अडचणीचा जाहलो

Submitted by निशिकांत on 18 March, 2020 - 00:38

कोपर्‍यालाही घराच्या अडचणीचा जाहलो
मीच माझ्या अंगणाला अडगळीचा जाहलो

रेशमांचे बंध होते कैक विणले जीवनी
लुप्त सारे, एक धागा उसवणीचा जाहलो

जिंकली मी कैक शिखरे, सांजवेळी पण अता
मी चढावाचा प्रवासी, उतरणीचा जाहलो

सांत्वने देता मला का? सावरा अपुले जिणे
का विषय ढोंगी जनांच्या हळहळीचा जाहलो

आत्मवृत्तातील पाने घेतली लिहिण्यास मी
एक मी इतिहास आता वळचणीचा जाहलो

भक्त होतो ईश्वराचा ना कधी याचक तरी
मजबुरीने दास आता विनवणीचा जाहलो

कर्मकांडाने निराशा लाभली अन् , कार्यकर्ता
अंधश्रध्देच्या विरोधी चळवळीचा जाहलो

गुंतलो इतका प्रपंची, आस मुक्तीची वृथा
जन्म मरणाचा प्रवासी दगदगीचा जाहलो

आरसा "निशिकांत" सांगे मावळाया लागले
अंत दिसता, ओलसर मी पापणीचा जाहलो

निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users