आमार कोलकाता - भाग ४ - मुक्काम ८५ अँमहर्स्ट स्ट्रीट

Submitted by अनिंद्य on 8 January, 2020 - 01:34

लेखमालेचे यापूर्वीचे तीन भाग इथे वाचता येतील : -

https://www.maayboli.com/node/72801

https://www.maayboli.com/node/72846

https://www.maayboli.com/node/72950

८५ अँमहर्स्ट स्ट्रीट, कोलकाता

48869151587_f96d025668_z.jpgचित्रसौजन्य - राजा राममोहन रॉय मेमोरियल, कोलकाता.

जुन्या कोलकात्यातील एक महालसदृश्य इमारत. जॉर्जियन वास्तुशास्त्राचा सुंदर नमुना असलेल्या शहरातील थोडक्याच इमारतींपैकी एक. फ्रान्सिस मेंडीस नामक श्रीमंत कलाप्रिय माणूस इमारतीचा मूळ मालक. १८१४ साली रंगपूरहून (सध्या बांग्लादेशात असलेले शहर) आलेल्या एका भारतीय व्यक्तीने १३००० रुपयांचा घसघशीत मोबदला देऊन फ्रान्सिसकडून हे घर विकत घेतले आणि तिथे कायमचे राहायला येण्याचे ठरवले. कोलकाता शहर त्या व्यक्तीला नवे नव्हते, पण शहरात नेहमीसाठी वास्तव्याला येण्याचे महत्व वेगळे होते. ह्या साध्या घटनेचा परिणाम मात्र मोठा झाला. पुढे उणीपुरी वीस वर्षे ती व्यक्ती जगली पण तत्कालीन कोलकाता शहर आणि बंगालच नव्हे तर भारत आणि जगावर आपला प्रभाव पाडू शकली.

48869092736_5e534f063a.jpgचित्रसौजन्य - राजा राममोहन रॉय मेमोरियल, कोलकाता.

* * *

इंग्रजी भाषा, पाश्चात्य पद्धतीचे शिक्षण आणि दीर्घ सघन जागतिक संपर्क ह्या तीनही मुद्द्यांना अन्य भारतापेक्षा बंगाल प्रांत आधी सामोरा गेला. गोपाळ कृष्ण गोखल्यांचे एक विधान प्रसिद्धच आहे - What Bengal thinks today, India thinks tomorrow.’

राष्ट्रवादी विचारांची आणि सामाजिक सुधारणांची आंदोलने, साहित्य, कला, सांस्कृतिक क्षेत्रात नवनवीन कल्पनांचा उदय, नव्या विचारांची, साहित्याची सतत पडणारी भर आणि देशोदेशीच्या विचारकांचा-कलाकारांचा दीर्घमुक्कामी मेळा असा समाजाला नवचेतनेची ऊर्जा देणारा सुमारे शंभर वर्षांचा बहारदार काळ (१८१४- १९१९) 'बांगला नवजागरणाचा' काळ म्हणून ओळखला जातो. ह्या काळात बंगालच्या सामाजिक, धार्मिक आणि शैक्षणिक जीवनात मोठे बदल झाले. ह्या काळात झालेल्या वेगवान बदलांचा बंगालवर आणि एकूणच बंगाली समाजमनावर दीर्घकालीन प्रभाव पडला. अस्पृश्यता, जातीप्रथा, बालविवाह, सतीप्रथा अश्या अनेक चुकीच्या धार्मिक प्रथापरंपरांविरुद्ध प्रश्न उपस्थित करणारी, त्याला चहुअंगी आव्हान देणारी उच्चविद्याविभूषित भद्रलोकांची रुढीभंजक पीढी उदयाला आली. सामाजिक बुरसटलेपणाला वैचारिक तडा देणारे, नवनिर्मितीचा ध्यास घेतलेले अनेक विद्वान, विचारक आणि सुधारक नवजागरणाच्या काळाने बघितले. सुरुवातीला बंगालचे नवजागरण म्हणजे फार मोठे जनआंदोलन असे नव्हते. त्याचे स्वरूप उच्चशिक्षित, श्रीमंत आणि मध्यमवर्गीय समाजाने आपल्या सभोवताली असणाऱ्या अन्यायकारक प्रथापरंपरांकडे डोळसपणे पाहणे आणि त्यांचा सनदशीर मार्गांनी विरोध करणे इथवरच सीमित होते, थोडेसे इटालियन रिनेसाँ सारखे. पण पुढे ह्या नवजागरणाने अनेक खऱ्याखुऱ्या आंदोलनांना जन्म दिला. ह्या नवजागरणातच भारतीय राष्ट्रवादाची सुप्त बीजे होती असे अभ्यासकांचे मत आहे.

नवजागरणाचा पाया रचणाऱ्यांमध्ये 'ओरिएंटॅलिस्ट' म्हणून ओळखल्या जाणारी विल्यम जोन्स, विल्यम करे, कोलब्रूक, एच एच विल्सन, रामकोमल सेन, जेम्स प्रिंसेप यासारखी विचारक - अभ्यासक - तत्वज्ञ मंडळी आघाडीवर होती. पण नवजागरणाची खरी धुरा वाहिली कोलकात्याच्या बंगाली भद्रजनांनी. ब्राम्हो समाजाचे धुरीण राजा राममोहन रॉय (१७७५-१८३३) आणि गुरु रविंद्रनाथ टागोर (१८६१-१९४१) ह्या दोन बंगाली महारथींच्या हाती ह्या नवजागरण काळाची दोन टोके आहेत असे म्हणता येते. अर्थात त्यामुळे केशबचंद्र सेन, मानवेंद्रनाथ रॉय, बंकिमचंद्र चॅटर्जी, ईश्वरचंद्र विद्यासागर, बिपीनचंद्र पाल, मायकल मधुसूदन दत्त आणि अश्याच अन्य महनीय व्यक्तींचे योगदान तसूभरही कमी होत नाही.

बंगाल नवजागरणाच्या एकूण काळाचे साधारण पाच ठळक भाग करता येतात :-

१८१४ ते १८३३ - ह्या काळाचे निर्विवाद नायकत्व राजा राममोहन रॉय ह्या असामान्य व्यतिमत्वाचे!
१८३३ ते १८५७ - राममोहन रॉय निवर्तल्यानंतर १८५७ च्या 'गदर' पर्यंत
१८५७ ते १८८५ - 'गदर' ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेपर्यंत
१८८५ ते १९०५ - काँग्रेस स्थापनेपासून बंगालच्या फाळणीपर्यंत
१९०५ ते १९१९ - बंगालच्या फाळणीपासून ते महात्मा गांधींच्या असहकार आंदोलनापर्यंत.

कोलकाता शहर ही नवजागराची पंढरी, अनेक दीर्घप्रभावी घटनांचा रंगमंच ! ‘८५ अँमहर्स्ट स्ट्रीट कोलकाता’ ह्या पत्त्यावर राजा राममोहन रॉय राहायला आले आणि ह्या जागेला एक वलय प्राप्त झाले. राममोहनांचे मूळ गाव हुगळी जिल्ह्यातले राधानगर. कुटुंब सनातनी विचारांचे. तत्कालीन परंपरेप्रमाणे त्यांनी लहानपणी बंगाली आणि संस्कृत भाषेचे जुजबी शिक्षण घेतले. संस्कृतमध्ये चांगली गती असल्याकारणाने त्यांना पाटणा आणि वाराणसीला वेदाध्ययनादी शिक्षणासाठी पाठवण्यात आले. ह्याच कालावधीत इंग्रज आणि फारसी विद्वानांशी त्यांच्या भेटीगाठी झाल्या आणि त्यांनी अन्य भाषांमध्ये असलेले ज्ञानही मिळवले. दिल्लीचा बादशाह अकबर-दुसरा ह्याने राममोहन रॉय यांना 'राजा' ही पदवी दिली. तरुण राममोहन रॉय संस्कृत, हिंदी, इंग्रजी, अरबी, फारसी तर शिकलेच, पुढे हिब्रू आणि ग्रीक भाषा सुद्धा त्यांनी आत्मसात केली. पौर्वात्य ज्ञानपरंपरा आणि पाश्चात्य चिकित्सावृत्ती यांचा मिलाफ म्हणजे राममोहन रॉय असे म्हटले जाते. विचारांची प्रखरता आणि ठाम तर्कसंगत विवाद करू शकण्याची कला यामुळे त्यांना प्रसिद्धी मिळू लागली आणि त्यांचे (त्याकाळी क्रांतिकारी वाटणारे) विचार न पटणाऱ्या समाजाकडून त्यांना तीव्र विरोध सुद्धा होऊ लागला. सगळ्यात पहिला मुद्दा होता तो मूर्तिपूजा नाकारण्याचा. रॉय मूर्तिपूजेच्या विरोधात होते आणि मूर्तिपूजा वेदसंमत नाही ह्यावर ठाम होते. ह्या विषयावर त्यांनी एक छोटेखानी पुस्तिका तयार करून त्याचे वितरण चालवले त्यावेळी त्यांचे वय होते १५-१६ वर्षे. तत्कालीन विद्वानांना हे अजिबात पटले नाही. मूर्तिपूजेच्या विरोधातील त्यांच्या प्रचारामुळे अनेक लोक दुखावले, त्यात त्यांचे नातेवाईकही होते. त्यांना खुद्द त्यांच्या घरातून निष्कासित करण्यात आले. निष्कासनाचा सदुपयोग करत त्यांनी प्रदीर्घ देशाटन केले. इराण, नेपाळ, तिबेट पर्यंत प्रवास करून देशोदेशीच्या विद्वानांशी चर्चा केली, अधिकाधिक अनुभवसंपृक्त होऊन एकेश्वरवादाचा पुरस्कार करू लागले.

हिंदू-सनातन धर्मातील 'सतीदाहो' (सतीप्रथा), अस्पृश्यता, जातिप्रथा आणि बालविवाहासारख्या रुढींबद्दल त्यांची मते तीव्र होती. ह्या विषयांवर त्यांच्या लेखनाला आणि आंदोलनांना कंपनी सरकारातील अनेकांचा पाठिंबा होता. अनेक ख्रिस्ती धर्मगुरू त्यांच्या मताशी सहमत होते. सतीप्रथेवर प्रहार करणारी त्यांची तीन पुस्तके लागोपाठ प्रसिद्ध झाली. सतीप्रथेविरुद्ध आधी वैचारिक-समाजजागृतीपर आणि पुढे कायदेशीर आंदोलन उभारून ही प्रथा हद्दपार करण्याचे श्रेय राममोहन रॉय यांना आहे.

रॉय यांचे विचार फक्त एका धर्मापुरते सीमित नव्हते. बहुभाषाकोविद रॉय सर्व महत्वपूर्ण धर्मग्रंथांचा मूलभूत अभ्यास करू शकत, प्रसंगी भाषांतरही करत. सनातन धर्माव्यतिरिक्त इस्लाम, जैन, सूफी मत, ख्रिश्चन धर्माच्या अनेक प्रसिद्ध ग्रंथांचा त्यांनी सांगोपांग अभ्यास केला होता. त्यामुळे त्यांच्या तर्काला मौलिक अनुभवाचे, प्रत्यक्ष ग्रंथाभ्यासाचे-ज्ञानाचे अधिष्ठान प्राप्त झाले होते. त्या-त्या धर्मातील खुळ्याभाबड्या आणि चुकीच्या कल्पनांवरही त्याची लेखणी परजत असे. १८२० साली कोलकात्यात रॉय यांचे 'पर्सेप्टस ऑफ जिझस' हे पुस्तक प्रसिद्ध झाले. चमत्कार आणि धर्मप्रसारासाठी घुसवलेल्या वाढीव कथाकहाण्यांना तिलांजली देऊन ख्रिस्ताचा नैतिक संदेश त्यांनी या पुस्तकात रोखठोकपणे मांडला होता. तो कोणालाच रुचला नाही आणि त्यांचा समर्थक असलेला कोलकात्यातील प्रतिष्ठित ख्रिस्ती समुदाय त्यांचाविरुद्ध गेला. स्वधर्मातील भवानीचरण बॅनर्जी, राधाकांत देब, गौरीकांत भट्टाचार्य यांच्यासारखे परंपराप्रिय विद्वान त्यांच्याविरुद्ध होतेच त्यात अन्यधर्मीय सुधारविरोधी लोकांची भर पडली.

राममोहन रॉय कोलकात्यात राहायला आल्यावर त्यांनी ग्रंथ, विचारपत्रे, सभा आणि प्रत्यक्ष चर्चा अशी सर्व संपर्कमाध्यमे वापरून आपल्या विचारांचा प्रचार केला. वेद आणि उपनिषदांना संस्कृत भाषेच्या कोषातून बाहेर काढून बंगाली-इंग्रजी भाषांतर आणि त्यांच्या मर्माबद्दल सुलभ लेखनामुळे राममोहनांचे नाव प्रसिद्ध झाले. प्रत्येक मुद्द्याचा सर्वांगांनी गहन विचार करणे आणि त्याचे सत्व नेमक्या शब्दात सगळ्यांना समजू शकेल असे मांडणे हे रॉय यांचे वैशिष्ट्य. त्यांचे घर म्हणजे 'चर्चेचा अड्डा' असे समीकरण झाले. वैचारिक देवाणघेवाणीसाठी राममोहनांच्या घरी दर आठवड्याला कोलकात्यातील विद्वत्जनांची 'आत्मीय सभा' भरू लागली. एकेश्वरवादाचा पुरस्कार, सतीप्रथेवर आणि बालविवाहावर कायद्याने बंदी, विधवा पुनर्विवाह, अस्पृश्यता निवारण अश्या अनेक विषयांवर रुढीप्रिय लोकांचे मतपरिवर्तन हे प्रमुख कार्य आत्मीय सभेने अनेक वर्षे केले. पुढे अधिक वैचारिक सुस्पष्टतेसह रॉय यांच्या पुढाकाराने कोलकात्यात 'ब्राम्हो समाजाची' स्थापना झाली. फार जनाश्रय लाभला नाही तरी ब्राम्हो समाजाने धार्मिक - सामाजिक चळवळींचे चक्र पुढे फिरवले याबद्दल संशय नाही.

शहरात असलेल्या छापखान्यांनी विचारप्रसाराचे काम सोपे केले. अनेकानेक पुस्तके, वृत्तपत्रे आणि मासिके जन्माला आली. भारतातील पहिल्यावहिल्या वर्तमानपत्राचा मान कोलकात्याकडे आहे. इंग्रजी, बंगाली आणि 'मिरात-उल-अखबार' सारखे फारसी भाषेतले वृत्तपत्र सुद्धा प्रथम कोलकात्यातून प्रकाशित झाले. शहरात पहिले सार्वजनिक ग्रंथालय सजले. घरात पुस्तकांची कपाटं असणे ही कुलीनपणाची सर्वमान्य कसोटी ठरू लागली. ह्या काळात कोलकात्याच्या विद्वानांनी प्रचंड मोठी ग्रंथसंपदा निर्माण केली. जगातील ज्ञान टिपतांनाच बंगाली साहित्याने नवकलेवर धारण करून स्थानिक इतिहासाचा, संस्कृतीचा, त्यातल्या उदात्त तत्वज्ञानाचा नव्याने उदघोष केला. ब्रिटिश वसाहतवाद्यांच्या सर्वव्यापी प्रभावाने दडपलेल्या तत्कालीन भारतासाठी ही मोठीच उपलब्धी म्हणावी लागेल.

48869152462_4365c56f6c_c.jpgचित्रसौजन्य - राजा राममोहन रॉय मेमोरियल, कोलकाता.

ऋणनिर्देश - फलकावरील मजकुराचा 'नूतन' यांनी केलेला हा अनुवाद :-

मध्यजुगीन अन्धकाराष्छन्न भारतबर्षे नबजागरणेर अग्रदूत राजा राम मोहन रायेर स्मृतिधन्या 'सिमला हाऊस'नामें ख्यात एई ऐतिहासिक भबने दर्शनार्थीदेर स्वागत.

मध्ययुगीन अंधःकारमय भारतवर्षातील नवजागरणाचे अग्रणी राजा राममोहन रॉय यांचे स्मारक असलेल्या आणि सिमला हाऊस नांवाने ख्यात असलेल्या या ऐतिहासिक भवनात अभ्यागतांचे (visitors) स्वागत.

आजचे कोलकाता शहर आपल्या वैश्विक प्रसिद्धी मिळवणाऱ्या सुपुत्राला विसरले नाहीये. अँमहर्स्ट स्ट्रीटला 'राजा राममोहन रॉय सारिणी' असे नाव देऊन आणि त्यांच्या घराला स्मृतिस्थानात बदलून रॉय यांच्या आठवणी आणि शहराशी असलेला ऋणानुबंध जपण्यात आला आहे. तेथे फारसे कोणी जात नाही. जागेची निगा चांगली राखली आहे आणि काही स्थानिक वयस्कर मंडळी जयंती-पुण्यतिथीला येथे कार्यक्रम करून त्यांच्या कार्याचा वारसा जागवतात हेही नसे थोडके.

* * *

नवजागरणाची व्याप्ती फक्त धार्मिक आणि सामाजिक विषयांपुरतीच मर्यादित राहिली नाही. कोलकात्याच्या कलाविश्वातही अनेक दीर्घप्रभावी आणि बहारदार बदल झाले, त्याबद्दल पुढे.

(क्रमश:)

(अन्यत्र पूर्वप्रकाशित. लेखातील कोणताही भाग लेखकाच्या परवानगीशिवाय अन्यत्र वापरू नये. काही चित्रे जालावरून साभार.)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@ अमा,

.... रॉय यांचे लेखन वाचून काढते आता.... ये बात ! प्रतिसाद फार आवडला.

@ rockstar1981

आभार.

@ हर्पेन,

.... मालीकाच चांगली चालल्ये ! ... आभारी आहे हो.

छान लेख, आवडला.
सतीप्रथा, अस्पृश्यता यांसारख्या त्याज्य व वाईट गोष्टी संपवण्यात एतद्देशीय भद्रजनांचं समाज सुधारण्याचं खरं मोलाचं कार्य आहे.

@ Aadesh203
आभार आणि सहमती.

ज्यांनी इथवर वाचलं आहे त्यांच्यासाठी पुढचा भाग इथे आहे :-
https://www.maayboli.com/node/73013

हा इतिहास वाचून शहर फिरताना वेगळा फील येईल.
तुमच्या मेहनतीला सलाम. नवीन कोलकात्यात वन वे च्या अतिरेकामुळे गांगरून जायला होतं नवीन माणसाला.

@ वेडोबा
@ अश्विनी..
@ रानभुली

आभार !

... वन वे च्या अतिरेकामुळे गांगरून जायला होतं नवीन माणसाला..... आणि चालक स्थानिक नसला तर प्रचंड गर्दीचे दडपण येते Happy