मी माझ्या जगण्याचे अत्तर शिंपत आले

Submitted by सुप्रिया जाधव. on 8 May, 2020 - 13:19

कर्तव्याला निष्ठेमध्ये गुंफत आले
मी माझ्या जगण्याचे अत्तर शिंपत आले

म्हणालास की तुझाच आहे तुझाच राहिन
खरे ठरावे म्हणून शिंकत शिंकत आले

कुणी किती अन कसे हरवले...पर्वा नाही
स्वतःस्वतःशी पैज लावली, जिंकत आले

जितक्यावेळा वास्तव जखमा देउन गेले
तितक्यावेळा मलम स्मृतींचे लिंपत आले

युगायुगांनी वाढत गेला तुझा अबोला
युगायुगांचा विरह प्यायले, झिंगत आले

क्षणाक्षणाने काळ पुन्हा सोकावत गेला
कणाकणाने खजील होउन संपत आले

सुप्रिया मिलिंद जाधव

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कुणी किती अन कसे हरवले...पर्वा नाही
स्वतःस्वतःशी पैज लावली, जिंकत आले
खूप छान.....