तुम अपना रंज-ओ-ग़म, अपनी परेशानी मुझे दे दो

Submitted by किंकर on 27 April, 2020 - 19:02

खरतर पियानो आणि हिंदी सिनेमा यांचे नाते बरेच जुने . विशेषतः ती हैसियत का काय जेंव्हा दाखवणे अतिशय जरुरीचे असते तेंव्हा एकवेळ नायक बी ए पास नसला तरी चालेल किंवा त्याच्या साठी गाजर का हलवा पण नको पण श्रीमंती थाटाचे प्रतीक म्हणून पियानो हवाच.

तसा याही चित्रपटात पियानो आहे पण तो खानदानी घरात नाही तर क्लब मध्ये आणि त्याचा वापर नायक किंवा नायिका यांच्या पैकी कोणी नाही तर चक्क सहनायिकेने केला आहे . कथा साधीच प्रेम झाले लग्न झाले मग अडचण कसली तर लग्न सासूच्या मनाविरुद्ध . मंगळीक असणारी ( हे खानदानी घराण्याच्या गुरुजींनी सांगितलेले ) सून म्हणून नाराजी.

मग व्यवसायात जुन्या जाणत्या लोकांनी केलेली फसवणूक , घरात अशांती मग काय आता हि सारी दुःख बुडवायला नायक क्लब मध्ये येऊन एकटाच ढोसत बसलाय आणि त्याच वेळी तिथे त्याची बालपणीची मैत्रीण ( जिला आपले लग्न नायकाशी व्हावे असे वाटत असत पण झालेले नसत ) तिथे अचानक (अवतरते ) येते.

मग अरे ,"असा का बरे स्वतःचा सर्वनाश करून घेतो आहेस ?" असं काकुळतीने विचारते . नायक आपल्या दुःखाचे मीटर किती हाय आहे हे सांगण्यासाठी प्रथम पेग भरतो आणि मी काय सांगू असे म्हणत मग काहीतरी बोलतो .

आणि त्यानंतर आपला म्हणजेच प्रेक्षकांचा ताबा खय्याम यांचे संगीत , त्याची पत्नी जगजीत कौर यांचा स्वर आणि शब्द रचना साहिर या त्रयींकडून घेतला जातो.
या गाण्याचे सादरीकरण देखील इतके सुंदर केले आहे कि , सर्वसाधारण कथानक आणि दुःख व्यक्त करण्याचा पारंपरिक पद्धतीनुसार नायक त्याचे दुःख शब्दशः रिचवत असूनही कॅमेरा प्रथम (निवेदिता )सहानायिकेच्या नाजूक बोटांच्या वर येत पियानो वादनातील सहजता दाखवतो आणि तिथून थेट नायकाला प्रथम पाठमोरे दाखवत गीत सुरु होते.

अर्थात त्याला कारण आहे साहिर..... सहनायिकेचे मनोगत मांडताना ती गीतांमधून नायकास विनंती करते ती खूप वेगळी आहे, तिच्या प्रेमाची जाणीव नायकास देताना ती म्हणते -,

तुम अपना रंज-ओ-ग़म, अपनी परेशानी मुझे दे दो
तुम्हे ग़म की कसम इस दिल की वीरानी मुझे दे दो ....

जसे जसे सहानायिका आपले मनोगत मांडत जाते तसे गीतातील जीवघेणी विनंती आपले लक्ष वेधून घेते.

याठिकाणी मनोगत सहनायिकेचे असले तरी शब्दांची ताकद साहिरजींची आहे,. प्रत्यक्ष जीवनात अनेक चढउतार पाहिलेल्या प्रेमाचे वेगळ्याप्रकारचे अमृतानुभव पाठीशी असलेल्या या तरल कवीने आपलेच म्हणणे या सहानायिकेच्या तोंडी उतरवले आहे असे वाटते.

गीतातील प्रत्येक कडव्यामध्ये नायकाकडे मागणी करताना ती काय काय मागते आहे ते पाहिले कि आपण जेंव्हा एखाद्यावर तरल प्रेम करणारी व्यक्ती कशाची मागणी करेल याचा नेम नाही त्यामळे सहनायिका नायकाकडे त्याची परेशानी,विरानी ,हैरानी मागतेच पण पुढे जात जर तुला समाज सतावत असेल तर त्यावर लक्ष ठेवण्याचे काम ( पाहरेदारी )निगेबानी , आणि शेवटी जर काही चुकीचे केल्याचे शल्य असेल तर ते म्हणजेच पशेमानी याची पण मागणी करते.

म्हणजेच या ठिकाणी हे शब्द फक्त यमक आणि ताल जुळवण्यासाठी आलेत असे वाटतच नाही धन्य तो साहिर ..
.
इतक्या सुंदर रचनेला दिलेले खय्यामजींचे संगीत तर स्वतंत्र अभ्यासाचा विषय ठरेल. हे गाणे त्यांनी पहाडी रागात बांधताना त्यांची हिमाचल आणि परिसर याच्याशी असलेली जवळीक सहज अधोरेखित केली आहे. एखाद्या उतुंग पर्वत रांगेत एखाद्या छोट्याश्या पठारावर एखादे शांत तळे आहे आणि एखाद्या निवांत संध्याकाळी त्या काठावर विचार मग्न अवस्थेत असताना, त्या तळ्यात एखादा छोटासा दगड सहज भिरकावून दिल्यावर, जसे तरंग उठतात तसे प्रत्येक कडव्यानंतर तिच्या भावना आपल्या मनात उतरतात असे वाटत राहते

या गीतासाठी त्यांनी निवडलेला आवाज इतका योग्य आहे कि पहाडी खर्ज आणि मार्दवता यांचा मिलाप असलेला हा आवाज त्यांच्या पत्नीचा आहे म्हणून नाही तर चपलख आहे म्हणून नितांत सुदर वाटतो आणि इतकी सुंदर रचना अशीच ऐकत राहावे असे वाटत असतानाच गीत संपून जाते मनात एक हुरहूर ठेवून
ती म्हणजे खरच सुंदर प्रेमाची प्रत्येक कहाणी अधुरीच असते का ?
ऐका एक साहिर प्रेमाचे व्यक्त होणे -
https://www.youtube.com/watch?v=A8Yr1OOeOT8&list=RDA8Yr1OOeOT8&start_rad...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलंय. गाणं किंवा चित्रपट कधी पाहिलेला नाही. पण गाणं खूप आवडतं, मला अत्यंत जवळचं आहे.

मस्त! खूप दिवसांनी ऐकलं आणि पहिल्यांदा यूट्यूबवर पाहिलं. लिंक साठी धन्यवाद.
खरं तर 'पियानोवरची गाणी' अशी लेखमालिकाच लिहायला हवी कुणीतरी... ख्वाब हो तुम या पासून नैनांदा क्या कसूर पर्यंत..... या पूर्वी आणि नंतरही बरीच असतील. लक्षात राहिलेले दोन पियानो म्हणजे "चांद तारे तोड लाऊं" मध्ये एक मस्त पांढरा पियानो होता आणि 'ए मेरे ख्वाबों के खयालों के शहजादे' मध्ये मीनाक्षी एका स्टेजटाईप्स पियानो वर नाचली होती.

किंकर
धन्यवाद ! जर आपल्याला हे गाणे आवडत असेल तर मग हे गाणे सुद्धा आवडत असणार , कृपा करून त्याबद्दल पण लिहाल का?
Soul stirring melody from the film Hamari Yaad Aayegi (1961), originally sung by Mubarak Begum, lyrics by Kidar Sharma, music by Snehal Bhatkar.

छान लिहिलंय. गाणं किंवा चित्रपट कधी पाहिलेला नाही. पण गाणं खूप आवडतं, मला अत्यंत जवळचं आहे.
>>> +१

भरत , हर्पेन ,अनिंद्य ,Cuty हीरा - आपल्या प्रतिसादासाठी धन्यवाद.
सीमंतिनी- 'खरं तर 'पियानोवरची गाणी' अशी लेखमालिकाच लिहायला हवी कुणीतरी...' अगदी खरे आहे तुम्ही आणि प्रभुदेसाई यांनी सुचवलेले मुद्दे पाहिले तर . एक वेगळा विषय म्हणून देखील संगीतकाराच्या नजरेतून हाताळता येईल इतका सुंदर विचार आहे. अतुल ठाकूरजीं सारखे मायबोलीकर या दोन्ही बाबत नक्कीच लिहू शकतील असा विश्वास वाटतो .
प्रभुदेसाई - आपल्या सूचनेवर नक्कीच विचार करता येईल. धन्यवाद

सुंदर लिहिलेय. माझे आवडते गाणे आहे हे. चित्रपट बहुतेक झोपला होता, कधीही बघितला नाही, गाणेही फारसे बघितले नाहीये. रेडिओवर ऐकलेय तेवढेच. त्यामुळे सिच्युएशनच्या माहितीबद्दल धन्यवाद. गाणारी सहनायीका खूपच गोड आहे.

मस्त लेख! गाणं आवडतं आहे पण सिनेमाची कथा माहीत नव्हती.
पियानो वरची गाणी खरंच मस्त विषय आहे! मला लगेच आठवलेलं गाणं म्हणजे तेरा जाना दिल के अरमानों का लूट जाना.

किती सुरेख लिहिलंय!
गाणे माहीत होते,सिनेमा पाहिला नाही.

प्रभु देसाई,तुमच्यासारखी च ,कभी tanhaiyome गाण्याची च आठवण झाली.

छान लिहिलय.. मस्त गाण. पियानोवरच अजून एक, बाईन्च धीरे धीरे मचल ए दिल ए बेकरार. .

साधना - व्हिडीओ लिंक पहिली ना ! चित्रपट इतका जुना आहे कि बॉक्स ऑफिसचे यश अपयश यांची माहिती नाही.
मानव पृथ्वीकर, जिज्ञासा , देवकी, लंपन - धन्यवाद
पियानो आणि हिंदी सिनेमा यावर खरच एक मालिका होईल.

वाह काय सुरेख लेख आहे. मूड एकदम तरल होउन गेला. पशेमानी या शब्दाचा अर्थच माहीत नव्हता. गाणे तर फारच श्राव्य आहे. आवाज + संगीत आणि बोल तर लाजवाबच.

हो. आज मी पुन्हा वाचला तेव्हा प्रेमाचे वेगवेगळे चढ उतार पाहिलेल्या साहीरचे ' अमृतानुभव ' हे माणिक हाताशी लागले. अर्थात अमृता प्रीतम..
छान लिहिले आहे हे पुन्हा एकदा.

सुंदर गाणे.

में देखू तो सही,
दुनिया तुम्हे कैसे सताती है
कोई दिन के लिए
अपनी निगेहबानी मुझे दे दो

निस्वार्थी प्रेमाची अतिशय तरल भावना मांडली आहे. खय्याम आणि साहिर हे कॉम्बिनेशन उत्तम आहेच. पण जगजीत कौर यांचा काहीसा वेगळा आवाज या गाण्याला परफेक्टली सूट होतो. निवेदिता (लिबी राणा) दिसतेही खूप सुंदर. चित्रपट पाहिला नाही. पडद्यावरील पती कमलजीत हे वहिदा रहमान यांचे खरेखुरे पती.

>>>>> पती कमलजीत हे वहिदा रहमान यांचे खरेखुरे पती
अरे वा. हॅन्डसम वाटला तो माणूस. पण खलनायकी हॅन्डसम म्हणजे हिरो होण्यासारखा चेहरा नाही खलनायक उत्तम वठवेल असा.

लिबी राणा का ती? हो खूप सुंदर दिसते. कालपासून हेच गाणे ऐकते आहे.

मला पाल्हाळ लावलेली आणि सबस्टन्स अगदी कमी असलेल्या, रसग्रहणांचा कंटाळा येतो. हे रसग्रहण रसाळ होते. खूपच आवडले.

जवळ जवळ तीन वर्षांनंतर तुम अपना रंज-ओ-ग़म, चा धागा पुन्हा वर आला खूप छान वाटले
सामो - धन्यवाद आपल्या छानश्या प्रतिसादासाठी . साहिरजी त्यांच्या हिंदी चित्रपट गीतांसाठी एक प्रथितयश रचनाकार म्हणून प्रसिद्ध असले तरी ते सुंदर गझलकार होते . आणि त्यामुळे त्यांच्या अनेक हिंदी गीतांच्या रचना उर्दू शब्दांच्या प्रभावाखाली येताना दिसतात . अर्थात शब्द उर्दू असले तरी हिंदी रचनेत आणि मनोभावना व्यक्त करण्यासाठी त्याचा चपलख वापर त्या रचनांना एका वेगळ्याच उंचीवर नेवून ठेवतात

हिरा -आपल्या पुनःश्च प्रतिसादासाठी आभार . आपल्या जीवनातील गतकाळातील अनेक आनंदी क्षणांचे देखील असेच होते . प्रत्यक्ष अनुभव आणि त्याचा पुनः प्रत्यय हाही एक अमृतानुभवच ठरतो. आपल्या ' अमृतानुभव ' नंतर ते माणिक झाकले माणिक ठेवले असते तरी त्याच्या प्रेमाच्या शॉक लपून राहिल्या नसत्या .

MazeMan- धन्यवाद . आपण नमूद केलेल्या कडव्यात निगेहबानी मागणारी नायिका जरी कोई दिन के लिये असे म्हणत असली तरी मनातून तिला आयुष्य भर नायकाची आणि पर्यायाने त्याच्य्या वरील प्रेमाचीच पहारेदारी करायची आहे असे वाटत राहते .

केशवकूल - प्रतिसादासाठी मनःपूर्वक आभार . आपल्या दोन्ही लिंक पहिल्या . नूरजहाँ आणि आपण सुचवलेले गीत दोन्हीवर नक्की लिहीन . फक्त लिंक लागली पाहिजे .

भ्रमर - धन्यवाद ! आपण सुचवलेले गाणे खूप दिवस झालेत ऐकले नाही आता मधूबन खुशबू देता (ह्य मुद्दाम लिहिलं आहे) पुन्हा एकदा ह्य साठी मुद्दाम ऐकेन .

केशवकुल : कलंक टायटल ट्रॅक छानच आहे. अमिताभ भट्टाचार्यचे लिरिक्स मस्त आहेत. ओरिजिनल अरिजितच्या आवाजात आहे. हे वर्जनही छान आहे. बोनस म्हणजे आलिया सुंदर दिसते. आणि तिची वेशभूषा पण सट्ल क्लासिक आहे.

केशवकूल - पियानो आणि संगीत यांचे नाते इतके गहिरे आहे कि त्यात नवे जुने काय आणि कसे विभागणार ?

मानव पृथ्वीकर- आपण घेण्यास सांगितलेल्या सुरैया यांच्या ' मैं दिल मे 'या सुरवातीच्या तीन शब्दातील ठसकाच संपूर्ण गीत दिलखेचक बनवतो

MazeMan -केशवकुल : कलंक टायटल ट्रॅक छानच आहे. अमिताभ भट्टाचार्यचे लिरिक्स मस्त आहेत. ओरिजिनल अरिजितच्या आवाजात आहे. हे वर्जनही छान आहे. बोनस म्हणजे आलिया सुंदर दिसते. आणि तिची वेशभूषा पण सट्ल क्लासिक आहे. >>>>> अगदी खरे आहे .