ह्याचसाठी भेट घेते

Submitted by सुप्रिया जाधव. on 6 May, 2020 - 05:00

तुला समजून घ्यावे ह्याचसाठी भेट घेते
स्वतःला ओळखावे ह्याचसाठी भेट घेते

मला शब्दात नाही मांडता आले कधी जे
तुझ्या नयनी समावे, ह्याचसाठी भेट घेते

युगांपासून झुलण्याचे मनाला वेड आहे
बसावे हेलकावे ह्याचसाठी भेट घेते

स्वभावाचे तुझ्या मांडीत गेले ठोकताळे
कळावे बारकावे ह्याचसाठी भेट घेते

तुझ्याविण राहते शिल्लक कुठे अस्तित्व माझे ?
तुझ्यातच विश्व मावे ह्याचसाठी भेट घेते

सुखाचा सोस नाही वेदनेशी नाळ जुळते
तिने अपुले म्हणावे ह्याचसाठी भेट घेते

निरर्थक वाटते आत्म्याविना देहात रमणे
समेवर येत गावे ह्याचसाठी भेट घेते

भरवश्याचा तुझ्याविण अन्य येथे कोण मृत्यो ?
कुणावरती मरावे ?... ह्याचसाठी भेट घेते

*सुप्रिया मिलिंद जाधव*

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users