कोरोना, व्यसन आणि आत्महत्या

Submitted by अतुल ठाकुर on 1 April, 2020 - 22:43

bird-3791588_640.jpg

काल मित्राने एक बातमी पाठवली. त्यानूसार केरळ आणि कर्नाटक येथे अनुक्रमे पाच आणि चार जणांनी दारु न मिळाल्याने आत्महत्या केली आहे. आणि आता केरळ सरकार मद्य पुरविण्यासाठी ऑनलाईन सेवा सुरु करणार आहे. शिवाय उत्पादन शूल्क विभाग दारुचे व्यसन असलेल्यांना दारु पुरविणार आहे. हा रोगापेक्षाही भयंकर उपाय आहे असे मला स्पष्टपणे वाटते. याचे अतिशय वाईट आणि दूरगामी परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यापेक्षा या दारु न मिळाल्याने अस्वस्थ झालेल्या आणि आत्महत्या करण्याच्या टोकापर्यंत पोहोचलेल्या माणसांना इस्पितळात दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरु करणे हा एकमेव उत्तम मार्ग होता. ज्याला डिटॉक्स करणे म्हणतात ते अशावेळी झाले असते. शिवाय दारु न मिळाल्याने जी विथड्रॉलची लक्षणे दिसू लागतात त्यांचीही काळजी इस्पितळात आपोआपच घेतली गेली असती.

काल मी म्हणालो होतो की व्यसनाच्या आजाराचे पेशंटस करोनाशी लढाई हातघाईवर आली असताना येणे हा वैद्यकिय सेवेवर पडणारा अनावश्यक बोजा आहे. मात्र जेव्हा व्यसन मिळत नाही आणि त्यामुळे मृत्युला कवटाळण्यापर्यंत परिस्थिती येते तेव्हा करोनाग्रस्त आणि व्यसनी माणसे यांना एकसारखेच गंभीर लेखून त्यांचे इस्पितळातच उपचार व्हायला हवेत असे माझे मत आहे. अर्थात हे विधान कुठल्याही आकडेवारीवर आधारलेले नाही त्यामुळे जर आत्महत्या करणारांची संख्या वाढु लागली तर वेगळे उपाय योजावे लागतील. मात्र दारु पुरविणे हा या परिस्थितीत योग्य उपाय नाही अशी माझी ठाम समजूत आहे. यातून गंभीर समस्या उद्भवू शकतात.

१. जी माणसे दारु मिळाली नाही त्यामुळे आत्महत्येच्या टोकापर्यंत गेली आहेत ती माणसे व्यसनाच्या पार तळाशी गेली आहेत असे समजण्यास हरकत नसावी. त्यांच्यावर उपचार होण्याची ही एक संधी होती. ती वाया तर गेलीच. शिवाय आता घरबसल्या दारु मिळाल्याने त्यांच्या शरीर मनावर झालेले भयंकर परिणाम आणखिनच गडद होतील.

२. आजवर बाहेर राहून दारु पिणारे माणसे आता घरात राहून राजरोस दारु पितील आणि घरच्यांना किती त्रास देतील याची तर कल्पनाही करवत नाही.

३. व्यसनी माणूस हा हट्टी आणि अहंकारी असण्याची शक्यता असते. तुमच्या नाकावर टिच्चून दारु मिळवली की नाही ही भावना त्याच्या मनात जास्त बळावेल आणि पुढे त्याचे व्यसन सुटणे हे आणखी अवघड होऊन बसेल.

४. व्यसनी माणूस हा वाईट अर्थाने अतिशय चलाख असतो. या दिवसांत अनेकांना आत्महत्येचे नाटक करणे हा दारु मिळविण्याचा राजरोस मार्ग आहे हे लक्षात येईल आणि अशी नाटके सुरु होती.

५. सरकार दारु किती पुरवणार आहे याची माहिती अजून मिळालेली नाही. मात्र व्यसनासक्त लोकांचा ठराविक असा कोटा नसतो. त्यामुळे किती दारु प्यायले म्हणजे आत्महत्या करणार नाही या प्रश्नाला उत्तरच नाही. अशामुळे भरपूर नशा करण्याचे प्रमाण वाढेल. कदाचित पुढे मागे दारु मिळणार नाही म्हणून साठा करण्याचे प्रमाणे वाढेल.

६. या दारुचे पैसे किती असणार आणि कोण देणार हा एक प्रश्नच आहे. आता घरच्या ज्येष्ठांना आपल्या मुलाने दारुमुळे आत्महत्या करु नये म्हणून स्वतः पैसे देऊन दारु आणून पाजावी लागेल. हे अतिशय विदारक चित्र आहे.

७. या सार्‍या प्रकारांमुळे घरच्यांचा शारिरीक आणि मानसिक त्रास अतोनात वाढण्याची शक्यता आहे. आणि या निष्पाप लोकांना नवीन दुखणी सुरु होतील. हे सारं कधी संपेल सांगता येत नाही या काळजीमुळे घरातील ज्येष्ठ, सहचरी यांचे मानसिक आरोग्य ढासळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

८. आपले बाबा घरात बसून दारु पित आहेत हे पाहून लॉकडऊनमुळे घरात बसलेल्या लहान मुलांवर याचे वाईट परिणाम होण्याची शक्यता आहे.

जी मंडळी या आत्महत्येच्या टोकापर्यंत गेली नाहीत त्यांना हात जोडून विनंती आहे की संयमाचा मार्ग अंगिकारावा. इतर अनेक सकारात्मक गोष्टींकडे मन वळवावे. अगदीच असह्य झाले तर सरळ वैद्यकिय उपचार घ्यावेत. पण सहन होत नाही म्हणून दारु पिऊ नये. करोनामुळे झालेला लॉकडाऊन ही व्यसनी माणसांनी व्यसन दूर करण्यासाठी मिळालेली सुवर्ण संधी आहे असे समजावे. दारुची दुकाने बंद, बारमध्ये नेणारे मित्र बंद, आत्मपरीक्षणाला भरपूर वेळ, जुने छंद जोपासायला भरपूर वेळ, चांगले मित्र जोडायला मिळालेला वेळ, काही लेखन करायला मिळालेला वेळ, कुटूंबियांशी संवाद साधायला मिळालेला वेळ हे सारे वाया कशाला घालवायचे? त्याचा उपयोग करून घेऊया. आणि करोनाबरोबरच व्यसनाचाही पराभव करुया.

अतुल ठाकुर

हा लेख ज्या बातमीवर आधारलेला आहे ती लिंक येथे देत आहे.

https://zeenews.india.com/marathi/india/9-people-suicide-because-of-not-...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एकीकडे कोरोनाच्या संकटातुन बाहेर येण्यासाठी शेकडो लोकांना मदतीचा हात सरकार द्यायचा प्रयत्न करतंय तर दुसरीकडे हजारोंना दारु पुरवून लाँगटर्मसाठी लोकांना व्यसनाच्या खाईत लोटतंय. जेव्हा सरकारच अस वागत असेल तेव्हा व्यसनमुक्तीसाठी धडपडणाऱ्या संस्था लोकांना कुठपर्यत रोखणार.. Sad

दारू मिळाली नाही म्हणून आत्महत्या करणे हे व्यसनी लोकांनी गाठलेलं शेवटचं टोक आहे. आमच्या सारखे पिणारे आहेत म्हणून भरमसाठ महसूल मिळून सरकार जनतेला मुलभूत सुविधा पुरवू शकतो.

उत्तम लेख.
डिटॉक्स, मानसोपचार हे उपाय आहेत व्यसनावर अंमली पदार्थ पुरवत रहाणे हा नाही.

आमच्या सारखे पिणारे आहेत म्हणून भरमसाठ महसूल मिळून सरकार जनतेला मुलभूत सुविधा पुरवू शकतो.

काय सांगताय?
दारूबंदी असलेल्या गुजरातमध्ये पायाभूत सुविधा अगदीच तळागाळाच्या असायला हव्या होत्या.
पण तेथे रस्ते गुळगुळीत आहेत वीज सुद्धा 24 तास असून अतिरिक्त वीज ते महाराष्ट्राला पुरवतात हे असं कसं काय बुवा?

दारू, कॅसिनो, रेस वगैरेतून शासनाला मोठा महसूल मिळतो असे आकडेवारीतून दिसत असले तरी व्यसनाधीनता आणि त्यातून निर्माण होणारे प्रश्न , त्याच प्रमाणे यातल्या सर्विस इंडस्ट्रीत काम करणार्‍यांचे प्रश्न -होणारे शोषण वगैरे विचारात घेतले तर हा उत्पन्न मिळवायचा फार महाग मार्ग आहे.
सक्तीची दारूबंदी हे उत्तर नाही तसेच या इंडस्ट्रीकडे महसुलाचा मोठा भाग या नजरेने बघणे देखील योग्य नाही.

Deaths in India attributed to alcohol use will lead to loss of at least 258 million life years

and 1.45% of GDP each year

कर्करोग, रस्ते अपघात आणि यकृताच्या आजाराने मृत्यू मुखी पडणारी हि चाळिशीतील माणसे आयुष्यातील सर्वात उत्पादक वर्षात जात असल्यामुळे राष्ट्राचे फार मोठे नुकसान होत असते.

त्या तुलनेत दारूवरील अबकारी करामुळे मिळणारा महसूल नगण्य आहे.

Read more at:
http://timesofindia.indiatimes.com/articleshow/70236838.cms?utm_source=c...

Indians’ drinking habits and patterns are problematic,“At least a third of the drinkers fall in the ‘hazardous drinkers’ category.

a National Institute of Mental Health and Neurological Sciences study in Karnataka a few years ago found that for every rupee the government got off the bottle, it lost more than Rs 2 in terms of healthcare expenses and lost productivity.

https://www.thehindubusinessline.com/economy/the-alcohol-economy/article...

दारूबंदी असलेल्या गुजरातमध्ये पायाभूत सुविधा अगदीच तळागाळाच्या असायला हव्या होत्या.

Proud

गुजरातेत दारू मिळते.

https://www.google.com/search?q=beer+bar+ahmedabad&oq=beer+bar+ahmedabad...

2019 चे गुजरातचे उत्पन्न 4 पट वाढले, इतके सगळे टुरिस्ट गुजरातला जातात का ?

https://ahmedabadmirror.indiatimes.com/ahmedabad/others/states-income-fr...

https://youtu.be/D3gO1nh1l2E

काबो, तुम्ही गुजरात बाहेरुन आलेला असला पाहिजे आणि टिकीट सोबत आयडी दाखवून आठवड्याचे परमीट with limited quota मिळते

अमेरीकेत डोमेस्टिक व्हायलन्स वाढला आहे. स्त्रिया फार्मसीत जाउन आता कोड नंबर बोलतात. उदा - मला मास्क १९ द्या. थोड्याच वेळात पोलिस फार्मसीत येउन त्या बाईच्या नवर्‍याला पकडून घेउन जातात.