माझा अजून एक खट्याळ दादा ....

Submitted by डी मृणालिनी on 9 February, 2020 - 10:54

मी एक शांत वृत्तीचा माणूस आहे असे दाखवणारा एक अशांत माणूस म्हणजे मोहम्मद दादा .नसा-नसात मालवणी भाजका मसाला असलेली ही एक अस्सल मालवणी वल्ली . मोहम्मद दादाच्या बुद्धीचं वैशिष्ट्य म्हणजे ती वरपासून खालपर्यंत अशा सर्व स्तरांवर आपली चुणूक दाखवते . दररोज संध्याकाळचे निवांत कषाय ( दाक्षिणात्य चहा ) पिताना आम्ही सर्वजण एकत्र बसून मस्त गप्पा मारतो . गप्पा म्हणजे एक ब्रेक फेल झालेली ,सुसाट धावणारी गाडीच . या गोष्टीची जाणीव मला नेहमी गप्पा मारतानाच होते . ' भाज्या किती महाग झाल्या ' इथून जर गप्पांची सुरुवात झाली कि ती शेतकऱ्यांची आत्महत्या ,त्यांचा कर्जबाजारीपणा ,सरकारचं आर्थिक धोरण ,राजकारण अशा सगळ्या सगळ्या विषयांना वळसा घालून थांबते . जगातले कोणतेही विषय असू दे ,सगळेच आमच्या संध्याकाळच्या कषायमध्ये असतात . कषायचा पहिला घोट आम्हाला या जगप्रवासाला नेतो आणि कषायचा शेवटचा घोट आम्हाला परत धामापूरला आणून सोडतो . कोणताही विषय असू दे . सगळे आपापल्या बुद्धीच्या क्षमतेनुसार मतं मांडत असतात . यामध्ये कधीकधी मोहम्मद दादाच्या विचारांनी प्रगल्भतेचा उच्चांक गाठला असतो, तर कधीकधी त्याच्या विचारांमधील असंबद्धपणामुळे कषाय पिताना त्याची सुस्तीसोबत बुद्धी पण गेली कि काय असा प्रश्न पडतो . म्हणूनच मगाशी म्हणाले ,कि आमच्या मोहम्मद दादाची बुद्धी सर्व स्तरांवर उड्या मारू शकते . असो. माझा सर्वात आवडता विषय म्हणजे इतिहास आणि मला अजिबात न आवडणारी गोष्ट म्हणजे इतिहास वाचणं. वाचनाची जरी मला खूप आवड असली तरीसुद्धा इतिहास वाचणं म्हणजे मध्यरात्री ३ वाजता उठून पायथॅगोरसचं प्रमेय समजण्यासारखंच आहे . पण मोहम्मद दादासोबत इतिहास समजणं म्हणजे प्रत्यक्ष त्या दुनियेत प्रवेश करणं. इतिहासाचा प्रत्येक भाग तो इतका रंगवून सांगतो कि मला दुसरं महायुद्ध first row मध्ये बसून बघितल्याचा भास होतो . सध्या मला तो एक सर्व कौशल्य संपन्न मुलगी बनवण्यात व्यस्त आहे . इंजिनियरिंग ,माडाच्या झाडावर चढणं ,पक्षी आणि वनस्पती ओळखणं या सर्व गोष्टींमध्ये तो माझा गुरु आहे . पावसाळा संपून हिवाळा सुरु झाला कि एका खांद्यावर कॅमेरा लटकावलेला मोहम्मद दादा आणि मी , असे आम्ही धामापूर तलावाच्या दिशेने प्रस्थान करतो.
सर -सुभेदार आंग्रेंनी लावलेल्या धामापूरच्या घनदाट जंगलात पक्षी ओळखत ओळखत फिरताना इतकी मज्जा येते कि काय सांगू ! माझ्या नकळतच माझ्या ज्ञानात भर पडत असते . कोकणातील निसर्ग आणि परंपरा यांची चालती -बोलती जंत्री म्हणजे मोहम्मद दादा . विश्वास दादा ,मी आणि मोहम्मद दादा असे आम्ही त्रिकुट ,घराचे मुकुट आहोत . जर लवांकुशला एक बहीणही असती तर त्या तिघांची उपमा आम्हाला द्यायला काहीच हरकत नव्हती . आमच्या घरातील तीन मुख्य खांब म्हणजे मोहम्मद दादा ,विश्वास दादा आणि ओंकार दादा . माझं विचाराल ,तर मी या खांबांवर आडवी टाकलेली तुळई .
२८ वर्षाच्या वयात तो घेणाऱ्या जबाबदाऱ्या ,भूमिका पाहून मला आश्चर्य वाटतं.
एकीकडे वेटलँड ब्रिफ डॉक्युमेंटेशन कमिटीचा एक्सपर्ट मेंबर म्हणून कलेक्टर तहसीलदारांचे सेशन्स घेणारा मोहम्मद दादा आणि दुसरीकडे लाकूड भुशात बसून एका १५ वर्षाच्या 'ढ' मुलीला रंदा कसा मारावा हे शिकवणारा मोहम्मद दादा . किती तो फरक ! सध्या आम्ही सर्वजण ( मोहम्मद दादा सोडून ) व्यस्त आहोत एका शोधमोहिमेत . मोहम्मद दादाचे दोनाचे चार हात करायचे आहेत ना .. घराला कितीही खांब आणि तुळया असल्या तरीसुद्धा एका प्रेमळ वाहिनीशिवाय ते घर अपूर्णच . तुम्हीसुद्धा आमच्या शोधमोहिमेत सामील व्हा ..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

निरागस मनाची लोकं तुझ्या आजूबाजूला आहेत आणि प्रेमाच्या नात्यानं एकमेकांशी जोडलेले आहेत हे पाहून छान वाटले. असेच आनंदात रहा.

मी शाळा सोडली नाही. मी शाळेतच कधी गेले नाही. लहान असताना १ली त गेले होते. पण ७ दिवसात सोडली. मला निसर्गात शिकायला खूप आवडतं . माझ्यासारखी अनेक मुले या जगात आहेत. आणि आमचा एक खूप मोठा ग्रुप आहे . जो रिवर्स मायग्रेशन करून आपल्या मूळ गावात येऊन निसर्गात शिकतात.

खूप छान लिहिले आहे.

तू आज 15 वर्षांची आहे की ह्या जुन्या आठवणी आहेत? सहज विचारले, खूप पर्सनल वाटले तर उत्तर दिले नाही तरी चालेल.

दहावी बारावीची परीक्षा कशी देता मग तुम्ही? पण भारीच प्रकार दिसतोय. पहिल्यांदाच ऐकलं. वर्क फ्रॉम होम असतं तसा स्कुल फ्रॉम होम प्रकार दिसतोय.

कोकणात असंच एका ध्येयवेड्या जोडप्यानं गतिमंद मुलांसाठी निसर्ग शाळा सुरू केल्याचं वाचलं होतं. मुलांनी बिनधुराची चूल अशासारखे प्रयोग करून वेगवेगळ्या गोष्टी तयार केल्या होत्या. वसतीगृहासारखं तिथेच सर्वजण राहतात वगैरे.

मी NIOS ( national institute of open schooling ) मधून मी सध्या १० वि ची परीक्षा देत आहे .

मृणालिनी,
छान लिहित आहेस. तुला निसर्गाच्या सहवासात शिक्षण घेता आले ही फार अमुल्य गोष्ट आहे. तुझ्या या चाकोरी बाहेरच्या शिक्षणप्रवासाबद्द्ल वेळ मिळेल तसे मायबोलीवर लिहीत रहा. हे होमस्कुलिंग सारखेच आहे की त्यापेक्षा बरेच वेगळे आहे? सर्वांनाच काही मूळ गावी जावून रहाणे शक्य नसते. परंतू भारतातही बरीच मुले होम स्कुलिंगचा भाग आहेत. त्या तुलनेने तुझे शिक्षण किती वेगळे आहे?