सरमिसळ एक भयंकारी रोमांच भाग तीन

Submitted by मुक्ता.... on 13 February, 2020 - 15:29

सरमिसळ एक भयंकारी रोमांच...भाग तीन
हतबलतेतून पुन्हा उभारी

एक लालसर प्रकाशमान वेटोळी आणि जमिनीवर उमटलेली विचित्र अक्षरं....आणि लाल प्रकाशाचा उष्मा...वत्सलची पावलं लालसर झाली. खिडकीच्या फटीतून पुन्हा काही पसार झालं. देवकी आणि नविनला बेडरूममध्ये शांत झोपलेलं पाहिलं. देवकी च्या डोळ्यावरही अलगद गावठी गुलाबपाण्याच्या पट्ट्या ठेवून वत्सल बाहेरच्या खोलीत आली.
ध्यान लावून वत्सलने गायत्री मंत्राचा जप केला.आणि मनस्थिती पूर्ववत आणली. मन एकाग्र केले.ध्यानाच्या तिसऱ्या अवस्थेत पोचल्यातनंतर आपले साध्य पुन्हा आठवले. नवीन आणि देवकीच्या भूतकाळात डोकावायला सुरवात केली. नवीन आणि देवकीच्या पूर्वायुष्यात घडलेल्या घटनांचा पट ओझरता उमटला. ते पाहून वत्सल हादरली. साधारण अंदाज आला. की गैरसमजांचं जाल पसरवण्यामागे काही सुप्त हेतू होते.खर काय ते मात्र नवीन आणि देवकी याना माहीत होते.
प्रत्येकाच्या बाबतीत घडणाऱ्या घटना वेगळ्या होत्या. प्रत्येकाला भेटलेली व्यक्ती वेगळी होती. वत्सल म्हणून देवकीच्या मोबाईल वरचे फोटो नऊवारी साडीतल्या बाई, वत्सलआत्याला देवकी म्हणून भेटलेली मुलगी, वत्सलला दरवाजा उघडणारी अनोळखी मुलगी, नविनला दरवाज्यात धमकी देणारी मुलगी….सगळीच....उलगडा होईलच म्हणजे करावाच लागेल कारण....देवकी आणि नवीन यांचे प्राण संकटात होते ,म्हणजे उघड उघड धमकी देत होतं कुणीतरी....

घुम घुम घुम सररररररर स्टिक स्टिक
स्क्याव स्क्याव....स्कुइझ स्कुइझ टक्क टक्क..
आकाशात आतिषबाजी करणारे रॉकेट सारखे फटाके कसे आवाज करतात ना तसे आवाज येऊ लागले.
लाल आणि हिरव्या प्रकाशाचे पुन्हा वेटोळे एकमेकांत गुरफटत होते......

खिडकीत खुडबुड चालू होती. वत्सल जवळ गेली तर तिला लाल आणि हिरव्या रंगाचे दोन कण एकमेकांवर आदळताना दिसले. वत्सल जवळ जाताक्षणी ते दोघे गायब झाले म्हणजे त्यांनी खाली उडी मारली. आणि एक काळं आणि पांढरं मांजर कंपौंडच्या भिंतीवर चालू लागलं.
वत्सल ते पाहू शकली नाही. कारण नवीन च घर 10व्या मजल्यावर होतं.
म्हणजे या खेपेला त्यांना आत येता आलं नाही. वत्सल आत्या आत्ता त्या मनस्थिती मध्ये नव्हत्या, त्यांचं डोकं सुन्न झालं. येऊन फक्त आठ तास झाले होते आणि इतकं काही अनाकलनीय, काळ खूप हळूहळू पुढे सरकत होता. गेली सहा वर्षे मात्र वेगाने मागे पडली. नवीन पुरता दुरावला होता. नविनला वाटत होतं देवकीवरच्या रागामुळे त्याची माय त्याला भेटत नव्हती. वत्सल आत्याना वाटत होतं की देवकी मुळे नवीन ने सर्वांशी संपर्क तोडलेले.…हिकडं आल्यावर सगळंच निराळं.....
कोण होता या गैरसमजाचा सूत्रधार,एक की अनेक?
काळजीने इतका जीव कालवला होता...."काही तास,फगस्त काही तास म्या हितं आले आन येव्हढी हालत का काळजीने जीव घुसमटाया लागला...गेली तीन वरस माजी पोरं ह्ये भोगवटे भोगत्यात....." वत्सलला रडू कोसळलं.
त्या लालसर प्रकाशाने वेटोळे घातल्यानंतर तिला थकवा जाणवू लागला. आणि तर्कशक्ती काम करत नव्हती.पहिल्यांदाच आपण कमजोर झाल्याची जाणीव वत्सलला झाली. आपल्यात झालेला भीतीचा चांचुप्रवेश वत्सलला जाणवला.
वत्सलला कुणाचा तरी आधार हवा वाटू लागला. "गुरुजींसनी फोन करावा का? का अव्याला करावा? काय करू म्या, काय सुदीक समजना झालया!!!"
वत्सल कपाळाला आठ्या घालून विचार करू लागली....
काहीतरी हालचाल करायला हवी होती...
वत्सलने तिचे योग गुरू विजय आणि अव्या म्हणजे अविनाश दोघांना फोन करायचे ठरवले.

सर्वप्रथम तिने विजय यांना फोन लावला.....
"ओम!!" पलीकडून आवाज आला....विजयचा आवाज ऐकताक्षणी वत्सलच्या आत्मविश्वासात वाढ झाली.
"नमस्ते, विजयराव, म्या वत्सला बाई बोलती!!"
विजय प्रसन्न हसून म्हणाले" वत्सल आत्या बोला. तुम्ही संपर्क साधण्याची वाट पहात होतो."
"व्हय, आज माज्या गुरूंनी परत ज्ञान द्येण्याची येळ आलिया, माझी मती काम करीत न्हाय, म्या काय करू, गावात बी न्हाय, तुम्हाला भेटाया न्हाय मिळायचं!!"
"मी जाणतो ,वत्सला आत्या, पण तुम्ही नविनच्या बाबतीत असलेला घटनाक्रम पूर्ण सांगा, तुमचे अनुभवकथन महत्वाचे आहे."
विजयना वत्सलने पूर्ण प्रकार सविस्तर सांगितला.
विजय म्हणाले "वत्सला आत्या हे जे काही आहे ते प्रचंड चलाख आणि शक्तिशाली आहे. नक्कीच आपल्या मेंदूच्या पलीकडे आहे. आत्या आपल्याला घाई करून चालणार नाही. मी सवड काढून ,लवकरात लवकर तिथे येतो. हे भेटून बोलावं लागेल. निश्चितच काही मोठं आहे. तोपर्यंत नवीन आणि देवकीला जपावं लागेल. तुमच्या येण्याने ते बिथरले आहेत. ज्या अर्थी तुम्हाला पाहून तो हिरवा प्रकाशझोत पळतो त्या अर्थी त्याला तुमचं आत्मतेज सहन होत नाही. लाल प्रकाश मात्र वेटोळ्या प्रदक्षिणा घालतो. आणि तुम्ही विचित्र अक्षर पाहिलीत, म्हणजे काही सांगण्याचा हा प्रयत्न असावा अथवा तुम्हाला इजा पोचवण्याचा प्रयत्न..."
" अव्या , अव्याला सम्पर्क करा, तो मदत करू शकेल"
"आपण न्यूझीलंडच्या कॉन्फरन्स ला गेलो होतो तेव्हाचा तुडतुडीत तरुण"
विजय वत्सलशी बराच वेळ बोलले. वत्सलने गमावलेला आत्मविश्वास परत मिळवला. ती स्थिर झाली. आपण कमकुवत झालो तर आपणही त्या शक्तींचा बळी ठरू आणि काहीच करू शकणार नाही याची तिला जाणीव झाली.
वत्सल आणि विजय यांचे बोलणे अव्या म्हणजे अविनाश वर येऊन सम्प्ले.
" येस माय गावरान गर्लफ्रेंड, आज या गरिबांची आठवण कशी?" अव्या पलीकडून म्हणाला,
"मुडद्या,आर फोन वर बी ह्ये आस बोलत्यात व्हय? म्या..." वत्सल लटक्या रागाने म्हणाली...
"ऑल राईट मावशी, भलत्याच काळजीत दिसतेस, टेल मी, मी काय करू शकतो तुझ्यासाठी?"
"ऐक पोरा...म्या हित माज्या पोराकड आल्ये...कारन मला कुणीतरी सांगावा धाडला का माज लेकरू संकटात हाय, पर कुनि त्ये न्हाय म्हैत! आता हितं काय घडलं त्ये आईक..."

वत्सलने सगळा घटनाक्रम अव्याला सांगितला!

अव्या लक्षपूर्वक ऐकत होता, टॉक, तो म्हणाला" मावशी विजय म्हणाले तसं हे सरधोपट नाही, भयंकर आहे. पण सत्य आणि शिव याहून नाही. आपण भेटू. तू एकच कर लवकरात लवकर स्मार्ट फोन घे. आणि शिक तो ऑपरेट करायला.दुसरं एक सांगतो ते कर....दोन काचेचे ग्लास घे आणि……abcdefg…"कळलं का गर्लफ्रेंड? "
"मुडद्या..."वत्सल हसू लागली ,तिकडे अव्याही हसला.आणि हा फोनकॉल संपला.
विजयने नविनच्या घरातील द्रव पदार्थ सेवन न करण्याचा वत्सलला सल्ला दिला.आणि नवीन आणि देवकीलाही देऊ नयेत असे सांगितले.तिने पहाटेच्या पहिल्या प्रहरी ध्यान लावले. सूक्ष्म देहांने त्या घरात वावरायला सुरुवात केली.विजयची उपस्थती तिला जाणवली..उर्जालहरीच्या स्वरूपात. तिने घरातील स्थायु द्रव आणि वायू सर्व पदार्थांचा वेध घरातला. प्रत्येक वस्तू अस्थिर होती. पण पाणी जरा जास्त जाणवले.
ध्यान पूर्ण होताच अव्याने सांगितलेला प्रयोग वत्सलने सुरू केला.
वत्सलच्या येण्याने ते विचित्र अस्तित्व ,किंवा जे कुणी होते ते डिस्टरब झाले होते हे नक्की. त्यांच्या कामात व्यत्यय आला होता. वत्सलला इथून घालवण्यासाठी किंवा मार्गातून बाजूला करण्यासाठी त्यांची नक्कीच काहिनाकाही व्यवस्था सुरू झाली असण्याची शक्यता होती.

योगासनांच्या अभ्यासाने तेव्हढी जागरूकता आणि ध्यानाच्या वरच्या टप्प्यावर वत्सल जाऊ शकत होती. ती काही प्रमाणात आपल्या माणसाच्या भूतकाळात डोकावू शकत असे. तिचे गुरू विजय यांनी दिलेल्या ज्ञानाचा उत्तम अभ्यास केल्याने हे शक्य होते. वत्सलने गावाहून आणलेलं पाणी प्यायलं. तिला तरतरी जाणवली. या वास्तूतील अन्नात दोष निर्माण झाल्याचे विशेषतः पाणी, दूध या द्रव पदार्थात काहीतरी गडबड असल्याचे तिने ताडले होते. दोन काचेचे ग्लास घेतले. एका ग्लासात नविनच्या घरातील पाणी आणि दुसऱ्या ग्लासात गावाहून आणलेले पिण्याचे पाणी भरले. पाच मिनिटे एकटक पाहिल्या नंतर वत्सलच्या लक्षात आले की नविनच्या घरातील पाण्यात व्हायब्रेशन्स आहेत. पाणी स्थिर नाही. आणि पाण्यात हिरवे आणि लाल सूक्ष्म कण तरंगत आहेत. सामान्य डोळ्यांना हा बदल पटकन लक्षात न येणारा होता. म्हणून वत्सलने ते पाणी आपल्या जवळील रिकाम्या बाटलीत भरले. त्या पाण्याला ती बाहेर घेऊन आली. त्यावर हात ठेवला आणि गायत्री मंत्र म्हणायला सुरुवात केली. त्यासरशी पाणी भूकम्प झाल्यासारखे जोरजोरात हलु लागले.गोल गोल फिरू लागले. पाण्यातील कणांचा आकार मोठा होऊ लागला. आणि आता स्पष्टपणे लाल आणि हिरव्या कणांची सरमिसळ दिसू लागली.

वत्सलने बाटलीवरला हात काढला. तसा पाण्यातला भोवरा थांबला. वत्सलच्या हातावर काही अक्षरं पुन्हा उमटली. लाल आणि हिरव्या रंगातील काही अक्षरं पाहून वत्सलला देवकी उठल्यानंतरची घटना आठवली आणि देवकीने भिंतीवर खुणा करून काही लिहिल्याचे आठवले. पण ती अक्षर 10 सेकंदात विरली होती. तिला आपल्या पायाजवळ उमटलेली लाल अक्षरही आठवली. पण ती इतकी विचित्र होती की लक्षात नसती राहिली. बाटलीच्या आवाजाने वत्सलची विचार शृंखला भंगली. बाटलीतील पाणी पूर्ववत म्हणजे रंगहीन झाले होते. वत्सलने ती बाटली लपवण्याचे ठरवले. ती माळ्यावर काही मिळते का ते बघू लागली. माळ्यावर पुन्हा विक्षिप्त ऊर्जा जाणवली. ती तेव्हढी तीव्र नसल्याने जाणून बुजून वत्सलने कानाडोळा केला आणि वाट बघण्याचे ठरवले. तिला एक लाकडी बॉक्स दिसला तो योग्य वाटला.त्यात बाटली ठेवून वत्सलने तो बॉक्स आपल्या बॅग मध्ये ठेवला.आता पुढची पावलं उचालताना खूप विचारपूर्वक जाणे आवश्यक होते.
देवकी आणि नवीन यांचा भिडस्त स्वभाव पाहता वत्सल आत्यानि सध्या याबद्दल त्यांना नीट माग लागेपर्यंत मोजकेच सांगायचे ठरवले. मात्र हे सगळं नक्कीच आवाक्याबाहेरचे आहे हे पक्कं मनाशी कळलं वत्सलला.
तो बॉक्स बॅगमध्ये ठेवून वत्सल स्वयंपाक घराकडे वळली...आणि लाईट लावल्यावर तिचे लक्ष नविनने काढून दिलेल्या पाटाकडे गेले ज्यावर बसून तिने स्वयंपाक रंधला होता. पाट ओळखीचा वाटला. त्याकडे बारकाईने पाहिलं.संदर्भ लागत नव्हता नीट. तिने तूर्तास तो विषय बाजूला ठेवला.

नवीन च्या खोलीतून पुन्हा हालचाल आणि आवाज येऊ लागला. मयेयाव मआव....मियाव...गुररररर गुरररररर
वत्सलने तिथे धाव घेतली, खोलीचा दिवा लावला. तसं एक लाल डोळ्याचं काळं मांजर दचकुन उडी मारून खिडकीत चढलं, ते देवकीच्या जवळ जात होतं. आणि समोरच दृश्य पाहून....वत्सल अचंबित झाली.काय झालं होतं?
…………मांजर एक लाल झोत होऊन खिडकीच्या फटीतून बाहेर....
वत्सल पार चक्रावली..…इतक्यात देवकी जागी झाली...
"आई काय झालं? इकडे काही झालं का?"
न्हाय पोरी,झोप तू ,म्या तुमा दोगांना बगाय आले हुते"
बर म्हणून देवकी झोपली....वत्सल धीर करून त्या खोलीच्या खिडकीपाशी गेली आणि ती फट बंद केली..
दिवस उजाडेपर्यंत ते दोन्ही प्रकाश झोत आत येण्याचा प्रयत्न करत होते पण नाही येऊ शकले....

वत्सलला सांगावा कुणी धाडला नविनकडे येण्यासाठी?मांजर आणि प्रकाशझोत यांचे काय संबंध?
अखेर विजय ,वत्सल आणि अव्या, यांचा परस्पर संबंध काय? याना आणि कुणी येऊन मिळणार काय?
क्रमशः

या कथेतील पात्रांची, त्यांच्या व्यक्तिमत्वाची ओळख करून देण्याची वेळ आता आलीय...आणि देवकी आणि नवीन यांची कहाणी, वत्सल आत्या येण्यापूर्वी घडलेल्या भूतकाळातील घटना...याचा सविस्तर फ्लॅशबॅक पुढील भागात....
स्टे ट्युन्ड....
ही कथामालिका पूर्णपणे काल्पनिक आहे. वास्तव जीवनाशी याचा संबंध नाही!!

मुक्ता

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults