सॉस पास्ता. " माझ्या पेन्शनर आईच्या ह्या निरागस प्रश्नावर तिकडून प्यु:मा चा हा डेडली रिस्पॉन्स ऐकून आता मी त्या व्हाईट सॉस सारखा फक्त पांढरा पडायचा बाकी राहिलो होतो.

“ आणि सुमे मला एक सांग, पास्ता चांगला भाजून घ्यायचा का तव्यावर आधी , उप्पीटा साठी आपण भाजतो त्या रव्या सारखा ? ” - आई चा प्रश्न पूर्ण होण्यापूर्वीच मला "खुदा न खास्ता , हा पास्ता खाण्याची जर माझ्यावर वेळ आलीच तर अगदी फूड पॉयझनिंग नाही पण सीव्हीयर अक्यूट अल्सरायटिस मात्र निश्चित होणार…माझ्या मगाशी पीळ पडला त्या छोट्या आतड्याला’ अशी उगाच मला धाकधूक लागून लागली.

“ थांब हं सुलभे एक मिनिट, हे हाक मारताहेत बाल्कनीतून...मी पॉझ करते व्हिडिओ , काय म्हणताहेत ते पाहून येते , मगाशी ह्यांच्या लेंग्याची नाडी सापडत नव्हती, त्या साठी हाका मारत असतील बहुतेक... थांब मी तुला करते परत व्हिडिओ कॉल.” - नवऱ्याच्या लेंग्याच्या हरवलेल्या नाडीच्या काळजीपोटी “प्यु:मा” वदली.

“अगं बाईsss , कोण? भानुदास भाऊजी क्का?... हो-हो , जा-जा , बघ त्यांना काय पाहिजे आहे ते, नाही तर पंचाईत व्हायची. पास्ता काय नंतर पण करता येईल. लेंगा महत्वाचा....आपण बोलू नंतर संध्याकाळी निवांत , आणि लॉकडाऊन उठल्यावर ये एकदा घरी त्यांना घेऊन म्हंटल ”

“हो पण लेंग्याची नाडी सापडली तरंच हं...नाही तर आला नाहीत तरी चालेल...मास्क आणि लेंगा दोन्ही कंपल्सरी आहे आमच्या सोसायटीत ” - मी पटदिशी बोलून गेलो.

“कार्ट्या तुझ्या जिभेला काई हाड?” - असं म्हणत माझं वाक्य प्यु:मा ऐकू जाऊ नये म्हणून गडबडीत आई नं शेवटी एकदाचा तो अर्धा पाऊण तास सुरु असलेला व्हिडिओ कॉल बंद केला. माझं नशीब चांगलं म्हणून आमच्या ह्या प्यु.मा. चे ‘सौभाग्य’ असलेले भानुदास की आदिदास , त्यांच्या लेंग्याची नाडी हरवली , नाही तर माझा हा हॉट स्पॉट पूर्ण विझून जायचा ह्या पुतना मावशीच्या रेसिपी चा विषारी पास्ता बनेस्तोपर्यंत.

कधी काळी रेडिओवर आकाशवाणी सांगली ‘स्टेशन’ ट्यून करून ऐकण्यात धन्यता मानणारी माझी आई! बी.एस.एन.एल. आणि ‘नोकिया’ला काहीही कारण नसताना लाखोली वाहण्या पासून सुरु झालेला माझ्या आईचा दूर संदेश वहन तंत्रज्ञान ह्या विषयीचा एकंदर प्रवास आता आता अश्या तऱ्हेने, गूगल मीट, मायक्रोसॉफ्ट टीम, (आणि अलीकडेच मोबाईल वरून डीलीट करून ‘वाळीत’ टाकलेलं चायनीज ऍप झूम) ही महत्वाची स्टेशनं पार करत, माझ्या आय फोन चा हॉटस्पॉट बनवून त्या वर घरगुती पद्धतीचा ‘पेने पास्ता विथ व्हाईट सॉस इन मोझरेल्ला चीज’ ही रेसिपी शिकण्या पर्यंत येऊन ठेपलेला आहे.

थर्ड जनरेशन, फोर्थ जनरेशन इंटरनेट स्पीड वगैरे सगळं ठीक आहे! पण ‘अडु’सष्ठी ओलांडत ‘अडु’ळसा पिण्याच्या ह्या दिवसात आमच्या घरातल्या सगळ्यात सिनियर जनरेशन चं इलेकट्रॉनिक गॅजेट्स वापरण्याचं हे नवं धाडस पाहून उगीचंच आपण आपल्या 'आई'च्या पिढीला ‘आई’टी तंत्रज्ञान आणि माहिती क्षेत्रात “अजिबात माहिती आणि गती नसलेली पिढी ” असं म्हणत इतके वर्षे हिणवल्याचा मला मात्र मनोमन 'पास्ता'वा सॉरी पस्तावा झाला.

चारुदत्त रामतीर्थकर.
३१ मे २०२० (पुणे).

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अगाध लेख.
_/\_
ह्या मातीच्या चुली घरोघरी आहेत. पुलेशु

मस्तच लिहिलंय! आवडलं.. Happy

( लेखकास विनम्र सुचना :
माझ्या नावामागे 'जी' लावण्याइतकी मी म्हातारी नाही! )

मस्त Happy