त्यांची माती, त्यांची माणसं!

Submitted by चिमण on 11 March, 2020 - 11:54

'कुठल्याही देशात जा स्थानिक लोकं बाहेरून आलेल्या लोकांबद्दल चीड व तिरस्कार व्यक्त करताना दिसून येतील. एका दृष्टीने ते बरोबर आहे म्हणा! स्वतःचा प्रदेश ही बर्‍याच प्राण्यांच्या डोक्यात गोंदवलेली गोष्ट आहे. कुत्री, लांडग्यांपासून आदिमानवानापर्यंत आपल्या प्रदेशाचं रक्षण करणं, त्याच्या जवळपास कुणी येत नाही ना ते बघणं हे डिनए मधेच आहे. शिवाय, उपरे लोक त्यांच्या त्यांच्या विश्वात मग्न असतात, स्थानिक लोकात मिसळत नाहीत. म्हणून त्यांनी त्यांच्या कोषातून बाहेर पडायला हवं, इथल्या मातीत मिसळायला हवं!'... कुणाचं तरी भाषण मी जांभया देत ऐकत होतो. पण भाषणा नंतर जेवण असणार होतं त्यामुळे उठून पण जाता येईना. मनाशी म्हंटलं मी ह्यांच्या गर्दीत मिसळलो तरी मला एकाकी वाटतं तर मातीत काय मिसळणार? त्यातल्या त्यात पबात मिसळण्याची कल्पना भुरळ घालणारी आहे म्हणा! इकडचे पब हे आपल्या गावाकडच्या पारासारखे चकाट्या पिटायची प्रमुख ठिकाणं असतात. 'स्टिफ अपर लिप' वाले असले तरी या गोर्‍यांची पण जीभ तरल द्रव्यानं सैल होतेच व मग अदृश्य सांस्कृतिक भिंती कोलमडून पडतात. पण पबाचा उपयोग मातीत मिसळण्यासाठी करायचा असेल तर नित्यनेमाने एकाच पबमधे जायला पाहीजे तर ओळखी होणार! ते मी चालू केलं तर माझी बायको, सरिता, मी पक्का बेवडा झालोय म्हणून वडाभोवती उलट्या प्रदक्षिणा घालायला लागेल आणि समस्त शत्रुपक्ष माझं बौद्धिक घेईल ही मोठी भीति होती. मातीत मिसळणं हे चहात दूध मिसळण्याइतकं सोप्पं नव्हतं तरी मी जेवणानंतरचा विडा उचलता उचलता मिसळायचं ठरवलं.

योगायोगाने, मातीत मिसळायची एक संधी मला लवकरच चालून आली. ऑफिसच्या नोटिस बोर्डावर ज्युली कुठल्यातरी कार्यक्रमाचं जाहीर आमंत्रण लावत असताना मी तिला हटकलं....'कोणता प्रोग्रॅम आहे, ज्युली?'
'हा ना? हा ख्रिसमस कॅरॉल सिंगिंगचा!'.. ज्युली आमंत्रणाला पिना टोचता टोचता म्हणाली. माझ्यासाठी कॅरॉल, कॉयर, ऑपेरा, रॉक पॉप जॅझ इ. सर्व प्रकार एकाच वर्गात मोडतात, तो म्हणजे इंग्रजी गाणी!
'ओ ओके! म्हणजे तू असशीलच त्यात!'.. ज्युली आमच्या ऑफिसातली एक चांगली गाणारी बाई! इथल्या पबांमधे ती अधून मधून गळा साफ करतेच, शिवाय, दर वर्षी ऑफिसातल्या काही लोकांना बरोबर घेऊन ऑफिसच्या ख्रिसमस पार्टीत गिटार वाजवत कॅरॉल म्हणायचं कामही ती नित्यनेमाने करते.
'हो, मी आहे ना! तू पण ये की म्हणायला, चिमण!'.. ज्युलीनं मला सहजपणे अगदी तिच्या घरचं कार्य असल्याच्या थाटात आमंत्रण दिलं. वास्तविकपणे, ऑक्सफर्ड मधल्या एका हौशी लोकांच्या गटाने ख्रिसमस कॅरॉल म्हणण्याचा घाट घातला होता. नाताळ येऊ घातला की गणपती उत्सव जवळ आल्यासारखा लोकांच्या उत्साहाला उधाण येतं. दोन दोन महिने आधीपासून अशा काही बंपर सेलच्या पाट्या लागतात की चिरनिद्रिस्तांना देखील खरेदीचा मोह होईल. सगळीकडे दिव्यांचा झगमगाट व सजवलेली ख्रिसमसची झाडं उभारलेली दिसतात. शाळा, कॉलेज, ऑफिस किंवा मॉल.. जिकडे तिकडे नुसते लाल झगे आणि सॅंटाच्या टोप्या घातलेली माणसं कॅरॉल गाताना दिसतात. नाताळ म्हणजे ना ताळ, ना तंत्र असा अर्थ ध्वनित झाला तरी इथे धांगडधिंगा किंवा लाऊडस्पीकर वर लावलेली कर्णकर्कश बटबटीत गाणी याचा मागमूस पण नसतो!
'ऑं? मी? मी फक्त बाथरुम मधे गाणी म्हणतो, बॉलिवुडमधली, ती सुद्धा घाबरत घाबरत! कारण माझं गाणं ऐकून शेजार्‍यांचं कुत्रं रडायला लागतं. कॅरॉल तर मी बापजन्मी म्हंटलेल्या नाहीत. मला नाही जमणार ते!'.. कायच्या काय बोलते ही! कॅरॉल काय म्हण? ते काय बडबडगीतं गाण्याइतकं सोप्पय?
'तू काही वेळा येऊन तर बघ. इतकं काही अवघड नाहीये ते. नाही जमलं तर नको येऊस परत!'.. तिचं बरं आहे, डासाला गुणगुणनं जितक्या सहजपणे जमतं तितक्या सहजपणे ती गाते.
'पण आता सगळा कार्यक्रम ठरला आहे ना?'
'हो! ठरला आहे पण बसला नाहीये. गाणारे कमी पडताहेत. आणि नेमके पुरुषच कमी आहेत.'.. अरेच्चा! म्हणजे आवाज वाढवायला माणूस हवाय की स्टेजवरची गर्दी?
'बरं, बघतो!'.. मी तिथून काढता पाय घेतला. तालमी दर सोमवारी रात्री, अंधार संध्याकाळी 5 लाच पडत असल्यामुळे 7:30 म्हणजे रात्रच, असणार होत्या. माझ्या पहिल्या तालमीला अख्खे 5 दिवस होते. पण ते सर्व दिवस माझं डोकं 'आपलं संगीताचं ज्ञान चारोळीला महाकाव्य म्हणण्याइतकं अगाध त्यात इंग्रजीतल्या आरत्या म्हणायला कसं काय जमणार?'.. या विचारुंदराने कुरतडलं! शेवटी वैतागून मी जायचा निर्णय घेतला. आयटीत राहून कंप्युटरशी वैर करून चालत नाही ना तसंच!

'मी कॅरॉलच्या तालमीला जाणारेय दर सोमवारी'.. मी सरिताला शेवटी सांगितलं. तालीम हा फार जालीम शब्द आहे. गाण्याच्या प्रॅक्टिसला तालीम म्हंटलं की आखाडाच डोळ्यासमोर येतो. अर्थात, माझ्यासाठी तो आखाडाच होता!
'ऑं! हे खूळ कुठून आलं तुझ्या डोक्यात?'
'हे खूळ नाहीये! याला सोशल इंटिग्रेशन ऐसे नाव!'.. मी तिला गप्प करायला सोशल कॅलक्युलसचं जार्गन फेकलं.
'अरे पण तुला गाता तरी येतं का?'.. सरिताचा प्रामाणिक प्रश्न!
'नाही! पण आता इथल्या मातीत मिसळायला हवं ना!'
'तुला शेजारच्या कुत्र्याच्या डोक्यावर परिणाम झालाय ते माहिती आहे ना?'.. कुठे नुसतं रडणं नि कुठे डोक्यावर परिणाम होणं! पण सरिताला अतिशयोक्ती आवडते, वर ती माझ्याकडूनच शिकली आहे म्हणते.
'अगं तिकडे कार्यक्रमाला कुणी कुत्री आणणार नाहीयेत.'.. माझा खुलासा तिला पटला नाही.
'अरे तू कधी गणपतीच्या आरत्या म्हणायची तरी तसदी घेतलीयेस का? काही तरी वेगळं कारण आहे नक्कीच! हां बरोब्बर! गाणार्‍या मैना खूप असतील नाही का!'.. तिला माझ्या गाण्याबद्दल जितकी खात्री आहे तितकी माझ्या वेड्याविद्र्या चेहर्‍याबद्दल असती तर तिने हा शेरा मारला नसता. सरिताला एखाद्या पुरातत्वशास्त्रज्ञाच्या उत्साहाने माझ्या डोक्याचं उत्खनन करून माझ्या नसलेल्या लफड्यांबद्दल तर्कवितर्क करण्याची फार हौस आहे.
'मला काय माहिती तिथे मैना आहेत की कावळे? मी गेलोय कुठे अजून? तू पण ये तालमीला मग, मैना किती आहेत ते बघायला!'
'नको! तुझं गाणं ऐकून कान किटवण्यापेक्षा मी जुने पिक्चर बघेन युट्युबावर!'.. मला माझी गोळी लागल्याचा आनंद झाला.

सोमवारी ठरल्या वेळेला मी गेलो. ऑक्सफर्डातलं चीनी ख्रिश्चन लोकांचं चर्च हे तालमीचं ठिकाण! चिन्यांमधे पण ख्रिश्चन पोटचिनी असतात हे मला नव्यानंच समजलं. त्या चर्चच्या एका भागात छोट्या समुदायासाठी योग्य असं एक नाट्यगृह होतं, चक्क! सर्व मंडळी जमलेली होती. मी धरून चार पुरुष सोडता बाकी सगळ्या मैना होत्या. त्यातला जॉन पियानोवर बसला होता! बहुतेक जण माझ्यापेक्षा म्हातारे होते. सर्वांची ओळख ज्युलीनं करून दिली. जवळपास प्रत्येकांनं 'तुझं नाव लक्षात रहाणार नाही, पण प्रयत्न करेन' असं भरघोस आश्वासन दिलं. मी पण कुणाचं नाव लक्षात ठेवण्याची खात्री दिली नाही.
'ही मेरी! आपली कंडक्टर आणि हा चिमण!'.. सगळ्यात शेवटी ज्युलीनं मेरीची ओळख करून दिली. मेरी कंडक्टर तर जॉन ड्रायव्हर की काय असा प्रश्न मला चाटून गेला.
'गिव्ह मी अ‍ॅन ए!'.. नमस्कार चमत्कार झाल्यावर मेरीनं मला फर्मावलं. मी बुचकळ्यात पडून इकडं तिकडं पाहील्यावर ज्युलीनं मला ए चा सूर लावायला सांगितला. तरिही मला काही समजलं नाहीच. मग मी जोरात इंग्रजी अक्षर 'ए' म्हंटलं. त्या बरोबर तिथे टिपुर शांतता पसरली. सभ्यतेच्या दडपणामुळे दोघींनी चेहरा निर्वीकार ठेवायचा आटोकाट प्रयत्न केला. मग मेरीनं पियानोवर ए वाजवला आणि मी त्या सुरात रेकायचा प्रयत्न केला. त्यांचे सूर ए बी सी डी ई एफ जी असे असतात हे कुणा लेकाला माहिती? अर्थात, तिनं 'सा' लावायला सांगितला असता तरी ते मला जमलं नसतंच, ती गोष्ट वेगळी! पण निदान ती सूर लावायला सांगतेय हे तरी कळालं असतं. ए बी सी डी ही काय सुरांची नावं झाली? आपल्या सुरांना सा रे ग म ऐवजी ट ठ ड ढ म्हंटलं तर खिळा ठोकण्याइतकं असुरी वाटेल की नाही?

मेरी मला नापास करणार आणि घरी जायला सांगणार हा आनंद फार काळ टिकला नाही. तिनं निर्विकारपणे कॅरॉलचं, त्यांच्या नोटेशन मधे लिहीलेलं, एक पुस्तक हातात खुपसलं. त्यात एका खाली एक असे बर्‍याच आडव्या रेघांचे पट्टे आणि त्यात लवंगांसारख्या दिसणार्‍या भरपूर उभ्या दांड्या होत्या. त्या आडव्या रेघांच्या ओळी बघून मला शाळेतल्या इंग्रजीच्या वहीची क्लेशकारक आठवण आली. काही लवंगांच्या खाली गाण्याचे शब्दं लिहीलेले होते. हायला! या लवंगा बघून खायचं सुचेल फार फार तर, गायचं कसं सुचणार? पण त्या सर्वांना ती लवंगी भाषा सगळ्यांना समजत असली पाहिजे हे जाणवून मला त्यांच्याबद्दल अतिआदर वाटायला लागला. तसंच मी ही लवंगी भाषा कधी शिकणार आणि कॅरॉल कधी म्हणणार याची चिंता लागली.

'आता आपण 'शो मी द वे' ही कॅरॉल म्हणू. मागच्या वेळेला नीट जमलेलं नव्हतं म्हणायला.'.. मेरीनं हातात छडी घेऊन सुरवात केल्यावर मला धडकीच भरली. शाळेतल्या छडी-सख्याच्या आठवणीनं माझ्या हाताला झिणझिण्या आल्या. ..'सोप्रॅनोज, आल्टोज आणि टेनर्स ... तुम्ही 'शो मी द वे' हे शब्द बार 25 व 26 पान 8 प्रमाणे म्हणायचे. सोप्रॅनोज, बारची सगळ्यात वरची लाईन तुमची, आल्टोज त्याच्या खालची आणि टेनर्स त्याच्या खालची.'.. मेरीनं ती ओळ तिन्ही प्रकारे म्हणून दाखवली आणि सगळ्यांकडून घासून घेतली. वेगवेगळ्या लोकांनी तीच ओळ एकाच वेळी वेगवेगळ्या पद्धतीनं म्हणायची याचं मला फारच अप्रूप वाटलं. सोप्रॅनो, आल्टो, टेनर, बेस इ. नावं वेगवेगळ्या पट्टीत गाणं म्हणणार्‍यांना असतात हे मी घाईघाईनं गुगल करून शोधलं! पण त्यातला मी कोण हे सांगायची तसदी मेरीनं न घेतल्यामुळे मी गुमान गुगलची माहिती वाचत राहीलो. सोप्रॅनो व आल्टो म्हणजे मुख्यत्वेकरून नैसर्गिकपणे उंच व खालच्या सुरात गाणार्‍या बायका! तर उंच व खालच्या सुरात गाऊ शकणारे पुरुष हे टेनर व बेस! हे ढोबळ वर्गीकरण आहे अर्थात! लवंगी भाषेत सोप्रॅनो, आल्टो, टेनर व बेस यांच्या ओळीच्या अलिकडे 'S', 'A', 'T' व 'B' असं लिहीलेलं असतं. मला ते पुस्तकात दिसल्यावर थोडं समजल्याचा आनंद झाला.

मेरीचं गायन मात्र मला आवडलं. तिचा आवाज सुरेल आणि ठणठणीत होता. बर्‍याच मैनांचा आवाज पियानोच्या वर ऐकू येत नव्हता पण मेरीचा मात्र अगदी स्पष्टपणे येत होता. उरलेला सगळा वेळ हा बार मग तो बार असं बार बार लगातार झाल्यावर माझ्या डोळ्यासमोर वेगळाच बार तरळायला लागला. कारण, मला जाणवलं की मला कुठल्याच कॅरॉलची चाल माहिती नाहीये, मग गाणार काय? चालीशिवाय गाणं हे पाण्याशिवाय अंघोळ करण्याइतकं कोरडं! ज्ञानेश्वरांनी जरी रेड्याकडून कुठलंही नोटेशन नसलेले वेद वदवून घेतले असले तरी माझ्याकडून नोटेशन असलेल्या कॅरॉल वदवायला मेरी काही ज्ञानेश्वर नव्हती.
'मेरी! मला ती लवंगी भाषा समजत नाही आणि कुठल्याच कॅरॉलच्या चाली मला येत नाहीत. त्यामुळे, सॉरी! हे मला काही जमणार नाही!'.. तालमी नंतर सगळे नष्ट झाल्यावर मी मेरी मातेला साकडं घातलं.
'ओह! डोंट वरी, वरचे वरी! इथे एक दोघे सोडता कुणालाच ती भाषा येत नाही! आणि चालींसाठी मी या गाण्यांची सीडी बघते घरी आहे का ते! तेव्हा तू येत रहा!'.. नाईलाजाने पुढच्या तालमीला गेलो. तेव्हा मेरीनं तिच्याकडे सीडी नसल्याचं जाहीर केलं. घरी गेल्यावर युट्युब वर नाही तर दुकानात ती गाणी शोधायचं ठरवून त्याही तालमीत मुक्याची भूमिका घेतली. पुढच्या काही दिवसात कुठेही गाणी न मिळाल्यामुळे मी अस्वस्थ झालो. इतर लोकांना त्या कॅरॉल माहिती होत्या कारण लहानपणापासून ते त्या ऐकत आलेले होते! मेरी मला मुळीच सोडायला तयार नव्हती. तिनं मला 'घाबरू नकोस! इतक्या लोकांमधे तू सहज लपशील!' म्हणून उलट धीर देला. मग मी त्या गाण्याच्या तालमीच मोबाईलवर रेकॉर्ड करून घरी ऐकायला लागलो. त्यामुळे काही गाण्यांच्या चाली समजल्या आणि मी कुजबुजत्या आवाजात थोडं फार म्हणायला पण लागलो. पण मेरी कधी कधी एखादं गाणं रद्द करून दुसरं घ्यायची त्यामुळे माझे परिश्रम वाया जायचे.

'मग काय चाल्लंय हल्ली?'.. एका मित्राचा फोन आला.
'काही नाही, मजेत! तुझं कसं काय?'.. मी स्टॅंडर्ड उत्तर फेकलं.
'चिमण हल्ली भजनं म्हणायला जातो.'.. सरितानं पुस्ती जोडली.
'करून करून भागला नि देवपूजेला लागला?'.. 'करून' वर जोर देत नि गडगडाटी हसत तो म्हणाला.
'अरे बाबा! इथल्या मातीत मिसळायचा प्रयत्न चाललाय. त्यासाठी कॅरॉल सिंगिंग करायला जातो.'.. त्यानं आणखी काही तारे तोडू नये म्हणून मी घाईघाईनं म्हंटलं.
'तुला पोपटाचं माहिती आहे ना?'.. त्यानं गुगली टाकला.
'काय?'
'पोपट म्हणे अनोळखी ठिकाणी आले की आजुबाजूचे वेगळे आवाज ऐकून आपणही त्यांच्यातलेच एक आहोत हे दाखवायला तसेच आवाज काढायचा प्रयत्न करतात. थोडक्यात तुझा पोपट झालाय.'.. परत एक गडगडाटी हास्य आलं. त्यानं माझा आणखी पोपट करू नये म्हणून मी फोन आवरता घेतला.

नेटाने मी तालमीला जात राहीलो. गाण्याची चाल समजली तरी इंग्रजीत गाणं म्हणायचं जिभेला वळण नव्हतं. त्यात एक दोन गाण्यात इंग्रजीचा खून पाडलेला.
De Virgin Mary had a baby boy and they say that his name was Jesus
He come from de glory, he come from the glorious kingdom
आता the च्या ठिकाणी De किंवा 'He come' हे कुठल्या व्याकरणात बसतं? हो! मी छड्या खात खात हे खूप वेळा ऐकलंय.. 'चिमणराव म्हणा... आय कम, यू कम, ही शी इट कम्स, दे ऑल कम!'.
'हे पहा 'हीss' नाही म्हणायचं, इथे ती नोट क्वेव्हर आहे. तेव्हा नुसतं हि असं पटकन म्हणा.. हि कम फ्रॉम द ग्लोरी'.. मेरी मधेच तिचं लवंगी ज्ञान पाजळायची. होता होता कोरस मधे आवाज न चोरता गाण्यापर्यंत माझी मजल गेली. आयुष्यभर हिंदुस्थानी संगीत कानावर पडल्यामुळे यांच्या चाली जरा वेगळ्याच वाटतात, निदान मला तरी! त्यामुळे त्यांना आपली गाणी म्हणायला सांगितली तर त्यांचीही माझ्यासारखीच गत होईल असं मला वाटतं. जर त्यांना मालकंस रागातल्या दोन ओळी म्हणायला सांगितल्या तर ते त्याचा धमालकंस करतील.

एके दिवशी मेरीनं पॉल नावाचा एक चांगलं गाऊ शकणारा माणूस यायला लागणार असल्याचं जाहीर केल्यावर मैनांचा पहिला प्रश्न आला..'त्याचं लग्न झालंय का?'.. मला त्यांच्या डायरेक्ट अ‍ॅप्रोचची गंमत वाटली. आमच्या कार्यक्रमात काही सोलो गाणी पण असणार होती. मेरी फार धाडशी बाई! तिनं मला सहजपणे 'एखादं सोलो म्हणशील का?' असं विचारलं आणि मी तडकाफडकी नकार दिला. काही गाण्यांच्या नंतर ख्रिस्ताच्या जन्मकथेशी संबंधित गोष्टी सांगायची पण प्रथा असते. त्यालाही मी नकार दिला. पण त्या गोष्टी ऐकता ऐकता कृष्ण व ख्रिस्ताच्या जन्मकथेत खूप साम्य आहे हे जाणवलं... बायबल व महाभारत लिहीणारे एकाच मातीत खेळले होते की काय असं वाटावं इतकं!

एका सोमवारी मी आजारी असल्यामुळे गेलो नाही, एकदम पुढच्या सोमवारी गेलो. तेव्हा लक्षात आलं की मागच्या सोमवार नंतर अजून एक तालीम होऊन गेली आहे कारण मुख्य प्रयोग शुक्रवारी असल्यामुळे वेळ उरला नव्हता. त्यात मेरीनं मला त्यातल्या त्यात बरी येणारी दोन गाणी उडवली होती आणि त्याजागी दोन नवीन गाणी घातली होती. रेकॉर्डिंगवर जमेल तितकी प्रॅक्टिस करून शुक्रवारी हजर झालो. कार्यक्रमाला चक्क 40/50 लोकं हजर होती त्यात शाळेत जाणारी मुलं पण! कार्यक्रम सुरू झाल्यावर जमेल तिथे तोंड घालण्या पलिकडे मला काम नव्हतं म्हणून मी प्रेक्षकांचं निरीक्षण करत बसलो. ते सगळे आमच्या बरोबर गात होते, मुलं पण! हे मला फारच नवीन होतं. सर्व प्रेक्षकांनी नंतर सगळ्यांचं कौतुक केलं.. हो! माझं पण! काय सभ्य लोकं आहेत ना हे?

शेवटी मनासारखं मातीत मिसळणं झालं नाही त्याचं थोडं वाईट वाटलं! पण जिथं मेघन मार्कलला पण शाही मातीत मिसळणं जमलं नाही तिथं माझी काय कथा? शिवाय, मातीत माझ्यासारखे खडे कसे काय मिसळणार?

तळटीप:
सोप्रॅनो, आल्टो, टेनर व बेस हे एकत्र गाताना ऐकणं हा एक वेगळाच पण सुखद अनुभव आहे. त्यासाठी हांडेल(1685-1759) याने रचलेली 'फॉर अन्टु अस अ चाईल्ड' ही कॅरॉल जरूर ऐका.

साधारणपणे 15 व्या सेकंदाला गाणं चालू होतं.

पहिल्या 29 सेकंदानंतर बार 12 पाशी सगळ्यात डावीकडे S व T लिहिलेलं दिसेल. त्या सोप्रॅनो आणि टेनरच्या ओळी आहेत. सोप्रॅनोनी 'गिव्हन' म्हंटल्यावर एका बीट नंतर टेनर सुरू होतात आणि पुढच्या बार मधे 2 बीट झाल्यावर सोप्रॅनो म्हणतात.

33 सेकंदापाशी बार 15: इथे टेनर E सुरापासून सुरुवात करतात तर सोप्रॅनो G पासून आ आ आ म्हणू लागतात.

47 सेकंदापाशी, बार 21: इथे आल्टो आणि बेस आहेत. इथे बेस आ आ आ म्हणतात. दोघांच्या पट्टीतला फरक लगेच कळेल.

1:09 पाशी, बार 30: इथे सगळे ऐकू येतील. प्रत्येक ग्रुप वेगवेगळ्या बीट वर गाणं उचलतो.

-- समाप्त --

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धमाल लिहिलंय. मातीत मिसळण्यासाठी जो काही खटाटोप केलाय/धाडस केलय ते कौतुकास्पद आहे.
जर त्यांना मालकंस रागातल्या दोन ओळी म्हणायला सांगितल्या तर ते त्याचा धमालकंस करतील. >> हे खूप आवडलं

भारीच चिमणराव !! अगदी कॅरोलिंग नाही पण चर्च मधल्या पुस्तकात असणारी ख्रिसमसची गाणी म्हणायला फार मजा येते. आमच्याकडे ख्रिसमस इव्हला कँडललाईट सर्वीस असते त्यात तर फार भारी वाटते. त्यावेळेस लाईट्स डीम करून सगळे मेणबत्त्या पेटवतात आणि सायलेंट नाईट म्हणतात.

हे सोप्रॅनो, आल्टो, टेनर व बेस भारी आहे. अजून माहिती मिळवायला पाहिजे Wink

भारी मज्जा आली वाचायला. आपण पण करुन बघावं हे असं वाटलं वाचुन एकदम. अर्थात तुम्हला सुरांचं थोडं तरी ज्ञान असणारच म्हणा. मी अगदीच 'ढ' आहे. तरीही.....

छान लिहिलंय. मजा आली वाचायला. कॅरोल म्हणजे काय असेल याचा जरासा अंदाज आला.
सोप्रॅनो, आल्टो, टेनर व बेस - हे शब्द असे एकत्र प्रथमच ऐकले.
शेवटी दिलेली कॅरोल नक्की ऐकणार. Happy

सगळ्यांना धन्यवाद!

धनि, सायलेंट नाईट ही मूळ जर्मन (“Stille Nacht”) कॅरॉल आहे. या कॅरॉलची एक कहाणी विलक्षण आहे. पहिल्या महायुद्धाच्या वेळी जर्मन आणि ब्रिटिश सैन्य कित्येक महिने आपापल्या खंदकामधे ठिय्या देऊन होते. तेव्हा ख्रिसमसच्या आदल्या रात्री जर्मन खंदकातून या कॅरॉलचे सूर ब्रिटिश खंदकापर्यंत ऐकू आले. त्यांना शब्द कळत नव्हते, पण सुरांमुळे ते काय म्हणताहेत ते झटकन समजलं आणि ते सायलेंट नाईट म्हणायला लागले. इतकंच नाही तर ख्रिसमसच्या सकाळी दोन्ही बाजुचे सैनिक खंदका बाहेर आले आणि त्यांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. इथे त्या बद्दलची माहिती वाचू शकतोस: https://www.history.com/news/world-war-is-christmas-truce-100-years-ago

>> तुम्हला सुरांचं थोडं तरी ज्ञान असणारच
हा हा हा! चांगला आहे विनोद, रिया! Wink

>> शेवटी दिलेली कॅरोल नक्की ऐकणार.
जरूर ऐक लले आणि मला नंतर सांग कशी वाटली ते.

मस्त लिहीले आहे! लवंगी भाषा ही शब्दरचना प्र-चं-ड आवडलेली आहे Happy

शेवटी मनासारखं मातीत मिसळणं झालं नाही त्याचं थोडं वाईट वाटलं! >>> अजिबात नाही. तू जे उद्योग केलेस त्यालाच मातीत मिसळणे म्हणतात.

माझ्यासाठी कॅरॉल, कॉयर, ऑपेरा, रॉक पॉप जॅझ इ. सर्व प्रकार एकाच वर्गात मोडतात, तो म्हणजे इंग्रजी गाणी! >>> यातली आतिशयोक्ती गृहीत धरून माझ्यासाठीही हे असेच होते. आता जरा तरी फरक कळतो. बाय द वे मी हे वरचे वाक्य शोलेतील अमिताभच्या "मुझे तो सब पुलिसवालोंकी सूरते एक जैसी दिखती है" च्या स्टाइलमधे वाचले Happy

सोप्रॅनो, आल्टो वगैरेंचा तर गंध नाही. आल्टो म्हणजे low व्हॉइस हे एक आश्चर्यच आहे. जरा अवांतर - सर्च केल्यावर असे दिसते की contralto शब्दाचे ते शॉर्ट असावे. कारण सर्वसाधारण अर्थाने आल्टो हे उंचीशी संबंधित आहे (altitude). बे एरियातील त्या प्रसिद्ध भागाचे नाव पॉलो ऑल्टो का आहे ते शोधले होते तेव्हा तेथे कोठेतरी असलेल्या उंच झाडावरून ते पडलेले आहे असे एका ठिकाणी वाचले होते.

आपकी चिकाटी उर्फ लगन को हम्रा सल्लाम! पुढं आणखी प्रगती नक्कीच झाली असणार हे गाण्याची.‌ पुढचा प्रवास देखील लिहा. धन्यवाद.

सर्वांना धन्यवाद!

फारेंडा, खालच्या सुरात गाणार्‍या स्त्रिया या आल्टो मधे मोडतात. त्यांचा सूर सोप्रॅनो आणि टेनर यांच्या मधे कुठेतरी येतो. ज्या स्त्रिया आल्टोच्याही खाली गाऊ शकतात त्यांना कॉन्ट्राल्टो म्हणतात ज्यांचा सूर टेनर च्या रेंजमधे येतो. इथे जास्त माहिती मिळेल: https://www.musicnotes.com/now/tips/determine-vocal-range/

आसा Lol