ओझं

Submitted by बिपिनसांगळे on 25 March, 2020 - 10:55

ओझं

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

मी कोणाच्याही नजरेत भरेन अशी आहे. सौंदर्याने अन सौष्ठवाने . पोरं साली पागल होतात !
मग तिच्या नजरेत मी भरले, यात काय आश्चर्य !...
तिच्या नजरेत ?... हंs ! तिच्या नजरेत !
मी हा शब्द चुकून वापरलेला नाही. कळतंय ना ?
आम्ही दोघी एकाच ठिकाणी नोकरी करतो. ती बाहेरगावची आहे. ती इतर मैत्रिणींबरोबर फ्लॅट घेऊन राहते. ती जॉईन झाली तेव्हाच आमची मैत्री झाली. आमच्या आवडीनिवडी सारख्याच. दोघीही निसर्गप्रेमी . मी तर शहरी निसर्ग पाहत वाढलेली; तर ती गावाकडची . अस्सल निसर्गसौंदर्य अनुभवत घडलेली.
आम्ही सगळीकडेच बरोबर हिंडू - फिरू लागलो. शहरात येऊन तिला बरेच दिवस झालेले. तरुण पोरापोरींच्या सगळ्या शहरी सवयी तिने पटापट आत्मसात केल्या होत्या .
ती जरा आडव्या बांध्याची आहे. गच्च भरलेली. रुंद खांद्यांची. पहिलवानी थाटात चालणारी;पण राहते टापटीप. दाट कुरळे केस आणि हसली की तिचे शुभ्र पांढरे, एकसारखे दात दिसतात. तिचं हसणंही मनापासून असतं. तिला खोटं वागणं जमत नाही.
तिच्यामुळे पोरांना माझ्याभोवती फार घुटमळता येत नाही. ऑफिसमधली पोरं तिचा दुस्वास करतात. तिला माझी बॉडीगार्ड म्हणतात.अन आहेच ती.
आम्ही कुठं शॉपिंगला गेलो की ती माझ्या हातात हात गुंफून चालायची. नुसता धरून नाही. मग इकडे-तिकडे स्पर्श झाला की मला कसंतरीच व्हायचं. मी उसासले की ती खुद्कन हसायची. पेटत्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहायची. तिच्या हसण्याने मी विरघळून जायचे. माझं पाणी पाणी व्हायचं.

-----
तिचं पहिलं इन्क्रिमेंट झालं. मी तिला पार्टी मागितली. ती नाही म्हणायचा काही प्रश्नच नव्हता.
ती म्हणाली, " आज रूमवरच पार्टी करू. बाकीच्या दोघी गावाला गेल्या आहेत."
ऑफिस सुटल्यावर आम्ही मस्त शॉपिंग केलं. एफसी रोडवर. संध्याकाळची वेळ होती . रस्ता मुलामुलींच्या गजबजाटाने नेहमीसारखाच फुलला होता . प्रसन्न, उत्फुल्ल ! पोरींची खरेदीसाठी वस्तूंवर फिरणारी नजर अन पोरांची पोरींवर भिरभिरणारी नजर. तारुण्य अन तारुण्याचा जोश ओसंडून वाहत होता . सरत्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने प्रचंड उकडत होतं.
आम्ही पाणी पुरी खाल्ली. मग चिकन लॉलीपॉप आणि चिकन बिर्याणीचं पार्सल घेऊन रूमवर गेलो. मध्येच थांबून तिने मोगऱ्याचे गजरे घेतले.
मी पहिल्यांदाच त्यांच्या रूमवर गेले होते. रूम म्हणजे खरं तर तो फ्लॅट होता. पोरी-पोरीच रहात असल्यामुळे सारं काही टापटीप होतं.
मी तिच्याकडे राहणार होते. आईला फोन करून आधीच तसं सांगितलं होतं .
फ्लॅट पाहून झाला. थोडं बसून, थोडं लोळत निवांत गप्पा मारल्या.
विषय अर्थातच ऑफिसचा. एकेकाची पिसं काढायचा. गुपितं सांगायचा. त्यात सुमनकुमारचा विषय जास्त. तो एक टॉल,डार्क,हँडसम पोरगा होता. त्याची नजर सारखी तिला शोधत असायची. तिच्यावर त्याची नजर सरळ फिरायची नाही; तर रेंगाळत रेंगाळत फिरायची.
मध्येच ती म्हणाली , " अगं, फ्रेश तरी हो. "
मी फ्रेश होऊन कपडे बदलून बसले. तिचेच कपडे . एक पांढरा टी शर्ट आणि एक सुती राखाडी पॅन्ट. तिचा गंध त्या कपड्यांमध्ये मिसळलेला … आकर्षित करणारा. उत्तेजित करणारा . हळूहळू देहात भिनत जाणारा.पूर्ण देहात खळबळ माजवणारा !...
त्या टीशर्टवर एक छोटासा, पटकन लक्षात न येणारा अनेकरंगी प्रिंट होता. दोन बदाम एकमेकांत गुंतलेले असा.
तीही फ्रेश झाली. मी टीव्ही लावला. एक रोमँटिक सिनेमा लागलेला होता. छान होता. कॉमेडी. मी तो बघण्यात मग्न असतानाच तिने किचनमधून शिराझची बाटली आणली.
कंपनीत बऱ्याचदा दारूपार्ट्या होत .
" मला ही वाईन जाम आवडते " , ती म्हणाली ,” हिने मूड कायच्या काई होतो !”
“ मस्त ! हमे भी ये जाम - जाम पसंद है ! " मी म्हणाले.
ती रेड वाईन बघताच माझा मूड आणखी छान झाला.
मी ग्लासांमध्ये वाईन ओतत असताना ती ते मोगऱ्याचे गजरे घेऊन आली. तिने ते आजूबाजूला ठेवले. मोगऱ्याचा घमघमाट पसरला.
गप्पा मारत, टीव्ही पहात, वाईनचे घोट घेत आम्ही चिकन लॉलीपॉप खाल्ले. पिणं संपल्यावर बिर्याणी. पार्सल उघडल्यावर असा मस्त घमघमाट सुटला तिचा . अशी टेस्टी होती ना !...
बराच उशीर झाला. आम्ही बेडरूम मध्ये गेलो. मस्त गप्पा मारत होतो. मध्येच ती म्हणाली," सिनेमा छान होता. लव्हस्टोरी . पण येडे नुसतेच प्रेम करतात ..."
" म्हणजे ? ..." मी विचारलं .
" अगं , पुढे काही असतं की नाही ? " ती सूचक हसत म्हणाली.
" पुढे काय आणि ?...."
त्यावर तिने मला तिचा मोबाईल दाखवला. त्यामध्ये एक क्लिप होती. दोन गोऱ्या बायका कामक्रीडा करत होत्या – बेभानपणे ! ते पाहून मला धक्का बसला. मला लाज वाटू लागली. माझे गाल लाल झाले. शरीरातून वाफा वाहू लागल्या. मी नजर वळवली.
" ए, आवडत नाही का गं ?.... “
“नाही ”.
“अन मी ?... " तिने विचारलं.
" तू आवडतेस की , खूप ! " मी म्हणाले.
त्यावर तिने एकदम मिठीतच घेतलं . माझे ओठ तिच्या ओठांमध्ये घेतले.
“अन तुही छान दिसतेस, छान राहतेस. तू तर कोणालाही आवडशील इतकी सुंदर आहेसच . अगदी कुठल्याही अँगलने”, ती खट्याळ हसत म्हणाली.
ते गजरे तिने असे का ठेवले होते,ते आता कळले. त्यांचा वास आता आणखीच धुंद करत होता. त्यात तिच्या डिओचा अन घामाचा मिश्र वास ...
बाहेर जोरदार वारं सुटलं होतं. पानांची सळसळ चालू होती ... साऱ्या वातावरणातच ती सळसळ भरून राहिल्यासारखं वाटत होतं.
तिने आवेगाने मला जवळ ओढलं अन मला माझ्याच देहाची नवीन ओळख झाली ! तो समोरच्याला किती आव्हानात्मक वाटू शकतो त्याची जाणीव झाली !…
साऱ्या शरीरात वीज सळसळली जणू.
नंतर केव्हातरी उशिरा रात्री, ती वीज जमिनीवर पडून नाहीशी व्हावी तशी थंडावली. मला माझीच नवीन ओळख झाली .

-----
आमच्याकडे चिकू नावाचा एक कुत्रा होता . गोल्डन ब्राऊन रंगाचे केस असलेला .अगदी छोटं पिल्लू असल्यापासून त्याला आम्ही पाळलं होतं. आमच्या घराचा एक सदस्यच जणू. मी यायच्या वेळेस तर तो खिडकीतच बसून राहायचा , माझी वाट पाहत . मी दिसायच्या आधीच, माझी नुसती चाहूल जरी लागली तरी तो शेपटी हलवून भुंकायला लागायचा . आम्ही दोघेही एकमेकांचे असे लाडके होतो . !
त्याचं वय झालं होतं. दोन-तीन दिवस बिचारा पडून होता. काही खात-पित नव्हता. अवघड परिस्थिती होती बिचाऱ्याची. पावसाची सुरुवात अजून व्हायची असल्याने जाम उकडत होतं त्या उकाड्याने त्याला आणखीच अस्वस्थ होत होतं .
आईचा त्याच्यावर भयंकर जीव होता. बाबांना असे प्राणी वगैरे फार आवडत नाहीत. पण आईमुळे तेही त्याचे लाड करायचे. त्याला जीव लावायचे. त्यांनाही कसंतरी वाटत होतं. आम्हाला कोणाला जेवण जात नव्हतं.
सकाळी मी ऑफिसला जाण्यासाठी आवरत होते.
बाबा एकदम आईवर भडकले. उगाच, " तुला काही वाटत नाही. तू चिकूकडे नीट लक्ष देत नाहीस !”...
मला उशीर झाल्याने मी त्यांच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही . पण त्यांच्या बोलण्यात काही तथ्य नव्हतं . त्यांचं असंच असतं - पटकन काहीतरी रीऍक्शन देऊन टाकायची. त्याच्या मागचं काही समजून घ्यायचंच नाही . अर्थात तेही टेन्शनमध्येच होते . म्हणूनच ते असं बोलले असणार . फटकन बोलतात ,पण आतून त्यांना काळजी असतेच.
पण आई शांतपणे म्हणाली ," अहो, असं कसं होईल ? तुमच्यापेक्षा जास्त दुःख मला आहे. पण त्याचं वय झालंय. त्याचं आयुष्य त्याने उपभोगलंय. आनंदात काढलंय. मग आता त्याची वेळ जवळ आलीये, तर ती आपल्याला स्वीकारायला हवी ना? निसर्गात जे आहे ते आहे."
त्यावर बाबा गप्प झाले . चष्मा पुसत बसले . विचार मांडण्यासाठी त्यांना शब्द जुळवायचे असले की चष्मा पुसायची त्यांची सवय होती .
आई पदराने कपाळ पुसत बाल्कनीत गेली . तुळशीला अन सदाफुलीला पाणी घालायला .
मी चिकूच्या डोक्यावरून हात फिरवला . त्याने क्षीण प्रतिसाद दिला. डोळ्यातलं पाणी पुसून मी कामाला निघाले.

-----
त्यादिवशी तिच्या रूम-पार्टनर नव्हत्या. तिने मला ऑफिसमध्ये सकाळच्या चहाच्या वेळेस तसं सांगितलं. मी नुसतं हो - हो म्हणाले. माझं नीटसं लक्षच नव्हतं कामात.
चिकूसाठी आईचा कधी फोन येईल, असं डोक्यात. तिचा फोन म्हणजे वाईट बातमी हे ठरल्यातच जमा होतं . मी तर सारखी देवाला प्रार्थना करत होते की तिचा आज फोनच येऊ नये. येऊच नये !
चहानंतर तिने मला मेसेज पाठवला, ‘ ए, आज स्पेशल भेटू या.’
मी काहीच रिप्लाय केला नाही. तेव्हा ती उठून माझ्याजवळ आली . "
काय गं , काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का ?" तिने विचारलं.
मग मी तिला चिकूचं सांगितलं. तिला त्याची तब्येत ठीक नाही , हे माहिती होतंच.
थोड्या वेळाने आईचा फोन आलाच. मी लवकर निघाले. मला सोबत म्हणून तीही निघाली.
तिचा आज खास मूड होता. मला जाणवलं होतं. पण ती शांत होती. तिने मला समजावून घेतलं. मला समजावलं.
मृत्यूची वाट बघणारा चिकू आज शांत पडला होता . अन - यापुढे खिडकीत बसून तो माझी वाट कधीच बघणार नव्हता ! …
आम्ही घरी गेलो. आई माझ्या गळ्यात पडून रडली.
मी तिच्या गळ्यात पडून रडले. तिचा आधार मला आश्वासक वाटला. ती माझ्या दुःखातही सहभागी होती. तिचं प्रेम फक्त शारीरिक नव्हतं तर…
आमचं एकमेकींवर प्रेम होतंच. पण माझी त्या प्रेमावरची श्रद्धा आणखी बळकट झाली.

-----
पुढे चार दिवसांनी आमचे बंधुराज रडताना दिसले . मला खूप आश्चर्य वाटलं.मला माहिती होतं,त्याला त्याच्या जीएफपुढे कुठलीच गोष्ट महत्त्वाची वाटत नाही म्हणून. आम्हीच त्याच्या खिजगणतीत नाही तर चिकू कधी?
नुसती हिरोगिरी अन फालतू शायनिंग !
त्याला विचारलं तर त्याने मला त्यामागचं खरं कारण सांगितलं, ‘त्याचं ब्रेकअप झालंय म्हणून !’
मी डोक्यालाच हात लावला म्हणजे त्याला चिकूचं काहीच नव्हतं. मला वाटलं ते खरंच होतं.
हो ना ! किती सहजपणे सांगितलं होतं त्याने मला, आधी त्याच्या रिलेशनशिपबद्दल आणि नंतर ब्रेकअपबद्दलसुद्धा ! अन मी तर तिच्याबद्दल एक शब्द बोलू शकत नव्हते. ना त्याच्याशी ना आईशी.

-----
आम्ही ऑफिसमध्ये सकाळचा चहा घेत होतो. तिच्या भावाचा फोन आला. तिला हुंदकाच फुटला-तिची आत्या गेली होती.
ती लगेच गावाला जायला निघाली. मलाही खूप वाटत होतं, तिच्याबरोबर जावं म्हणून. पण सुट्टी घेण्याचा प्रॉब्लेम होता.
ती दोन- चार दिवसांनी परत आली. ते चार दिवस कसे गेले , माझं मलाच माहित . तरी फोनवर मधूनमधून आमचं बोलणं चालू असायचंच . पण ती जवळ नाही हे सारखं मनाला टोचत राहायचं अन तिलाही .
आल्यावर ती सारखी रडत बसे. शेवटी तीही एक स्त्री होती. तीही संवेदनशील होतीच.
तिची आई लहानपणीच गेली होती. त्यानंतर तिला तिच्या आत्यानेच वाढवलं होतं. अगदी आईसारखं. अगदी डोक्यातल्या उवा काढण्यापासून ते आजारपणात लाड पुरवण्यापर्यंत. तिला कधी आईची उणीव भासू दिली नव्हती. आत्याचं लग्न झालेलं नव्हतं. ती त्यांच्याच घरात राहत असे. जुन्या जमान्यातली ,नऊवारी नेसणारी. ती आत्या एकाएकी गेली. त्याचा तिला धक्का बसला होता.
मी त्या काळात तिला सारखा धीर द्यायचे . समजावून सांगायचे. विशेष म्हणजे आम्ही एकत्र असायचो. पण 'एकत्र ' यायचो नाही.
एकदा मी तिला म्हणाले ,"अगं, दुःख पुरे आता. आत्याचं तुझ्या जीवनातलं स्थान मलाही माहिती आहे."
"ती माझ्यासाठी आईपेक्षा जास्त होती गं !..." ती भरलेल्या आवाजात म्हणाली.
त्यावर मी म्हणाले, " मी तुझी नुसती पार्टनरच नाही. मीच तुझी आईही आहे."
"तुझ्यातल्या या बाईपणाच्याच्या मृदुगुणावर तर मी भाळले !" ती कातिल नजरेने माझ्याकडे पाहत म्हणाली. माझ्या दाट न सरळ, रेशमी केसांशी खेळत, जे तिला खूप आवडत. तिचे केस कुरळे होते ना.
बाहेर पाऊस सुरु झाला होता.
त्यावर मी जाम लाजले. पण मग मीच तिला जवळ ओढलं तिच्या गुबगुबीत मांसल देहाचा स्पर्श अनुभवते न अनुभवते तोच ती बाजूला सरकली.
“अंहं ! “ …
“का “ ?
“बाहेर ढगांचा न इथे माझा पिरियड आलाय…”, ती हसत हसत, वात्रटपणे म्हणाली .
“- चल हट , सगळा मूड घालवला !” मी म्हणाले ,” या निसर्गाची पण गंमतच आहे , नाही का ? आपण अशा आहोत, पण आपल्याही हा भोग काही चुकलेला नाही !”
ती मिश्किल हसत, लाजरं बघत ,पॅड घेऊन बाथरूममध्ये पळाली.
त्यादिवशी आम्ही ' एकत्र ' यायचं असूनही आलो नाही , हे वेगळं सांगायला नकोच.

-----
माझं चिकूचं अन तिचं आत्याचं दुःख मागे पडलं. आमचं रुटीन चालू होतं.
मला आता तिच्याशिवाय काही सुचत नसे.सारखी ती अवतीभवती असायचीच. रात्री तिच्याशी बोलल्याशिवाय मी झोपत नसे. आमचे व्हॉट्सअप डीपी देखील दोघींचे वेगवेगळे फोटोच असत.
सगळे आमची एवढी मैत्री आहे म्हणून जेलस होत असत. पण त्यांना आमची ' अंदर की बात ' कुठे माहिती होती.
आम्हाला जेव्हा जेव्हा संधी मिळायची. आम्ही एकमेकींना स्वर्गसुखात न्हाऊ घालायचो. तिने मला मिठीत घेतलं की माझ्या चित्तवृत्ती फुलू लागत. तिला एकटीला भेटायला मिळणार असेल तर मला कसंतरी व्हायला लागायचं. धडधड वाढायची , कानशिलं तापायची आणि -बरंच काही...
ती मला सॉलिड दमवायची. सारं काही करण्यात तिचाच पुढाकार असायचा. मला तिचं ऐकण्यात मजा वाटायची. एकदा शांत झालो की आम्ही एकमेकींच्या मिठीत बसून खूप गप्पा मारायचो. एकदम रिलॅक्सड वाटायचं.
एकदा ती म्हणाली,” एकदा आमच्या गावी जाऊ या. मस्त आहे आमचं.गाव .मोकळ्या हवेचं, निसर्गरम्य. रात्री अंगणात खाटल्यावर मस्त हवा खात,चांदणं पाहत पडायचं.”
“हो ! चालेल की ,पण नुसतं पडायचं, ओके ?”... मी तिच्या कुरळ्या केसांत बोटं गुंतवत म्हणाले.
माझ्या बोलण्यातला अर्थ कळल्यावर माझ्या मांडीला चिमटा काढत ती वाईट्ट हसली.

-----
एकदा अशाच आम्ही मिठीत असताना ती म्हणाली,
“ आपण म्हणजे परफेक्ट कपल आहोत !.”
"अर्थातच ! " मी म्हणाले. ही आपलीही एक लव्हस्टोरीच आहे . तुझ्या आठवणीने कधीकधी तर झोपच लागत नाही.
"पण आपण हे कोणाला सांगू शकत नाही. खुलेआम जाहीर करू शकत नाही. मन मारून जगावं लागतं.बाकीची पोरं-पोरी त्यांचं स्टेटस अगदी अभिमानाने अपडेट करतात. मला खूप वाटतं की जगाला ओरडून सांगावं -माझं तुझ्यावर प्रेम आहे!- पण नाही !"
"हं ! खरंय. मलाही खूप वाटतं. पण ही एक अदृश्य सामाजिक भिंत आहे. ती नाही तोडता येत. मलाही वाटतं, आपलं हे प्रेम कोणालातरी सांगावं, शेअर करावं. त्याचाही एक वेगळा आनंद असतो ना. निदान आईला तरी तुझ्या बद्दल सांगावं … आपल्याकडे कोहिनुर हिरा असावा आणि तो आपण भीतीमुळे कोणाला दाखवूच शकत नाही. असं वाटतं…ओझंच वाटतं…आयुष्य भराचं !
" कशासाठी ओझं ?” ती करवादली अन पुढे म्हणाली,” तो सुमनकुमार -एक इशारा केला ना तर पायावर लोळण घेईल माझ्या. त्याला एखाद्या जनावरासारखा बांधून उपभोग घेता येईल मला.पण नाही. एखाद्या माजावर आलेल्या पोरीचं समाधान करू शकेल तो, पण आपलं नाही ना- आपलं नाही. हे लक्षात घे ना तू !”
“तेच तर ना, म्हणून तर मला टेन्शन येतं. तळ्यात- मळ्यात वाटत राहतं. आपण नॉर्मल नाही असं वाटतं …मणामणाचं ओझं मनावर लादल्यासारखं वाटतं राहतं…ज्यामधून सुटका नाही . अन कधीच नाही. आई- बाबांचा चेहरा डोळ्यांसमोर येतो ... पुढे कसं होणार ? त्यांना कळल्यावर काय वाटेल? या विचाराने कधीकधी झोप लागत नाही.” मी म्हणाले.
“एकदा माझ्यामुळे झोप लागत नाही, तर एकदा या विचारांनी झोप लागत नाही ! दोन्हीकडून बोलतेस. सोड गं ते विषय ! “ म्हणत ती पुन्हा माझ्यावर आरूढ झाली.
मी पुढे बोलतच होते,”आईचा खूप आधार वाटतो गं.आई ही प्रत्येक मुलीची मैत्रीणच असते ना. म्हणून मला खूप वाटतं, इतर कोणाला नाही ,निदान आईला तरी सांगावं. खरंतर मी आईशी प्रत्येक गोष्ट शेअर करते. एक हे सोडलं… तर त्याचंही दडपण येतं. हे लपवण्याचं , हे आईला न सांगण्याचं मनाला ओझं वाटत रहातं .... ओझं !”
“तुला तर आई आहे . माझं काय ? हां- तशी आत्या होती . पण मला तिला असं काही सांगावंसं वाटलं नाही . कसं सांगणार ना ? हे आपलं आपलं - वैयक्तिक आहे ... फालतू कायतरी बोलत बसतेस - चल हट ,सगळा मूड घालवला !” म्हणत , मला एक फटका ठेऊन देत ती बाजूला झाली.
अन त्या क्षणाला अंगावरून तिचंच ओझं उतरल्यासारखं वाटलं.
मला तिचा खूप राग आला- खूपच ! असं वाटलं - सोडून द्यावं तिला अन तोडून टाकावं हे त्रासदायक रिलेशन… ब्रेकअप करून टाकावं !

-----
पण मी ब्रेकअप केलं नाही .
प्रेमात अशी अनबन तर चालतेच ना.आता माझं जग तीच तर होती. थोडा वेळ मध्ये गेला. पण आमचं गुळपीठ पुन्हा जमलंच.
आणि आम्ही एकटेच तर नाही ना जगात .असे किती जण आहेत आमच्याबरोबर .आम्ही तर आमची ओळख उघड करत नाही .पण स्वतःची ओळख न लपवता या विषयावर काम करणारे अनेक कार्यकर्ते आहेत. संस्था आहेत. आणि त्यांचे सातत्यपूर्ण ,अथक प्रयत्न चालू आहेत . हं - ही वेगळी गोष्ट आहे की त्यांच्याकडे समाज कुत्सित नजरेने बघतो .
आणि तो सोनेरी दिवस उजाडला -सहा सप्टेंबर २०१८ !
ज्यादिवशी या विषयावरच्या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिला. एलजीबीटी ' समुदायाला कलम ३७७ मधून वगळण्यात आलं. यापुढे त्यांना गुन्हेगार समजण्यात येणार नाही. हे स्पष्ट केलं.
खरंतर ही गोष्ट अगदी साधी, नैसर्गिक आहे. पण प्रचलित समाजधारणेप्रमाणे ती विकृत ठरते.यात काहीच अर्थ नाही. पण याविरुद्धच्या लढ्याला यश आलं . किती जणांनी हा ताण , हा भार आजतागायत पेलला असेल. दुःख, मानहानी सहन केली असेल.
पण तो निर्णय आला. आमच्यासारख्या कितीजणी असतील, ज्यांनी हा दिवस अत्याधिक आनंदाचा म्हणून साजरा केला. आणि आम्ही ?...
त्यादिवशी संध्याकाळीही आम्ही खूप आनंदात होतो. मस्त फिरलो. गार हवा सुटली होती अन पाऊस नव्हता.
तिने माझ्यासाठी तिच्या चॉईसचा एक टॉप घेतला. तिला माझं खूपच कौतुक आहे. तिला माझ्या आवडीनिवडी अगदी बरोबर कळतात. मी तिच्यासाठी एक गळ्यातलं घेतलं. एकमेकात गुंतलेले दोन बदाम ! तिनेही ते लगेच आनंदाने घातलं होतं.पण पेंडंट आत सोडलं होतं.तिने घातलेल्या तंग काळ्या टीशर्टच्या आत . लोकांना दिसू नये म्हणून.
मग मस्त पाणीपुरीच्या दोन-दोन प्लेट्स खाल्ल्या. रूमवर गेलो. तिच्या मैत्रिणी सध्या नऊच्या नंतरच यायच्या. ते आमच्या पथ्यावरच पडलं होतं.
मी तिच्या बेडवर पडले . मस्त लोळत . आळस देत , तिला आव्हान देत …
ती पण आज भलत्याच उत्तेजित अवस्थेत होती. आज तिला फ्रेश व्हायची सुद्धा गरज वाटली नव्हती . अन मलासुद्धा.
माझ्या शेजारी तिचा तो पांढरा टीशर्ट होता . दोन बदामांचा … तो एक स्पेशल सिम्बॉल होता - सूचक ! त्याचा अर्थ तिनेच एकदा मला मिठीत असताना सांगितला होता .
मी तो नाकाजवळ ओढला त्याचा वास घेतला अन ... तिला अंगावर ओढूनच घेतलं !…
आज तिलाच काय ,मलाही घाई झाली होती.
माझ्या अंगावर तिने दिलेला चिकनचा फिकट हिरवा टॉप होता. तो दुकानातच ट्रायल घेताना घातला होता . तिने तो पाहिला तेव्हाच तिला तो खूप आवडला होता . तो काढू नकोस म्हणून तिने सांगितलं होतं.
आता तोच टॉप तिने स्वतःच , हलकेच काढला. माझ्याकडे अनिमिष नेत्रांनी पहात तिने मला मिठीत घेतलं. माझ्या ओठांवर ओठ ठेवले. दीSर्घ चुंबन घेतलं.
आतमध्ये लाव्हा जमत होता...
मी खाली पडले तेव्हा मी तिला दिलेल्या नेकलेसमधले ते दोन गोल्डन,नाजूक बदाम माझ्या अनावृत्त स्तनांशी चाळा करत होते.
आम्ही एकमेकींचं अभिनंदन केलं.
अन दोन बदाम एकत्र होऊ लागले ! …
केव्हातरी ज्वालामुखी फुटला. शांत झाला.

-----
पुन्हा एकदा तिला मिठीत घेऊन , तिचं चुंबन घेऊन मी घरी निघाले.
मनाने अन शरीराने एकदम मोकळंमोकळं झाल्यासारखं वाटत होतं.
पण - अचानक , इतकं सुख उपभोगल्याचं एक अपराधी फीलींग मनात आलं . का ? ते कळेचना. अचानकच असं काहीतरी वाटायला लागलं ... कदाचित आता कितीतरी जण त्यांची ओळख स्पष्ट करण्यासाठी पुढे येतील म्हणून?... पण आपलं काय ? इतक्या वेळ ती बरोबर होती . पण आता एकाएकी एकटं पडल्यासारखं वाटलं. खूप एकटं.
मी घरी पोचले.दार उघडण्यासाठी आई बाहेर आली. तेव्हा छातीत धडधडलंच.
बाबा टीव्हीवर बातम्या पहात होते. कुठलंसं मराठी चॅनेल होतं. त्यावर आजची ब्रेकिंग न्यूज होतीच.कलम ३७७ ची.
ती हॉलमध्येच बातम्या पाहत थांबली . मी बाथरूममध्ये गेले. दार लावलं. फ्रेश झाले. पाण्याचा स्पर्श झाला तसं बरं वाटलं . ती मनातली खळबळ जरा बाजूला पडली.
माझं शरीर मी निरखून अन न्याहाळून पाहिलं. तिला आवडणाऱ्या माझ्या शरीराचा मला अभिमान वाटला. माझ्या देहावर अन चेहऱ्यावर एक वेगळीच चमक चढलेली होती आताशा.
मी दार उघडलं. पण बाहेर आले नाही. आई-बाबा बोलत होते. त्यांचं बोलणं माझ्या कानावर पडलं. ते मी तशीच दडून ऐकत राहिले.त्यांना वाटलं की मी अजून आत आहे. दार बंदच आहे.
पुन्हा मन आंदोळू लागलं…
बाबांची कडवट प्रतिक्रिया होती. " कोर्टाने मान्यच केलं म्हणजे संपलंच. अशा लोकांना ऊत येणार आता. आपल्या संस्कृतीचा ऱ्हास होतोच आहे. त्याला आणखी वेग येईल आता."
त्यावर आई म्हणाली," परिवर्तन म्हणजे जीवनाचा नियम आहे. आपल्याला नको असला तरी बदल हा होतच राहणार . त्याहीपेक्षा जास्त म्हणजे हे नैसर्गिक आहे, असं मला वाटतं. माणसामध्ये या प्रकारचीही सहज प्रवृत्ती असणार आहे. वेडं मूल कोणाला हवं असतं ? पण एखाद्याला नैसर्गिकरीत्याच वेडं मूल निपजतं ना. तसंच, ही प्रवृत्तीही. आपण दाबायचा प्रयत्न केलाच तर कुठलीही गोष्ट उसळून बाहेर येते. त्यापेक्षा ती नैसर्गिकरित्या प्रवाही राहू द्यावी."
"पुरे झालं तुझं लेक्चर ! " बाबा वैतागून म्हणाले.
पण आई वैतागली नाही. ती म्हणाली, " चिकू गेला ना तेव्हा सगळ्यात जास्त दुःख मला झालं -मला . त्याचं सगळ्यात जास्त मी केलं आयुष्यभर. तुम्ही सगळे नुसते आंजारायला -गोंजारायला . पण मी त्या दुःखाचं प्रदर्शन नाही करत बसले चार दिवस . अन तसंही बायकांना पदर खोचून उभं तर राहावंच लागतं, प्रत्येक क्षणाला . प्रत्येक गोष्टीला तोंड द्यायला . पण मी ती गोष्ट स्वीकारली . कारण जे घडतं ते आपण स्वीकारायला हवं . निसर्गात जे जसं आहे तसं आपण स्वीकारायलाच हवं. माझी निसर्गावर श्रद्धा आहे ."
बाबांनी तिला हात जोडले. आणि मग ते चष्मा पुसत बसले.
आई शांतपणे किचनमध्ये वळली.
मी बाहेर आले. किचनमध्ये गेले. मला आवडणाऱ्या पाटवड्यांच्या रस्साभाजीचा मस्त वास सुटला होता . पण आता माझं तिकडे लक्ष नव्हतं .
ती तुकारामांचा अभंग म्हणत होती . मी तो ऐकत राहिले –

हेचि थोर भक्ति आवडते देवा l संकल्पावी माया संसाराची
ठेविले अनंते तैसेचि रहावे l चित्ती असो द्यावे समाधान

तिला माझी चाहूल लागली. ती वळली,तिने माझ्याकडे पाहिलं.माझ्या डोळ्यांत पाणी होतं.
"काय गं ? काय झालं ? " तिने काळजीने विचारलं.
ते असह्य ,नकोनकोसं ओझं आता उतरवण्याची वेळ येऊन ठेपली होती…
मी पुढच्या क्षणाला रडतच तिच्या कुशीत शिरले. म्हणाले , " आई , मला तुला काही सांगायचंय गं..."
----------------------------------------------------------------------------------------------------
Bip499@hotmail.com

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

बोल्ड व वास्तववादी.
अजुनही अशी नाती माझ्याही पचनी पडत नाहीत. पण एक त्या त्या व्यक्तीचा चॉइस, पर्याय म्हणुन त्या नात्यांकडे बघता यायला हवे. यायला हवे - हे कळते पण वळत नाही.
अर्थात, याचा अर्थ मी टिका करेन, त्या लोकांना वाळीत टाकेन असा नव्हे.
_________
आईचे स्वगत आवडले. तिची व्यक्तीरेखाच आवडली.

घरात असं कोणी निघालं तर असंच समर्थन मिळेल का यात शंकाच आहे. आधुनिक काळात इंद्रिय तुष्टीकरण करण्याचा अधिकार प्रत्येकाला मिळालाय. पण रुढ चाकोरीबाहेरील वागणं स्विकारले जाईल याची शक्यता कमी आहे. शहरात अशा गोष्टी चालू असतील.

कथा तशी छान आहे... पण यात त्यांच्या प्रेमाचे बरेच पैलू अजुन दाखवता आले असते. मुळात लेस्बिअन किंवा गे लोकांना फक्त शरीर सुख हाच एक मुद्दा नाहीय. एखाद्याच्या opposite sex कडून ज्या अपेक्षा असतात त्याच त्यांच्या same sex कडून असतात. ही साधी बाब सांगण्यासाठी मला नाही वाटत की कथेत इतक्या जास्त प्रमाणात sexuality दाखवायला पाहिजे होती/मांडायला पाहिजे होती... मुळात चार भिंतींच्या आत सगळे सारखेच असतात. पण ह्याच कथेत कदाचित तुम्ही त्यांचा ऑफिस मधला डोळ्यातला रोमान्स रंगवून सांगू शकला असतात किंवा इतर काही...

तुम्ही मायबोलीवर लिहिण्यासाठी वेळ कसा काढता?
हा बोकलत यांचा धागा आहे .
त्यावर माझी ही प्रतिक्रिया आपण कृपया पहावी

बोकलत ,
तुमची ही व्यथा मी समजू शकतो . माझाही तोच प्रॉब्लेम आहे .
तुम्ही हा धागा काढला यावरून त्या मागची कळकळ समजते .
आभारी आहे .

खरं तर ,
मुळात , एकूण व्यापात ,
मला लेखनासाठी वेळ कमी मिळतो . वाचनही फारसं करायला मिळत नाही . - काहीच .
माबोहि नाही अन इतरही नाही .
पुस्तकं पाच दहा पानांच्या वर वाचली जात नाहीत
जेवढा वेळ मिळतो , जे शक्य आहे ते वाचतो .
जेव्हा शक्य आहे तेव्हा जसं जमेल तसे लिहितो .

माझ्या लेखनावर प्रतिक्रिया देणाऱ्यांनाही मी पटकन आभार म्हणू शकत नाही .
( त्यात एक गोष्ट आहे , की मी मोबाइलवरून काहीही ऑपरेट करत नाही ).
त्याबद्दल मी वाचकांची क्षमा मागतो .
मी कथासुद्धा टाईप करून घेतो . स्वतः करत नाही .
अंतिम हात तेवढा फिरवतो.

इथे माबोवर किती तरी सुंदर लेखन आहे .
ते न वाचण्याचं दुःख आहे . त्या त्या लेखकांना प्रतिक्रिया देऊ शकत नाही याचीही खंत आहे .

कृपया लेखकांनी आणि वाचकांनी ही अडचण , माझा हा दोष समजून घ्यावा - हि विनम्र विनंती

हे रिपीट करण्याचं कारण म्हणजे
काही प्रतिक्रिया विशेष असतात
त्या वाचकांचे
आभार मानणं किंवा
त्यांना योग्य प्रतिसाद देणं
हे मी करायला पाहिजे असताना करू शकत नाही
क्षमा असावी
वेळ असल्यास काही लेखन सबमिट करिन .
जमल्यास मुलांसाठी
आत्ताही
लॉक डाउन मध्ये सुद्धा मला फारसा वेळ मिळालेला नाही

कथा आवडली. त्यांच्या प्रेमाचे इतरही पैलू आले असते तर अजून आवडली असती. मला आईची व्यक्तीरेखा आवडली.

अजिंक्यराव पाटील
जयश्री साळुंके
प्रसन्न हरणखेडकर
तृप्ती
स्वाती

मनापासून आभार

सामो ++१११ माझ्या मनातलीच प्रतिक्रिया लिहीली आहेत. खरंच आहे कि अजूनही अशी नाती पचनी पडत नाहीत. पण कथा बोल्ड आहे. चांगली लिहीली आहे.

ही साधी बाब सांगण्यासाठी मला नाही वाटत की कथेत इतक्या जास्त प्रमाणात sexuality दाखवायला पाहिजे होती/मांडायला पाहिजे होती...>>> सदर कथेचा आवाका तुम्हाला उमगला त्याहून मोठा असू शकतो. इतरांबद्दल मी लिहू शकत नाही पण मला तरी या कथेत फक्त sexuality दिसली नाही. चिकू कुत्रा, बातमीवरची नायिकेच्या वडिलांची प्रतिक्रिया, त्यावरचं नायिकेच्या आईचं उत्तर हे कथेचे sexuality संदर्भातल्या चार दोन शब्दांपेक्षा जास्त महत्वाचे पैलू आहेत.

अजिंक्यराव पाटील
मी फक्त Sexuality बद्दल नाही बोलले.
कथा खूप छान आहे हे माझं पहिलं वाक्य आहे. पण इतर पैलू अजुन खुलवता आले असते...
यात सांगण्यासारख एवढंच होत की लेस्बो किंवा गे ही प्रचंड हळवी लोकं असतात आणि त्यांच्या भावना मांडण्याच्या पद्धती देखील खूप सुंदर असतात. ते देखील अजुन खुलवलं गेलं पाहिजे होतं...

चांगली कथा. अहो जेव्हा मनुष्यजातीचे अस्तित्वच संकटात आहे तेव्हा असे बेसिक इन्स्टिंक्ट बाहेर येणारच . आगदी नैसर्गिक आहे.

पूर्वी सुद्धा माबो वर सुबोध साने लिखित चहा वेलची कविता प्रसिद्ध झाली आहे. व चर्चा पण झाली तेव्हा.

काही जणांच्या तर या निमित्ताने मी ऋणातच राहू इच्छितो

कृपया थोडा वेळ घेतो आणखी प्रतिक्रियांसाठी