लाईफ आफ्टर डेथ - जर्नी ऑफ सोल्स

Submitted by राधानिशा on 26 March, 2020 - 10:31

लाईफ आफ्टर डेथ या विषयावरील पुस्तकांमध्ये मायकल न्यूटन या लेखकाच्या "जर्नी ऑफ सोल्स" पुस्तकाला वाचकांची चांगलीच पसंती असल्याचं पाहून हे पुस्तक वाचायला सुरुवात केली .

न्यूटन हे जम बसलेले हिप्नॉथेरपिस्ट होते , काही शारीरिक किंवा मानसिक व्याधींचं मूळ शारीरिक वैद्यकशास्त्राला मिळत नाही , आणि मानसिक कारणामुळे ही व्याधी उत्पन्न झाली असावी यासाठी सायकीऍट्रिस्टकडे पाठवलं जातं . काही वेळा रुग्ण सायकीऍट्रिस्ट समोरही मोकळेपणाने बोलत नाही किंवा काही अप्रिय आठवणी पार खोलवर पुरून टाकलेल्या असतात किंवा काही गोष्टी आठवणीतही नसतात , पण त्यांचा परिणाम व्यक्तिमत्त्वावर , स्वभावावर , वागण्यावर , शरीरावर होत असतो ... अशावेळी संमोहनाखाली आठवणीत मागे मागे घालवून सध्याच्या व्याधीचं नेमकं कारण असलेल्या घटनेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जातो , आणि ती आठवण जागृत झाल्यावर मग कौन्सिलिंग केलं जातं , त्यानंतर हळूहळू ती व्याधी शमते .... असे बऱ्याच लोकांचे अनुभव आहेत .

काही संमोहन तज्ज्ञांचा दावा आहे की काही पेशंटना याप्रमाणे आठवणीत मागे मागे घालवताना त्यांना पूर्वजन्मातील घटना आठवल्या आणि त्यांच्या व्याधीचं / त्रासाचं कारण किंवा त्या व्यक्तीच्या स्वभावातील एखाद्या विशिष्ट दोषाचं कारण हेही पूर्वजन्मातील घटनेत आढळलं . वेगवेगळ्या काळातील एकापेक्षा अधिक पूर्वजन्म आठवले .

या दाव्याला वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध करू शकणारे कोणतेही पुरावे सापडलेले नाहीत . त्यामुळे एकतर ह्या डॉक्टर्स आणि संमोहनतज्ज्ञांच्या प्रामाणिकपणावर विश्वास ठेवून त्यांचं त्याबाबतीतलं कथन खरं मानणे किंवा हे लोक निव्वळ फ्रॉड आहेत आणि त्यांची पुस्तकं रचून लिहिली आहेत , भोळ्याभाबड्या लोकांना फसवून पैसे उकळण्याचा आणखी एक नवीन उद्योग आहे झालं , असा निष्कर्ष काढणे असे दोन पर्याय आपल्यासमोर असतात . काय खरं मानायचं , काय खोटं याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला आहेच .

आत्मा परत परत जन्म घेतो हा दावा करणारं एक प्रसिद्ध पुस्तक म्हणजे डॉक्टर ब्रायन वेस यांचं मेनी लाईव्ज मेनी मास्टर्स . वर म्हटल्याप्रमाणे व्याधीच्या कारणाचा शोध घेताना सब्जेक्टला आधीचा जन्म आठवला आणि त्यातून पुढे तिची व्याधी बरीही झाली . यातून डॉक्टर वेस यांना पूर्वजन्म , पुनर्जन्म असतात हा शोध लागला आणि त्यांनी त्याबाबतीत आणखी केसेस स्टडी केल्या .

मायकल न्यूटन यांनी एक पाऊल पुढे जाऊन आपण सब्जेक्टकच्या कोणत्याही 2 जन्मांच्या मधल्या काळातील आठवणी जागृत करण्यात यश मिळवलं आहे असा दावा केला . हा मधला काळ म्हणजे मृत्यूनंतर पुढचा जन्म होईपर्यंत आत्मा स्पिरीट वर्ल्ड मध्ये जो काळ व्यतीत करतो तो काळ .

पुस्तक हे मुख्यतः स्पिरीट वर्ल्ड / आत्म्यांच्या मूळ निवासस्थानाबद्दल , पुनर्जन्म का होतो , पुनर्जन्माचा उद्देश काय इत्यादी इत्यादी प्रश्नांची उत्तरं देतं . अनेक गाढ संमोहनात असलेल्या केसेसशी प्रश्नोत्तरे करून ही माहिती मिळवली आहे . ह्यातली महत्वाची / इंटरेस्टिंग माहिती थोडक्यात पुढीलप्रमाणे -

1 - आत्म्यांमध्ये नवीन आत्मे आणि जुने आत्मे असे प्रकार असतात . नवीन म्हणजे ज्यांची निर्मिती होऊन थोडाच काळ झाला आणि थोड्याच जन्मांचा अनुभव त्यांना आहे , जुने म्हणजे याच्या उलट .

2 - जुन्या आत्म्यांच्या मृत्यूनंतर मूळ निवासस्थानी परतण्यासाठी त्यांना मार्गदर्शनाची गरज भासत नाही , घरचा रस्ता त्यांच्या बरोबर लक्षात असतो . मृत्यूनंतर लगेच त्यांच्या पूर्वी अनेकवेळा केलेल्या या प्रवासाच्या आठवणी जागृत होतात .

नवीन आत्मे मृत्यूनंतर कन्फ्युजड स्थितीत असतात , आत्मा म्हणून त्यांची आठवण लगेच जागृत होत नाही , ते जी व्यक्ती म्हणून जगत असतात त्याच व्यक्तीच्या कॅरक्टरमध्ये ते अजूनही असतात .... म्हणजे रोल संपवून विंगेत आलेल्या नटाला कॅरॅक्टर मधून चटकन बाहेरच पडता येऊ नये तसं काहीसं . अशांची मदत करण्यासाठी त्यांचे गाईड्स हजर होतात आणि त्यांची समजूत काढून त्यांना स्पिरिट वर्ल्ड मध्ये घेऊन जातात . तिथे पोहोचल्यावर थोड्या वेळातच हा आत्मा कॅरॅक्टर मधून एकदाचा बाहेर पडतो आणि सत्य आयडेंटिटीची आठवण जागृत होते .

3 - स्पिरिट वर्ल्ड हे आपलं घर आहे आणि नवीन नवीन जन्म ही रंगभूमी किंवा कर्मभूमी .... इकडे पाठवताना आपली मेमरी जाणीवपूर्वक ब्लॉक केली जाते कारण तिथली आठवण राहिली तर इकडे जीव रमणारच नाही . तिकडे राग , द्वेष , हेवा , तिरस्कार , स्वार्थ अशा कोणत्याही भावना नसतात , आत्म्यांच्या मनात एकमेकांबद्दल शुद्ध प्रेमभावना असते ... सगळे एकमेकांना खरोखर ओळखून असतात , कोणीही किंचितही जजमेंटल असत नाही . गैरसमज , अपेक्षाभंग असल्या गोष्टी तिथे निर्माणच होऊ शकत नाहीत . अशा ठिकाणची आठवण राहिली तर पृथ्वीवर आयुष्य जगणं अशक्य होईल , सारखी परत जायची ओढ लागेल म्हणून या आठवणी ब्लॉक केल्या जातात .

4 - पूर्वजन्मांच्या आठवणी राहिल्या तर आपण पुन्हा पुन्हा त्याच चूका करणार नाही असं काही माणसांना वाटतं पण स्पिरिट वर्ल्ड मधल्या तज्ज्ञांच्या मते कोरी पाटीच सुधारणेसाठी उत्तम . पूर्वजन्मातील अनुभवांतून आपण जे ज्ञान मिळवलं ते नष्ट होत नाही , त्या ज्ञानाचा आपला स्वभाव घडवण्यात मोठा वाटा असतो , पण सगळ्या आठवणी तशाच ठेवल्या तर ते एकूण प्रगतीसाठी घातक , त्यामुळे त्या ब्लॉक केल्या जातात .

5 - स्पिरिट वर्ल्ड मध्ये कुटुंबासारखे आत्म्यांचे ग्रुप्स असतात , एका ग्रुपमध्ये 3 ते 25 आत्मे असतात . हे आत्मे पुन्हा पुन्हा एकत्र जन्म घेतात .... आई - वडील - जिवलग मित्र - पत्नी - मुलगा - आयुष्यावर प्रभाव टाकणारी महत्वाची व्यक्ती , एखादी दुखावणारी व्यक्ती अशा रोल्स मध्ये हा गट जन्म घेतो . एकाच वेळी पूर्ण गट पृथ्वीवर कार्यरत असेल असं नाही , काहीजण तिथेच स्पिरीट वर्ल्ड मध्ये किंवा काहीजण दुसऱ्या ग्रहांवर / दुसऱ्या प्रकारच्या जीवयोनीमध्ये असू शकतात . माणसाच्या जन्मातून थकून आलेले काही आत्मे एखाद्या आनंददायी जीवयोनीची निवड करतात ... उदा . घनशरीर नसलेले , धुराच्या स्वरूपात जगणारे , दुसऱ्या ग्रहावर ज्वालामुखीच्या धगीचा आनंद घेणारे जीव किंवा मानवसदृश्य पण कॉम्प्लिकेटेड भावना नसणारे , साधं सुखी आनंदी समृद्ध आयुष्य जगणारे जीव ....

6 - प्रत्येक आत्म्याचा वेगळा गाईड आत्मा असतो . गाईड आत्मे हे खूप अधिक प्रगती केलेले आत्मे असतात , ते आता पृथ्वीवर क्वचितच जन्म घेतात . आपल्या शिष्यांना प्रगती करण्यात मदत करणं हेच त्यांचं पुढचं चॅलेंज असतं , ह्यातून त्यांचीही प्रगती होत असावी .

7 - कुठल्याही आत्म्यावर पृथ्वीवर परत जन्म घेण्याची सक्ती केली जात नाही .

8 - पुढचा जन्म पृथ्वीवर घ्यायचा की आणखी कुठे हे निवडण्याचं स्वातंत्र्य प्रत्येक आत्म्याला असतं .

9 - पृथ्वीसारख्या कष्टमय , शारीरिक - मानसिक - भावनिक चॅलेंजेस असलेल्या ग्रहांवर आत्म्याला स्वतःत सुधारणा घडवून आणण्याच्या भरपूर संधी / स्कोप असतो म्हणून हे आत्मे स्वतःहून पृथ्वीची निवड करतात .

10 - मानवी शरीर आणि मनाच्या प्रवृत्ती , इच्छा , गरजा आणि भवतालची परिस्थिती यांच्यासमोर शरणागती न पत्करता स्वतःची प्रगती घडवून आणायची हे चॅलेंज प्रत्येक आत्म्यासमोर असतं .

11 - पृथ्वीवरचा काळ हा आत्म्याच्या दृष्टीने नगण्य असतो त्यामुळे " इतकीSS " वर्षं त्रास कसा सोसायचा हा प्रश्न त्याला पडत नाही . त्याच्यासाठी तो अत्यंत अल्प काळ असतो .

12 - प्रगतीचं अंतिम ध्येय हे सोर्स ऑफ क्रिएशन मध्ये विलीन होणे हे आहे ... त्यासाठीच प्रत्येक आत्मा इच्छूक असतो .

ह्या सोर्स ऑफ क्रिएशनचं वर्णन एका सब्जेक्टने असं केलं आहे - गाडीतल्या मागच्या डब्यातल्या उतारूला इंजिन दिसलं नाही तरी इंजिनाचं अस्तित्व जाणवतं , आवाज धडधड जाणवते तसंच स्पिरिट वर्ल्ड मध्ये प्रत्येक आत्म्याला सोर्स ऑफ क्रिएशन / देवाचं अस्तित्व जाणवतं ..

त्याच्या अधिकाधिक जवळ जाणं हे प्रत्येक आत्म्याचं ध्येय आहे ... त्यासाठीच हा जन्मांचा खटाटोप .

बाकी थोडं आहे ते पुढच्या भागात लिहिते

Group content visibility: 
Public - accessible to all site users

न्युटन हे हैदराबाद चे काय? पुण्यात एक बाई आहेत त्यांच्या शिष्या. त्या सेशन घेतात. नाव आठवेना पण रेंजहीलला राहतात बहुतेक. मिपावर की कुठंतरी लेख वाचले होते त्यांचे. पोनोपोनो इंटरेस्टिंग आहे. आता त्रास देणाऱ्या व्यक्तीची सेशनमध्ये जाऊन मागील जन्मी केलेल्या अपराधांची क्षमा मागितले तर सर्व व्यवस्थित झाले असं अनुभव बरेच लिहिले होते. शुभा असं नाव आहे त्यांचं. माझं बोलणं झालं होतं फोनवरून त्यांच्या बरोबर. तीन हजार रुपये घेत होत्या एका सेशनचे.

आपल्या धर्मात पाच देह सांगितले आहेत, स्थूल, कारण, वासना, लिंग वगैरे ही स्थूल शरीर सोडल्यानंतर च्या अवस्था आहेत. की तो आत्म्याचा प्रवास आहे.

तुम्ही म्हणताय ते पोनोपोनो हेच की वेगळं माहीत नाही , काही दिवसांपूर्वी " हो ओपोनोपोनो " या मूळ हवाईअन प्रॅक्टिसबद्दल एक मेसेज आला होता कुठल्यातरी व्हाट्सअप ग्रुपवर .. एका डॉक्टरने म्हणे बरे होण्याची अजिबात आशा नसलेले हिंसक वेडे कैदी बरे केले , तेही त्यांच्यापैकी कुणाला प्रत्यक्ष न भेटता ..

अविश्वासाने खोटं असणार म्हणून अधिक सर्च केलं गुगलवर तर या प्रॅक्टिसची माहिती वाचली की यात कुठल्याही घटनेचा / माणसाच्या वागण्याचा / आपल्या स्वतःतील काही दोषांचा आपल्याला त्रास होत असेल , वाईट वाटत असेल त्या घटनेला आपणच जबाबदार आहोत असं मानून माफी मागायची ... कोणा व्यक्तीसमोर जाऊन मागण्याची गरज नाही किंवा अमुक एका व्यक्तीचीच असंही नाही ... तुम्हाला कसला त्रास होत आहे समजत नसेल तरीही काही हरकत नाही ...

युनिव्हर्स / वैश्विक शक्ती सर्वज्ञ आहे . हो ओपोनोपोनो मध्ये 4 च वाक्य म्हणायची असतात - I'm sorry , please forgive me , thank you , I love you .

स्टेप 1 आणि 2 हातून ज्या काही चुका झाल्या , कोणाहीबद्दल जे रागाचे - द्वेषाचे विचार केले गेले , ज्याही कोणाला कोणत्याही प्रकारे दुखावलं गेलं त्याबद्दल वैश्विक शक्तीला सॉरी म्हणायचं , माफ करण्याची विनंती करायची . जे लोक चांगले वागत नाहीयेत त्यांच्या आपल्याशी तसं वागण्याला आपणच जबाबदार आहोत समजून सॉरी म्हणायचं ( हे सगळ्यात कठीण वाटतं लोकांना आणि जमत नाही )

स्टेप 3 - ज्या ज्या चांगल्या गोष्टी मिळाल्या आहेत , आरोग्य , आईवडीलांचं प्रेम , चांगलं सुरक्षित लहानपण , सध्या चांगली आर्थिक परिस्थिती , कुटुंबियांचं शारीरिक मानसिक आरोग्य , घर , सुविधा , सुरक्षितता अशा ज्या ज्या गोष्टींसाठी थँक यू म्हणता येईल त्या आठवून मनापासून थँक यू म्हणायचं .

स्टेप 4 - आय लव्ह यू तुम्ही स्वतःच्या आरोग्याला ,शरीराला म्हणू शकता , तुमच्या घराला म्हणू शकता , तुमचे जे जे प्रिय कुटुंबिय आहेत त्यांना म्हणू शकता ... जे त्रासदायक लोक आहेत त्यांनाही म्हणू शकता ... वैश्विक शक्तीने ज्या ज्या गोष्टी दिल्या , ज्यांच्यासाठी थँक यू म्हटलं त्या आठवून तिलाही आय लव्ह यू म्हणायचं ...

हे सगळं अर्थात मोठ्याने म्हणायची गरज नाही , मनात म्हटलं तरी ते पोचतं ... हे करायला काळ वेळ नाही , 24 अवर्स करू शकता , मध्यस्थाची गरज नाही , कोणीही करू शकतं .

ह्याचा परिणाम होऊन जे काही प्रॉब्लेम्स असतात ते हळूहळू सुटत जातात .

ही माहिती मिळाली . म्हटलं डॉक्टरची गोष्ट खरी खोटी देव जाणे ... पण हे सोपं दिसतं आहे , मेडिटेशन तर आपल्याला जमत नाही त्यामानाने हे सिंपल वाटतं आहे ...टाईमपास म्हणून करून पाहू कसं वाटतं ते ...

सुरुवात केली आणि थांबावंसंच वाटेना .... अर्धा पाऊण तास केलं आणि नंतर दिवसात ते चालूच राहिलं डोक्यात , उतारावर गाडी फास्ट जाते तसं एकदा प्रोसेस जमली की ती फास्ट होते ... तहानलेला पाण्याच्या एका घोटावर थांबत नाही , आणखी पाणी पी असं सांगावं लागत नाही आपोआपच घटाघट प्यायलं जातं तसं झालं . मला अंगणात बसून आकाशात , झाडांकडे पाहन विचार करणं सोपं गेलं - युनिव्हर्सशी बोलतो आहोत असं इमॅजिन करून ..

आता दिवसातून 5 मिनिटं करते आठवलं की , कम्पलशन नाही काही .... पण 4 - 8 दिवसातच बराच फरक पडला मनस्थितीत आणि विचार करण्याच्या पद्धतीत ... छान वाटतं खूप पहिल्यापेक्षा .. Happy ☺️

मला नामस्मरणाने फायदा झाला. गोंदवलेकर महाराजांनी मला त्यांच्या हातात घेतले असे वाटले कारण अचानक त्यांच्याबद्दल प्रीती (गुरु म्हणुन) निर्माण झाली, कारणाशिवाय.
मला जो विचार , आठवण सैतानासारखा आयुष्यभर डाचत होता तो शमला त्याचा नायनाट झाला. त्याजागी ही उपरती झाली की महाराज काय सांगतात - फक्त आणि फक्त नामस्मरण करा.
मग मलाच उपरती झाली, कशाला मी अन्य विचार करु? आणि अचानक आठवण, विचार जे की औषधाने पुसायचा प्रयत्न होता, ते पुसले गेले. याचा अर्थ औषधात खंड पाडलेला आहे असा नसून, औषधांबरोबर महाराजांवरची श्रद्धा, नामस्मरण सुरु आहे. व्यायामाने खूप पॉझिटीव्हिटी वाटते. तोही चालू आहेच.
आपला लेख फार आवडला. मला माझे अनुभव शेअर करायचे आउटलेट मिळाले. राधानिशा - आपले आभार.

थँक यू सामो ....

नामस्मरण didn't work for me .. आमच्या घरात स्वामी समर्थांचं एक कॅलेंडर आहे , त्यासमोर बसून बोलते मी डोक्यात जेही काही असतं ते ... त्यांना म्हणाले मला खूप त्रास होतोय ह्या निगेटिव्ह विचारांचा , सहन होत नाहीत ; मला जमत नाहीये हे विचार घालवणं ... काहीतरी मदत करा .. आणि नेमकं मला जमेल आणि उपयोग होईल असं टेक्निक मिळालं लगेच 15 दिवसात .. Happy

>>>आणि नेमकं मला जमेल आणि उपयोग होईल असं टेक्निक मिळालं लगेच 15 दिवसात .. >>> अरे वा!!! बरं झालं.
________
गुरु, सूक्ष्म रुपाने आपल्यासन्नीध असतात खरे. त्रिवार खरे. असा अनुभव येतो.

सदा सर्वदा देव सन्नीध आहे । कृपाळूपणे अल्प धारिष्ट पाहे ॥

मिनेसोटामध्ये असताना, मी रेग्रेशनिस्ट शोधत होते पण एकटी असल्याने, जायची हिंमत झाली नाही. आता फॅमिली बरोबर आहे तेव्हा मला हा प्रयोग करायची इच्छा आहे. करोना प्रकरण मिटू देत एकदाचे.

श्रीमहाराज एक टक्काही न कळलेले लोक भरकटत असतात. हे करु की ते करु. ते म्हणतात नाम घे तर तेवढेच कर ना. कळलं म्हणायचं पण वळलेले दिसत नाही.

तुमचा हा लेख डेस्क्टॉपवरती शोधायला कष्ट पडले. कारण १४ व्या पानानंतरची पाने, डेस्क्टॉपवरती उघडतच नाहीयेत. अगदी यु आर एल बदलू/ मॅनिप्युलेट करुनही. असो.
___________
काल २ दा हे गायडेड मेडीटेशन ऐकले.
https://www.youtube.com/watch?v=NttW4t768F0
बाप रे इतकी डीप झोप लागली. म्हणजे सेल्फ-हिप्नॉसिस झाला नाही पण झोप फार फार डीप लागली.
आदिश्री तू ही हे ट्राय करुन बघ. तुला मेडीटेशनमध्ये रुची आहे म्हणुन सांगते आहे.

स्वतःची प्रगती करण्यासाठी आत्मा जन्म घेतो म्हणजे नक्की काय का येतो आपण पृथ्वीवर. नामस्मरण करणे हे अंतिम ध्येय असले पाहिजे का


अनेक रस्ते एकाच गंतव्य स्थानाकडे घेउन जाउ शकतात. नामस्मरण फक्त एक रस्ता असावा बहुतेक. तुम्ही सेवा करु शकता. तुम्ही सर्वांकरता मनात समता, सहिष्णुता, प्रेम व आदर ठेउ शकता.
>>>>>ऐसी बानी बोलिये, मन का आपा खोय।
औरन को शीतल करै, आपौ शीतल होय।।>>>>>>>>
तुम्ही भडक वक्तव्ये टाळू शकता. असे अनेक रस्ते असावेत.

NDTV वर राज पिछले जाणं जा प्रोग्रॅमर होता लिंक देत आहे -https://youtu.be/_9lDFc1iFmQ
यात शेवटी कॉन्टॅक्ट फोन आहे .... या शिवाय अनेकांनी प्रतक्ष्य अनुभव दिले आहेत, अगदी खरे अनुभव मांडणारे मराठी पुस्तक 'ठेव ही कर्म बंधाची' नावाचे आहे यात तर अनेक जणांचे अनुभव आहेत आणि शेवटी मार्गदर्शन आहे....

लाईफ आफ्टर डेथ बद्दल किंवा सूक्ष्म जगत (Astral World) आणि कारण जगत (Causal World) बद्दल जाणून घ्यायचं असेल तर योगानंदांच्या ऑटोबायोग्राफी ऑफ अ योगी (योगी कथामृत) मधला प्रकरण ४३ जरूर वाचावा. अगदी विस्तृतपणे माहिती दिली आहे. प्रक्ररणाचे हिंदी वाचन सुद्धा उपलब्ध आहे - https://www.youtube.com/watch?v=h9D-nV93xd4
इच्छुकांनी जरूर ऐकावे.

आत्मा परत परत जन्म घेतो हा दावा करणारं एक प्रसिद्ध पुस्तक म्हणजे डॉक्टर ब्रायन वेस यांचं मेनी लाईव्ज मेनी मास्टर्स . वर म्हटल्याप्रमाणे व्याधीच्या कारणाचा शोध घेताना सब्जेक्टला आधीचा जन्म आठवला आणि त्यातून पुढे तिची व्याधी बरीही झाली . यातून डॉक्टर वेस यांना पूर्वजन्म , पुनर्जन्म असतात हा शोध लागला आणि त्यांनी त्याबाबतीत आणखी केसेस स्टडी केल्या .

मायला, म्हणजे चार्वाक वादी, अनिसवादी, कम्युनिस्ट, तथाकथीत सायन्सवादी लोकांची या शोधामुळे गोची झाली म्हणायची. संत तुकाराम महाराज आपले मागील पाच जन्म सांगायचे. संत बहिणाबाईंना मागचे १३ जन्म आठवायचे ह्या वरील लोकांना भाकड कथा वाटायच्या.

हीज हायनेस हमीद दाभोळकरांनी याला प्रतिवाद म्हणुन काहिही लिहूदे श्री प्रकाश घाटपांडेजी , आमचा कर्मसिध्दांत आणि पुनर्जन्म थेअरी वर विश्वास आहे. हा विश्वास मी तरी योगसुत्र वाचून संपादन केला आहे.