काबुलीवाला कथा आणि काबुलीवाला चित्रपट

Submitted by सतीश कुलकर्णी on 6 May, 2020 - 13:51

काबुलीवाला कथा आणि काबुलीवाला चित्रपट ( १९६१)

“काबुलीवाला” रवीन्द्रनाथ टागोर यांची भावस्पर्शी कथा. पण ही केवळ कथा आहे असे मला वाटत नाही तर ते अप्रतिम विरह काव्य आहे. हा विरह एका बापाला दूरदेशी असणाऱ्या मुलीचा जाणवत असणारा विरह आहे, हा विरह आपला देश सोडून दुसऱ्या देशात आलेल्या एका सर्व सामान्य माणसाचा आपल्या मातीबद्दलचा विरह आहे, घरापासून कोसो दूर असणाऱ्या हिंदुस्थानात गेल्यावर सहन कराव्या लागणाऱ्या आपल्या आईचा , घराचा हा विरह आहे. आणि या विरहाने व्याकूळ झाला आहे आफ्गानिस्थानातील काबुलीवाला. ही मन हेलावून टाकणारी व्याकुळता रवींद्रनाथ टागोर यांनी त्यांच्या कथेतून मांडलेली आहे. रवींद्रनाथ यांच्या कथेमध्ये काव्य असते, जीवन विषयक दृष्टीकोन असतो आणि त्याचमुळे त्यांच्या कथा मनाला स्पर्श करून जातात. काबुलीवाला कथा नेमकी कोणत्या साली लिहिली हे माहित नाही पण काही पुस्तकातील नोंदी वरून रवींद्रनाथ टागोर यांच्या बहुतेक सर्व कथा १८९० ते १९१० या काळात लिहिल्या आहेत. या कथेवर बिमल रॉय यांनी निर्मित केलेला आणि हेमेन गुप्ता यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट आहे “ काबुलीवाला”

“अफगाणिस्थान” हिंदुस्थान पासून दूर असलेला देश. हा प्रांत वेगळा, तिथली भाषा आणि वेश वेगळा, इतकेच काय संस्कृती सुद्धा वेगळी. काबुलीवाला रहमान या देशाचा. आपल्या घरावर, कुटुंबावर, संस्कृतीवर प्रेम करणारा हा सच्चा पठाण आपली छोटी मुलगी आमिना आणि त्याची आई यांच्यासह राहत आहे. आमिनाच्या छोट्याशा विश्वात काबुलीवाल तिचे सर्वस्व आहे. आपल्या मुलीचा प्रत्येक हट्ट तो पूर्ण करत असतो कारण तिला आई नाही. आपले छोटेसे घर काबुलीवाला काबाडकष्ट करून चालवत आहे. अनेक आर्थिक अडचणी तो कर्ज घेऊन सोडवत आहे. एक दिवस कर्ज वसुली साठी त्याच्याकडे सावकार पठाणाचा तगादा होतो. आणि काबुलीवाला आश्वासन देतो पंधरा दिवसात तो कर्ज फेडेल. अफगाणीस्थानात त्याच्या धंद्याला वाव नाही म्हणून आपल्या कुटुंबियांचा निरोप घेऊन तो हिंदुस्थानात जातो. आणि आपल्या मित्रांच्या साह्याने रस्त्यावरून शाली विकण्याचा धंदा चालू करतो. गल्ली बोळातून शाली विकून तो आपला गुजारा करत असतो. काबुलीवाला दिसायला इतका धिप्पाड आहे त्याला घाबरून लहान मुले पळून जात असतात. एक दिवस तो एका मुलीच्या समोर येतो आणि प्रेमाने तिच्याकडे बघत असतो. मुलगी त्याला घाबरते आणि आपल्या घरात पळून जाते. तिची धारणा आहे काबुलीवाल्याच्या झोळीत त्याने पळवून नेलेली छोटी मुले आहेत आणि तो तिला तसाच पळवून नेईल. पण मुलीच्या मनात काहीही असले तरी काबुलीवाल्याची मन:स्थिती निश्चितच वेगळी आहे. मिनीचे वडील बाबूजी ( सज्जन) लेखक आहेत, त्यांचे विचार पारदर्शक आहेत. काबुलीवाला आपल्या मुलीला भेटायला आला आहे हे त्यांना समजते तेव्हा ते त्यांची भेट घडवतात. आणि काबुलीवाल्याला घाबरून असणारी मिनी ( सोनू) त्याला “उद्या पण ये” म्हणून सांगते. एरवी उदास उदास असणारा काबुलीवाला त्या दिवशी आनंदात असतो.

काबुलीवाला हिंदुस्थानात रुळत असतो. पण काबुलीवाल्याचे घरी येणे हे मिनीच्या आईला ( उषा किरण ) मान्य नाही. गावातील मुले पळवून नेऊ लागलेत आणि काबुलीवालाच त्याला जबाबदार आहे असे तिला वाटत असते. पण असे असले तरी एक अनामिक ओढ मिनी आणि काबुलीवाला यांच्यात आहे काहीच दिवसात मिनीचा वाढदिवस साजरा करायचे ठरते. पण या वाढदिवसादिवशी काबुलीवाल्याचे घरी येणे हे मिनीच्या आईला मान्य नाही. मिनीचे वडील काबुलीवाल्याला तसे सांगतात. काबुलीवाला नाराज होतो पण तो मिनीच्या वडिलांचे म्हणणे मान्य करतो. मिनीच्या वाढदिवसादिवशी तिला लाल बांगड्या द्यायचे त्याने मान्य केलेले असते पण आता त्याला देता येणार नसतात. मिनीला भेटण्याची त्याची तडफड मात्र कायम असते.

मिनिला सुद्धा काबुलीवाला येणार असे वाटत असते पण तो येत नाही असे बघून त्याच्या वाटणीचा खाऊ ती चोरून आपल्याजवळ ठेऊन घेते. खिडकीत बसून ती काबुलीवाल्याची वाट बघत बसली आहे. बराच वेळ होतो पण काबुलीवाला येत नाही म्हणून मिनी त्याला शोधण्यासाठी बाहेर जाते. पण मिनी दिसत नाही म्हणून घरी एकच गोंधळ उडतो. काबुलीवाल्याला हे कळते आणि तो स्वत: मिनीला शोधण्यासाठी बाहेर पडतो. शेवटी एका ठिकाणी मुसळधार पाउस आल्याने आडोशाला काबुलीवाला बसला असतो. तिथे कुणाचे तरी लक्ष जाते आणि काबुलीवाल्याला त्याची मिनी सापडते.

पाउसात भिजल्याने मिनीला ताप येतोच, सर्व अस्वस्थ होतात. ताप जसा वाढत जातो तशी चिंता वाढत जाते. काबुलीवाल्याला घरात प्रवेश नाही, मिनीला तो बघू शकत नाही त्यावेळी तो घराच्या बाहेर बसून नमाज पडतो. त्याचे अल्लाकडे मागणे एकच आहे मिनीला बरे कर. दुसरा दिवस मिनी बरी होते. काबुलीवाला आनंदतो. पण या प्रसंगानंतर त्याला त्याच्या घराची आठवण येते.

गोष्टी जशा त्याच्या मनात असतात तशा अल्लाच्या मनात नसतात. एका ठिकाणी त्याने माल उधार दिला आसतो. आणि उधारी वसूल करण्यासाठी तो त्या माणसाकडे जातो. पण तो माणूस माल घेतलाच नाही असा बहाणा करतो . काबुलीवाल्याला राग येतो. दोघांची बाचाबाची होते, काबुलीवाला रागाच्या भरात त्या माणसावर चाकू उगारतो आणि त्यात तो माणूस मरण पावतो. काबुलीवाल्याला पोलीस पकडून नेतात. पोलीस पकडून नेत असताना त्याला रस्त्यावर मिनीचे घर लागते. काबुलीवाल्याचे वेगळेच रूप मिनीला बघायला मिळते. काबुलीवाला तिची समजूत काढून पुढे जाऊ लागला आहे. इतक्यात मिनी काबुलीवाला म्हणून हाक मारते आणि मघाशी खून करणारा काबुलीवाला एकदम ओक्साबोक्षी रडू लागतो.

केस कोर्टात जाते. काबुलीवाल्याला दहा वर्षाची शिक्षा होते. काळ पुढे जात असतो. एक दिवस काबुलीवाला कोर्टातून सुटतो, आणि मिनीला भेटायचे ठरवतो. जाताना तिच्यासाठी लाल बांगड्या घेण्याचे सुद्धा तो विसरत नाही. त्या दिवशी मिनीचे लग्न असते आणि तिला घराबाहेर यायला परवानगी नसते. पण काबुलीवाल्याच्या भावना बघून तिचे वडील त्यांची भेट घडवून आणतात. काबुलीवाल्याला आर्थिक मदत सुद्धा करतात. आणि काबुलीवाला आपल्या देशाकडे परत जातो.

काबुलीवाला या चित्रपटाची ही कथा. पण ही कथा खऱ्या अर्थाने खुलली आहे कारण हेमेन गुप्ता यांचे दिग्दर्शन आणि बलराज सहानी यांच्या अभिनयामुळे. यातील प्रत्येक प्रसंग सादर करत असताना दिग्दर्शन आणि अभिनय यांचा मिलाप आपल्याला बघायला मिळतो. चित्रपटाच्या सुरवातीला काबुलीवाला घर सोडून जात असतो आणि आपल्या मुलीचा निरोप त्याला घ्यायचा असतो हा प्रसंग याचे द्योतक आहे. पहाटेची वेळ. आमिना गाढ झोपली आहे, काबुलीवाला आपल्या लाडक्या मुलीजवळ येतो. आता त्याने घर सोडून हिंदुस्थानला जाण्याचा निर्णय पक्का केला आहे. दूरदेशी आपल्या मुलीची आठवण म्हणून तो एका कागदावर तिच्या चिमुकल्या हातांचे ठसे घेतो. काबुलीवालाच्या मनातील आर्त वेदना त्याच्या चेहऱ्यावर दिसत आहे. त्याला साथ आहे फक्त अल्लाची. दूरवर कुठूनतरी नमाजाचे स्वर ऐकू येत असतात. काबुलीवालाच्या मनात असणारे अल्लाचे अस्तिव आणि त्याच अल्लाचे निषाप रूप त्याची मुलगीहि समोर निजलेली आहे. आमिनाला हलकेशी जाग आली आहे असे बघून काबुलीवाला दूरवरूनच आपल्या मुलीला डोळेभरून बघतो आणि खोलीच्या बाहेर पडतो. त्याच्या हातात कुराण देऊन साश्रू नयनांनी त्याची आई त्याला निरोप देते. इतक्यात आमिना “बाबा बाबा” म्हणत झोपेतून जागी होते. काबुलीवाला तत्परतेने घराबाहेर पडतो. आता आपल्याला उंटावरून सवारी करत जाणारे प्रवासी आणि त्याचबरोबर वेगाने जाणारी रेल्वे दिसते. काबुलीवालाने घर सोडलेले असते. त्याच्या आयुष्याशी एक नवीन सफर सुरु झाली असते.

काबुलीवाला हिंदुस्थानात आल्यावर मिनीची आणि त्याची भेट होते. हिंदुस्थानात तो पूर्णपणे नवीन आहे, आणि या नवीन ठिकाणी त्याला मिनी भेटते आणि तिचा लळा त्याला लागतो. पण मिनीमधे तो आपली मुलगी बघून स्व:ताच्या मनाला दिलासा देत असतो. वास्तविक दोन प्रांत वेगळे, दोन घरे वेगळी, दोन्ही मुली वेगळ्या पण काबुलीवाला मात्र त्यांच्यात सर्वस्व विसरून एकरूप झालेला असतो. काबुलीवाल्याच्या मनाची हि अवस्था प्रेक्षकां पर्यत सादर करत असताना हेमेन गुप्ता यांनी गाण्याचा अप्रतिम वापर केला आहे. संध्याकाळची वेळ. काबुलीवाला मिनीला भेटून परत घरी चालला आहे, आणि रस्त्यात एक फकीर गाणे म्हणत आहे. काबुलीवाला त्याचे गाणे तल्लीन होऊन ऐकत आहे. “गंगा आये कहा से” . हे गीत काबुलीवालाच्या मनाची स्थिती व्यक्त करत असते. “दिवस आणि रात्र यात किती फरक असतो पण त्यांचातील भेद संध्याकाळ मिटवते त्याचप्रमाणे नाव काहीही असो, भाषा काहीही असो पण प्रेमाचे नेत्र उघडले कि सर्व काही एक आहे.” हेमंकुमार यांचे हे दर्दभरे गीत मन हेलावून टाकते.

चित्रपटातील मिनीच्या वाढदिवसाचा प्रसंग. खर म्हणजे वाढदिवसासारखा प्रसंग आनंददायी पण तो सुद्धा आपल्यला चटका लाऊन जातो. मुलांचे जेव्हा कार्यक्रम चालले असतात तेव्हा आपल्या मिनीला बघण्यासाठी काबुलीवाल्याची धडपड चाललेली असते. इकडे काबुलीवाला जेवढा मिनीला बघण्यासाठी उतावळा झाला आहे तेवढीच काबुलीवाला आपल्या वाढदिवसाला आला नाही म्हणून त्याच्या वाटणीचा खाऊ मिनी गुपचूप पणे बाजूला काढून ठेवते. दोघांचे एकमेकावर निरतिशय प्रेम असल्याचे द्योतक आहे.

वाढदिवसादिवशी काबुलीवाला आला नाही म्हणून मिनी त्याला शोधत जाते आणि पावसात भिजल्याने आजारी पडते. काबुलीवाल्याचे तिच्यावर इतके प्रेम आहे कि तो गेटच्या बाहेर बसून नमाज पडतो. मिनी बरी होते. पण आजारी मिनीला बघत असताना त्याला अमीनची आठवण येते. काबुलीवाल्याच्या मनाची उदास स्थिती “ ए मेरे प्यारे वतन” या गाण्यातून व्यक्त होते. काबुलीवाल्याला त्याचा प्रदेश घर सगळे आठवते. गाण्याचे शेवटचे कडवे तर मन हेलावून टाकते “ छोडकर तेरी जमीन को दूर आ पहुंचे हम, फिर भी हे यहि तमन्ना तेरे जरोकी कसम, हम जहा पेदा हुये उस जागाह हि निकले दम, ए मेरे प्यारे वतन” गाणे संपते आणि काबुलीवाला अधिकच अस्वस्थ होतो. आपल्या लहान मुलीच्या हातांच्या ठशाचा कागद बाहेर काढतो. आणि भावाकुल होतो.

या चित्रपटातील शेवटचा प्रसंग बलराज सहानी यांच्या अभिनयाचा कळस आहे असे म्हणावे लागेल एक दिवस काबुलीवाला कोर्टातून सुटतो, आणि मिनीला भेटायचे ठरवतो. जाताना तिच्यासाठी लाल बांगड्या घेण्याचे सुद्धा तो विसरत नाही. मिनीच्या घरावर रोषणाई आहे, वाजंत्री वाजत आहे, सर्वांची एकच धांदल चालू आहे. काबुलीवाला तिथे भेटायला जातो. त्या दिवशी मिनीचे लग्न असते आणि तिला घराबाहेर यायला परवानगी नसते. पण काबुलीवाल्याच्या भावना बघून तिचे वडील त्यांची भेट घडवून आणतात. दहा वर्षाचा काळ लोटला तरी काबुलीवाल्याच्या डोळ्यापुढे छोटी मिनी आहे. तो त्याच रुपात तिला बघू पाहत असतो. मोठी होऊन मिनी समोर आली तरी तिच्याकडे त्याचे लक्ष जात नाही. पण जेव्हा तो मोठ्या मिनिशी बोलू लागतो तेव्हा त्याच्या लक्षात येते मिनी त्याला ओळखतच नाही. काळाच्या ओघात ती त्याला विसरून गेली आहे. काबुलीवाला एकदम हताश होतो. हातातील कागद काढतो. आणि भावनावश होतो. काबुलीवाल्याने मुलीला भेटावे असे मिनीच्या बाबांना पण वाटत असते. पण त्याच्याकडे पैसे नसतात. बाबा रोषणाई आणि वाजंत्री साठी बाजूला ठेवलेले पैसे काबुलीवाल्ल्याला देतात. मिनी हातातील बांगडी देते. उपकाराच्या या ओझ्याने काबुलीवाला रडू लागतो आणि आशीर्वाद देत निघून जातो. वास्तविक पाहता, काबुलीवाला एक त्रयस्थ व्यक्ती. पण तरीसुद्धा मिनीचे वडील त्याला तो घरी जावा म्हणून आर्थिक मदत करतात. आणि मिनी त्याला हातातील कंगन देते. ज्या काबुलीवाल्याने तिला छोटी समजून बांगड्या आणलेल्या असतात ती काबुलीवाल्याच्या मुलीसाठी तिच्या हातातील कंगन देते. काळ पुढे गेला. मिनी आणि अमिना दोघीही मोठ्या झाल्या पण काबुलीवाल्याच्या भावनात मात्र काहीच फरक नाही. ही त्यागाची उच्चतम परिसीमा आहे आणि त्याचमुळे हा प्रसंग चटका लावून जातो

काबुलीवालाची दोन रूपे आहेत. एक मिनिशी जेव्हा तो बोलत असतो तेव्हा आणि दुसरे रूप त्याच्या हृधयात्त आहे जेव्हा त्याला घरची आठवण येत असते तेव्हा. मिनीला जेव्हा तो पहिल्यांदा भेटतो तेव्हा त्यात अमिनाला बघत असतो आणि मग प्रत्येक वेळी मिनीकडे आल्यावर त्याला मिनीचा लळा लागतो खरा पण त्याच्या आत मात्र अमिना आहे. जेव्हा शेवटच्या प्रसंगात मिनी त्याला ओळखत नाही तेव्हा त्याला वाटते आपली अमिना सुद्धा आता ओळखणार नाही आणि तो अधिक व्याकूळ होतो. काबुलीवालाच्या अंतरंगात असणारे हे दुसरे रूप खुलवणे कठीण होते, कारण तिथे अधिक न बोलता बोलायचे आहे. हे बोलणे कधी गाण्याच्या रुपात किंवा काही वेळा छोट्याशा प्रसंगातून त्यांनी व्यक्त केले आहे. मग “गंगा आये कहा से” या गीताचे सदरीकरण असो किंवा जेव्हा काबुलीवाला जेव्हा मिनीला भेटायला जातो तेव्हा सातत्याने दुडूदुडू धावत जाणाऱ्या मुली बघून त्याच्या मनाची होत असणारी चलबिचल असो. हे हेमेन गुप्ता यांचे श्रेय आहे.

गुलजार यांची गीते, सलीलदा यांचे संगीत आणि लेखक श्री विश्राम बेडेकर आणि एस खलील ही या चित्रपटाच्या यशामागे असणारी आणि काही मोठी नावे.

चित्रपट अस्वस्थ करतोच. पण चित्रपट संपल्यावर अस्वस्थता तशीच राहते. काबुलीवाला घरी गेला खरा पण त्याची अमिना त्याला ओळखेल का? त्याची आई जीवंत असेल का? त्याचा प्रांत दहा वर्षात किती बदलला असेल असे अनेक प्रश्न आपल्याही मनात येतात आणि मन दु:खी होते. आणि नंतर लक्षात येते कि मन दु:खी झाले, अस्वस्थ झाले हाच खरा सुखद अनुभव आहे. सुप्रसिद्ध इंग्लिश कवी शेले म्हणतात “ our sweetest songs are those which tell us our saddest thoughts “

सतीश पडळकर

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

छान लिहिलांय
पिक्चर पाहिला नाही, पण ए मेरे प्यारे वतन गाणं नेहमीच रडवून जातं.

तेरे दामन से जो आए, उन हवाओं को सलाम
चूम लूँ मैं उस ज़ुबाँ को, जिसपे आए तेरा नाम
सबसे प्यारी सुबह तेरी, सबसे रंगीं तेरी शाम
तुझपे दिल क़ुरबान

मन्ना डे - सुभानल्ला !!!!

हा चित्रपट बिमल रॉय नि डायरेक्त्त केलेला नाहीय हे माहित नव्हते.. छान लेख !!!

आज ७ मे ला हा लेख वाचला.
सुखद योगायोग, कारण आज रवींद्रनाथांचा वाढदिवस !
लेख उत्तम.

छान लिहिलांय
पिक्चर पाहिला नाही, पण ए मेरे प्यारे वतन गाणं नेहमीच रडवून जातं.
>>>> +१

मायबोलीवर स्वागत असो
लिहित रहा.

खूप छान लिहिलंय.
नेटफ्लिक्सवर स्टोरीज ऑफ रबीन्द्रनाथ टागोर मध्ये ही लघुकथा पाहिलीय.
चित्रपट सुद्धा बघेन आता.

मायबोलीवर स्वागत सतीश पडळकर.

हा चित्रपट जितक्या वेळा पाहिला तितक्या वेळा वाईट रडले आहे. त्यामुळे अगदी ठरवून हा सिनेमा बघणे कायमचे सोडून दिले आहे.