सहचरीनामा - १ - सहचरींनी मला काय दिलं...

Submitted by अतुल ठाकुर on 31 December, 2019 - 21:01

नवीन वर्षाच्या पहिल्या लेखनाची सुरुवात सहचरींबद्दलच्या कृतज्ञतेच्या भावनेने करणे मला आवश्यक तर वाटते कारण खरोखर त्यांनी मला न मागता बरेच काही दिले आहे. शिवाय अशी कृतज्ञता व्यक्त करणे हा माझ्या आनंदाचाही भाग आहे. यामुळे पाय जमिनीवर राहण्यास मदत होते. सुरुवातीलाच स्वतःच्या मर्यादांबद्दल बोलावं लागेल. संशोधनाच्या दरम्यान व्यसनमुक्तीसाठी काम करणारी अनेक माणसे पाहिली. त्यांच्या मनात व्यसनी व्यक्तींबद्दल करुणा, सहानुभूती होती. अनेकांना स्वतःला व्यसनाचा अनुभव असल्याने त्यांच्याकडे अनुभवजन्य ज्ञानही होते. पण पीएचडी झाल्यावर आणि त्यानंतरही व्यसनाच्या क्षेत्रात काम करीत आल्यावर असे लक्षात आले की आपल्या मनात व्यसनी व्यक्तींबद्दल फारशी करुणा निर्माण झालेली नाही. तरीही आपल्याला हे काम सोडावेसे वाटत नाही. उलट हे काम जास्त जोमाने करावेसे वाटते याचे कारण काय असावे? तेव्हा असे लक्षात आले की आपल्याला व्यसनी व्यक्तींपेक्षाही व्यसनामुळे कुटूंबातील व्यक्तींना जो भयानक त्रास होतो त्याबद्दल सहानुभूती वाटते. व्यसनाच्या भाषेत या गटातील स्त्रियांना सहचरी म्हणतात.

खरंतर सहचरी म्हणजे स्त्रियाच असा भेद मला करावासा वाटत नाही. व्यसनामुळे घरातील इतर पुरुषांनाही त्रास होत नाही काय? ते ही आपल्या व्यक्तीला व्यसनातून बाहेर आणण्यासाठी घडपडत नाहीत काय? नक्कीच धडपडतात. त्यामुळे व्यसनी व्यक्तीला व्यसनातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करणारी ही जी घरातील मंडळी आहेत ती सर्वच सहचरी आहेत त्यांच्यासाठी काम करण्यात आपल्याला रस आहे हे मला जाणवले. व्यसनाच्या संपूर्ण प्रवासात या सहचरी अपार त्रास सहन करतात. शिवीगाळ, मारहाण, संशय, सततची भांडणे, व्यसनी माणसाच्या तब्येतीची काळजी, मुलांच्या व्यसनामुळे खचलेल्या ज्येष्ठ मंडाळीची काळजी, व्यसनामुळे कुढणार्‍या, अकाली प्रौढ झालेल्या मुलाबाळांची काळजी, ढासळणार्‍या आर्थिक बाजूला सावरणे आणि स्वतःच्या तब्येतीवर अपरिहार्यपणे होणारा वाईट परिणाम, त्यातून स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करणे, समाजात, नातेवाईकांमध्ये, कामावर होत असलेली हेटाळणी सहन करणे....ही यादी वाढवावी तितकी वाढतच जाईल. सहचरीच्या दु:खाची कल्पना आणि त्याची तीव्रता कुणालाही पटकन कळणे शक्य नाही. जावे त्यांच्या वंशा हेच खरे.

पण तरीही या सहचरी त्यांच्या पोटात व्यसनी व्यक्तींबद्दल अपार माया बाळगून असतात. हा सारा हिंसाचार, मारहाण हे अपार दु:ख सहन करून, पचवून त्या व्यसनी व्यक्तीला उपचार केंद्रात दाखल करतात. त्यांनी पुढे व्यसनमुक्त रहावे यासाठी काय करावे लागेल याबद्दलचे शिक्षण त्या आवर्जून घेतात. व्यसनी व्यक्तीच्या कला कलाने घेऊन त्याला व्यसनापासून दूर ठेवतात. याचे कारण त्यांचे आपल्या माणसावर खरोखर प्रेम असते. व्यसन वाईट आहे, व्यसनी व्यक्ती वाईट नाही हे त्या जाणतात. सहचरींच्या सहकार्याशिवाय व्यसनमुक्ती ही मला अत्यंत कठीण गोष्ट वाटते. मुक्तांगणच्या संस्थापिका डॉ. अनिता अवचट यांनी अत्यंत दूरदृष्टीने सहचरींची सभा घेण्यास सुरुवात केली. सहचरींची शारिरीक मानसिक स्थिती निरोगी राहणे अत्यंत आवश्यक आहे हे त्या जाणून होत्या. नेमक्या याच क्षेत्रात माझाही खारीचा वाटा असावा असे मला वाटते.

या सहचरींइतकी क्षमाशीलता माझ्यात नाही हे मी जाणून आहे. पण त्यांच्यासोबत काम करून हा गुणही काही अंशाने तरी माझ्यात येतील असे मला वाटते. काही वर्षे करीत असलेल्या कार्याला दिलेली दिशा ही सहचरींनी मला दिलेली सर्वात मोठी देणगी. यातील अनेक सहचरी माता भगिनी माझ्यापेक्षा वयाने लहान असतील, बरोबरीच्या असतील आणि मोठ्याही असतील. पण सर्वांच्याच पायावर डोके ठेवून या कार्यासाठी वर्षाच्या सुरुवातीला त्यांच्याकडून आशीर्वाद मागावासा वाटतो. आणि तो त्यांचा अधिकारही आहे. कारण त्यांनी तो आपल्या स्वभावातील अपार करुणेने तो मिळवला आहे असे मला प्रामाणिकपणे वाटते.

अतुल ठाकुर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आवडलं, छान लिहीलयं. एका सहचरीची धडपड जवळून पाहिली आहे. त्यातील प्रचंड आशानिराशेचा हिंदोळा, अपार कष्ट पाहून थक्क झाले होते. त्यात त्यांना यश लाभले.

बाप रे. खरच किती कसोटी असेल सहचारींची.
आपल्या स्वप्नपूर्तीकरता. असेच नेटाने काम करत रहाण्याकरता शुभेच्छा.

जास्तीत जास्त व्यासनी लोकांना व्यसन हे वाईट आहे .
आणि त्या व्यासणामुळे
आपल्या आर्थिक,सामाजिक,शारीरिक अशा तिन्ही बाजूने हानी होत आहे हे समजत असते.
अशा लोकांचे नशेच्या आहारी नसताना असलेलं वागणं खूप वेगळं आणि प्रेमाचे आणि जिव्हाळ्याचे असू शकत.
पण व्यसनाची सवय लागल्या मुळे रात्र झाली की ते परत समजत असून सुद्धा व्यसन करतात.
ह्या मध्ये कुटुंबातील व्यक्ती n chi खूपच कुचुंबना होते..a
आणि तुम्ही जे कुटुंबाला मानसिक आधार देण्याचे काम करत आहेत ते अतुलनीय काम आहे.
काही व्यावसायिक कंपन्या ह्या परिस्थिती चा फायदा घेवून त्यांची व्यासणा पासून मुक्ती देण्याचे प्रॉडक्ट बाजारात आणत आहेत ..
पण अजुन जास्त हानी पोचवतात.