अमिबा

Submitted by इकेबाना on 15 April, 2020 - 10:38

अमिबा

"नाही नाही नाही, हे कसं झालं, मी माणूस आहे ,माणूस ..." मी ओरडतच होतो, ही शेजारीच होती, माझ्या ओरडण्याने तीही जागी झाली. तिला कल्पना आली. "अहो उठा,जागे व्हा , काय झालं? आधी जागे व्हा, काही वाईट स्वप्न बघितलं का?" मला जाग आली, मला दरदरून घाम फुटला होता. जाग आल्यावर सगळ्यात आधी काय केले असें तर हात पाय चेहऱ्यावरून हात फिरवला आणि मी अजून आहे तसाच असल्याची खात्री केली. हिला काही कळेना "अहो काय आपलेच हातपाय बघताय असे, काय झालं, काही दुखत वगैरे नाही ना?" हिने मला प्यायला पाणी दिले, माझाही घसा सुकला होता,ग्लासभरून पाणी मी घटाघटा प्यायले तेव्हा कुठे जरा बरे वाटले.
"काय झालं सांगा बघू, स्वप्नच होते ना, झोप बघू आता" हिने मला आडवे केले, डोक्यावरून हात फिरवला. मी डोळे मिटून घेतले होते पण आतून जागाच होतो. मी आडवा झालो तरी डोक्यातून ते स्वप्न जात नव्हते.

काल संध्याकाळी माझ्या मित्राच्या लग्नाचा २५वा वाढदिवस होता. त्याने चांगली फाईव्ह स्टार हॉटेलात पार्टी ठेवली होती. फाईव्ह स्टार हॉटेलात पार्टी म्हणजे येणारे सगळे त्याच लेव्हलचे होते, पुरुष आणि बायका आपापल्या परीने आपल्या सांपत्तिक स्थितीचे प्रदर्शन करायला अशी संधी दवडणार नव्हते. बायका कपडे, दागिने, मेकअप, चपला आणि पुरुष गाड्या, घड्याळे, सूट बूट ह्याच्या प्रदर्शनात हिरीरीने भाग घेणार होते. खरे म्हणजे असल्या पार्ट्या, त्यातले ते संपत्तीचे ओंगळवाणे प्रदर्शन, बोलण्यात हसण्यातला खोटेपणा मला आणि हिला उबग आणतात पण मित्र खूप जवळचा, आमची जीवनाची वाटचाल बरोबरीने केलेली त्यामुळे त्याचे आग्रहाचे आमंत्रण नाकारू शकत नव्हतो. त्यामुळे इचछा नसूनही चांगले चांगले कपडे वगैरे करून आम्ही हॉटेलवर पोचलो, बरोबर ओर्चीडचाफुलांचा गुच्छघेतला होता. आतमध्ये पोचल्यावर पतिपत्नीला शुभेच्छा दिल्या, आणि बाकीच्या मित्रांबरोबर बाजूला बसलो. प्रत्येकाच्या हातात ग्लास होताच त्यामुळे गप्पांचा नेहेमीप्रमाणे ओघ साधारणतः बिझनेस, इकॉनॉमी, भारतीय सरकार, क्रिकेट, बॉलिवूडच्या तारका, व्हाट्सऍपवरचे घाणेरडे जोक असाच चालू होता. मला आज का कोणास ठाऊक गप्पांमध्ये भाग घ्यावासा वाटत नव्हता. म्हणून मी माझ्या मोबाईलमध्ये बातम्या बघत होतो.
तेव्हढ्यात माझ्या भारतातल्या मित्राने एक व्हाट्सअप वर मेसेज पाठवला, २०-25 फोटो स्लाईड दिसत होते. हा माझा मित्र खूप चांगला लिहितो वाचतो त्यामुळे कधीकधी काहीतरी छान निवडक कविता गोष्ट किंवा गाणे पाठवायचा, त्यामुळे मी लगेच डाउनलोड केला. त्याने दरवर्षीप्रमाणे भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार दिलेल्या मानकऱ्यांची नावे, फोटो आणि कार्य पाठवले होते. दरवर्षीप्रमाणे ह्यावर्षीपण खिरापती वाटायचं एव्हढंच त्यात नवीन काय. नावे वाचल्यावर एक गोष्ट निदर्शनात आली, ती म्हणजे ह्यावेळेच्या नावांमध्ये फारच कमी नावे कलाकार आणि खेळाडूंची होती. जवळजवळ ८०% नावे ओळखीची नव्हती. पण मी जसे जसे फोटो बघायला लागलो आणि त्यांच्या कार्याची माहिती वाचायला लागलो तसे मला आश्चर्याचे धक्क्यावर धक्के बसत होते. ती सगळी अनोळखी माणसे अत्यंत साधी होती, कुणीही श्रीमंत नव्हती, पण पण त्यांचे जीवनकार्य अचाट होते .
हरकेला हजब्बा मंगलोरच्या जवळ खेड्यात राहणार एक गरीब फळविक्रेता, गावात शाळा नव्हती, स्वतः अशिक्षित पण शिक्षणाचे महत्व त्यांना माहित होते. त्यांनी संत्री मोसंबी विकून आलेल्या पैश्यातून पैसे वाचवून आपल्या गावात शाळा बांधली. महाराष्ट्रातल्या अकोला जवळच्या राहीबाई पोपेरे , अशिक्षित पण त्यांनी नेटाने पारंपरिक शेती पद्धती त्याचे फायदे शिकले, आजूबाजूच्या शेतकऱ्यांना शिकवलं आणि जैव विविधता (bio diversity ) तत्वावर बी बियाणे तयार केली. लोक त्यांना बिजमाता म्हणतात. तामिळनाडूचे रामकृष्णन ,स्वतः मानेपासून खाली लुळे /अपंग , वयाच्या २२व्या वर्षी अपंगत्व आले ,गेली ४४ वर्ष व्हील चेअर वर , दुसरा कोणी असता तर आयुष्य संपवले असते पण त्यांनी मतिमंद आंधळ्या मुलांकरता शाळा काढल्या. मी अधाश्यासारखे सगळ्या लोकांचे कार्य वाचले.अशी अनेक साधी माणसे पण ज्यांनी जीवनात काही तरी ध्येय ठेऊन कार्य केले होते. वाचत असताना नकळत एकदोन पेग जास्तीच झाले होते. जेवून घेतले आणि पार्टीतून काढता पाय घेतला. परत येताना गाडी हीच चालवत होती, गाडी चालवताना हिची बडबड चालू होती, ही काय म्हणाली ती काय म्हणाली. कोणी नवीन गाडी घर घेतलं, पण मी एक्दम शांत होतो, माझे कशातच लक्ष नव्हते, मी गप्प असल्याचे तिला जाणवले. घरी आल्यावर मी लगेचच आडवा झालो, ड्रिंक झाली असली तरी झोप येत नव्हती डोळ्यासमोर त्या सगळ्या लोकांचे फोटो आणि माहिती येत होती. ह्या लोकांना का कोणास ठाऊक भेटावेसे वाटत होते. बऱ्याच वेळाने मला झोप लागली. झोपेत स्वप्नात मी असाच झोपलो होतो , जाग आली म्हणू मी बाथरूमला गेलो, बाथरूमचा दिवा लावला , बेसिन समोरून जात असताना माझे लक्ष आरश्याकडे गेले. स्वतःला आरश्यात पहिले. वय ५२ वर्षे, गेली २० वर्षे भारताच्या बाहेर, पैसे अडका घर गाड्या मुलांचे परदेशी शिक्षण सगळे काही नीट केलेले, दिसायला एक्दम स्मार्ट त्यामुळे वय वाटायचे नाही. आरश्यात बघताना स्वतःने आजवर मिळवलेल्या यशाचा रुबाबदार दिसण्याचा मला अभिमान वाटायचा. पण एकाएकी आरश्यातल्या माझ्या चेहऱ्यात बदल व्हायला लागले, माझी त्वचा वितळायला लागली. आणि काही क्षणात माझ्या चेहेऱ्याचे रूपांतर एका ओरँग उटांग माकडाच्या चेहेर्यात झाले. मला काय होतंय हेच कळेना पण लगेच परत माझा चेहेरा बदलायला लागला, काही क्षणातच माझा चेहेरा कुत्र्यासारखा दिसायला लागला. मला काही कळायच्या आत मी मांजर झालो, मांजराचे फुलपाखरू झाले , फुलपाखराचे रूपांतर एका मधमाशीच्या झाले. आणि नंतरचे रूप बघून मी हादरलोच, माझे रूपांतर एका गांडुळात झाले, आणि शेवटचा धक्का इतका प्रचंड होता कि मी ओरडायला लागलो कारण माझे रूपांतर एक अमीबात एका एकपेशीय सुक्ष्म जीवात झाले होते. शाळेत शिकले होते अमिबा दोनच कामे करतो खाणे, स्वतःचे विभाजन करून आपली प्रजा वाढवणे आणि काही वेळाने लोप पावणे. माझे रूपांतर एका अमिबात झाल्याचे पाहून मी घाबरलो आणि मी जोरजोरात ओरडायला लागलो. आणि त्याच वेळेस मला ही हलवून जागे करत होती

नंतर रात्रभर मला झोप अशी लागलीच नाही. रात्रभर डोक्यात त्या पद्मश्री विजेत्या लोकांचा विषय घुमत होता. रात्री पडलेल्या स्वप्नाचा अर्थ मी शोधत होतो. पहाटे पहाटे शेजारी असलेल्या देवळात पुजाऱ्याने केलेला घंटानाद ऐकू आला तेव्हा थोडी मनाला शांतता मिळाली. आणि आकाशात काडकन वीज कडाडावी तास डोक्यात लक्ख्खा प्रकाश पडला.
देवाने आपल्याला एव्हढे काही दिले, धडधाकट शरीर, चांगली सारासार विचार करायची बुद्धी, शिक्षण, व्यावसायिक यश, धन धान्य समृद्धी सगळे काही दिले. पण आपण काय परत दिले?. ह्या जगाला, मानवजातीला, ह्या वसुंधरेला आपण आजवर काय दिले?. आयुष्यभर फक्त दोन्ही हातांनी घेतच आलो. त्या हातांना द्यायची सवयच नव्हती, लहानपणी शाळेत वाचलेली विंदांची कविता आठवली
“देणाऱ्याने देते जावे घेणाऱ्याने घेत जावे
घेताघेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. “
देवाने आपल्याला एव्हढे काही देऊन ह्या जगात पाठविले त्याचा उपयोग त्याचा बाकीच्या लेकरांसाठी काही केला का ? मनात विचारांचा कोलाहल माजला, आतमध्ये पूर्ण ढवळून निघाले होते. डोळ्यासमोर फक्त प्रश्नचिन्ह दिसत होती. सगळ्या प्रश्नांचे उत्तर एकच होते. शून्य... फक्त शून्य, आपल्या पुरते जगायचे , मी आणि फक्त माझं. खायचे प्यायचे, वंशावळ वाढवायची आणि एक दिवस देह सोडायचा असे करणाऱ्या माझ्यात आणि त्या अमीबामध्ये काय फरक होता. माकडे फळे खातात ,बिया फेकतात त्याची नवीन झाडे होतात, मधमाश्या फुलझाडे वाढवायला मदत करतात , गांडूळंसुद्धा जमिनीत राहून जमिनीचा पिकांचा कस वाढवायचे काम करतात. माझ्या हातून एका गांडुळाइतकेही इतकेही काम झाले नव्हते.
अमिबा ......होय मी एक अमीबाच होतो. ह्या जगतातले किडामुंगीसुद्धा माझ्यापेक्षा उजवे होते. माझीच मला शरम वाटत होती. काही तरी बदलायला हवे, काही तरी वेगळे घडायला, घडवायला हवे होते.

सकाळी उठलो, ऑफिसाला जायचा मूड नव्हता तेव्हा दांडी मारायचा निर्णय घेतला. सकाळचा चहा घेताना मोबाईलवरून माहिती काढत होतो. साधारण नऊ वाजेपर्यंत कसाबसा तग धरला आणि फोन केला "हॅलो", समोरून उत्तर आले "हॅलो वनवासी कल्याण आश्रम"....

महेश इंदुमती वसंत बिळगीकर

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults