परवा एक फोन आला...

Submitted by अतुल ठाकुर on 26 April, 2020 - 00:28

fear-1131143_640.jpg

त्या बाईंचा बीएस्सी आयटी झालेला मुलगा गेले दोनतीन वर्षे ड्र्गच्या अधीन गेलेला आहे. लॉकडाऊनमध्ये ड्र्ग्ज मिळत नसल्याने तो हिंसक झाला आहे. काही दिवसापूर्वी त्याने आईवडिल आणि त्याच्या बारावीत असलेल्या बहिणीवर हात उगारला. बहिणीला बराच मार बसला. इतका की ती घरातून बाहेर पळाली आणि पाचेक तास बाहेरच होती. तेही या लॉकडाऊनच्या काळात. घरच्यांनी मग पोलीसांकडे तक्रार केली. तेथेही काही झाले नाही. बहिणीला आता मामाकडे पाठवले आहे. पण आईवडिल मात्र जीव मुठीत धरून राहात आहेत. एक तर मुलगा मारझोड करेल म्हणून भीती. आणि दुसरे म्हणजे तो दिवस दिवस बाहेर राहतो. बाहेर काय पराक्रम करत असेल ही चिंता आणि कदाचित घरी करोनाचा संसर्ग आणेल ही दुसरी रास्त चिंता.

मला फोन आल्यावर मी माझे काही काँटॅक्ट्स वापरले. पण लॉकडाऊनच्या काळात उपचारकेंद्रे बंद आहेत. नवीन भर्ती अजूनही सुरु झालेली नाही. समुपदेशन करता येणे कठीण आहे कारण मुलगा फोन वर येण्याची शक्यता जवळपास नाहीच. मग एए मिटिंगचा पर्याय सांगितला. त्या मिटिंग्ज जरी बंद असल्या तरी त्यातील कुणी कार्यकर्ते शेजारी पाजारी असले, कार्यरत असले आणि काही मदत होऊ शकली तर पाहता येईल. व्यसनाधीन असलेल्या आणि व्यसन मिळत नसल्याने हिंसक झालेल्या या मुलाच्या हातून काही भयंकर घडू नये हीच देवीजवळ प्रार्थना आहे. मात्र अशा हातघाईच्यावेळी सर्व इंटेलेक्चुअल चर्चा फोल वाटतात. कृती काय करता येईल याचाच विचार मनात असतो. मुलाला नाही तर आईवडीलांना समुपदेशनाची काही मदत होऊ शकेल का हा पर्याय मी सध्या पाहतो आहे. कदाचित त्यांचे समुदेशन झाले तर त्यांना आपल्या मुलाच्या समस्येला नीट तोंड देता येईल. स्वतःच्या चिंता कमी करता येतील. बघु या कसे काय जमते ते...सध्या त्या लोकांच्या संपर्कात आहे. हात वर करून मोकळं होणं जमणार नाही. फार अपराधी वाटेल.

पण या निमित्ताने काही दु:खद गोष्टी समोर आल्या.या बाईंना आधीपासूनच मुलाला उपचारकेंद्रात दाखल करावे म्हणून सल्ला देण्यात आला होता. तेथे त्यांनी दुर्लक्ष केले. आपल्याकडे व्यसनासंबंधीचे अज्ञान अगाध आहे. काहीतरी गुढ असा चमत्कार होऊन व्यसन आपोआप नाहीसे होईल असे सुशिक्षितांनाही वाटते. लग्न करून देण्यासारखे उपाय तर आजदेखिल लोकप्रिय आहेत. म्हणजे एका स्त्रीच्या आयुष्याचा खेळखंडोबा. अजून हा मुलगा सुदैवाने अविवाहित आहे. आपल्याकडे वैज्ञानिक उपायांवर अनेकांचा फारसा विश्वास नसतो. बाई माझ्याशी फोनवर बोलताना काही असे औषध आहे का की जे घेतल्याने दारु प्यायची इच्छाच होणार नाही याबद्दल चौकशी करीत होत्या. दुसरे म्हणजे त्यांना उपचारकेंद्रात दाखल केल्यावर गॅरेंटी हवी होती. अशी गॅरेंटी कुणीही देऊ शकत नाही. व्यसन हे बाय चॉईस असते आणि ते स्वतःच प्रयत्न करून घालवावे लागते. उपचारकेंद्र काय नी सायकियाट्रीस्ट काय तुम्हाला फक्त मार्गदर्शन करु शकतात.

आणि एकदा उपायांवर तुमचा विश्वास नसेल तर उपाय केला तरी त्यावर जास्त पैसे खर्च करायचे नाहीत असा विचार माणसे करु लागतात असे मला अलिकडे वाटू लागले आहे. कुणाला मी अगदी पाषाणहृदयी आहे असे वाटेल पण मला अनुभवही तसेच आलेत. अजून तीन मे ला अवकाश आहे. त्यानंतरही काय निर्णय होईल सांगता येत नाही. उपचारकेंद्रे सुरु होतील की नाही माहित नाही. मुलगा हिंसक झालेला आहे. आणि या बाईंना खर्चाची काळजी आहे. काही कमी करता येईल का असा प्रश्न त्या विचारत होत्या. काही केसेस खरंच अशा असतात की ज्यांची खर्च करण्याची परिस्थिती नसते. व्यसनामुळे सारे काही डबघाईला आलेले असते. पण हातात सोन्याचे ब्रेसलेट, बोटांत सोन्याच्या अंगठ्या, बायकोच्या अंगावर दागिने असा जामानिमा करून आणि स्वतःच्या वाहनातून आलेली माणसेही पैसे कमी करा म्हणून अडून राहिलेली मला माहित आहेत. गंमत म्हणजे यातील अनेकांनी लाखो रुपये व्यसनात उडवलेले असतात. पण पंधरा हजार रुपये पंचवीस दिवसासाठी, (यात राहणे, जेवणखाण, नाश्ता, उपचार सारे आले) खर्च करायचे म्हणजे माणसे एकदम गहन विचारात पडतात.

थोडक्यात काय तर करोनाच्या निमित्ताने व्यसनाची ही काळीकुट्ट बाजुदेखिल उजेडात आली हे एकप्रकारे बरेच झाले. व्यसनाचा पुरवठा होत आहे म्हणून काहीवेळा हिंसा घडत नाही. म्हणजे सर्व आलबेल आहे असे नसतेच. पुरवठा थांबला की ही हिंस्र श्वापदे अंधारातून बाहेर येऊ लागतात. अशावेळी ती कुणाचा घास घेतील त्याचा नेम नसतो.

अतुल ठाकुर

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अंगावर काटा आला वाचुन.. तो मुलगा ठरवलं तर या सगळ्यातुन अजुनही बाहेर पडु शकतो. हे खुप आशादायी आहे.

कोरोनाची पांढरी बाजूही आहे. माझा एक कलीग रजनीगंधा फॅन होता. ऑफिसात आम्ही खूप प्रयत्न केले. तोही प्रयत्न करायचा. पण दोन तासात हातपाय कापायला लागले की रजनीगंधाला शरण जायचा. गेले महिनाभर त्याने भयंकर त्रास भोगला आणि आता म्हणतो मी रजनीगंधामुक्त झालो. आता खावेसे वाटत नाही, हातपाय कापत नाहीत.

खरं आहे पण काही ड्रग्जचे विथ्ड्रॉल फार भयंकर असतात. काहीवेळा माणसे हॅल्युसिनेशनमध्येही जातात. आणि हिंसक झाली तर मग विचारायलाच नको. म्हणून काळजी वाटते आहे.

माझ्या घरातील एक ज्येष्ठ नागरिक जवळजवळ ६० वर्षांपासून तंबाखू खात होते. ते मधुमेही आहैत. लॉकडाऊनमुळे घरची मंडळी बाहेर सोडत नाहीयेत.
आता साधारण महिनाभर तंबाखू मिळाली नाही, त्यामुळे खाल्ली नाहीये. हातपाय कापणे, पोट साफ न होणे अशा तक्रारी करतात. ह्यासाठी काय करता येईल, त्याबद्दल काही सुचवतात आलं तर प्लीज सांगा.
ठाकूर साहेब, तुमच्या धाग्यावर अवांतराबद्दल सॉरी.
तुमच्या कामाचे आणि संयत भाषेचे कौतुक.

ठाकूर साहेब, तुमच्या धाग्यावर अवांतराबद्दल सॉरी.
हे अवांतर नाही. आम्ही हेच तर काम करतो. आज एका समुपदेशकाशी बोलणार आहे तेव्हा सर्व पर्याय विचारेन आणि येथेच उत्तर देईन. सध्या उपचारकेंद्रे बंद आहेत. आणि कधी सुरु होतील याचा नेम नाही. तेव्हा त्या काय काय उपाय सुचवणार आहे ते पाहुयात.
बाकी आमच्या व्यसनमुक्तीच्या क्षेत्रात तंबाखुला "मदर ऑफ ऑल अ‍ॅडीक्शन" म्हणतात बरं का. सुटायला अत्यंत चिवट असं हे व्यसन. अनेक माणसे अशी पाहिलीत ज्यांची दारु सुटली आहे पण तंबाखु सुटणे अवघड गेले आहे. मी अशक्य म्हणत नाहीये. तुलनेने अवघड. कारण सर्व लोकांसमोर राजरोसपणे करता येणारे व्यसन आहे हे. ऑफरही करता येते. मॅनर्सचा भाग म्हणून.

व्यसनी लोकांवर उपचार हे essential services मध्ये यायला हवे ना? किमान काही केंद्रांवर कमी क्षमतेवर काम सुरू राहीले पाहिजे ना?
तुमचा लेख वाचून वाईट वाटले. त्या मुलाला योग्य मदत लवकरात लवकर मिळू देत!

व्यसनी लोकांवर उपचार हे essential services मध्ये यायला हवे ना? किमान काही केंद्रांवर कमी क्षमतेवर काम सुरू राहीले पाहिजे ना?
जिज्ञासा खरं सांगु? अगदी कळीच्या मुद्द्यावर बोट ठेवलेत. ज्यांच्याकडे जागा आणि इतर काही सोयी आहेत अशांनी अशा हाताबाहेर गेलेल्या आणि धोकादायक ठरु शकणार्‍या केसेस घ्यायला काय हरकत आहे? यांच्याकडे इंफ्रास्ट्रक्चर आहे. माणसे आहेत. आता त्यांनी घरात खून पाडले म्हणजेच आपल्याला जाग येणार आहे का?
आणि अशा हातघाईच्या वेळीच जर अशा गोष्टींचा उपयोग होणार नसेल तर काय फायदा???

व्यसनी लोक, मनोरुग्ण वगैरे लोकांसाठी ह्या दिवसातही सोय हवी. आताच जास्त गरज आहे.

सरकारचा प्रॉब्लेम हा असावा परवानगी दिली तर जी मंडळी आवश्यक सेवा म्हणून बाहेर पडतील त्यापेक्षा जास्त मंडळी पाय मोकळे करायला उगीचच बाहेर पडतील. शहाणे लोक इथे शोधूनही सापडत नाहीयेत. मुंबईतील परिस्थिती तर अतिशय बिकट आहे आणि तरीही लोक बाहेर पडताहेतच.

व्यसनी लोक, मनोरुग्ण वगैरे लोकांसाठी ह्या दिवसातही सोय हवी. आताच जास्त गरज आहे.

सरकारचा प्रॉब्लेम हा असावा परवानगी दिली तर जी मंडळी आवश्यक सेवा म्हणून बाहेर पडतील त्यापेक्षा जास्त मंडळी पाय मोकळे करायला उगीचच बाहेर पडतील. शहाणे लोक इथे शोधूनही सापडत नाहीयेत. मुंबईतील परिस्थिती तर अतिशय बिकट आहे आणि तरीही लोक बाहेर पडताहेतच.

त्या कुटुंबाबद्दल वाईट वाटले पण पालकांचे वागणे बघून अजूनही त्यांना याचे गांभीर्य कळलेले नाही असे म्हणावे लागेल. लोक नेहमी चुकीच्या ठिकाणी भाव करतात.

हे अती अवांतर होईल पण त्या मुलाच्या पालकांनी केलेला विचार पाहून मला माझ्या भाच्याची आठवण झाली. तो ५ वर्षांचा असताना वडील वारले. त्यामुळे त्या मुलाची आई आधी दुःखात जाऊन मुलाकडे दुर्लक्ष केले. नंतर लग्नानंतर ची ९ वर्षे अतिशय बंधनात गेल्यामुळे स्वतःचे स्वातंत्र्य (नवर्याचा भरपूर पैसा असल्याने) उपभोगण्याच्या नादात मुलाकडे दुर्लक्ष. त्यात माझ्या सासर्यांनी मुलीला मदत म्हणून आई-मुलाच्या नात्यात ढवळाढवळ केली. (मुलगा आजारी पडल्यास मुलाच्या आईने ऑफिस ला जाणे अन् आजारपण आजी-आजोबांनी काढणे. शाळेतील मीटिंग्स ना आजोबांनी जाणे कारण आईची रजा होते.)
आता परिणाम असा आहे की मुलाचे मनस्वास्थ्य ठीक नाही. दिवसेंदिवस झोपून राहणे, बाहेर मित्र किंवा नातेवाईकांशी संपर्क न ठेवणे. जो मुलगा मेडिकलचं शिक्षण घेऊ शकला असता तो आता दिशाहीन पध्दतीने आर्ट्स ला आहे.
पुण्यातील एका नामांकित लहान मुलांच्या सायकियाट्रिस्ट कडे नेले असता त्या डॉक्टर ने मुलगा वाया गेला आहे ही कमेंट मारणे. (हे तर मला पटलेच नाही. ) त्यामुळे मला असे वाटते की इतक्या सुशिक्षित घरातील मुलगा वाया गेला असे सगळे गृहीत धरत आहेत.
मला असे वाटते की पुढेमागे त्याने पैसे (जे यशाचे खूप मोठे मापदंड आहे) कमावले तरी त्याचे व्यक्तिमत्त्व सायकलॉजिकली डिस्टॉर्टेड असेल.
आणि केवळ त्याला ह्या गर्तेतून बाहेर कसे काढता येईल ह्या करता असलेले ignorance आणि योग्य दिशेने करायच्या प्रयत्नांचा अभाव.

अतुलजी, १५००० एका दिवसाचे कि २५ दिवसांचे ?

२५ दिवसाचे. तेथेच राहावे लागते. जेवणखाण उपचार त्यातच येतात. मी पुण्याच्या मुक्तांगणविषयी सांगतो आहे. इतर ठिकाणचं मला माहित नाही.

आता परिणाम असा आहे की मुलाचे मनस्वास्थ्य ठीक नाही. दिवसेंदिवस झोपून राहणे, बाहेर मित्र किंवा नातेवाईकांशी संपर्क न ठेवणे.
माझ्या पाहण्यात एक केस अशी आहे की दुर्लक्ष झाले म्हणता येणार नाही. उपचारही झाले. पण लपवाछपवी खुप झाली. आणि बहुधा मनोविकार बळावल्यावर उपचार सुरु झाले असावेत. अनेकदा दुर्लक्ष असेही होते किंवा उपचारांची हयगय केली जाते. किंवा समाजापासून लपवण्याकडे आईवडिलांचा कल असतो. लपून छपून उपचार करून एकदाचे बरे करुयात मग पुढचे पाहु असा विचार असेल. याचा अर्थे दुखणे गावात दवंडी पिटून कळवायचे असा नाही. पण काही मनोविकार चिवट असतात आणि त्यांना दीर्घकाळ उपचारांची आवश्यकता असते. त्यावर काम करणारे काही स्वमदत गटही असतात. अशांची मदत उपयुक्त ठरु शकते.

अतुलजी, मग खरोखर अशा( हातात सोन्याचे ब्रेसलेट, बोटांत सोन्याच्या अंगठ्या, बायकोच्या अंगावर दागिने असा जामानिमा करून आणि स्वतःच्या वाहनातून आलेली माणसे) पालकांबद्दल वाईट वाटून घेऊ नये.

त्यांच्या पाल्याने आजपर्यंत व्यसनात किती पैसे घालविले किंवा पुढे किती जाणार

पालकांनाच जाणीव नसेल तर तुम्ही काहीही करू शकत नाही
___/\___

फारच दाहक लेख आहे हा. लोकांच्या प्रायॉरिटिज अनेकवेळा चुकीच्या असतात आणि असल्या विचित्र विचारसरणीमुळे एखाद्याच्या आख्ख्या आयुष्याचं नुकसान होतं.

मामी+१
विचार करून काटा आला अंगावर.

मला नाही वाटत कि पोरावर प्रेम कमी आहे किंवा त्याच्या व्यसनाचे गांभीर्य कमी आहे म्हणून अशी पैश्याबाबत घासाघीस होत असेल.
कुंडलीत ठाण मांडून बसलेल्या ग्रहांमुळे हे व्यसन सुटत नाहीये किंवा शेजारच्या एखाद्या विधवा बाईची नजर तुमच्या पोराला लागली आहे सांगून फेका पंचवीस हजार करतो ब्ंदोबस्त असे म्हटले असते तर फेकले असते क्षणाचाही विलंब न करता पैसे... मात्र समुपदेशनावर वा या ऊपचारपद्धतीवर लोकांचा विश्वास नाही बसत हे कारण असावे ज्यामुळे पैसे खिश्यातून चटकन निघत नाही.

तो विश्वास का बसत नाही याचीही कारणे अभ्यासायला हवी आणि त्यावरही काम करायला हवे असे वाटते. एकप्रक्रारे मार्केटींग करायला हवे या ऊपचारपद्धतीची असे म्हटले तरी चालेन.

तळटीप - ग्रहतारे कुंडली हे उदाहरणासाठी दिलेय. त्यावर लोकांचा विश्वास असण्याला आक्षेप नाही. ते खरेखोटे हा वाद ईथे नको.

बाकी जिथे हे प्रॉब्लेम आहेत त्यांचे स्पेशली या लॉकडाऊन काळात अवघड आहे खरेच. हे वैद्यकीय उपचाराचाच भाग असल्याने जेवनावश्यक बाबी / अत्यावश्यक सेवा यातच मोडायला हवे. मदत मिळायलाच हवी.

लोकांच्या प्रायॉरिटिज अनेकवेळा चुकीच्या असतात आणि असल्या विचित्र विचारसरणीमुळे एखाद्याच्या आख्ख्या आयुष्याचं नुकसान होतं.
मामी. सहमत.
काल समुपदेशकाकडून या काळात उपयुक्त पडतील अशा हेल्पलाईन्सचे नंबर गोळा करून त्या बाईंना पाठवलेत. बघुया काय होतंय ते.

भयंकर आहे हे सगळं. ~~ +12345
जवळच्या नात्यात मुलाच्या व्यसनाधीनतेमुळे अख्खा कुटुंबाची फरफट जवळून पाहिली आहे.
हा लेख वाचून त्या ची खूप आठवण आली पण आता ते सगळं खूप खूप हाताबाहेर गेले आहे प्रकरण. मुलगा कॉलेज मध्ये असताना आई बाबांनी याकडे केलेले दुर्लक्ष, नातेवाईकांनी सांगायचा प्रयत्न केला तेव्हा मिळालेली सारवासारवीची उत्तरं, सतत पाठीशी घालणे, बिझनेस नीट न चालवून सुद्धा सतत फायनान्शशियल सपोर्ट करत राहणे.. ई गोष्टी त्या ला अजून कमकुवत करतायत..

मुलगा कॉलेज मध्ये असताना आई बाबांनी याकडे केलेले दुर्लक्ष, नातेवाईकांनी सांगायचा प्रयत्न केला तेव्हा मिळालेली सारवासारवीची उत्तरं, सतत पाठीशी घालणे, बिझनेस नीट न चालवून सुद्धा सतत फायनान्शशियल सपोर्ट करत राहणे.. ई गोष्टी त्या ला अजून कमकुवत करतायत..
अगदी सहमत. अणि Piku माझा अनुभव असा आहे की पुढे ही पालक मंडळी व्यसनासमोर हतबल होतात. मुक्तांगणला मुलाच्या व्यसनमुक्तीसाठी येणार्‍या बहुतेक पालकांचा पहिला प्रश्न असतो त्याला येथे आणायचे कसे? तो आमचं ऐकणार नाही. स्वतःहून येथे कधीच येणार नाही. माझ्या पाहण्यात एक वडिल असे निघाले की ज्यांनी व्यसनमुक्ती किंवा घरातून बाहेरचा रस्ता असे दोनच पर्याय मुलासमोर ठेवले होते. मुलाने मुकाट्याने व्यसनमुक्तीचा रस्ता धरला. आज तो मुलगा व्यसनमुक्तीसाठी समुपदेशनाचे काम करतो आहे.

अतुल ठाकुर, खूप छान काम करता आहात.
हे सगळं व्यसनांचं जग सिनेमा मध्ये पाहिलं होतं, पण US मध्ये नेहमी भेटणाऱ्या छान कपलपैकी एक जण अचानक ड्रग्जच्या किती आहारी गेला आणि नन्तर काय काय झालं हे जवळून बघितलं तेव्हा सगळं किती भयानक असतं ते अचानक भिडलं.
तुम्हाला तुमच्या कार्यासाठी शुभेच्छा. आणि समाजासाठी जे काम करत आहात, त्यासाठी आभार.

ज्यांनी व्यसनमुक्ती किंवा घरातून बाहेरचा रस्ता असे दोनच पर्याय मुलासमोर ठेवले होते. >> उत्तम.

(ड्रग्स बद्दल माहीत नाही, पण तंबाखू आणि दारु याबाबतीत) आपल्याला व्यसन लागले आहे आणि आपण स्वतःच यातून बाहेर पडले पाहिजे, हे त्या व्यसनी व्यक्तीला पटत नाही, तोपर्यंत कुठलाही उपाय कामाचा नाही, असे माझे स्पष्ट मत आहे.

माझ्या पाहण्यात एक वडिल असे निघाले की ज्यांनी व्यसनमुक्ती किंवा घरातून बाहेरचा रस्ता असे दोनच पर्याय मुलासमोर ठेवले होते ~~ अशा सुज्ञ पालकांना खरच सलाम..
यामध्ये त्या मुलाची संगत तर चुकलीच पण पालकांनी ही असा कडक नियम केला नाही आणि नातेवाईकांचे सल्ले/कळकळीने सांगितलेले काही दुर्लक्षित केले.. तो दारू व्यतिरिक्त अजूनही काही व्यसन करतो हे उघड दिसून येते तरीही अजून परिस्थिती तशीच आहे.
आता बर्याच शारीरिक व्याधी शी सुद्धा झगडावे लागत आहे.. वय वर्षे ४१ ..आणि आईचे ६८!! खूप क्लेशदायक आहे हे सर्व..

आज तो मुलगा व्यसनमुक्तीसाठी समुपदेशनाचे काम करतो आहे. ~~ हे तुमचे आणि तुमच्या सहकार्यांंचे यश आहेच, त्या मुलाच्या determination चेही.

अतुल ठाकुर, खूप छान काम करता आहात.
धन्यवाद मीरा.

आपल्याला व्यसन लागले आहे आणि आपण स्वतःच यातून बाहेर पडले पाहिजे, हे त्या व्यसनी व्यक्तीला पटत नाही, तोपर्यंत कुठलाही उपाय कामाचा नाही, असे माझे स्पष्ट मत आहे.
यामागे वैज्ञानीक कारण आहे. यालाच व्यसनातले डीनायल म्हणतात. बहुतेक व्यसनी लोकांना मूळात आपण व्यसनी आहोत हेच मान्य नसते. या डीनायलमधून बाहेर पडल्यावरच उपचार शक्य होतात.

आज तो मुलगा व्यसनमुक्तीसाठी समुपदेशनाचे काम करतो आहे. ~~ हे तुमचे आणि तुमच्या सहकार्यांंचे यश आहेच, त्या मुलाच्या determination चेही.
याचे सारे श्रेय मुक्तांगण टीमचे आणि तेथे काम करणार्‍या समुपदेशकांचे. मी फक्त माझ्या पीएचडीच्या संशोधनासाठी तेथे जात असे.

आपल्याला व्यसन लागले आहे आणि आपण स्वतःच यातून बाहेर पडले पाहिजे, हे त्या व्यसनी व्यक्तीला पटत नाही, तोपर्यंत कुठलाही उपाय कामाचा नाही, असे माझे स्पष्ट मत आहे. ~~ १०००% बरोबर.

यालाच व्यसनातले डीनायल म्हणतात. बहुतेक व्यसनी लोकांना मूळात आपण व्यसनी आहोत हेच मान्य नसते. या डीनायलमधून बाहेर पडल्यावरच उपचार शक्य होतात.

Pages