मेळघाटातला एक दिवस (भाग-४)

Submitted by अरिष्टनेमि on 19 May, 2020 - 21:34

मी ‘कुठंय?’ म्हणून विचारल्यावर त्यानं शांतपणे बोट दाखवलं. माझ्यापासून दोन-तीन फूट दूर खुर्चीच्या मागं उजव्या हाताला भिंतीला चिकटून साप शांत पसरला होता.

‘आपण याच्या खुर्चीखाली साप सोडून आलोय’ याचं काहीही ओझं न बाळगता रामलाल जसा शांतपणे आला तसाच अतीव शांततेत निघून गेला. मी वळून सापाकडं पाहिलं. त्यानं काहीतरी खाल्लेलं होतं. मी विचार केला. ‘हा शांत पसरला आहे. कुठं जाणार नाही आता. आता आधी गरम गरम चहा घेतो, मग त्याच्याकडं पाहू.’ रामलालच्या शांतपणानं मला चांगलाच आत्मविश्वास आला होता. मी आता ‘शूर वीर’ झालो होतो. मी अजूनच ऐसपैस बसलो. शौर्य दाखवायची हीच वेळ होती.

हा सगळा तद्दन फालतूपणा त्यावेळी ‘कसला भारी’ वाटत होता.

माझ्या पायात उंच चामडी बूट होते. त्यामुळं मला भलताच सुरक्षित फील आला होता. आजपावेतो कधी कधी अचानकच साप जवळ आला असं झालं होतं. नाग, फुरसं, घोणस, अजगर आणि खास लक्षात राहील असा मण्यार. सांगतोच तुम्हाला.

पाऊस असावा पहिला दुसराच, पण हे अस्सा बम झाला. रस्त्याला नुसतं पाणीच. पाऊस चांगला स्वच्छ उघडला. अशा रात्री दीड वाजता मेळघाटाच्या ऐन रानात घाटरस्त्याला अद्भुत दृश्य दिसलं. कभिन्न अंधारात रस्त्याच्या दुतर्फा झाडांना लक्ष काजव्यांच्या दीपमाळा तेवत होत्या. तापून निवलेल्या जमिनीचा मृद्गंध. मग हे पाहून कवीला पडलेलं स्वप्न -
रत्नवैभवी दिवस ते सारे
काजवमाळा रातीला
पानोपानी हिरे माणके
सुगंध यावा मातीला

खाली दरी तर नुसती लखलख करत होती. दिवाळी किंवा शुभ प्रसंगी जशी आपण माळांची रोषणाई करतो. तसंच. डावीकडनं प्रकाशाची लाट उजवीकडं जात होती, तर क्षणात उजवीकडून डावीकडं. क्षणात वरुन खाली, तर लगेच खालून वर. एका क्षणी केंद्राच्या मध्यातून बाहेर, तर पुढच्या क्षणी बाहेरून आत. तर कधी समुद्रात उठाव्यात अशा लाटांवर लाटा.

बरं, अशी किती झाडं म्हणू? किती काजवे म्हणू? लक्षावधी. कदाचित जास्तच. पार्थिव नजरेनं आणि बुद्धीनं त्या अलौकिक दृष्याचं वर्णन काय करावं? मी स्वत: हा चमत्कार 'याची देही, याची डोळा पाहिला' म्हणून विश्वास बसला. त्याची चित्रफीत कोणी काढली असती तर नक्कीच रोषणाईच्या विजेच्या माळांचा खेळ म्हणून मी सोडून दिलं असतं. या काजव्यांच्या प्रभानर्तनात एक विशिष्ट ताल होता, गती होती, क्रम होता. त्याला शब्दात पकडणं म्हणजे आयुष्यातली एखादीच लक्षात रहावी अशी आपली आवडती सकाळ भांड्यात भरून साठवण्यासारखं आहे. सदा अशक्य.

रस्त्याच्या डाव्या बाजूला दैवी हिरव्या प्रकाशाच्या शेकडो नाजूक मेखला ल्यायलेल्या दरीचा तो एकमेवाद्वितीय नृत्याविष्कार सुरू होता. मी वेड्यासारखा पहातच होतो. ते पिऊन घेत होतो. जवळ कॅमेरा नव्हता. खिशातून मोबाईल काढला. त्यात व्यवस्थित दिसेना म्हणून रस्त्याच्या अगदी कडेला गेलो. मोबाईल स्थिर राहावा म्हणून दोन्ही पायात अंतर ठेवून भक्कम उभा राहिलो. दोन्ही हातात मोबाईल पकडून दरीकडे रोखला. अजून पुढं जाता आलं तर बरं झालं असतं. पुढं दरी सुरू होत होती पण अंधारात आणि गवतात समजत नव्हतं की सुरू होते कुठून? माझा एक मित्र पन्हाळ्याच्या धुक्यात अस्साच चालत चालत चालत थेट दरीत गेला. मी अजून किती पुढं जावं म्हणून टॉर्च सुरू केला अन् खाली पाहिलं. प्रखर प्रकाश पडल्याबरोबर माझ्या दोन्ही पायातून सरपटणारा काळाशार तीन फुट मण्यार जागीच थांबला. मी पहात राहिलो. पायात हेच उंच चामडी बूट होते. मला भीती वाटली नाही. मण्यार थिजला होता. त्याचे काळ्या मण्यासारखे डोळे भानामती करत होते. मी टॉर्च सुरू ठेवून मागं झालो. माझ्या हालचालीची जाणीव होऊन तो जालीम विषारी साक्षात मृत्यू पुढं सरपटत दरीत उतरला.

इतका सहज, पण इतका संहत अनुभव कदाचित आजपर्यंतचा हाच. म्हणून तो मण्यार लक्षातच राहील. बाकी सापांचे आलेले अनुभव कधीतरी लिहीन. विस्तारभयास्तव इथं नाही देत. तर असा हा मण्याराचा अनुभव भर रात्री घेतल्यानं या सापाचं दिवसाउजेडी मला तितकं काही वाटलं नाही.
मी ४ – ६ पार्ले बिस्कीट्स खाल्ली ‘काली चाय’मध्ये बुडवून. चहा पिऊन कप समोरच्या टी-पॉयवर ठेवला. डाव्या हाताशी खालीच कॅमेरा ठेवला होता. तो उचलला आणि उभा झालो.

साप?

गायब. गेला तो! पण कुठं? शक्यता दोनच. एकतर तो व्हरांड्यातून उतरुन जंगलात पसार झाला, नाहीतर………? नाही तर वनविश्रामगृहाच्या माझ्या खोलीत गेला.

पहिल्या शक्यतेला गृहित धरुन मी सगळीकडं शोधलं. व्हरांड्यातून उतरला असता तर मला दिसल्याशिवाय थोडाच राहिला असता? शिवाय त्याची सरपट खाली मातीत दिसायला हवी होती. ती नव्हती. अगदी बारीक नजरेनंही दिसली नाही.

आता पर्याय क्रमांक दोन; माझी खोली. मी काळजीपूर्वक खोलीच्या भिंतींच्या कोप-यांची झडती घेतली. कपाटाखाली पाहिलं. कपाट पक्कं बंद होतं. इवलुशी म्हणून फट नाही. आत जाऊच्च शकत नाही. पलंगाखाली पाहिलं. कुठं, कुठंच नाही.

अशा उन्हाळ्याच्या दिवसात साप कुठं जाईल? थंडाव्याला.
थंडावा कुठं मिळेल? न्हाणीघरात.
न्हाणीघरात? अरे खरंच की. मी हळू दार उघडून झडतीसत्र चालू केलं.
दाराच्या चौकटीशी?........नाही.
पाणी जायच्या जाळीपाशी?…. नाही.
कमोडमध्ये?...... नाही.
बादलीत?..... नाही.
बादलीखाली?..... नाही.
गडी गेला कुठं?

परत बाहेर व्हरांड्यात आलो. साप होता तिथं भिंतीशी उभा राहिलो.

मी साप असतो तर कुठं गेलो असतो?
माझ्यातला साप : सरळ बाहेर. झाडाखाली. गवतात. बिळात. माणसापासून लांब.
हे तपासून झालं होतं. साप व्हरांड्याच्या खाली उतरलाच नाही. उत्तर चुकलेलं आहे.

माझ्यातला साप : जवळच्याच, भिंतीतल्या बिळात.
भिंत तपासून झाली. एकही बिळ नाही. उत्तर चुकलेलं आहे.

माझ्यातला साप: भिंत आणि छत यातल्या फटीत.
व्हरांड्याला वर पत्रा आहे. पत्र्याखालचे वासे तपासले, काही दिसलं नाही. शिवाय आता पत्रा तापलाय. इतक्या भट्टीत बसायला ते काय ड्रॅगनचं पिल्लू आहे? उत्तर चुकलेलं आहे.

माझ्यातला साप : घरात. थंड, अंधा-या जागी.
हे ही तपासून झालेलं आहे. उत्तर चुकलेलं आहे. आतल्या थंड जागा सुनसान, निर्सर्प आढळल्यात. अंधा-या जागी फक्त अंधार. साप-बीप काही नाही. ......... थोडं तथ्य आहे हं पण. मी थंड जागा पाहिली. पण दोन अंधा-या जागा सुटल्या की. ‘खर्र बोललास रे सापा.’

सकाळी निलीमेचा आवाज ऐकून पळायच्या घाईत मी कॅमेरा बॅग पलंगाशेजारी खालीच ठेवली होती. बॅगच्या झाकणाची अर्धी चेन लावलेली होती, अर्धी उघडी. तो आत गेलेला साप या बॅगेतही जाऊन बसू शकतो अगदीच. मी हिंमत करुन बॅग अलगद उचलून बाजूला ठेवली. बॅगखाली काही नव्हतं. हळू हळू बॅगची उरलेली चेन उघडू लागलो. चेन पूर्ण उघडून झाकण हळू पलिकडं टाकलं. आत काहीच नाही.

आता शेवटची संशयित होती माझी सामानाची सॅक. तोंड सताड उघडून तीही पडली होती जवळच. मी ती ही हलक्या हातानं उचलून बाजूला घेतली. खाली काहीच नव्हतं. यात आत पाहणं शक्य नव्हतं. आतलं सामान बाहेर टाकणं जास्त बरोबर. ती उलट्या बाजूनं उचलली आणि तोंड फरशीला टेकवून हळूवार उलटी करुन मागे ओढत न्यायला सुरुवात केली. त्यातनं कपडे-बिपडे, टॉर्च असा तसा जंगम माल घसरून पडू लागला. शेतकरीदादानं तिफण धरुन ज्वारी-बाजरी पेरत पुढं चालावं तसा मी शर्ट, पॅंट, दाढीचं सामान, पेरत पेरत मागं निघालो.
सामान पडता पडता एकदम त्यातून काळा साप बाहेर पडला, छातीत धडाडधूम वाजलं आणि ......

आणि ...... पायातले ते उंच बूट तसेच असूनही मी चौखूर होण्यापूर्वीच एका सेकंदात लक्षात आलं की ती दुर्बीण गळ्यात अडकवण्याची पट्टी आहे. सापाजीराव अजून फरारच. इकडं छातीतलं आता वाजलेलं धडाडधूम अजून काय बसलं नव्हतं.

जेंव्हा आपण एखादी गोष्ट मनात धरुन काही करतो, तेंव्हा त्या गोष्टीची जाणीव सर्वत्र होत राहते. नव्यानं रानात फिरायला येणा-या माणसाला सगळीकडं वाघ दिसत असतो. तसा मला पट्टीचा साप दिसला होता.

आता डोक्याचा भुगा. सगळी सॅक उलटी केली, साप नव्हताच.
माझ्यातला माणूस आता उठून समोर उभा राहिला. ‘काय गरज होती, हिरोगिरी करायची? दिसला होता साप, तर तेंव्हाच मार्गी लावायचं होतं त्याला. फार हौस आहे फोटोची, तर जे काही फोटो-बिटो आहेत, ते उरकायचे होते ना! काय पहायचं ते पहायचं आणि सोडून द्यायचं होतं त्या सापाला तेंव्हाच, लगेच. तू काय जिम कॉर्बेट झालास? की स्वत:ला रामलाल समजलास? तो रोज असले साप पाहतो. आता कुठं घुसून बसला असेल तो साप?’

कान पाडून बाहेर व्हरांड्यातल्या खुर्चीत मी बसून राहीलो.

जंगलात नेहमी घातक ठरणा-या फाजील आणि अतिआत्मविश्वासाचा मी एक नमूना होतो. अक्कल फुकट मिळत नाही. अशा एकेका अनुभवातून हळूहळू का होईना, शिकत गेलो.

आता चिडचिड करून उपयोग नव्हता. म्हटलं आता डोकं आधी शांत करु. मग तपासकार्य परत सुरू करता येईल. समजा नाहीच मिळाला तर? ठीक आहे. तसाही तो बिनविषारीच आहे. तरी शक्यता काहीही होत्या. रात्री झोपेत तो उबेला शेजारी आला तर? साप विषारी असो की बिनविषारी. मी बरंच काय काय पाळायचे धंदे केले होते, पण साप? एकदाच मी साप आणून बादलीत ठेवला होता. पण त्यानं मध्यरात्री बादलीत आवाज करायला सुरुवात केल्यावर त्याला रातोरात मी सोडून आलो होतो. साप पाळायला मी अपात्र होतो. आता पुन्हा असा अज्ञात जागी लपलेला साप ठेवून राहणं म्हणजे........???

मी डोळे मिटून खुर्चीच्या कुशनवर पाठ टेकून पाच एक मिनिटं आरामात बसलो. डोक्यात चक्र सुरुच.

रामलालला बोलावू?
नको. चक्क समोर साप पाहून तारेवर बसलेली चिमणी दाखवावी, तसा तो सापाकडं बोट दाखवून निघून गेला होता. समोर दिसणारा साप पाहूनसुद्धा त्या माणसाच्या चेह-यावर काही हललं नाही, न दिसणा-या सापाबद्दल त्याला काय वाटणार? त्याला बोलावलं तरी तो काय सांगणार होता? “गया होंगा किदरभी अभी वो. जाने दो साएब, आयेंगा दूसरा.”

आता कसं कळेल साप कुठं घुसलाय ते?

माझ्यातला साप : …………………………………….…
च्यायला, याचा पण घसा बसला होता. आवाज निघेना आता त्याचा.
तसाही त्याचा उपयोग नव्हता. मी बरोबर होतो. साप चुकीची उत्तरं देत होता.

मी उठून पुन्हा भिंतीशी उभा राहिलो. ‘हे बघ. तू साप आहेस. माणूस नाहीस. माणसासारखा विचार करू नकोस. साप हो, साप.’

करेक्ट. माणसाच्या पातळीवर विचार करायचं थांबवून आता मला अगदी सापाच्या पातळीवर जाऊन विचार करायला हवाय. मग मी खाली बसलो. आता माझी पातळी सापाच्या पातळीच्या जवळ आली. पुन्हा डोक्याला ताण दिला.

‘हा इथं मी साप, असा. मागं जाऊ का?’
“नको. ऊन आहे तिथं चांगलंच. उजेड आहे, लपायला काही दिसत नाही. अशा ठिकाणी नाही जाऊ.”

ओके. इथून असा असा पुढं आलो. खुर्चीपाशी.

‘उजवीकडं जाऊ का?’
“नको. तिथं खुर्चीत माणूस आहे, माणूऽऽऽऽस!!! त्याच्यासमोर कशाला? ‘आ बैल मुझे मार.’ खरंच खुर्चीतला बैल उठला तर? त्यापेक्षा भिंतीच्या आडोशानं जात राहावं आणि खुर्चीच्या मागून निघावं. इथून खुर्चीच्या पायापासून सरपटत जावं लागेल, तिथं खोलीत जायला.”

खुर्चीच्या पायापासून.... खुर्चीच्या पायापासून....... खुर्चीच्या पायापासून.......

‘दया, यह कुर्सी चेक करनी पडेगी.’

खुर्चीचं सूक्ष्म निरीक्षण मी सुरु केलं. दोन फुटाच्या खुर्चीचं किती निरीक्षण करावं? एक प्रदक्षिणा उजवीकडून डावीकडं, दुसरी डावीकडून उजवीकडं. साप गवसेना. पत्ता नाही.

एकदम ट्यूब पेटली. हा कवड्या आहे. सुरुसुरु चढून जातो कुठंपण. खुर्चीत चढायला काय बळ लागतंय त्याला?

मी खुर्चीच्या पाठीची उशी काढली.

मग खाली बसायची उशी काढली.

या दोन उशांच्या फटीत सापाजीराव पहुडले होते.
‘अबे तं भैताडा, माहा जीव अर्धा झाला अन् तू इथं टेचात खाली वर गाद्या घेऊन झोपून राह्यला बे!’

11_0.jpg

म्हणजे मी चहा बिस्किटं खात बसलो तेंव्हा हा वर चढून माझ्या पाठीशी घुसला. कंबर आणि खुर्चीचे कुशन्स यातल्या अंधा-या जागी त्याला सुरक्षित वाटलं होतं.

आता परत त्याला शोधता शोधता मी त्यालाच बुडाशी घेऊन पाच मिनिटं बसलो होतो चक्क. आमच्या लहानपणी आजी काय खोटं नव्हती बोलत, ‘ढुंगणाखाली आरी अन् चांभार पोरं मारी.’

जीभ लव-लव करीत मान वळवून साप अंदाज घेत होता की नेमकं झालंय काय? मी मोठ्या सुखा-समाधानानं त्या शेषराजाच्या लघु अवताराकडं पाहिलं.
“धन्य, धन्य महाराज. तुम्ही दातांवर इतका संयम ठेवून राहिलात. मला फोटू द्या आता एक. समस्त सर्प-असर्प समाजाला हे तुमचं कवतिक आम्ही नाय तर कोण कळवणार?”

12_1.jpg

अर्ध्या किलोमीटरवर नदीचा एकदम सरळसोट खोल काठ होता. त्यात अनेक कपारी, खुरटी झुडपं होती. सापासाठी उत्तम अधिवास. सापाला नेऊन त्यात सोडलं. आता कडा चढून परत वर येणं त्याला शक्य नव्हतं.

क्रमशः

लेखात वापरलेल्या बोली भाषेतील शब्द / प्राणी / झाडं यांची सामान्य भाषेतली नावं / अर्थ

निलीमा – Tickell’s blue flycatcher bird
भैताड - मूर्ख

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारी!
तुमची भाषेवरच्या हुकुमतीला दाद आपोआपच जाते. 'इतका सहज , पण इतका संहत' >> वा वा!
तुम्हाला संपर्कातून इमेल केली आहे. मिळाली का?

@ वावे.
माफ करा. आज पाहिली. आताच.

ओह, वाचताना प्रत्येक क्षणी धडधड वाढली
खूप म्हणजे खूप्पच प्रभावी वर्णन
पुढील भागाच्या प्रतिक्षेत

छातीत धडाडधूम ,
माझ्यातला साप :
पायामधे मण्यार

अरे, काय भारी लिहिता राव ! जबरदस्तच...

या भागात सापाशी गाठ ! लेख आवडला.
मी सापाची चपळाई अनुभवलेली आहे आणि तो किती वेगात सरपटतो हे पाहिले आहे. माझ्या दिशेने येत नव्हता तरी पाचावर धारण बसली होती!

बापरे, थरारक अनुभव.

<<मला निलीमा आधी तुमची बायको असेल वाटले>> मला पण. .

साप माझा अतिशय आवडता प्राणी आहे! त्याच्याइतकं सुंदर या जगात काहीच असू शकत नाही; हा फोटो बघायलाच मी बऱ्याचदा हा धागा उघडतोय. अजून येऊ द्यात किस्से! तुमची लेखनशैली आणि तुमचे अनुभव वाचल्यावर हेवा वाटतोय!