थरार

Submitted by सदा_भाऊ on 31 January, 2020 - 05:03

लेखाचे नाव काय द्यावे हे सुचत नव्हते. पण काहीतरी भन्नाट नाव दिल्या शिवाय वाचक वर्ग आकर्षित होणार नाही या निखळ भावनेने मी “थरार” नाव दिलेले आहे. तसा हा अनुभव माझ्यासाठी कितीही थरारक असला तरी वाचकाना तो तितका वाटलाच पाहीजे असं काही बंधनकारक नाही. तर असो, माझ्या तोळामासाच्या जीवाला घाबरवून टाकलेला असा एक किरकोळ पण चित्तथरारक प्रसंग इथं मांडण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहे. जमलं तर हळहळा अन्यथा हसा.. पण जरूर वाचा.

काही वर्षांपुर्वी मी असाच पोटासाठी इंडोनेशियातून वणवण भटकत होतो. जाकार्ता ते चिलाचाप असा माझा विमान प्रवास होता. त्या ठिकाणी फक्त एकच विमान जाते असं मला सांगण्यात आले. विमानाचे नाव Susi Airline. सकाळी ११ ला सुटण्याची वेळ होती. मी आणि माझा एक सहकारी जाकार्ता आंतरराष्ट्रिय विमानतळावरून त्यांच्या एका छोट्याशा विमानतळावर पोचलो. आमची बॅग घेऊन बोर्डींग पास देणाऱ्या व्यक्तीने बॅगेचे वजन करून झाल्यावर आमचे पण वजन करून नोंद करून घेतले. भीतीयुक्त उत्सुकता अशा विचीत्र भावनेने स्वत:चे वजन डाॅक्टर नसतानाही कोणालातरी सांगावे लागल्याची हळहळ मनाला चटका लावून गेली. कदाचित प्रथमच मला वाढीव वजनाची अगदी मनापासून भीती वाटली असावी.

ठरलेली वेळ निघून गेली तरी विमानाच्या आगमनाची काही चिन्हे दिसेनात. लहानपणी ST Stand वर बसची वाट बघताना इतर नको असलेल्या बसेस आणि त्यासाठी उडालेली झुंबड बरीच पाहली होती. आज तोच अनुभव इंडोनेशियाने विमानांसाठी दिला. गंमत म्हणजे या विमानाच्या प्रतिक्षेत मी आणि माझा एक सहकारी असे दोघेच दिसत होतो. नक्की विमान उडणार का नाही अशी शंका सतत माझ्या मनात घोळत होती. माझा सहकारी देशी तमिळ असल्यामुळे तोही एकंदरीत प्रकाराला नवखा होता. मी उगाचच चाळा म्हणून या विमानाचे झालेले अपघात असं गुगल केलं. बऱ्याच भयानक गोष्टी गुगलने दाखवून मला घाबरवून सोडले. फोन बंद करून देवाचे नाव घेतले आणि मुकाट्याने वाट बघत बसून राहीलो. स्थानिक भाषेचे ज्ञान शुन्य असल्यामुळे तडक जाब विचारण्याची सोय नव्हती. मुकाट्याने वाट बघण्याशिवाय पर्याय नव्हता. अखेरीस आमचे विमान आल्याची वर्दी तिथल्या स्क्रिनवर देण्यात आली. विमान सुटण्याची वेळ आता ३ दाखवण्यात आली होती.

आम्हाला चालतच विमाना पर्यंत नेण्यात आले. आमच्या बरोबर आमच्या बॅगा घेऊन एक माणूस पोचला. विमान अगदीच लुटूपूटूचे खेळण्यातले वाटत होते. विमानात २ पायलट आणि ३ प्रवासी एवढेच होतो. पायलटनी आम्हाला विमानाच्या मधोमध बसायला सांगितलं, कारण विमानाचा बॅलन्स राहीला पाहीजे. विमानात ताठ उभारता सुध्दा येणार नाही एवढे ते बुटके होते. बसण्यासाठी सीट आणि सुरक्षेसाठी बेल्ट या खेरीज कोणतीच सुविधा दिसत नव्हती. एखाद्या टॅक्सी सारखं विमान धावू लागलं आणि हळूच धावपट्टीचा संपर्क सोडून हवेत वर चढू लागलं. विमान उडालं खरं पण आम्ही मात्र जीव मुठीत घेऊन बसलो होतो. माझ्या समोरच पायलट बसले होते. काही क्षणातच विमान हवेत सरळ दिशेने जावू लागले. रिक्षानं रस्त्यातले खड्डे चुकवावेत तसे पायलट ढग चुकवत विमान हाकू लागला. पायलटच्या समोर हिरव्या रंगाच्या स्क्रिनवर रडारचे स्कॅनिंग फिरत होते. पायलट शांतपणे त्याकडे पहात त्याच्या सहकाऱ्या बरोबर गप्पा विनोद करीत निवांत होता. थोड्या वेळात जोराचा पाऊस आला. आधीच डगमगणारे विमान आता चांगलेच झोके घेऊ लागले. ढगातल्या वीजा खिडकीतून आत येतात काय वाटू लागले. दोघे पायलट मात्र एकदम निवांत! खिडकीतून बाहेर बघावं तर मनात भीती! उगाच माझ्यामुळं विमानाचा तोल गेला असं निमीत्त नको. संपुर्ण प्रवास हा घनदाट जंगलावरून होता. त्या जंगलातले ओरांग उटान प्रसिध्द आहेत असं कुठंतरी ऐकलं होतं. आता वाटलं की ओरांग उटान बरोबर ती रात्र काढावी लागते वाटतं. विमानाचं नाव सुसी का ठेवलं असावे असा विचार मनात येऊन गेला. कारण शू किंवा शी ची सोय विमानत नव्हती. मुख्य म्हणजे कितीही घाबरलं तरी शू लागण्याची परवानगी नव्हती. राम राम करीत बसून राहीलो. डोळे मिटण्याची पण भीती वाटत होती. पायलट नक्की नीट चालवतोय की नाही याकडं लक्ष लागलं होतं. मी गियर टाकायला मदत करू का असं विचारावंस सारखं वाटत होतं. साधारण दिड तासाच्या प्रवासात लाख वेळा जप झाला असेल. अखेरीस त्या पायलटनी चिलाचॅप च्या विमानतळावर विमान उतरवलं. उतरल्या उतरल्या त्यानं गर्रकन वळवून रिक्षा स्टॅंडला लावतात तसं विमान कडेला उभं केलं. विमानतळ आपल्या गावा कडच्या स्टॅंड च्या आकाराचं पण नव्हतं. सहीसलामत उतरल्यावर रामाचे शतश: आभार मानले.

परत येताना मात्र आम्ही टॅक्सी करून आलो. तब्बल १० तासाचा प्रवास केला पण त्या विमानात पाय ठेवणार नाही म्हणून सांगितलं.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

खरंच थरार आहे.
१० तास बाय रोड आलात पण विमानाने नाही हे समजु शकते. Happy

चांगले लिहिलेय. Happy
परतीचा थरार हुकवलात म्हणून हळहळ वाटते आहे.

छान लिहिलंय.
माझा पहिला हवाई प्रवास हेलिकॉप्टरने झाला होता त्याची आठवण झाली. जुहू ते ONGC च्या एका सुमद्रातील प्लॅटफॉर्मवर असा एक दीड तासाचा प्रवास होता. माझ्यासोबत खरंतर दोन अनुभवी सहकारी होते, पण आम्ही जाणार त्या आधीच्या हेलिकॉप्टरमध्ये एक जागा, आणि थोडं वजन शिल्लक होतं आणि तेवढ्या कमी वजनात मावणारा पुढील फेऱ्यांच्या यादीतील मी एकटाच होतो म्हणुन माझे नाव पुकारण्यात आले. ढगाळ वातावरण, हेलकांडे खात प्रवास सुरु झाला सुरवातीला अर्धा तास जीव मुठीत धरून होतो पण पुढे आभाळ जरा उघडे होते आणि सवयही झाली होती, मग पुढच्या प्रवासाचा आनंद लुटला.

छान लिहिले आहे.
पण शी शू ची शोय नाही तर आल्यावर नक्की करायचे काय? बस टॅक्सीने जात असू तर रस्त्याच्या कडेने (रच्याकने) गाडी थांबवून तिथेच काम ऊरकता येते. ऊडत्या विमानात लागली तर काय करणार? प्याराशूट घेऊन उडी मारायची का?