माझे काही 'पाक'धार्जिणे हितशत्रू !

Submitted by Charudutt Ramti... on 4 May, 2020 - 12:20

अलीकडच्या काळात माझ्या बऱ्याच फेसबुक फ्रेंड्सनी अपापल्या ‘सौं’ना स्वयंपाक घरात मदत करतानाचे इतके वेगवेगळे व्हिडिओज पोस्ट केले, की पहिला २१ दिवसांचा लॉकडाउन एक्सटेन्ड झाल्यावर, ह्या माझ्या हितशत्रूंच्या फेसबुक “वॉल्स” वरून माझ्यावर सततच्या होणाऱ्या 'कुकरी'वाल्या पोस्ट्सच्या माऱ्या मुळे इथे माझ्या घरच्या बालेकिल्ल्याची “तटबंदी” कोसळायची वेळ आली. माझा स्वयंपाक घरातील तटस्थपणा अलीकडील काळात गृह खात्याच्या डोळ्यावर येऊ लागला आणि मी “अश्या रीतीने तिऱ्हाईताची भूमिका वठवलेली फार काळ खपवून घेतली जाणार नाही” असं वारंवार बजावत, अंतःस्थ शक्तींचा माझ्यावरील नैतिक दबाव बरेच अंशी वाढू लागला.

मित्रांचे ‘कुकरी’ ह्या विषयावर इतके व्हिडिओज पोस्ट झालेत की ‘पाक’कलेत अजिबात गती नसलेल्या आणि ‘ कुकरी’ हे फक्त एक नेपाळी गोरखांनी वापरण्याचं एक धारदार शस्त्र असून त्यानं किरकोळ कांदे बटाटे नव्हेत तर चक्क एकमेकांचे गळे कापले जातात ! सध्या लॉकडाऊन मुळे घराबाहेर पडता येत नाहीये म्हणून, नाही तर ‘कुकरी’ ह्या विषया संदर्भात एवढीच जुजबी माहिती असलेल्या माझ्यासारख्या एखाद्या निष्पाप आणि पापभीरू (खरं तर नि’ष्पाक’ आणि ‘पाक’भिरु म्हणायला हवं ) सद्गृहास्ताच्या हातून, आमच्या घरातले वैवाहिक संबंध काहीही कारण नसताना तणावग्रस्त केले म्हणून, अश्या 'वाद'ग्रस्त पोस्ट सोशल मीडिया वर टाकणाऱ्या माझ्या अनेक मित्रांपैकी एखाद्या मित्राचा, माझ्याच हातून खून व्हायचा, तोही चक्क ‘कुकरी’ने.

जीवनात आलेलं फक्त एक ‘प्राक्तन’ समजून कुक्कुट संप्रदायातील मळवट भरलेल्या एखाद्या सतीसावित्रीने, भल्या पहाटे उठून तिच्या खुराड्यात निस्पृह पणे घातलेले ते विश्वरूपी ‘अंडे’. त्या अंड्यातील अत्यंत प्रवाही आणि चंचल असले तरी चरित्र मात्र अगदी स्वच्छ व पारदर्शी असलेलं असं ते वैशिष्ट्य पूर्ण एगव्हाईट! पण हेच प्रवाही व पारदर्शी एगव्हाईट गरम तव्यावर अवतरल्यावर मात्र क्षणार्धातच निर्लेप असं पांढरं शुभ्र धुतवस्त्रं परिधान करतं. पण तत्पूर्वी फुलपात्रात फेटायला घेतलेलं एग व्हाईट, आणि त्यामध्ये स्वछंदी पणे तरंगणाऱ्या फुलपात्रातल्या पिवळ्या धम्मक 'योक'वर, जीवनात सतत आपला ‘उग्र’वाद (सॉरी उग्र वास) उराशी जपणारा, तो चिमूटभर नवजीवन की बांधानी हिंग टाकायचा. तो हिंग त्या एकजिनसी द्रावणात विरघळतो न विरघळतो तोच, दुसऱ्याच क्षणी मग, अगम्य असे मलबारी ऊष्ण काष्ठ पदार्थ मिक्सर मध्ये फिरवून’ बनवलेला, खरं तर चवीला बऱ्यापैकी तिखट (आणि काही अंशी खारट सुद्धा) असणारा पण फक्त नावालाच मात्र ‘गोडा’ असलेला, तो 'गोडा'मसाला, टाकून ते द्रावण चांगलं फेटून संपृक्त करायचं. वर परत तिखट मीठ पण तेही फक्त चवीपुरतं. आणि ओट्यावरच चराचरा सुरी चालवत कापलेल्या मिरचीचे बारीक बारीक काप घालून निर्लेपच्या तव्यात ते संपृक्त द्रावण ऐसपैस पसरवून सकाळी सकाळी एक मस्त पैकी खमंग आम्लेट बनवायचं.

किंवा नाहीतर मग सरळ सकाळच्या वेळी स्वयंपाक घरात ओट्यावर कवडश्याच्या रूपाने पडणाऱ्या सोनचाफी उन्हात उभे राहून, सजल नयन कांदे कापून, आयुष्यभर फक्त मोहरीची 'तडतड' ऐकण्यात धन्यता मानणाऱ्या जर्मनच्या च्या कढईत, मेतकूट आणि कडीपत्ता घालून फोडणी देत केलेला शिळ्या भाताचा जीर्णोद्धार किंवा पुनरुत्थान! तोंडी लावायला बेडेकरांच्या लिंबाच्या लोणच्याची चरचरीत फोड असेल तर उत्तमच पण नसलीच तर 'सकाळ'चा अग्रलेख तोंडी लावायला पुरतो फोडणीच्या भाताबरोबर, (कारण तिखट मीठ आणि फोडणी घालण्याचं काम एकवेळ बल्लवाचार्यांना चांगलं नसेल जमत पण माध्यमांना उत्तमचं जमतं. असो! ) पण क्रिकेट व्यतिरिक्त ह्या पाश्चात्य आंग्ल संस्कृतीच्या गुलामगिरीचे प्रतीक असलेल्या ऑम्लेट आणि एकदम त्या विरुद्ध टोकाच्या मराठमोळ्या फोडणीच्या भाता पलीकडे माझं पाक कौशल्य कधी गेलंच नाही.

चौदा एप्रिल नंतरच्या मोदीजींच्या लॉकडाऊन वाढवण्याच्या उद्घोषणेनंतर परत एकदा घरातील संघटित शक्तींनी जोर धरला आणि दोनच दिवसानंतर म्हणजे सोळा एप्रिलच्या रात्रीच माझा हाती 'डाव' अजिबात न घेण्याचा 'डाव' हाणून पाडण्याचा कट माझ्याविरुद्ध स्वैपाकघरात 'शिजला' अशी अशी कुणकुण मला लागली. इकडे गनीम हा कावा करत असताना तिकडे फेसबुक वरील स्वतःची अर्धवट 'पाक'कला उधळणाऱ्या शत्रूच्या ना'पाक' हरकती मुलखात अजूनही धुमाकूळ घालतंच होत्या.

“आज मला जॅम कंटाळा आलाय, मी आज चुकून सुद्धा ओट्याकडे फिरकणार नाहीये!” सौ. नं रणशिंग फुंकलं!

“ हो, राहूदे , मी ब्रेड आणतो...मला ही जॅम कंटाळा आलाय तेच तेच खाऊन, जॅम ब्रेड खाऊ, फारतर मॅग्गी करू ! ” माझं हे वाक्य संपत न संपत तोच स्टोव्ह चा उडतो तसा नं तसा हिचा भडका उडाला.

“ कंटाळा आलाय का रोज ते-च ते-च खाऊन? बरं मग बघतेच आता मी ” - घरघुती हिंसाचारात जागतिक पातळीवर चौपटीहून अधिक वाढ! टी.व्ही.वर बाष्फळ बातम्या देणारा झी चोवीसतास वाला कडमडला मधेच ! मी रिमोटने पटकन चॅनेल चेंज केला.

" अगं , मला तसं म्हणायचं नव्हतं, कंटाळा आलाय म्हणजे, अगं भाज्यांच कुठंयत ताज्या, ह्या लॉक डाऊन च्या दिवसात , असं म्हण..." माझं वाक्य पूर्ण व्हायच्या आंत हिनं दाणणंकिंन माझ्या पुढ्यात ती मळत होती ती कणकेची परात आदळली. तो कणकेचा एवढा मोठा ‘गोळा’ पाहून मला आता खूप मानसिक बळ ‘गोळा’ करायला लागणार होत हे निश्चित, पुढील प्रसंगाला सामोरे जाण्याकरता.

“हे बघ, पण मी काय म्हणतो...आज आपण...”

“…मी अर्धी मळलेलीच आहे, तुम्ही उरलेली मळा, आणि कणिक मळून झाली की पटकन फ्रिज मधली मी काल निवडून ठेवलेली कुठलीतरी भाजी घ्या करायला. आज मी मेडिटेशन करायचं ठरवलंय ! मी जाते आत, मला डिस्टर्ब् करू नका अजिबात पुढचा किमान एक तासभर तरी…” एवढा संबंध परिच्छेद एका श्वासात म्हणून आमच्या सौ. तरातरा मुदपाक खान्यातुन गर्भगृहात रवाना झाल्या. 'ही' आता मेडिटेशन ह्या गोंडस नावाखाली अर्धापाऊण तास सरळ बसल्या बसल्या किंवा प्राणायाम च्या पोश्चर मध्ये सरळ आडवी होऊन, ऑफिशियली एक मस्त गाढ झोप काढू शकते. डिस्टर्ब करायची सोयच नाही कारण जाताना तशी धमकी देऊनच गेल्या होत्या सौ. बाहेर एवढं प्रचंड मोठं लॉक डाऊन सुरु असताना, परत पुन्हा स्वतःला एका खोली मध्ये 'लॉक' करून स्वतःत वास्तव्याला असलेल्या 'मी'पणा 'डाऊन' करण्याचा वगैरे मनस्वी प्रयत्न करणाऱ्या अध्यात्मिक व्यक्तींचा सध्या मला फार आदर आणि हेवा वाटतो आहे.

तिकडे एकीकडॆ सौ. नं तिच्या प्रापंचिक वेबसेरीज मधून अध्यात्मिक ब्रेक घेत सहजच 'चेंज' म्हणून स्वतःतल्या परमात्याचा 'शोध' घ्यायला सुरुवात केली आणि इकडे कणकेचा गोळा माझ्या वैवाहिक जीवनाची वाताहत होताना पाहत कुठल्यातरी अज्ञात अश्या स्वानंदात मुक्त पणे भिजत होता. त्या अर्धवट मळलेल्या कणकेच्या गोळ्याला, एखाद्या कुंभाराने मडकं घडवण्यापूर्वी चिकण माती चांगली मळावी त्या पद्धतीने मी “फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार विठ्ठला, तू वेडा कुंभार” न कळत हे गाणं गुणगुणत साधारण पुढील वीसेक मिनिटे मळत बसलो. पण वीस मिनिटं झाली तरी, एकदा कणिक सैल झाली म्हणून ती घट्ट होण्याकरिता गव्हाचं पीठ, आणि परत जास्त घट्ट झाली म्हणून ती कणिक सैल व्हावी म्हणून घातलेलं आमच्या खडकवासला धरणातून स्वैर वाहणाऱ्या मुठेचं पाणी! तसेच आज जीवांचं सुद्धा काहीही झाले तरी चालेल पण ह्या दोन्हीचं म्हणावं तसं प्रमाण जुळवूंन अणणारंच ही दुर्दम्य 'इच्छाशक्ती' - ह्या तिन्ही जीवनावश्यक वस्तूंच्या जोरावर मी माझ्या हितशत्रूंच्या ना'पाक' हरकतींवर विजय मिळवण्यास निघालो होतो.

पस्तीस एक मिनिटं उलटून गेल्यावर मला समजलं की कणिक सैल किंवा घट्ट असणं हे तितकं महत्वाचं नाहीये! महत्वाचं आहे ती कणिक नीटस पणे पोळपाटावर लाटणं.

त्यामुळे अर्धी कणिक 'सैल' आणि अर्धी कणिक जरा 'घट्ट' अश्या संभ्रमावस्थेतील तो गोळा मी सरळ आता पोळपाटावर लाटायला घेतला. पण तो घेण्यापूर्वी त्या गोळ्याचे साधारण तळहातावर पिंगपॉंग (टेबल टेनिस) च्या बॉल च्या आकाराचे छोटे छोटे गोळे करायला मी विसरलो नाही. पण ते तसे गोळे करताना माझ्या एक गोष्ट मात्र चांगली लक्षात आली. आपण कणकेचा 'सैल'पणा आणि 'घट्ट'पणा जोपासण्याच्या नादात खूपच जास्त पीठ मिसळलंय आणि त्यामुळे कणिक आता पूर्वी होती त्यापेक्षा साधारण दुपटीपेक्षा जास्त झालीय आकारानं. 'अंदाज अपना अपना' च्यूक्या वाटतं, अशी शंकेची पाल मनात चुकचुकतं असतानाच, कणिक 'सैल' तर 'सैल', पुढे तर जाऊ... असं स्वतः ला सांगत मन 'घट्ट' केलं, आणि तसेच दोन तळहातांच्या मधोमध कणिक धरून तिचे गोळे करत राहिलो, पुढचे साधारण पंधरा एक मिनिटं.

एकंदर गोळ्यांची संख्या पाहता माझा अंदाज चुकला हे सांगायला कोणत्याही भविष्यवेत्याची गरज नव्हती. मी मोजले तर चक्क चोपन्न गोळे झाले होते. आता मी पाच मिनिटं तसांच थांबलो. गोळे तब्बल चोपन्न आहेत ह्याचे दोन अर्थ होतात १) कणिक फारच जास्त झाली, किंवा २) गोळे फारंच छोटे झाले. खाणारी तोंड अवघी तीन, त्यातली एक कार्टी! एक पोळी दुधात कुस्करून जरी दिली तरी निम्मी टाकून देते "बाबू तू खाच्छील का रे ? माझी टंमी भरली " असं म्हणत आणि तोंड वाकडं करत. मग तिला ते कार्टून चे चॅनेल लावून द्यावे लागतात. मग ती उरलेली कुस्करलेली पोळी "छोटा भीमचे" पुढचे पंधरा पंधरा मिनिटांचे तीन एपिसोड होईल अश्या हिशेबाने पुरवून पुरवून खाते.

मी, प्रसंगाचं गांभीर्य ओळखून घायला कधीच अपुरा पडत नाही. पुढे येणारा प्रसंग निश्चितंच सोपा नाहीये, हे न कळण्या एवढा दूध खुळा मी नक्कीच नाही.

मी घड्याळाकडे पाहिलं. हिनं मेडिटेशन सुरु करून साधारण पस्तीस ते चाळीस मिनिटं झाली होती. म्हणजे माझ्याकडे अजून साधारण हाताशी पंचवीस ते तीस मिनिटं होती. मी पटापट चोपन्न गोळ्याचे तीन सामान भाग केले. अठरा त्रिक चोपन्न. एका हिश्यात साधारण अठरा गोळे आले. मग मी अठरा चा एक लॉट लॉटायला सॉरी लाटायला घेतला. अर्थात आपण लाटलेल्या पोळ्या 'गोल' व्हाव्यात असल्या क्षुद्र अपेक्षा मी कधीच ठेवल्या नव्हत्या. पण तव्याचं सरासरी तापमान, पोळी लाटण्यासाठी लागणारा एकंदर अवधी, लाटलेल्या पोळीची पोळपाटावरून तव्यावर कराव्या लागणाऱ्या स्थलांतराच्या वेळी होणारी पोळीची ससेहोलपट आणि माझी त्रेधा तिरपीट! आणि पोळी एका बाजूने करपलेली पण दुसऱ्या बाजूने कच्ची असताना गॅस मंद आचेवर ठेवायचा की बर्नर पूर्ण भरभरत मोठा ठेवायचा, ह्याविषयीची माझ्या मनाची अनिर्णित अवस्था..!

पहिल्या पांच पोळ्यांना 'पोळ्या' म्हणणं धाडसाचं ठरलं असतं. 'फुलके' म्हणणं फारच उत्तशृंकल पणाचं वाटलं असतं आणि 'रोटी' वगैरे म्हणणं म्हणजे फारंच फिल्मी! आधीच्या पाच पोळ्यांच्या एकंदर अनुभवावरून, पुढच्या पाच पोळ्या लाटायला घेण्या पूर्वी मी एकंदरीतच डकवर्थ लुईस लावायचं ठरवलं. अमेरिकेने चायना मधून आलेली औषधं आणि टेस्टिंग ची किट्स जशी निकृष्ट दर्जाची आहेत म्हणून बाद ठरवली, तशीच मी सुद्धा ही कणिक पोळ्या करण्यासाठी निकृष्ट दर्जाची असावी, तेव्हा पटापट पुऱ्या करू आणि त्या तळून रिकामे होऊ! सौ. तिचे मेडिटेशन संपवून बाहेर यायच्या आत, असं पुटपुटत मी पटकन कढईत तेल ओतायला घेतलं, गोड्या तेलाच्या कावळ्यातून. तेल साठवून ठेवतात तो 'कावळा' आणि तेल पेटवून दिवा लावतात ती 'चिमणी' ! संबंध आयुष्य आपल्या अस्तित्वानं जिथं सांडेल तिथे फक्त तामसी तवंग आणणाऱ्या तेलासारख्या पदार्था बरोबर कंठणाऱ्या दोन वस्तुंना 'चिमणी' आणि 'कावळा' ह्या सारख्या दोन निष्पाप पक्षांची नावं का दिली? हे मला एक न सुटलेलं कोडं आहे.

पाचेक मिनिटांनी कढई तापली तसं त्या कढईतलं तेल ही. मी पटापटा परत पोळ्या लाटून आता मात्र त्या लाटलेल्या कणकेत 'वाटी'नं एकमेकांच्या जवळ अगदी दाटी'वाटी'नं वर्तुळं आखू लागलो. कणकेत "मला तिखटा मिठाच्या पुऱ्याच करायच्या होत्या असं भासवाण्या साठी, थोडं तिखट आणि मीठ मात्र न चुकता मिसळलं. मात्र परप्रांतीय विस्थापित झालेल्या प्रदेशात जितपत मिसळतात 'तेव्हढे'च ते 'तिखट-मीठ' मूळ कणकेच्या गोळ्यात मिसळले. प्रयत्न करूनही एकजीव झाले नाहीत. मीही होईल जरा "आच" लागली की एकजीव असं म्हणत नाद सोडून दिला. मी एखादया पाणीपुरी च्या गाड्यावर कामाला असून दर पुरी मागे पन्नास पैसे मिळणार असल्यासारखा पुढची बारा पंधरा मिनिटं मी वेड्यासारखा फक्त एका मागून एक अश्या फक्त पुऱ्याच तळंत होतो. एका पोळपाटात साधारण आठ पुऱ्या मावत होत्या. पण नंतर स्पर्धेची वेळ संपत आल्यावर कसे खेळाडू त्यांचा वेग वाढवत पटापट चेंडू वगैरे फेकतात तसं मी जरा वेग वाढवण्यासाठी म्हणून आता मोठ्या आकाराची वाटी घेतली, आता पोळपाटावर आठ ऐवजी पाचंच पुऱ्या मावल्यामुळे माझा वेग चांगला दुपटी एवढा वाढला, पण वाटी बदलल्यामुळे झालं असं की मी पाणीपुरी च्या गाड्यावरचा कामगार न राहता आता कचोरी च्या गाडीवरचा कामगार वाटू लागलो स्वतःला - कारण वाटीचा आकार अचानक वाढला होता. पण 'सबाहय अभ्यंतरीं तू एक दत्त' असं म्हणत बाह्य आकारा पेक्षा अंतर्मनातील जाणिवांना मी प्राधान्य देत गेलो.

पण एवढ्यात आतून एकदम खांब फोडून हिरण्यकश्यपू बाहेर यावा तशी ही जवळ जवळ दरवाजा तोडून बाहेर आली. मी हिच्या अश्या अचानक 'ध्यान धारणा तोडून बाहेर येण्यामुळे दचकून गेलो, हातातला झारा हातातच स्थिर झाला, आणि मी डोळे विस्फारून हिच्याकडे पाहतच उभा राहिलो. ती सुद्धा साक्षात 'परमेश्वराचं' दर्शन झाल्यावर कसे पाहिलं तशी माझ्याकडे पुढचे वीसेक सेकंद पाहत राहिली.

" अहो , किती धूर कोंडलाय ? जरा खिडक्या उघडा पटापटा ... ! "

“ जरा जप करत देवा देवा म्हणत मी अर्धा तास बसावं म्हंटल, तर आत पर्यंत धूर सगळा दाराच्या फटीतून.” - पाणीपुरीच्या गाड्यावर अन्न व भेसळ विरोधी प्रशासनाच्या स्कॉड नं अचानक धाड टाकल्यावर पाणीपुरी वाल्याची अवस्था कशी होईल? तशी झाली माझी अवस्था .

मी भानावर येऊन पटकन आजूबाजूला पाहिलं. खरंच सगळ्या स्वयंपाक खोली भर धूर कोंडला होता.

“ मला कसा काय नाही बुवा जाणवला , एवढा धूर होई पर्यंत ? ”, मी स्वतःशीच पुटपुटलो. कदाचित प्रदूषणाची एवढी सवय असावी पुण्यात रस्त्यांवरून फिरताना मला, की अवती भवती धूर झाल्यामुळे 'अस्वस्थ' वाटण्या ऐवजी 'आश्वस्त' वाटू लागलं असेल कदाचित. कुणास ठाऊक. मंदिराच्या गाभाऱ्यात धुपारी देतात आणि धूर आणि सुवास एकत्र येतो, तसा आमच्या स्वयंपाक घरात आमच्या अध्यात्माचा धूर कमी होता म्हणून की काय? ह्या सगळ्या भानगडीत कढईतल्या पाच पुऱ्या जवळ जवळ जळून अक्षरश: खाक होण्याच्या परिस्थितीत होत्या आणि त्यां पुऱ्यांच्या करपलेल्या गोडं तेलाचा वास आता क्लायमॅक्स साठी सुरु झाला होता.

“ अहो गॅस बंद करा आधी! ” – आमची सौ. दामिनी कडाडली माझ्यावर, वळवाच्या पावसापूर्वी वीज कडाडावी तशी.

"काय करावं ह्या माणसाला ?" असं म्हणत हिनं पदर खोचला कमरेला आणि पटापटा चार्ज घेत, गॅस बंद केला, करपलेल्या पुऱ्या कम कचोऱ्या कढईतून पटकन खाली चाळणीत घेतल्या, स्वयंपाक घरातला एक्झॉस्ट फॅन सुरु केला, दार खिडक्या उघडल्या...!

पाचेक मिनिटांनी स्वयंपाक घरातला धूर कमी होऊन माझा प्रवास "तिमिरातुनी...तेजाकडे" सुरु झाला, पण हिच्या चांगल्या तासा सव्वा तासाच्या ध्यानधारणे मध्ये मी केलेल्या धुरामुळे आणि त्यायोगे आणलेल्या व्यत्ययामुळे, हिच्या चेहऱ्यावर जे तेज आले होते त्या तेजाची तुलना फक्त कणसे भाजतात त्या शेगडीतल्या कोळश्याच्या निखाऱ्याशीच होऊ शकते.

मी पुढील पाच सहा मिनिटं फक्त, चाळणीतल्या दोन वेगवेगळ्या बांधा आणि शरीर यष्टी असलेल्या साधारण पंचवीस तीस पुऱ्यांकडे आणि त्या पुऱ्यांच्या शेजारी एकाच कुटुंबातील पाच अमीबांची ची वेगवेगळी पोर्ट्रेट्स शोभतील अश्या कोणतातरी आकार असलेल्या पाच पोळ्यांकडे पाहत सुळावर निघालेल्या घोर 'अपराध्या' सारखा उभा होतो. सुळावरची पोळी ही म्हण कशावरून पडली असेल ते मला अत्ता ह्या क्षणी समजलं.

चोपन्न पैकी फक्त अठरा गोळ्यांचाच प्रश्न मिटला होता, अजून छत्तीस गोळे बाकी होते, पोटात आलेला सदतिसावा, तो मी हिशेबात जाणून बुजून मोजलाच नाही !

आमच्या वैवाहिक जीवनात ह्या लॉक डाउनच्या दिवसात ताण तणाव निर्माण झाले ते निव्वळ अश्या, माझ्या काही फाजील मित्रांच्या ‘पाक’धार्जिणे पणामुळे!

चारुदत्त रामतीर्थकर
५ मे २०२०, पुणे

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Rofl डोळ्यासमोर चित्र उभे राहिले वाचून.
नशीब मी वाचलोय या तिसर्या पर्वापर्यंत. पुढे काय होणार हे भगवंतालाच माहिती.

Lol

आताच शिकायला लागा. आणि छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मदत करायला लागा म्हणजे एकदम मोठा स्फोट होणार नाही Wink

छान Happy

वेळोवेळी बायकोच्या स्वयंपाकाची तारीफ करा, कदर करा आणि या संकटातून वाचा.

आमच्याकडे माझ्या वाट्याला स्वयंपाकघर आले नाहीये किंवा चहा कॉफी सूप ताक मॅगी लस्सी टोस्ट आणि हाल्फफ्राय ईत्यादी मोजक्याच मला जमणारया आणि करायला आवडणारया गोष्टी सवड मिळेल तसे करणे चालू असते.

लॉकडाऊन संपल्यावर काय कराल माहीत नाही. पण चालू असेपर्यंत तरी असिस्टंट शेफ / मदतनिसाची भूमिका मनापासून करा. आपोआप चुका कमी होतील. आणि मिसेस रामतीर्थकर खुश होतील.

बाकी लेख खुसखुशीत.
ते टम्मी भरलेली कार्टी अगदी रिलेट करू शकले Happy
घरोघरी छोटा भीमच्या चुली Proud

....तेलासारख्या पदार्था बरोबर कंठणाऱ्या दोन वस्तुंना 'चिमणी' आणि 'कावळा' ह्या सारख्या दोन निष्पाप पक्षांची नावं का दिली?....

हे थोरय Happy

लेख आवडला

@राजसी >>> निदान ओटा पुसून घेऊन भांडी तरी घासत होतात का!? काळजी वाटली सौ. दामिनी ची . <<<

हो , कौशल्य नसलेली ( किंवा तुलनेनी कमी कौशल्य लागणारी ) बरीच कामं मी करत होतो/आहे. पण काचेच्च्या गोट्या खेळणाऱ्या माणसाला, कॅरम बोर्ड वरती नाही तर चक्क बिलियर्ड्स खेळायला सांगितलं तर जशी गत होईल, ..तशी झाली कारण भांडी घासणं आणि ओटा पुसणं ह्या तुलनेनं पोळ्या करण्यासाठी लागणारं कौशल्य खुपचं कमी आहे, पोळ्या करायची वेळ आली तेंव्हा.
( असं माझं प्राजंळ मत, कदाचित चुकीचं सुद्धा असू शकेल ).
एखादं कुठलं काम दुसऱ्या कामापेक्षा कमी असतं असं नाही पण कौशल्य मात्र वेगवेगळं लागतं, प्रत्येक कामाकरता.

@पियू >>> लॉकडाऊन संपल्यावर काय कराल माहीत नाही. पण चालू असेपर्यंत तरी असिस्टंट शेफ / मदतनिसाची भूमिका मनापासून करा. आपोआप चुका कमी होतील. आणि मिसेस रामतीर्थकर खुश होतील.<<<

नक्की...निवडून देणे , खवणणे, चिरणे, वाटून देणे ( हल्ली मिक्सरुन देणे ), भाजून अथवा परतून देणे, मिसळून अथवा विसळून देणे, तापवून देणे, हात फिरवणे, उलथवून टाकणे, शिट्या मोजणे, गॅस लहान असल्यास मोठा आणि मोठा असल्यास लहान किंवा बंद करणे, किंवा मायक्रोवेव मधून 'ओव्हू'न देणे अशी कामे करतंच असतो, पण जगताप मळ्यातल्या विहिरीत पोहणे आणि इंग्लिश खाडी पोहणे ह्यात फरक आहेच. पोळ्या करणं म्हणजे डायरेक्ट विहिरीतून इंग्लिश खाडी!

@ऋन्मेष >>> वेळोवेळी बायकोच्या स्वयंपाकाची तारीफ करा, कदर करा आणि या संकटातून वाचा.<<< हो अश्या क्लुप्त्या अजून असतील तर लिहा... एक मेका करू साहाय्य अवघे धरू सुपंथ ।

बाकीसर्वांचे लेख आवडल्याचे अभिप्राय नोंदवल्याबद्दल आभार !

हो , कौशल्य नसलेली ( किंवा तुलनेनी कमी कौशल्य लागणारी ) बरीच कामं मी करत होतो/आहे. ---छान, मग मॅडमचा मूड off असणार किंवा फारच लागट बोललं गेलं असणार; त्याशिवाय पोळ्यांचं काम अंगावर पडणार नाही.

मदत करत होतात कळल्यावर आता मजा आली वाचायला:)

लेख विनोदी म्हणून वाचला.छाने.
अमिबा असल्या तरी चव येणं महत्वाचं.
"खमंग खरपूस चव असेल, तर अमिबापोळीला पण अर्थ आहे...
नुसताच कच्चट गोळा दिसेल, तर कंपासने काढलेला गोलही व्यर्थ आहे.."

आहे त्या परिस्थिती त आनंदाने राहायला लष्करात शिकलो.

त्यामुळे घरात काहीही स्वयंपाक न येता ही माझं व्यवस्थित चालू आहे.

मला जेवायला काहीही चालतं मग रव्याचे दोन लाडू किंवा फरसाण किंवा बाकरवडी सुद्धा.

काहीच नसलं तर 2 केळी किंवा 2 आंबे खाऊन मी माझे पोट भरू शकतो.

बायकोला असलं काही चालत नाही तिला साग्रसंगीत सगळं लागतं.त्यामुळे स्वयंपाक करणं आलं.

बाकी कणिक मळून पोळ्या करणं किंवा पुऱ्या करणं हे एवढं काही कठीण नाही हे मी एक दिवस करून सिद्ध केलंय.

बाकी कणिक मळून पोळ्या करणं किंवा पुऱ्या करणं हे एवढं काही कठीण नाही हे मी एक दिवस करून सिद्ध केलंय.
>>>>

तेच तेच रोज करणे कठिण असते Happy

एखाद दुसरे वर्ष केलेत तर समजेल Happy