तू एक विश्वकर्मा

Submitted by Sanjeev Washikar on 21 May, 2020 - 06:18

तू एक विश्वकर्मा
मला आई लहानपणी मांडीवर घेऊन थापटायची .मी तिचा अंगभर पदर पांघरून घ्यायचो.तिच्या पदरात मला मी जगातील फारच सुरक्षित व्यक्ती आहोत असे वाटायचे. ती मला प्रेमाने विचारीत' तू मोठेपणी कोण होणार ?'माझे मात्र उत्तर ठरलेलं' 'सुतारमामा' ,मग मात्र तिचा माझ्या तोंडावर, नाकावर थापटण्याचा वेग वाढायचा. ''जळमेल तुझ लक्षण परत अस कुणाला सांगू नकोस,अस ती म्हणायची,''मला मात्र ,याचे कधीच वाइट वाटले नाही.माणसाला ज्या गोष्टी कराव्या वाटतात त्या त्याने मनसोक्त पणे कराव्यात .लहानपणी सुतार व्यवसायाचे मला खुपच अकर्षन होते. एखाद्याच्या घरी गाडी आहे,टिव्ही आहे,फ्रीज आहे या पेक्षा त्यांचेघरी हातोडा आहे, करवत आहे, खिळे आहेत ती माणसे मला खुप श्रीमंत वाटायची,पूर्वी वडीलांनी आईला शिलाई मशिन आणले होते, त्या बरोबर एक इनस्ट्रमेंट बॉक्स मिळाला होता,मशिन पेक्षा तो बॉक्स मला खूप महत्वाचा वाटायचा,त्या मधिल लहान मोठे पाने, छोटे छोटे स्कू ड्राईव्हर ,तेलाची बुदली, हे सर्व प्रकार पाहून माझे मन भाउन जायचे.
जवळजवळ सर्वच सुतार मंडळचा पेहराव हा एक विशिष्ट पद्धतीचा असतो.अंगात फुल बाह्यांचा बनियन,त्याला एक दोन भोके,अखुड विजार . पायात पट्टीला सेफ्टीपीन लावलेली स्लिपर.चष्म्याचा दोन भिंगामधिल काढीला ही मंडळी चिंधी का गुंडाळतात कूणास ठाउक? काम करीत असताना चष्मा मागे पुढे होऊन, नाकाची झीज होउ नये म्हणून केलेली ही उपाययोजना असावी.यांची चहा पिण्याची पध्दत ,ब्रिटीशानाही लाजवेल आशी असते.कधीही कुठलाही सुतार आपल्या सारखा डायरेक्ट चहा पिणार नाही.चहाचे आधी तांब्याभर पाणी घेणार मग चार पाच चुळा भरणार,मग थोडे पाणी तोंडावर मारून घेणार,मग तांब्याने वरून गटागटा पाणी पिणार.मग सर्वच्या सर्व कपातील चहा बशीत ओतून फुसकारा मारत चहा रिचवणार. या लोकांचे जेवण झाले कि मग पंधरा मिनीटे का असें ना, वामकुक्षी हि झालीच पाहिजे, आणि चमत्कार बघा! पंधरा मिनिटे झाली कि एखादा टायमर लावल्या प्रमाणे ते पटकन उठतात .काम करताना ही मंडळी तोंडात खिळे धरतात,ते पाहीले की बघणाऱ्याचा हात भितीने तोंडावर जातो. ज्या प्रमाणे विवाहित स्त्रीला मंगळसुत्र गळ्यात घालणे बंधनकारक असते ,त्या प्रमाणे ,कानात पेन्सिल ठेवणे हे सुतार लोकांना बहुतेक बंधनकारक असावे. कानावर पेन्सिली न ठेवणारा सुतार म्हणजे, विना तिकिट प्रवास करणारा प्रवासी होय.एवढ्या पसार्‍यात त्यांची पेन्सिल कधीच हरवत नाही ती कायम सुरक्षितही असते.हि सुतार मंडळी सिसपेन्सिलीला टोक मात्र पातळीने का लावतात कुणास ठाऊक ?यांची खिळा ठोकताना सुध्दा किंव्हा करवत चालवताना सुध्दा त्याला एक विशिष्ट अशी तालमय लय असते. सुतार काम करताना खरोखरच इतका आनंद आहे, तो आपण दुसऱ्याला का देतो हे कुणास ठाऊक ?
एकदा एक सुतारमामा आमचे घरी कामासाठी आले होते. काही कारणाने ,ते चार दिवस कामावर येणार नव्हते .मात्र त्यांनी आपली सर्व हत्यारे आमच्या घरातच ठेवली होती. ही संधी म्हणजे माझ्या साठी मोठी पर्वणीच होती.त्यांनी पाठ फिरविताच मी त्यांची सर्व हत्यारे बाहेर काढली आणि मग काय,खुल जा सिम सिम.लाकडी जिन्याला मारलेली एक काबंट काढली, त्यांचे छोटे छोटे तुकडे करून त्त्याची एक ओबडधोबड जमेल तशी खुर्ची तयार केली. हाताला खूप ठीकाणी जखमा झाल्या. जरी ती खुर्ची,ओबडधोबड असली  तरी ती जगातील मला मोठा आनंद देणारी,एक पहिली कलाकृती होती.पंतप्रधान, राष्ट्रपती यांनी जरी ती माझ्याकडे मागीतली असती तरी, मी त्यांना ती दीली नसती.कौतुकाने मी लोकांना ,घरी बोलावून ती खुर्ची दाखवत असत.त्यांच्या वेगवेगळ्या प्रतीक्रिया येत होत्या. 'ही काय कैद्यांना फाशी देण्यासाठी तयार केलेली खुर्ची आहे वाटतं? तर कोणी म्हणे ,सांभाळून ठेव म्हातारपणी, बाथरूम मध्ये वापरता येईल''.मला मात्र त्यांच्या प्रतीक्रीयेची अजीबात परवा नव्हती.
आमचे घरा जवळ काही सुतार मंडळींचा ठीया होता,ते काम करीत असताना ,मी तासनतास ते पहात असत.त्या ठिकाणी बसण्याची परवानगी द्यावी ,म्हणून मी त्यांची बारीकसारीक कामेही करीत असे.त्यांची कामे पाहता पाहता मी इतका तल्लीन होत आसे, की माझी बैठक हळूहळू सरकत सरकत त्यांच्या खुपच जवळ असे,मग मात्र ते ओरडून सांगत 'ए बाळ मागे सरक ,नाहीतर पंचतंत्रातल्य माकडा प्रमाणे,शेपूट लाकडाच्या फटीत आडकूउन घेशील''.त्याचे काम पहाणे हे माझ्या साठी दिव्य चमत्कार असायचा.
ही छोटी माणसे एवढा मोठा ओंडका कसा काय कापतात ,याचे मला फार कुतूहल वाटायचे.त्यांची आरी चालताना भुरूभुरू उडणारा चुरा ,लग्नात पडणार्या अक्षदा सारखा वाटायचा आणि त्यातून निघणारा तो ओल्या लाकडाचा वास ,काय विचारू नका.सद्या बाजारात मिळणार्‍या कोणत्याही सेंटची तुलना त्याच्या बरोबर होणार नाही.लाकूड कापल्या नंतर त्या वर उमटलेली ती कलाकृती म्हणजे ,या विधात्याने मुक्त हस्ताने रंगवलेले ते अप्रतिम रंग छटांची उधळणच असते.त्यातील काळ्या,पिवळ्या,तपकीर छटा अशा कांही चितारलेल्या असतात की माणुस त्या वर प्रेमाने हळूवार हात फिरवतो. लाकडात असणारी गाठ देखील एक सुंदर कलाकृती बनून जाते.
कधी कधी आसे वाटते की हा विधाता देखील, हातात आरी घेतलेला विश्वकर्मा तर नाहीना? तो कधी कुणाला वाकवेल तर कधी कुणाला तासून तासून सरळ करेल,कधी तुटलेले जोड हळूवार जोडेल,तर विरूध्द ठोकळ्यंचा असा जोड मारेल की जन्मभर एकत्र राहावे लागेल .हे सर्व करीत असताना ,त्या विश्वकर्माचे हात मात्र कधीच कुणाला दिसले नाहीत.
.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

छान लिहिलंय..
विनोदी न वाटता उलट अतिशय वास्तविक लेख झालाय...
पूर्वी लाकडाला छिद्रं पाडण्यासाठी एक दोरखंडवाले हत्यार असायचे त्याचे मला सर्वात जास्त आकर्षण होते.
लहानपणी प्रयत्न करुनही ती दोरी फिरवणं मला कधीच जमलं नाही.
आणि पूर्वीच्या सर्व हत्यारांची मजा आता नव्या मशीन्स आणि इंस्ट्रुमेंटस् नी घालवली आहे.