चित्र रेखु दे

Submitted by सुप्रिया जाधव. on 15 April, 2020 - 12:52

छातीवरती माथा टेकत
स्पंदनातले गूज ऐकु दे
तुझ्या मनाच्या कॅनव्हासवर
मौनाचे मज चित्र रेखु दे

हव्याहव्याश्या आठवणींचा
नकोनकोसा चाले झिम्मा
प्राण वाचला अर्धा-मुर्धा
सावरताना होतो निम्मा
बोटांमध्ये बोटे गुंफत
उत्कटतेची वीण घालु दे
तुझ्या मनाच्या कॅनव्हासवर
मौनाचे मज चित्र रेखु दे

तप्त-तप्तश्या वैशाखातच
थंड-थंडश्या पडती गारा
स्वातंत्र्याला वाव दिल्यावर
मतभेदांचा सुटतो वारा
सुटून जाता रेशिम गुंता
मनामनातिल तेढ मिटू दे
कधी सुलट तर कधी उलटही
विश्वासाचे नाते विणु दे
तुझ्या मनाच्या कॅनव्हासवर
मौनाचे मज चित्र रेखु दे

भुरळ पाडण्या चंद्र-सख्यावर
सांज नेसली वस्त्र भरजरी
अभिसारीका जणू निघाली
प्याला घेउन दुग्ध-केसरी
स्वप्नरंजने नकोच आता
अजरामर क्षण एक ठरु दे
रंध्रा-रंध्रावरती माझ्या
रोमांचांची नक्षी सजु दे
तुझ्या मनाच्या कॅनव्हासवर मौनाचे मज चित्र रेखु दे

छातीवरती माथा टेकत
स्पंदनातले गूज ऐकु दे
तुझ्या मनाच्या कॅनव्हासवर
मौनाचे मज चित्र रेखु दे

सुप्रिया मिलिंद जाधव

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आहे!
तुमच्या इतर अनेक कवितांसारखी धारदार वाटली नाही!!
पण तरीही आवडली!!