फ्लुओराइड : भक्षक दातांचे रक्षक

Submitted by कुमार१ on 17 February, 2019 - 22:49

खनिजांचा खजिना : भाग ५
भाग ४ (कॅल्शियम व फॉस्फरस : https://www.maayboli.com/node/69024)
************************

सूक्ष्म पोषण घटकांपैकी दातांच्या मजबुतीसाठी आवश्यक असलेले हे खनिज. विविध प्रसारमाध्यमांतून आपल्यासमोर फ्लुओराइडयुक्त टूथपेस्टच्या जाहिराती सतत आदळत असतात. त्यातून आपल्याला फ्लुओराइडच्या महत्वाची जाणीव होते आणि काहीसा गोंधळही उडतो. निसर्गात ते माती, विशिष्ट खडक आणि पाण्याच्या नैसर्गिक स्त्रोतांत आढळते. अल्प प्रमाणात ते आपल्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. पण, ते अतिरिक्त प्रमाणात शरीरात गेल्यास मात्र तापदायक ठरते. त्याचा सर्वांगीण आढावा या लेखात घेतला आहे.

आहारातील स्त्रोत
१. नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत: जगभरातील स्त्रोतांवर नजर टाकता यात खूप विविधता दिसते. पिण्याच्या पाण्यातील फ्लुओराइडचे योग्य प्रमाण ०.७ mg/Litre इतके असावे. काही भूभाग हे अशा पाण्याने संपन्न असतात. परंतु, बऱ्याच भागांत हे प्रमाण खूप कमी तर अन्य काहींत ते खूप जास्तही असते. प्रमाण कमी असणाऱ्या भागांत पिण्याच्या पाण्यात फ्लुओराइड योग्य प्रमाणात मिसळण्यात येते. तर तर खूप जास्त प्रमाण असणाऱ्या पाणीसाठ्यांतून ते कमी करावे लागते.
२. वनस्पती : फ्लुओराइड-संपन्न मातीत वाढलेल्या वनस्पतींतूनही ते आपल्याला मिळते. चहाच्या पानांमध्ये त्याचे प्रमाण चांगले असते.

३. जगातील काही देशांत पाण्याच्या फ्लुओरीडेशनला पर्याय म्हणून मीठ अथवा दुधात फ्लुओराइड मिसळले जाते.

४. फ्लुओराइडयुक्त टूथपेस्ट : लहान मुलांत अशा पेस्टने दात घासताना ती तोंडातून गिळण्याचे प्रमाण लक्षणीय असते. त्यामुळे त्यांच्यावर पालकांनी बारीक नजर ठेवली पाहिजे. ब्रशवर घ्यायची पेस्ट ही जेमेतेम वाटाण्याच्या आकाराची असावी.

शरीरातील कार्य व गरज
आहारातून शोषलेले फ्लुओराइड हाडे आणि वाढीच्या वयांतील दातांत पोचते. तिथे ते कॅल्शियम व फॉस्फरस यांच्या थरात समाविष्ट होते. या त्रिकुटाचा थर अगदी मजबूत असतो. आपल्या दातावरचे जे चकचकीत कठीण आवरण असते त्याला enamel म्हणतात. ते या थरामुळे अगदी कठीण बनते. किंबहुना enamel हा शरीरातील सर्वात कठीण (hard) पदार्थ आहे. हाडांप्रमाणेच हे देखील रोज थोडी ‘कात’ टाकत असते. मुलांत कायमचे दात यायच्या वयापर्यंत जर फ्लुओराइड योग्य मिळत राहिले तर त्याने दातांच्या किडीला प्रतिबंध होतो.
फ्लुओराइडची प्रौढांची रोजची गरज ३-४ mg आहे. मुलांत ती वयानुसार यापेक्षा कमी आहे.

अभावाचे परिणाम
हे दातांवर स्पष्टपणे दिसतात. Enamel कमकुवत झाल्याने दातांची झीज लवकर होते. त्यातूनच पुढे दात किडण्याचे प्रमाण वाढते. कमकुवत Enamel मुळे आम्लयुक्त खाद्यपेयांचा दातावर विपरीत परिणाम होतो.

अतिरिक्त सेवनाचे दुष्परिणाम (फ़्लुओरोसिस)
फ्लुओराइडच्या दीर्घकालीन अतिरिक्त सेवनाचे प्रमुख कारण म्हणजे पिण्याच्या नैसर्गिक साठ्यांत असलेले त्याचे भरपूर प्रमाण. हा प्रश्न भारत व चीनमधील अनेक भागांत दिसतो. तसेच जगभरात ग्रामीण भागांतील काही विहीरींच्या पाण्यातही हे प्रमाण जास्त असल्याचे दिसते. अशा पाण्यांवर योग्य ती प्रक्रिया करून अतिरिक्त फ्लुओराइड काढून टाकायचे असते. अशी यंत्रणा सर्वत्र उपलब्ध नसल्याने तेथील लोक फ़्लुओरोसिसला बळी पडतात. त्याचे परिणाम असे असतात:
१. हाडे: जसे शरीरातील फ्लुओराइडचे प्रमाण वाढू लागते तसे ते हाडांत अधिक साठू लागते. त्याने हाडाची घनता काहीशी वाढते. एका मर्यादेपर्यंत अशी हाडे अधिक बळकट असतात. पण, जर हे प्रमाण अति वाढू लागले आणि योग्य पातळीच्या पाचपटीवर गेले तर मात्र उलटे परिणाम दिसतात. आता हाड-घनता कमी होते आणि ही हाडे ठिसूळ होऊ लागतात.

२. सांधे: फ्लुओराइडचे प्रमाण दीर्घकाळ वाढत राहिल्यास सांधे ताठ व कडक होतात आणि दुखतात. हे तीव्र झाल्यास पुढे पाठीचा कणा खूप ताठ होतो आणि त्यामुळे आतील spinal cord दाबला जातो. त्याने मज्जासंस्थेवर परिणाम होतात. आजही आपल्या ग्रामीण भागातील काही गावांत फ्लुओराइडचे पाण्यातील प्रमाण धोकादायक पातळीवर आहे. त्यामुळे तिथले संपूर्ण गाव फ़्लुओरोसिसने बाधित असते. काही रुग्णांत कणा इतका ताठ होतो की ते वर आकाशाकडे बघूच शकत नाहीत. तेलंगणातील नलगोंडा जिल्ह्यात हा प्रश्न अत्यन्त गंभीर आहे.

fluoro.jpg

३.दात: मुलांत दुधाचे दात पडून कायमचे दात येण्याअगोदर जर फ़्लुओरोसिस झाले तर दातांवर विपरीत परिणाम होतात. सुरवातीस त्यांवर ठिपके पडतात. मग खराब डाग पडतात आणि त्याहीपुढे खड्डे पडू लागतात. त्यातून मुखसौंदर्यास बाधा येते. फक्त हे दात किडत नाहीत हाच काय तो फायदा !

फ्लुओराइडयुक्त टूथपेस्ट आणि दंत-आरोग्य
बाजारात नजर टाकता आपल्याला फ्लुओराइडयुक्त टूथपेस्ट, जेल, गुळण्या करण्याचे द्रव आणि औषधी मुलामा अशी अनेक उत्पादने नजरेस पडतात. त्यांच्या जाहिरातींचा भडीमार तर काय वर्णावा? एकूण सामान्यजनांना बुचकळ्यात टाकणारी ही स्थिती असते. दातांच्या आरोग्यासाठी फ्लुओराइडचा प्रतिबंधात्मक वापर कितपत उपयुक्त असतो हा त्यातून उद्भवणारा प्रश्न.
या विषयावर मुले आणि १६ वर्षांपर्यंतच्या तरुणांवर बरेच संशोधन झाले आहे. दातांना नियमित फ्लुओराइड लावण्याने त्यांच्या किडीचे प्रमाण कमी झालेले आहे. मात्र अशा उत्पादनांतील फ्लुओराइडचे प्रमाण विशिष्ट पातळीचे वर असावे लागते. तेव्हा दंतवैद्याचा सल्ला घेऊन गरजेनुसार योग्य त्या पेस्टचा वापर करावा. मुलांत अशी पेस्ट वापरताना ती गिळली जाणार नाही याची खबरदारी आवश्यक.
वयानुरूप दातांची झीज (erosion) होत असते. त्याच्या जोडीला आहारातील विविध आम्लयुक्त पदार्थांमुळे enamel चा हळूहळू नाश होत असतो. याबाबत फ्लुओराइडयुक्त पेस्टचा वापर कितपत प्रतिबंधात्मक आहे, याबाबत मात्र मतांतरे आहेत. संशोधनांचे निष्कर्ष उलटसुलट आहेत. अधिकाधिक संशोधनातून त्यावर भविष्यात प्रकाश पडेल.
*********************************************

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद कुमार१ जी,

२. दातांची निगा राखूनही ते पिवळे का होतात
>>>>
त्यामागे शरीरातील चयापचयाशी संबंधित काही कारणे असतात.>>>>
माझा पण तोच अंदाज होता.

Pages