एकटीच @ North-East India दिवस २७

Submitted by सुप्रिया राज जोशी on 6 May, 2020 - 15:20

अनुक्रमाणिका > https://www.maayboli.com/node/72984
अनुक्रमाणिका २ > https://www.maayboli.com/node/73598
अनुक्रमाणिका ३ >https://www.maayboli.com/node/74455

4th मार्च 2019

प्रिय कोमल,

माझ्या प्रवासातील आजची अविस्मरणीय गोष्ट तुझ्या नावावर मांडायची आहे. कारण एक तू आहेस की मी वेड्या वेड्या सारखे वागले तरी तुला माझी चूक-भूल दिसणारच नाही. कारण तू ही थोडी तशीच जगाने वेडी ठरवलेल्या कॅटेगरीमध्ये मोडतेस. शिवाय माझ्यावर खूप प्रेम करणारी माझी सर्वात जवळची माणसं दोन हातांच्या दहा बोटांवर मोजायची ठरवली तर एका बोटावर तुझे नाव असेल. मी तुला पत्र लिहीलंय हे कळल्यावर तुला केवढा आनंद होईल ते मला डोळ्यासमोर दिसतंय!

मला शब्दात सांगता करता येणार नाही पण काल रात्री जशी झोप लागली ती जरा वेगळीच होती. सकाळी जाग यायला थोडा उशीर झाला. आज जंगलात मोठ्या शिकारीला जायचा बेत ठरला होता. कालच सामानाची जमवाजमव करून ठेवली होती. नदीत मासे पकडायचे आणि तिथेच जेवण शिजवून खायचे असा फक्कड बेत ठरला होता. पण खोलीबाहेर आले तर आभाळ भरून आले होते. म्हणजे अख्खी रात्र सरली तरी पाउस सरला नव्हताच. अशा ओल्या वातावरणात शिकारीसाठी दूर जंगलात जायच्या नुसत्या कल्पनेने मला गरजेपेक्षा जास्त कापरे भरू लागले. तसेही त्या वातावरणात भर सकाळीही लोन्ग्वा गाव खिन्न वाटत होते. मला तिथे अजून रहायची इच्छा होईना. मी पाठीवर बॅग चढवली आणि घरच्या मंडळीना गुडबाय करून निघाले. जरी कुठे जायचे ते ठाऊक नव्हते तरी मोन पर्यंतचा पहिला टप्पा अटळ होताच. मोन ला जायची पहिली आणि शेवटची सुमो साडे आठला सुटणार होती, त्यामुळे विचार करत बसायला वेळ नव्हता.

सुमो स्टँडवर पोहोचले तर सुमो जवळजवळ पॅक होऊन निघायच्या तयारीत उभी होती. सर्वात पाठच्या सीटचे तिकीट मिळाले. ते गोड मानून, लोन्ग्वाला गुडबाय करून निघाले.
56753112_10156997741397778_3181358739449970688_o.jpg
आधी आधी मी पावसात स्वच्छ आंघोळ केलेल्या सृष्टीला कमेंरात टिपून घेण्यासाठी आतुर होते पण काहीच वेळात माझ्या डोक्यात, पोटात भिरभिरु लागले. उपाशी पोटी निघाले होते. पाठची सीट होती. रस्ता वळणावळणाचा होता. यापलीकडे जाऊन ते सिरिअसली घ्यावे, हे माझ्या डोक्याला तेव्हा सुचले नाही.

मोन ला पोहोचल्यावर पुढचे तिकीट काढायला गेले तेव्हा सोनारीसाठी सुमो निघत होती. मला आदल्या प्रवासात झाला तसा त्रास परत होऊ नये याची मला नीट खबरदारी घ्यायची होती. मी एक नंबर ची सीट देण्याच्या अटीवरच फक्त तिकीट विकत घेतले. (भरल्या सुमोतही ती सीट मला मिळाली याचे थोडे आश्चर्य वाटले खरे!) खूप सारा सुका खाऊ विकत घेऊन मी ऐटीत पुढच्या सीट वर खिडकीत बसायला गेले, तेव्हा मला कळले की एक नंबरची सीट ही ड्रायव्हर आणि खिडकीतील प्रवासी यांच्या मधली सीट असते.

या सीटवरच्या प्रवाशाला एक पाय गिअर च्या पलीकडे नि एक पाय गिअरच्या आलिकडे ठेऊन बसावे लागते, दोन पायामधला कोन ही ड्रायव्हरची गिअर बदलायची स्पेस असते. आता हा कोन किती अंशाचा ठेवायचा हे सर्वस्वी आपल्या मनावर आहे. हे भगवान! आयुष्यात असा प्रवास करायची वेळ येईल (ते ही एक नंबर च्या ओन डिमांड तिकिटावर) असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. जोडीला नागालँडच्या रस्त्याची महतीही मी मागच्या पत्रात लिहिली आहेच, तर ह्या टप्प्यावरचा प्रवास कसा झाला असेल याची हे वेगळे लिहायला नको. (जोक्स अपार्ट, एरव्ही रोजच इथल्या गाडीत एक नंबर च्या तिकीटावर कोणी न कोणी प्रवासी बसतोच की! अनेकदा ती स्त्री सुद्धा असते हे मी स्वत: पाहिलेले आहे.)

57154217_10156997745732778_4457204196638195712_o.jpg

तीझीट (Tizit) ला नागलँडची हद्द संपून आसामचे राज्य सुरु होते. हुश्श! निदान पुढचा विसेक किलोमीटरचा प्रवास सरळ आणि सपाट रस्त्यावरून करायचा. तथा गिअर बदलायची वेळ फारशी येणार नाही! पण स्टेट बोर्डर क्रोस केल्या केल्याच नुसतेच रस्ते नाही तर संपूर्ण नजारा बदलून गेला. पावसाळी वातावरणात नागालँड मधील मोन डीस्ट्रीक्ट अक्षरश: पेंगत असल्यागत वाटत होते. त्याच वातावरणात आसामचे नामतोला (Namtola) मात्र वाऱ्यात नाचणाऱ्या हिरव्या कुरणाला डोक्यावर घेऊन नांदत होते असे कोणालाही वाटेल. ते पाहून खरतर मन प्रसन्न व्हायला हवे. पण तसे आले नाही. कारण त्या सुमारास मी एका वेगळ्याच अनुभवातून जात होते.

माझे डोके थोडे बधीर झाले होते. आजूबाजूच्या परिस्थितीचे भान हळू हळू अस्पष्ट होत होते. काही वेळात सारेच फिक्कट होत होत शेवटी सारे अदृश्य झाले. माझ्या आयुष्यातले पुढचे काही तास जे चक्क गायब झाले, ते मला अजून सापडले नाहीत.

56944938_10156997749312778_1088357022182670336_o.jpg

अंदाज बांधला तर तेव्हा साधारण अकरा वाजलेले असावेत. दीड वाजता मी भोजो रेल्वे स्टेशन वर का आणि कशी पोहोचले याची मला मुळीच आठवण नाही. तिकीटच्या खिडकी पलीकडून तो महाशय मला कुठे जायचे हे विचारत होता त्यावेळी मला त्याचा राग येत होता, एवढे मला आठवते. मी त्याला ओरडून सांगत होते, “मै कही भी जाऊ, आपको उससे क्या मतलब? आपका काम सिर्फ तिकीट देने का है|”

फारशी बाचाबाची झाली नसावी पण काहीतरी बिनसले, एवढे खरे! तशी मी धुसमूसत तडक खिडकी सोडून निघाले आणि रेल्वे प्लॅटफोर्म वर येऊन रुसून बसले. काही वेळाने एक ट्रेन आली, त्यात चढले. जवळजवळ अख्खी ट्रेन रिकामी होती. ते मला आवडले. मी खिडकीची सीट पकडून बसले. वारा अंगावर येऊ लागला. डोकेही ताळ्यावर येऊ लागले. मी कुठे चालले आहे? मला हे माहितच नाही, ह्याची जाणीव झाली. ती जाणीव खूप भीतीदायक होती. आदल्या दिवशी अफिम ची नशा केली त्याचा हा परिणाम असेल का? ह्या प्रश्नाचे उत्तर मला आजपर्यंत सापडले नाही. पण जो अनुभव आठवणीतच नाही तो अनुभव निव्वळ अविस्मरणीय आहे.

मोबाईलचे चार्जिंग संपले होते त्यामुळे त्याक्षणी मला काहीच करता येईना. काही मिनिटांनी मी इन्टरनेटवरून ट्रेन चे नाव आणि रूट शोधून काढला. सोनारी पासून तीन किलोमीटर दूर असलेल्या भोजो स्टेशनवरून दीड च्या सुमारास मी अवध-आसाम एक्स्प्रेस पकडली होती.
ही गाडी दुपारी 2.35 ला गाडी न्यू तिनसुकिया स्टेशनला पोहोचते. माझ्याकडे तिथून पुढच्या प्रवासाची दिशा ठरवण्याचे स्वातंत्र्य होते.

सुपर आयडिया! अरुणाचल प्रदेश मधल्या डोंग या गावाला जाता येईल. न्यू तिनसुकिया पासून 330 किलोमीटरचा रस्ता आहे. आज जमेल तितका रस्ता पार करायचा आणि उद्या 5 मार्चच्या रात्री डोंगला जाऊनच मुक्काम करायचा. हा जो दोन वाक्यात दोन दिवसाचा प्लान केला तो किती ढोबळ आणि कुचकामी होता हे पुढे कळेलच. पण डोंग ला का जायचे ठरवले ते आधी सांगते.

सहसा शेपटीवाल्या प्राण्यांची शेपूट जशी मूळ शरीराच्या बाहेर जोडली असते तसे नॉर्थ इस्ट इंडिया हे उर्वरित देशाच्या पूर्वेला जोडलेले आहे. या प्रदेशातले सर्वात पूर्वेकडचे कुठचे गाव असेल तर ते डोंग! सूर्योदयाच्या किरणांचा सर्वात पहिला स्पर्श डोंग ला होतो. हे गाव फार दुर्गम असल्यामुळे सहसा प्रवाशांच्या आयटनरी वर नसते. पण माझ्या हातात चार दिवस होते. प्रवास संपायच्या आधी अशा विलक्षण जागेला भेट द्यायची संधी जणू चालत आली होती.

डोंगच्या जायच्या रस्त्यावरचे मुख्य टप्पे असे आहेत. न्यू तिनसुकिया 80 km (2 तास) नाम्साई 55 km (1.30 तास)  तेजू 200 km (8-10 तास) वालोंग (पायी 2.5 तास) डोंग. रात्रीच्या तिसऱ्या प्रहराला शेवटच्या टप्प्यावरची डोंगरातील पाउलवाट तुडवून सूर्योदयाच्या आधी डोंग ला पोहोचतात. मी तर सुर्योदयाच्या प्रतीक्षेत अख्खी रात्रही डोंगच्या पठारावर काढायला तयार होते.

न्यू तिनसुकिया ला उतरले तेव्हा गेट वर तिकीट चेकर उभा होता. आता माझी लाज आणि पैसे दोन्ही जाणार या भीतीने माझी पूरती गाळण उडाली. मी त्याला चुकवत प्लॅटफोर्मवर येऱ्याझाऱ्या घालत राहिले आणि मधेच धीर एकवटून चपळाईने बाहेर सटकले.

मग माझी स्टाईल चेंज करून ताठ मानेने मी पुन्हा उलटी वळले. चौकशी काउंटर वरून पुढच्या प्रवासाची माहिती मिळाली त्याप्रमाणे चालत चालत बस स्टँड वर गेले. आजची शेवटची बस काहीच वेळात निघणार होती, आणि ती फक्त नाम्साई (Namsai) पर्यंतच नेऊन सोडणार होती. पण 'पुढचे पुढे बघू'! कमीतकमी एवढा नरम एटीट्युड तर बॅकपॅकरला ठेवावाच लागतो. ह्या टप्यावरचा प्रवास पूर्ण करून मी नाम्साईला उतरले तेव्हा फक्त पाच वाजून गेले होते. या वेळेस एकही वहान तेजू ला पोहोचायला मिळणार नाही यावर मी मुंबईकरने तरी कसा विश्वास ठेवायचा? म्हणूनच जेव्हा बस मला मेन रोड वर उतरवून निघून गेली तेव्हाही मी निश्चिंत होते. पण तिथला एक अनोळखी इसम मात्र अक्षरश: परोपरीने मला विनवू लागला की, “या वेळेस तू कुठच्या गाडीत बसशील तर तेजू ला पोहोचशीलच याची मुळीच गरेंटी नाही. इथली परिस्थिती एवढी खराब आहे की अर्ध्या रस्त्यात तुला लुटून नेतील. रात्र इथेच काढून उद्या पहाटे पुढचा प्रवास कर.” प्रथम त्या अनोळखी इसमाच्या फुकटच्या सल्याकडे मी दुर्लक्ष केले. पण तरीही तो माझ्या काळजीपोटी माझ्या सोबतीला थांबूनच राहिला. मी कितीतरी वेळ गाड्यांना लिफ्ट साठी इशारे करत होते आणि मला मुळीच दाद न देता वहाने डोळ्यासमोरून पुढे निघून जात होती. पण एखादी गाडी थांबलीच तर मी त्यात खरच बसेन की काय अशी काळजी त्या माणसाला वाटत होती. स्वत:च्या शब्दाला किंमत नसतानाही शिवाय फुकटचा वेळ दवडून, निव्वळ कुणाच्या सुरक्षिततेच्या काळजीपोटी हटून रहाणारे असे लोक फक्त अशाच प्रवासात सापडतात.

एकच फक्त गाडी दुरून दिसली तिच्यामध्ये बसायला त्याची हरकत नव्हती असे तो म्हणाला. कारण ती गाडी पोलीसची होती. माझा इशारा गाडी थांबली, पोलीसने पुढची काच खाली केली.
मी विचारले “गाडी तेजूतक जाएगी?”
“हा.”
“प्लीज मुझे भी लेकर चलिये|.”
“मुमकिन नही है| पीछे कैदी बैठे है|”
“ तो क्या मै आगे बैठ सकती हू? आप है तो फिर डरने जैसा क्या है?” ...

दोन तास भर माझी चिकाटी आणि हिम्मत पूर्ण पणाला लावूनही मी एकही वहान थांबवू शकले नाही. त्यात पाऊस सुरु झाला आणि दोन मिनिटात मी भिजूनही गेले. सकाळी जे सटरफटर खाल्ले होते त्यावर पोटात अन्नाचा कण नव्हता. एका क्षणी मी आशा सोडून दिली आणि मेनरोड वरून सरळ नाम्साई मार्केटच्या दिशेने चालू लागले तसे माझ्या रक्षणकरत्याच्या जीवात जीव आला.

चालताना एका लोकल बाईक ला थांबवून मी विचारले की एखादे सुरक्षित हॉटेल इथून किती दूर आहे? त्यावर त्याने मला मार्केट पर्यंत लिफ्ट द्यायची तयारी दाखवली. मी सामान मांडीवर धरून त्याच्या पाठी बसले. माझी थोडी विचारपूस केल्यावर जसे त्याला कळले की मला तेजू (Tezu) ला जायचे आहे तर तो ही एका क्षणात एका चाकावर ( ) तेजू ला जायला तयार झाला. दिवस सरून गेल्यावर, पावसात भिजत, पुचाट स्कुटरवरुन, जंगलाच्या रस्त्यातून तो मला नुसताच घेऊन जायला तयार नव्हता तर त्यासाठी मला खूप जास्त भरीसही पाडत होता. त्याला मी एकतर मूर्ख दिसत होते किंवा मी एकटीच स्त्री आहे यापुढे काहीच दिसत नव्हते.

मी त्याला खोटे सांगितले की मी on government duty आहे तसे त्याने माझ्याकडे सेन्ट्रल की स्टेट, कुठचे डीपार्टमेंट वगैरे वगैरे चौकशी करायला सुरवात केली. मी मुंबईहून आले आहे, अशा तुटक जुजबी माहिती पलीकडे मी काहीही सांगू शकणार नाही, असे मी त्याला भासवले. माझ्या बोलण्यातील खरेखोटेपणा पडताळून पहाण्यासाठी असेल कदाचित पण त्याने एका हॉटेलवर नेउन गाडी उभी केली. कोणी सर्वसाधारण प्रवासी असता तर तिथेच रहायची सोय शोधली असती. पण मी तर गव्हरर्न्मेंट सर्वंट होते ना? रिसेप्शनवर मी सर्किट हाउस बद्दल विचारणा केली. त्यावर तो मनुष्य मला पटवू लागला की ते मार्केटहून पुढे खूप दूर आहे. शिवाय सर्किट हाउससाठी फक्त आगामी (advance) बुकिंग होते. पण गप्पांच्या ओघात जसे मला कळले, की समोरच Deputy Commissioner चे ऑफिस आहे, मी ही खात्रीपूर्वक सांगितले की माझे आयकार्ड बघून त्यांना माझी रहायची सोय करावीच लागेल. त्या वात्रट माणसाच्या तावडीतून सुटण्यासाठी मला हेच सुचले.

तरी तो मला DC ऑफिस मध्येही सोडायला आला. एकतर त्याला खूप शंका येत होती की मी थापा मारत आहे शिवाय ऑफिस अवर्स तर उलटून गेले होते. त्यामुळे माझे काम तिथे होणारच नाही या खात्रीने तो तिथेच थांबून राहिला. मी त्या इमारती मधला जिना चढू लागले. वरच्या मजल्यावरच्या एकाच खोलीत लाईट चालू होता, मी तिथे गेले आणि जो कोण तिथे होता त्याला सारी कहाणी सांगून विनंती केली की "मला इथे ऑफिसमध्ये रात्रभर बसायला मिळाले तरी मी उद्या सकाळी गपचूप निघून जाईन". तो सद्गृहस्थ मला Additional DC कडे घेऊन गेला. हे दोघेजण इलेक्शन च्या कामामुळे उशिरापर्यंत ऑफिस मध्ये राहिले होते, तेच माझ्या पथ्यावर पडले. Additional DC सज्जन आणि दयाळू माणूस होता. त्याने लगेच दोन फोन जोडले. पुढच्या काहीच मिनिटात माझ्यासाठी एक जीप तयार होती जी मला घेऊन सर्किट हाउस मध्ये गेली. जिथे माझ्या जेवण्या-खाण्याची रहाण्याची VIP व्यवस्था केलेली होती.
56902424_10156997767847778_8188231759708553216_n.jpg

माझ्या आयुष्यातून हरवलेल्या तासानंतर जेव्हा मी भानावर आले तेव्हा "रात्री नऊ वाजता मला फोन करून माझी खुशाली विचार" फक्त एवढाच निरोप मी राज, रोशन आणि अभिषेक असा तिघांना पाठवला होता. जे सकाळी घडलं ते पुन्हा होणार नाही कशावरून? आणि तशी वेळ माझ्यावर रात्री अवेळी आली तर? हीच रिस्क ओळखून मी तशी तरतूद केली होती. पण ते संकट ओढवले नाही.

56883668_10156997777522778_2152579987473956864_n.jpg

दुसऱ्याच एका अकल्पित संकटातूनही सुखरूप बाहेर पडून मी सर्किट हाउस मध्ये आले. गरम गरम पाण्याने न्हावून घेतले. मी रात्रीच्या जेवणात सहा चपात्या जेवले. पलंगावर विसावले तसे बरोबर दिलेल्या वेळेला एका पाठोपाठ एक तिघांचाही फोन येऊन गेला. माझीच आजची गोष्ट मी फोनवर तीन-तीन वेळा जरी सांगीतली, तरी माझ्यासाठी ती अनाकलनीयच राहिली.

माझ्याबरोबर प्रवास करायची मोठी हौस आहे ना तुला? तर प्रवासाची ही झलक वाचून तुझा विचार बदलतोय का ते बघ.

तुझीच.
(मोठी नणंद आहे मी, स्वत:ची पायरी ओळखून वाग.)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी या भागात थोडासा प्रवास केलाय. तुम्ही जो प्रवास करताय त्यातलं धाडस काय आहे याची कल्पना येतेय.
तिथे तुम्ही करत असलेल्या बॅकपॅकिंगला सलाम!

Fact is stranger than fiction ह्या उक्तीचा अनुभव आला. मागचा आणि हा भाग वाचून, आधी एक टपलीत मारून परत करशील असं, असे विचारावेसे वाटले पण उत्तर हो च यावे असेही Proud

नक्कीच थरारक भाग.... कदाचित अफीमची नशा भारी पडली असावी. असो, तुम्हाला काही आठवत नसले तरी तुम्ही सुखरूप होता म्हणजे बाह्य जगाला फारसे कळले नसावे Happy

त्या भागात इतका सहज प्रवास करता येतो की परमिट सहज मिळू शकते? मागच्या भागात परमिटचा उल्लेख आलाय म्हणून विचारते. होमस्टेज आहेत म्हणजे प्रवासी येत असणार.
बाकी न ठरवता केलेला प्रवास रोचक तितकाच धोकादायक ठरू शकतो. ते सरकारी ऑफिस बंद असते तर थोडी पंचाईत झाली असती...

हर्पेन टपली चालेल कोणी ओणव उभं रहायचा विषय काढला नाही ते बरे Lol
साऱ्यांना हा भाग वाचल्याबद्दल धन्यवाद

अशा धाडसी, मनमौजी प्रवासाला थोडी बेफिकिरी असावीच लागते ना? हा अनुभव (वाचायला) मस्त आहे. मस्त लिहिलंय. शेवटी भावजईला दिलेला दम भारीच.