प्रेरणास्थळ - हुस्सैनीवाला

Submitted by MazeMan on 30 April, 2020 - 17:01

भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासातील तीन धगधगती स्फुल्लिंगे - भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव
इंग्रजांच्या जुलमी सत्तेविरुद्ध त्यांचा लढा आणि त्यांचे प्राणार्पण त्यांना अजरामर करुन गेले आहे.

त्यांना मिळालेली शिक्षा ऐकून सगळा भारत पेटून उठला होता त्यावेऴी. ज्या लाहोर शहरात (कोट लखपत तुरुगांत) ते कैद होते, तिथे तर उठावाची चिन्हे दिसत होती. आणि त्या धास्तीनेच एक दिवस आधीच त्यांना फाशी देण्यात आली. कुटुंबियांनाही याची कल्पना दिली नव्हती. आपल्याला सांगण्यात आले की रात्रीच्या अंधारात एका नदीकाठी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

पार्थिवाला नातेवाईक किंवा मित्रांच्या अनुपस्थितीत, कुठलेही संस्कार न करता अग्नीच्या स्वाधीन करण्याला आणि लोकांना सुगावा लागला असावा अशी शंका आल्यावर अर्धवट जळालेली शवे नदीत सोडण्याला कोणत्या देशात अंत्यसंस्कार म्हणतात माहिती नाही. पण आपण भारतीय तर विटंबनाच म्हणू याला. अर्थात हुतात्म्यांना अवडंबराची काय गरज? अग्नीच पावन झाला असेल त्यांच्या स्पर्शाने.

तर हुतात्म्यांच्या रक्ताच्या सिंचनाने पावन झालेली ही भूमी आहे हुस्सैनीवाला. सतलज नदीच्या किनारी. बर्याच लोकांना वाटते की फाशी तर लाहोरमध्ये दिली, मग ही जागाही तिथेच कुठेतरी असेल, म्हणजेच आजच्या पाकीस्तानात. हो. फ़ाळणीत हुस्सैनीवाला पाकिस्तानच्या वाट्याला आले होते.

काही वर्षांनी भारत आणि पाकिस्तानमधे गावांची अदलाबदल झाली. त्यात फ़ाजिल्का जिल्ह्यातील १२ गावे  पाकिस्तानला दिली गेली.या जागेचे ऐतिहासिक महत्व जाणून हुस्सैनीवालाला भारतात समाविष्ट करण्यात आले. तत्कालीन संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाणांनी समाधीस्थळाची पायाभरणी केली.

भगतसिंग यांच्या फाशीच्या वेळेस, त्यांचे एक सहकारी बटुकेश्वर दत्त कैदेत होते. आपल्याला मित्रांसोबत फ़ाशी झाली नाही याचे त्यांना दुःख्ख झाले होते. स्वातंत्र्योत्तर काळात त्यांचे दिल्लीत निधन झाले. त्यांची मित्रांसोबत चिरविश्रांती घेण्याची इच्छा होती. त्यानुसार त्यांचे अंतिम संस्कार हुस्सैनीवालाला करण्यात आले. तिथे त्यांचीही समाधी उभारली गेली.

ऑफिशिअल एक्स्चेंजमधे जरी हुस्सैनीवाला भारतात सामिल करण्यात आले होते तरीही वारंवार येथे आक्रमणे होत राहीली. आजही तिथे तुम्हाला दिसेल कैसर-ए-हिंद टॉवर. तोफगोळ्यांच्या वर्षावात "मोडेन पण वाकणार नाही"चा बाणा सार्थ ठरवत आपल्या सैनिकांच्या अतुलनिय शौर्याची गाथा सांगणारा हा टॉवर साक्ष देइल त्या हल्ल्यांची. १९५६ मधे जे के रायफल्स, १९६५ मधे सेकंड मराठा लाइट इन्फ्रंट्री, १९७१ मधे १५ पंजाब डी कंपनी फॉर हुस्सैनीवालाने प्राणपणाने हुस्सैनीवाला झुंजवले. १९७१ मधल्या लढाईत समाधीस्थळ नेस्तनाबुत झाले होते. १९७३ मधे त्याचे पुनःनिर्माण करण्यात आले. आता त्याचे नाव आहे प्रेरणास्थळ.

समाधीस्थळाकडे जाताना आपण नदी पार करतो. त्या पुलाची एक बाजू १०-१५ फुट उंचीचे लोखंडी पत्रे लावून बंद केली आहे. थोडं विचित्रच वाटतं. या निर्मनुष्य प्रदेशात सा़उंड बॅरीअर्स कशाला असाही विचार येतो मनात. मग लक्षात येतं अरे पलीकडे तर पाकीस्तान आहे.

एकेकाळी पाकीस्तानच्या ताब्यात असलेलं हुस्सैनीवाला आज एक बॉर्डर पोस्ट आहे. आता इथुन बॉर्डर क्रॉसिंग बंद केले असले तरी दररोज येथे फ्लॅग रीट्रीट सेरेमनी होतो. वाघा बॉर्डरवर जसा जयघोष होतो आपापल्या देशाचा, तेवढ्याच उत्साहात इथेही घोषणा होतात. अर्थात वाघालाही होत नाही अशी एक घोषणा इथे मात्र गर्जत असते "इन्कलाब ज़िदाबाद". ती मात्र समोरुन होत नाही. एवढा दैदिप्यमान वारसा नाकारायला धाडस तरी लागतं किंवा कर्मदरिद्रीपणा. इथे दुसरी शक्यता जास्त. असो.

पर्यटक अम्रुतसरला जातात, त्यातले बहुतेकजण वाघा बॉर्डरला जातात. अम्रुतसरपासुन साधारण ३ तासांच्या अंतरावर  फिरोजपुर जिल्ह्यात आहे हुस्सैनीवाला. हे आहे उत्तर रेल्वेचे शेवटचे टोक, जिथे वर्षात एकदाच रेल्वे चालवली जाते. २३ मार्चला, हुतात्म्यांना अभिवंदन करण्यासाठी.

तुम्ही कधी अम्रुतसरला गेलात तर हुस्सैनीवालाला जरुर जा. 
भगतसिंग, राजगुरु, सुखदेव, बटुकेश्वर दत्त यांच्या समाधीवर डोकं टेकवण्यासाठी.
नाही तर किमान त्यांना सांगण्यासाठी की स्वतंत्र भारताचे त्यांचे स्वप्न जे आज आपण जगतोय, त्यांच्या जिवावर.

========================================================

हुस्सैनीवाला मधील एक स्म्रुतीशीला.

The land where national martyrs rest,
The land where inspiration resides,
The ground where emotions of patriotism and sacrifice are born,
The ground...which we held beyond our breath,
The ground....which we nurtured with our blood,
To hold that ground till death and beyond,
So was the inspiration by you Bhagat Singh
That we still lie here..... by your side
Even in the afterlife.

— Martyred Indian Soldier

==========================================================

वि. सु. : हा लेख माझ्या वैयक्तिक ब्लॉगवर हिंदीमधे पुर्वप्रकाशित झाला आहे.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

ही माहिती माझ्यासाठी आजवर अज्ञात होती. धन्यवाद.

कधी तिकडे गेलेच तर वाघाला जाईन का माहीत नाही पण हुसैनीवालाला मात्र नक्की जाईन.

आम्ही सहलीला जात होतो तेव्हा भगतसिंगांच्या मुळ गावी त्यांची समाधी आहे असं समजलं होतं आणि तिकडे जायची इच्छा होती. अम्रुतसरला गेल्यावर इथे भगतसिंग यांची समाधी आहे असं कळलं. पण या जागेचं महत्त्व काय आहे हे तिथे पोहोचल्यावर समजलं.

आम्ही ज्या गाडीने हुस्सैनीवालाला गेलो होतो, त्याचे चालक एक स्थानिक सरदारजी होते. त्यांनाही हुस्सैनीवाला माहिती नव्हते. परत आल्यावर बर्याच लोकांशी हुस्सैनीवाला विषयी बोलणं झालं. त्यांना ही जागा माहीत नव्हती. मग विचार केला की ही माहीती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. म्हणून आधी फेबु पोस्ट व नंतर ब्लॉग लिहीला.

लेख आवडला. एका अज्ञात प्रेरणास्थळाबद्दल कळले. तुमचे खूप आभार. फोटो असल्यास लेखाला जोडावेत. आम्हाला ही मनात प्रणाम करता येतील.

लेख आवडला. एका अज्ञात प्रेरणास्थळाबद्दल कळले. तुमचे खूप आभार. फोटो असल्यास लेखाला जोडावेत. आम्हाला ही मनात प्रणाम करता येतील.>>>>+ १

फोटोसाठी धन्यवाद . वरचा पुतळ्याचा फोटो पाहून रोमांच/ goosebumps आले.
सुखदेव, भगतसिंग , बटुकेश्वर दत्त व राजगुरू या हुतात्म्यांना कोटी कोटी प्रणाम _/\_ .

वाघा बॉर्डर एवढी प्रसिद्धी हुसेनीवाला बॉर्डर ला मिळालेली नाही अजून. पण आवर्जून भेट द्यावी असेच ठिकाण आहे.
२००२-०३ आम्ही फिरोझपूरला होतो तेव्हा २-३ वेळा जाणं झालं होतं.
तेव्हा बॉर्डर वर कुंपण वगैरे काही नव्हते. फक्त एक पांढरा पट्टा आखलेला होता. पलीकडे पाकिस्तान, अलिकडे भारत. चूकून पाऊल वाकडं पडलं तर पाकिस्तानात रवानगी. Wink फार मजा वाटली होती तेव्हा. आता तिथेपण वाघा बॉर्डर सारखी परेड होते असे ऐकले आहे. गेले पाहिजे एकदा.
स्मारक खरंच खूप सुरेख आहे. त्या वेळी सुद्धा खूप छान मेन्टेन केलेले होते.

साधना, वाघा बॉर्डर परेडपण आता ओवरहाइप्ड झाली आहे. पूर्वी एवढा शोशा नसायचा. गर्दी पण नसायची, त्यामुळे तो समारंभ नीट बघायला मिळायचा. आता बरीच गर्दी असते असे ऐकले आहे.

खूपच छान माहिती दिलीत. फोटो टाकल्याबद्दल विशेष आभार!
आयुष्यात एकदा तरी नक्कीच जाणार या स्थळी.

आज २३ मार्च - शहीद दिन.
त्या निमीत्ताने काहीश्या अपरीचित परंतु भारतिय इतिहासातील एक महत्वाचे स्थळ असलेल्या हुस्सैनीवालाची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी लेख वर काढतेय.

गेल्या वर्षातील एका बहूचर्चित वादग्रस्त घटनेमुळे आता हुस्सैनीवाला नाव बहुतेकांना माहिती झालेय. पण त्याचं खरं महत्व काय हे कित्येकांना अजूनही माहित नसेल. म्हणून हा बाफ पुन्हा एकदा वर काढते आहे.
स्वतःची रिक्षा फिरवतेय असंही काहींना वाटेल. पण उद्देश तो नाही.

MazeMan, तुम्ही ही माहिती एका लेखाच्या रूपात सकाळ , म टा इ. मधे प्रसिद्ध करा. ही खूप लोकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे.