चौकटींतील रत्ने (उत्तरार्ध)

Submitted by कुमार१ on 22 December, 2019 - 21:18

पूर्वार्ध इथे : https://www.maayboli.com/node/72730
*********************************************************************************
या लेखाच्या पूर्वार्धात लिहिल्याप्रमाणे मराठी कोड्यांवर हुकुमत यायला माझे एक दशक खर्ची पडले होते. आता एक धाडस म्हणून इंग्लीश कोड्यांकडे वळणार होतो. आतापर्यंत इंग्लीश पेपर चाळताना चौकटीयुक्त कोडे दिसले तरी त्याकडे ढुंकून पाहिले नव्हते. याला कारण माझी इंग्लीशबाबतची भाषिक पार्श्वभूमी अशी होती. इयत्ता पाचवीपासून शालेय विषय, आठवीपासून विज्ञान व गणित इंग्लिशमधून आणि पुढे व्यावसायिक शिक्षण इंग्लिशमधून झाले. सामान्य व्यवहारातील बोलणे हे मराठीतूनच. याचा अर्थ इतकाच होतो की ‘पुस्तकी इंग्लीश’ शी आपली घसट झालेली असते. या जोडीला मर्यादित इंग्लीश साहित्यवाचन आणि अधूनमधून इंग्लीश दैनिके व अन्य नियतकालिके चाळणे इतपत तो भाषासंपर्क होता. मात्र ही शिदोरी इंग्लीश शब्दकोडी सोडवायला फार अपुरी असते. याचा प्रत्यय मी जेव्हा ही कोडी नीट वाचू लागलो तेव्हा लगेच आला.

सलग २-३ दिवस या कोड्यांवर नजर टाकता काही गोष्टी ध्यानात आल्या. कोड्यातील जी शोधसूत्रे भूगोल, समाजशास्त्र, विज्ञान आणि आरोग्य यांवर आधारित आहेत, त्यांचीच उत्तरे आपल्याला सामान्यज्ञानावर देता येतील. मात्र कोड्यातील इतर जे प्रांत आहेत त्यात आपण जेमतेम रांगणारे बाळ आहोत !

आता प्रथम आपण दैनिकांतील इंग्लीश कोड्यांचा आकृतीबंध समजून घेऊ. मागच्या भागात लिहिल्याप्रमाणे शब्द्कोड्यांचे २ मूलभूत प्रकार म्हणजे सामान्य आणि गूढ. माझे लक्ष्य फक्त सामान्य कोडी हेच होते पुढील विवेचन हे तेवढ्यापुरतेच आणि केवळ माझ्या दृष्टीकोनातून असेल. या दैनिकांत दर सोमवार ते शुक्रवारच्या कोड्यांच्या कठीणतेची पातळी ‘साधारण’ असते. शनिवारच्या कोड्यात ती त्याहून वरच्या पातळीवर जाते. तर रविवारच्या कोड्याची पातळी ही महाकठीण असते – अगदी मेंदूला झिणझिण्या येतील इतकी.

cross.jpg

आता सोम ते शुक्रवारच्या कोड्यांपासून प्रारंभ केला. कोडेनिर्माते त्यांना ‘easy’ म्हणतात पण मी त्यांना ‘नॉर्मल’ म्हणणे पसंत करेन. (इंग्लीश मातृभाषिकासाठी ती इझी असतील !) एका कोड्यावर सुमारे पाऊण तास घालवल्यावर ते कसेबसे १०% सुटले. हे अपेक्षितच होते. मग एक काम केले. आजच्या कोड्याचे उत्तर उद्याच्या अंकात येत असते. तेव्हा आजचे पान जपून ठेवायचे आणि दुसऱ्या दिवशी सरळ उत्तरे बघून ती हातानी त्यात लिहून काढायची. असे करताना इंग्लीश कोड्यांच्या विषयांची व्याप्ती समजू लागली. त्यांचे जे काही खास विषय असतात त्यात सामान्य मराठी माणूस अनभिज्ञ असतो. उदाहरणार्थ काही विषय असे :

१. त्यांच्या बोलीभाषेतील अनौपचारिक शब्द, खास अपशब्द, म्हणी आणि वाक्प्रचार
२. संगीत, कलाविष्कार, संस्कृती आणि आनंदोत्सवांशी संबंधित शब्द.
३. विशेष खाद्य आणि मद्य पदार्थ !
४. अ‍ॅडम, इव्ह, नोहा, बायबल.... हे प्रांत
५. ग्रीक व रोमन संस्कृतीविषयक शब्द.

या निरीक्षणानंतर एक लक्षात आले. ही कोडी सोडवताना आपण हातात पेन्सिल (पेन नव्हे, कारण खोडता आले पाहिजे) घेऊन निव्वळ स्मरण आणि कल्पनाशक्तीवर काही उत्तरे येणार नाहीत. सुरवातीस आपल्याला शब्दकोशाची मदत घ्यावीच लागेल. जशी ती घेऊ लागलो तसे अजून एक समजले. निव्वळ शब्दकोशापेक्षा इथे समानार्थी कोश अधिक उपयुक्त असणार आहे. तसेच गुगलचा वापरही बऱ्यापैकी करावा लागणार आहे. मग गरजेनुसार या सर्व आयुधांची मदत घेऊन हा कोडेप्रवास चालू केला. इंग्लीश कोड्यांत एक महत्वाचा मुद्दा असतो स्पेलिंगचा. काही शब्दांच्या बाबतीत ब्रिटीश व अमेरिकी शब्दांचे स्पेलिंग भिन्न असते. बरेचदा असा अमेरिकी शब्द एका अक्षराने कमी असतो. कोड्यातील रिकाम्या चौकटीची संख्या आणि शब्दाची अक्षरसंख्या तंतोतंत जुळावी लागते. त्यामुळे दर्जेदार कोडेनिर्माते कोडयाखाली महत्वाची तळटीप देतात, की त्यातले शब्द या दोनपैकी कोणत्या शब्द्कोशानुसार निवडले आहेत. तसे न दिल्यास कोडे सोडविणाऱ्याची कधीकधी चिडचिड होऊ शकते. उदा. ‘चित्रपटगृह’ असे शोधसूत्र असल्यास त्याचे उत्तर theatre का theater असा संभ्रम होतो आणि त्या बदलाचा अन्य उभ्या/आडव्या शब्दशोधावर देखील परिणाम होतो.

या शब्द्शोधाचा सुरवातीस एक महत्वाचा फायदा होतो. तो म्हणजे काही प्रसिद्ध विशेषनामांची स्पेलिंग्स आपली पाठ होतात. बऱ्याचदा आपला गैरसमज असतो की आपल्याला ती बरोब्बर माहिती आहेत. पण काही वेळेस तसे नसते आणि इथल्या काटेकोर शब्दसंख्येमुळे आपण गंडतो. स्वानुभावातले उदाहरण देतो. समजा एखादे उत्तर ‘स्वीडन’ हा देश आहे. आपल्या मराठी उच्चार पद्धतीनुसार आपण पटकन ते Sweeden असे करायला जातो आणि चुकतोच. त्या शब्दात ee नसून फक्त एक e आहे हे मला कोडी सोडवितानाच जाणवले. मग मी त्या शब्दाचा उच्चार मनातल्या मनात ‘स्वेडन’ असाच पाठ केला.

इंग्लीश बोलीभाषेतील शब्द शिकणे हा अजून एक फायदा मला झाला. त्यातले काही तर इतके गोड होते की त्यांच्या प्रेमातच पडायला झाले. त्याचे हे एक उदाहरण. शोधसूत्र असे होते:

‘क्रिकेटच्या एका डावात भरपूर झेल सोडलेला खेळाडू’.
उत्तराची अक्षरसंख्या आहे तब्बल १३. आता इथे आपले सामान्यज्ञान किंवा शब्दकोश फारसा कमी येत नाही. लाक्षणिक अर्थाने हा शब्द योजलेला आहे. त्याचे उत्तर आहे ‘butterfingers’ !

लेखात वर या कोड्यांचे खास विषय दिलेले आहेत. त्यातील अनेक प्रांतातले माझे सामान्यज्ञान हळूहळू वाढत गेले. एकंदरीत या कोड्यांतील विहार म्हणजे युरोप-अमेरिकेची बसल्याबसल्या सांस्कृतिक सफर असते. त्यांच्या पौराणिक, ऐतिहासिक, देव-दैत्यविषयक, कलाविष्कार आणि गाजलेले लेखक/ कलाकार अशा अनेकविध प्रांतातील विशेषनामे आपल्याला माहिती होतात. त्यांच्या विशिष्ट नद्या आणि पर्वतांची नावे इथे वारंवार विचारलेली असतात. विविध लांब पायांचे पक्षी इथे भरपूर विहार करतात आणि गेंडा आणि पाणघोड्यासारखे प्राणी तर ठाण मांडून बसतात ! ग्रीक व लॅटिन भाषांतील काही पिटुकले शब्द इथे तोंडी लावण्यासाठी असतात. तर जर्मन, फ्रेंच व स्पॅनिशमधील आदरार्थी संबोधने इथली भाषिक मेजवानी समृद्ध करतात. इंग्लीश भाषेबाबत आपल्याला ब्रिटीश व अमेरिकी वैशिष्ट्ये आणि भेद माहित असतात. पण कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड इथल्या बोलींतील काही खास शब्दसमूह हे तसे अपरिचित. तेही आपल्याला कोड्यांत भेटतात. जशा आपल्या मराठीच्या विविध बोली तशाच त्यांच्याही हे खरे.

काही कोड्यांतून असे काही खास शब्दसमूह मिळाले की ते माझ्या लेखनाचे विषय ठरले. एका साप्ताहिक कोड्यातील शोधसूत्र होते : “ अपहरणकर्ते आणि ओलीस यांच्यातील प्रेमभावना”. त्याचे उत्तर आहे ‘स्टॉकहोम सिंड्रोम.’ मग उत्सुकतेने या रंजक विषयावर उत्खनन केले आणि लेख लिहीला. (https://www.maayboli.com/node/68894).

अशा प्रकारे दैनिकात नेहमीच्या वारी असणारी सामान्य कोडी मी बराच काळ सोडविली. जेव्हा त्यातले ७०% शब्द सुटू लागले तेव्हा मग हळूच रविवारच्या महाकठीण कोड्यास हात घातला. सुरवातीस पदरी पडले ते फक्त नैराश्य ! अगदी समानार्थी कोश जवळ घेऊन बसले तरी फारसा उपयोग नसायचा. कारण एखाद्या शब्दाचे पन्नासेक पर्यंत समानार्थी शब्द असायचे आणि त्यातला एकच कोड्यातील उभ्या-आडव्या जुळणीत फिट बसणार असायचा. ही दमछाक जबरदस्त असते. कोड्यातील विशेषनामे ओळखायची सूत्रे देखील महाकठीण. कुठल्यातरी अतिप्राचीन ग्रंथांचे लेखक अथवा युरोपीय चित्रकारांची किंवा संगीतकारांची नावे विचारलेली. त्यामुळे पहिले ६ महिने मी साप्ताहिक कोडे अगदी ५% सुटले तरी धन्य मानायचो. काही शब्द तर खूप कठीण आणि अपरिचित असायचे. त्यांची सूत्रे जालावरील ‘क्रॉसवर्ड सॉल्व्हर’ मध्ये पाहिली तरी उत्तर शोधणे अशक्य व्हायचे. मग गुमान आठवडाभर थांबून पुढच्या अंकाची वाट पहावी लागे.

या निमित्ताने एक खूप जुनी आठवण जागी झाली. १९८०च्या दशकांत पेपरात साप्ताहिक कोड्याचे २ भाग करून त्यांच्यामध्ये दोन रेघा मारल्या असत. त्या रेघांच्या मधोमध ‘कॉफी टाईम’ असे लिहिलेले असे ! तेव्हाचे काही दर्दी लोक मी कोड्याचे दरम्यान खरेच चहा पिताना पाहिले आहेत. यावरून त्यातून होणारी मेंदूची थकावट लक्षात यावी.

tea.jpg

आता मला मराठी व इंग्लीश कोड्यांचा बौद्धिक व्यायाम करीत दोन दशके झाली आहेत. तेव्हा मीच माझा परीक्षक बनून गुण द्यायचे ठरवल्यास काय चित्र आहे? मराठी कोड्याचे बाबतीत सरासरी ९५% कोडे सुटणार याची खात्री वाटते. चौकटीवाले दैनिक कोडे मी ७ मिनिटांत तर साप्ताहिक महाकोडे २० मिनिटांत हातावेगळे करू शकतो. हाच आत्मविश्वास इंग्लीश कोड्याचे नाव काढताच काहीसा डळमळीत होतो. इथे दैनिक कोडे ७०% पर्यंत तर साप्ताहिक ३०% पर्यंत अशी ही गुणतालिका आहे. सोडवायचा वेळ अर्थातच मराठीच्या २-३ पट अधिक असतो. ज्या दिवशी दैनिक कोडे पूर्ण सुटते, तो माझ्यासाठी आनंदोत्सव असतो.

यावर थोडे आत्मविश्लेषण केल्यास त्याचे स्पष्टीकरण मिळते. मातृभाषा ही खऱ्या अर्थाने आपली ‘आतड्याची’ भाषा असते. आपल्या जन्मापासून ती आपण विविध रूपांत आणि बोलींत सतत ऐकतो आणि हवी तशी फिरवून आणि वाकवून वापरतो. आपली आपणच ती छान शिकत जातो. मग का नाही त्यावर ठराविक प्रभुत्व येणार? मात्र इंग्लिशचे तसे नाही. व्यवहाराची आणि पोटापाण्याच्या उद्योगाची भाषा म्हणून ती आपल्याला ‘शिकवली’ जाते. तिच्या जागतिक बोली तसेच अनेक पैलू हे आपण अंतरातून आत्मसात करण्यात खूप कमी पडतो. मी हे निव्वळ स्व-निरक्षण म्हणून नोंदवले आहे; त्याबद्दल अजिबात खंत नाही. गूढ इंग्लीश कोड्यांना अजून कधी हातही लावलेला नाही आणि तो लावून मेंदूला अतिरिक्त ताण द्याचीही अजिबात इच्छा नाही !

आता चौकटी-कोडी सोडून इंग्लीशमधल्या अन्य एका प्रकाराकडे वळतो. त्याचे नाव आहे ‘Anagram’ (विपर्ययी नवशब्द). हा एक अनोखा आणि मेंदूला वेगळ्या प्रकारची चालना देणारा शब्दखेळ आहे. यात ५ पासून ९ पर्यंत सुटी अक्षरे दिली असतात. आता ती योग्य क्रमाने जुळवून अनेक किमान ४ अक्षरी अर्थपूर्ण शब्द करायचे असतात. तसेच प्रत्येक शब्दात एक ठराविक अक्षर हे सक्तीने घ्यायचे असते. जास्तीत जास्त किती शब्द होऊ शकतात त्याचा आकडा जाहीर केलेला असतो. आपण जितके शब्द करू त्या प्रमाणात आपल्याला उत्कृष्ट/मध्यम/साधारण अशी श्रेणी मिळते.
साधारणपणे एकूण ९ अक्षरांचे कोडे हे प्रमाण मानले जाते. त्यापासून शब्द तयार करताना किमान एक शब्द ९ अक्षरी लागतो आणि बाकीचे अर्थात किमान ४ अक्षरी. कोड्याचे अन्य काही उपनियम असतात. जसे की एखाद्या नामास s किंवा क्रियापदास s /ed असे लावून केलेले शब्द चालत नाहीत. कोडे सोडवायला घेतले की ४ अक्षरी शब्द पटापट जमतात पण अधिक अक्षरी शब्द करताना आपला कस लागतो आणि तो सर्वात जास्त अर्थात ९ अक्षरीच्या बाबतीत. हा मोठा शब्द आपण ऐकलेला आहे की नाही त्यावर आपली अक्षरांशी झटापट किती वेळ होणार हे ठरते. हे कोडे एका बैठकीत हातावेगळे करायचे नसतेच. आरामात दिवसभर पुरवता येते. त्यांनी दिलेला जास्तीतजास्त शब्दांचा आकडा गाठणे हे आव्हान असते. यातले दर्दी लोक त्या आकड्याहून १-२ अधिक शब्द बनवू शकतात ! असेच एके दिवशी मला ९ अक्षरी शब्दाने दिवसभर रडवले होते. जाम जमत नव्हता. दिलेली अक्षरे होती :
a p c d h e y m r
दिवसभर काम करता करता मध्येमध्ये खूप प्रयत्न करून झाला होता. संध्याकाळी फिरून आलो, व्यायाम केला आणि बाजारहाटही झाला. डोक्यात सारखे ते ‘नवग्रह’ फिरत होते पण त्यांचा योग्य क्रम काही सुचेना. एव्हाना जवळपास १२ पाठकोरे कागद खरडून खर्ची पडले होते. रात्रीचे १० वाजले. अखेरचा प्रयत्न म्हणून ती अक्षरे जुळवली आणि हा शब्द तयार झाला:
Pachyderm.

तो मी कधी ऐकला नव्हता पण आता याहून डोळ्यांना बरा वाटेल असा अर्थपूर्ण अक्षरक्रम होणार नाही याची खात्री वाटली. हा शब्द काहीतरी जीवशास्त्रातील आहे असे मनोमन वाटले. मग उघडला शब्दकोश आणि काय ! होय, तो अधिकृत शब्द निघाला. त्याचा अर्थ ‘हत्ती ’(आणि जाड कातडीचे प्राणी) ! हत्ती म्हणजे elephant इतकेच माझे ज्ञान होते. आज त्यात फारच मोलाची भर पडली होती. तेव्हा मी घरी एकटाच होतो. झालेल्या आनंदाने अक्षरशः पागल झालो आणि संगीत लावून १० मिनिटे चक्क नाचलो ! अथक प्रयत्नांती हा शब्द आल्याने झालेला आनंद अवर्णनीय होता हे काय सांगायला पाहिजे? यानंतर गेल्या १० वर्षांत असे अनेक शब्द सुटल्याचा आनंद मी अनेकदा घेतला आहे. असेच एकदा इंग्लीश पेपरात हत्तींच्या फोटोखाली pachyderm शब्द वाचनात आला आणि त्यामुळे पूर्वीचा आनंद द्विगुणीत झाला. अशी कोडी सोडवताना इंग्लिशचा गणिती तत्वाने अभ्यास होत राहतो. म्हणजे, कुठल्या अक्षरानंतर कुठले ‘चालते’ किंवा नाही. sion/ tion /qua/ sh/ th ....इत्यादी अक्षरसमूह वारंवार हाताळले जातात. दिलेल्या ९ अक्षरांत जर स्वरांची संख्या (व्यंजनांपेक्षा) बरीच जास्त असेल, तर ९ अक्षरी शब्द करणे अधिक अवघड असते.

Anagrams चा एक विस्तारित प्रकार म्हणजे एखाद्या शब्दसमूह किंवा वाक्यापासून अक्षरक्रम बदलून नवा समूह तयार करणे. यात मूळचा समूह अर्थपूर्ण असतोच. नवा समूह होईल तो अर्थपूर्ण किंवा बरेचदा विचित्र अर्थाचा तयार केला जातो. दोन मजेदार उदाहरणे देतो:
१. मूळ शब्दसमूह आहे : New York Times
आता त्याचा हा anagram : Monkeys write !

२. मूळ शब्दसमूह : mother in law
त्याचा हा anagram : woman Hitler !!

( सर्व ज्येष्ठ भगिनींनी हलकेच घेणे हेवेसांनल. Bw )

या रोचक विषयावर नंतर जालावर माहिती वाचली. Anagrams हा युरोपीय भाषांतला फार जुना शब्दखेळ आहे. पूर्वीच्या राजांच्या पदरी काही कुशाग्र बुद्धीची माणसे Anagramers म्हणून नेमलेली असत. त्यांनी वरीलप्रमाणे विविध मनोरंजक शब्द राजाकडे सादर करायचे असत. त्याचा त्यांना उच्च मोबदला मिळत असे. आजच्या उद्योग जगतातही असे काही बुद्धिमान लोक कंपनीचे सल्लागार म्हणून काम करतात. एखाद्या उत्पादनाला जरा हटके मुद्रानाम शोधणे हे त्यांचे काम असते. त्यासाठी सामान्य शब्द घेऊन त्यांपासून मजेदार Anagrams ते तयार करतात. एक सोपे उदा. देतो. ‘टोयोटा’ कार्सचे जे ‘Camry’ मॉडेल आहे ते चक्क एक Anagram आहे. त्याचा मूळ जपानी शब्द ‘कानमुरी’ आहे खरा, पण जेव्हा ‘Camry’ इंग्लिशमध्ये लिहीले जाते तेव्हा तो my car चा Anagram आहे ! सहज एकदा विचार केला की मराठीत हा खेळ आणता येईल का? अवघड आहे कारण आपल्या अक्षरांना असलेल्या काना, मात्रा, उकार, वेलांटी इत्यादींमुळे ते फारसे जमणार नाही. करायचेच झाल्यास ‘वरद तळवलकर’ सारखे निव्वळ मूळाक्षर असलेले शब्द घ्यावे लागतील.

इंग्लीश कोड्यांची विविधता मराठीपेक्षा अधिक आहे. त्यांचे जालावर देखील नवनवे शब्दखेळ उपलब्ध असतात. मी या लेखात वर्णन केलेल्या कोड्यांपुरते मला सीमित ठेवलेले आहे. ही पातळी आनंद आणि समाधानाची आहे. याहून अधिक कोड्यांत बागडून ‘कोडे-किडा’ होण्याची इच्छा नाही !

शब्द्कोड्यांचा छंद आपल्याला छान रिझवतो. वेळप्रसंगी आपल्या एकटेपणात तो सुरेख साथ देतो; आपले विचार भरकटण्यापासूनही वाचवतो. कोडे सोडवायला बसताना बाजूस आपले आवडते (शब्दाविण) संगीत मंद आवाजात लावून ठेवायचे, बस्स ! त्याच्या तालावर शब्द पटापट सुटत जाणे हा स्वर्गीय आनंद असतो. जर एखाद्या कुटुंबात एकत्रितपणे कोडे सोडवायला घेतले तरी त्याची सामूहिक मजा काही औरच असते. लांबच्या कौटुंबिक पर्यटनात अंताक्षरीचा कंटाळा आला की मराठी कोडी एकत्रित सोडविणे ही एक धमाल असते.

आजपर्यंतच्या माझ्या या दीर्घ शब्दप्रवासात शिकलेले नवे विशिष्ट शब्द मी वहीत नोंदवून ठेवतो. असे म्हणतात की प्रत्येक शब्दातून त्याचा इतिहास डोकावत असतो. जेव्हा मी माझी ती शब्दवही कधी उघडून बघतो तेव्हा त्यातील एकेक शब्द माझे सुरेख स्मरणरंजन करतो. कुठल्या शब्दाने तो सुटत नसताना आपले किती डोके खाल्ले होते याच्या आठवणी आता सुखद वाटतात. कुटुंबापासून एकटे राहण्याच्या परिस्थितीत मी हा छंद स्वीकारला. त्यातून गवसलेल्या हजारभर शब्दांची सोबत आता आयुष्यभर पुरणार आहे.
**********************************************
समाप्त.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूपच रंजक लेख, तुमचा 'कोड'गेपणा असाच सुरू राहू देत आणि त्यात प्रगती होउ देत ही शुभेच्छा Happy

हाही भाग छान माहितीपूर्ण आणि रंजक आहे. कोड्यांचा चांगला छंद तुम्ही मस्त जोपासला आहे.
लेखातील pachyderm , मजेशीर anagrams हे दोन्ही आवडले.

वरील सर्व नियमित वाचकांचे आभार !
एक विनंती

या विषयाचे सादरीकरण मुद्दाम २ भागांत ( मराठी व इंग्लिश कोडी) केले होते. ज्यांना लेख आवडले असतील त्यांनी या दोनपैकी कोणता भाग अधिक भावला, हे सांगितल्यास आभारी होईन.
(आत्मपरीक्षण हा हेतू).

हाही लेख छानच !

स्टॉकहोम सिंड्रोम >> याबद्दल पहिल्यांदाच माहिती मिळाली. त्यावरचा लेखही अतिशय वाचनीय.

मला मराठी शब्दकोडे सोडवण्याची लहानपणापासून सवय आहे त्यामुळे आधीच्या लेखात बर्‍याच वेळा अगदी.. अगदी.. असे झाले तर हा लेख नवीन माहिती देणारा म्हणून खूप आवडला.. एकूणात दोन्हीही लेख आवडलेच!

मला मराठी कोडी सोडवण्याचा इतका छंद होता की दारु पिणाराला नशा येण्यासाठी प्रमाण वाढवावे लागते. मराठी कोडी सोडवणे हातचा मळ झाल्यानं एका स्टेजला कोडी सोडवणे थांबवलं.
इंग्रजी जमतं पण फार डोकं खावं लागतं. आताशा मला कोडी सोडवणे,हार्ड लेव्हल च्या गेम खेळणे, वाहन सुसाट वेगाने चालवणे अशा गोष्टी थ्रील/ आनंद देत नाहीत.

डॉ कुमार यांचे दोन्ही लेख वाचले. आवडले, पण माझ्या मनात नक्की काय विचार आले ते लिहितो.
फार पूर्वी GRE परीक्षेची तयारी करताना २-३ हजार शब्द पाठ केले होते ते आठवले. त्या शब्दांचा प्रत्यक्ष आयुष्यात फार क्वचितच वापर झाला, Dictionary ला Lexicon हा प्रतिशब्द आहे हे माहीत असले किंवा नसले तरी जीवनात फारसा फरक पडत नाही, पण उपयोग काय तर परिक्षेत फायदा होतो. स्पेलिंग-बी सारख्या परीक्षा तशाच आणि कोडी सोडवायचा हा प्रकार पण काहीसा तसाच वाटला. ५०००, मग १०,००० मग २०,००० शब्द माहीत झाले की कोडी सोडवता येणार. ते पण बहुतेक वेळा, १००% नाही कारण मग एखादे वेळी   floccinaucinihilipilification असा क्लिष्ट शब्द (The action or habit of estimating something as worthless) पण शब्दकोड्यात येऊ शकतो.

माझ्या मते, मुळात भाषेचे उद्दिष्ट म्हणजे आपले म्हणणे समोरच्या व्यक्तीला समजले पाहिजे. दुसरे मत म्हणजे भाषा जितकी साधी, सरळ असेल तितकी ती समजायला सोपी पडते. त्यानंतर माझे मत आहे की सतराशे साठ गोष्टी माहीत करून घ्यायची नेहमीच गरज नसते. एस्किमो लोक बर्फ़ाला २७ प्रकारे संबोधन करतात असे कुठेतरी वाचले होते. त्यांची ती कदाचित गरज असेल (बर्फ भुसभुशीत आहे की घट्ट आहे की ठिसूळ आहे वगैरे) पण म्हणून आपल्याला त्या २७ स्वतंत्र शब्दांची गरज आहे का? श्री. शशी थरूर यांच्यासारखे इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवण्याची खरच गरज आहे का? हा कधीतरी विचार केला पाहिजे. महत्वाचे म्हणजे केवळ आपली शब्दसंपदा वाढल्याने आपले ज्ञान वाढणार आहे का? Richard Feynman - Names Don't Constitute Knowledge हा व्हिडिओ आठवला.
आणि माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपल्याकडे या आयुष्यात लिमिटेड वेळ असतो. तो आवडीच्या गोष्टीत घालवावा असे माझे मत आहे. आता आंतरजालामुळे प्रतिशब्द शोधणे खूप सोपे झाले आहे. मला उर्दू येत नाही, पण ही कविता समजायला अडचण आली नाही. पण त्याच्यासाठी मी उर्दू शिकण्यात वेळ वाया घालवत नाही.

अर्थात हौसेला मोल नसते. तुम्हाला शब्दकोडे  सोडवून आनंद मिळत असेल तर मग उत्तमच. त्यामुळे तुम्ही शब्दकोडे सोडवता, त्यातून तुम्हाला आनंद मिळतो ही फारच छान गोष्ट आहे. तुम्हाला शुभेच्छा.

आजच्या घडीला साधारण ६९०० भाषा अस्तित्वात आहेत, Experts predict that even in a conservative scenario, about half of today's languages will become extinct within the next 50 to 100 years.
भाषा नष्ट होणे ही काही नवी गोष्ट नाही. आजवर अनेक भाषा नष्ट झाल्या आहेत.
पुढील ५०० ते १००० वर्षात कदाचित जेमतेम १०० भाषा टिकतील. गंमत या गोष्टीची वाटते की ज्या भाषा आता नष्ट होणार आहेत किंवा नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत त्यांचा अभ्यास का केला जातो? आणि केवळ अभ्यासचं न्हवे तर ती भाषा (उदा. संस्कृत) टिकून राहावी म्हणून आटापिटा का केला जातो? (संवाद हे भाषेचे उद्दिष्ट धरले तर) एकंदरीत जितक्या भाषा कमी असतील तितके मनुष्यजमातीला एकमेकांशी संवाद साधणे अधिकाधिक सोपे होणार नाही का?
मला तरी हा प्रश्न अधिक रोचक वाटतो.

निलाक्षी,
दोन्ही भागांबद्दल तुलनात्मक मत दिल्याबद्दल आभार.
समीर,
अगदी बरोबर. छंद आणि व्यसन यातील सीमारेषा ओळखणे महत्वाचे. आवडीची गोष्ट जोपर्यंत 'छंद' असते तोपर्यंतच मजा येते. त्याचे व्यसनात रुपांतर झाले की व्यसनमुक्तीच्या दिशेने जावे लागते !

उ बो,
विचारप्रवर्तक समतोल प्रतिसाद. आभार. त्याची दखल स्वतंत्र प्रतिसादात घेतोय.

उ बो,
तुमच्या प्रतिसादाने छान मंथन झाले. काही माझे आणि अन्य अभ्यासकांचे याबाबाबतचे विचार लिहितो.

१. कोड्यातील कालबाह्य, क्लिष्ट शब्द >>>

याबद्दल माझाही तीव्र आक्षेप आहे. यातून कोडेनिर्मात्याला ते अवघड केल्याचे समाधान मिळते. पण, सामान्य माणसाला त्याचा व्यवहारात काही उपयोग नसतो. दोन उदा:

* लेखाच्या भाग १ मध्ये चर्चा झालेला 'लापनिका' हा शब्द.
* इंग्लिश कोड्यातील ' ague' शब्द. याला ते शोधसूत्र देतात : ताप. आता याला गेली अनेक वर्षे प्रचलित असलेला सामान्य शब्द आहे 'fever'.
Ague हा थंडी वाजूनचा ताप असतो.
हा इ.स. १२५० मधला शब्द कोणी डॉ सुद्धा आज वापरत नाहीये.

आता 'कबगीर' बद्दल. हा शब्द मी कधीही ऐकला नव्हता. तो कोड्यात आला. पण माझ्या माहितीतील मोलाने घरकाम करणाऱ्या व्यक्तीस तो माहित आहे. अशा वेळेस ही माझ्या ज्ञानात पडलेली भर आहे हे मान्य.

सारांश : अवघड शब्द हे निदान कुठेतरी वापरात असावेत हे पटते.
****
क्रमशः..

>>> शब्दसंपदा आणि ज्ञान >>>

यावर आमच्या घरात चर्चा झाली होती. माझे वडील फक्त शब्दकोड्याचे शौकीन तर बायको फक्त सुडोकू सोडवते. अंककोड्यातून तर्कबुद्धीला चालना मिळते. मात्र ‘माहिती’त कुठलीच भर पडत नाही. ते कोडे सुटले तर आनंद नाहीतर अस्वस्थता.
शब्दकोड्यानी आपल्या माहितीत नक्कीच भर पडते. त्यातले क्लिष्ट शब्द सोडून देऊ. तसेच भाषाविषयक दृष्टीकोनही बाजूला ठेवू. सामान्यज्ञान वाढणे हा भाग नक्कीच आहे. एखादा कोड्यातला न सुटलेला शब्द तुम्हाला दिवसभर शोधक विचारात ठेवतो.

अंककोड्याचे तसे नाही. कोडे बाजूला ठेवले की डोक्यातला विषय संपतो.

साद, रोचक मुद्दा.
उ बो,

२. आपली शब्दसंपदा वाढल्याने आपले ज्ञान वाढणार आहे का
Names Don't Constitute Knowledge >
>>>

“To name is to create “, असे जी ए कुलकर्णी म्हणायचे !

३. भाषा टिकून राहाव्यात म्हणून आटापिटा का केला जातो? >>>>

यावर पूर्वी ‘अंतर्नाद’ मासिकात दीर्घ चर्चा झाली होती. त्याचा समारोप करताना संपादकांनी जे लिहीले होते, त्याचा गोषवारा असा:
जगातील अनेक नैसर्गिक गोष्टींची विविधता टिकवावी असे आपण म्हणतो कारण त्यात मजा आहे. वाघांच्या १० आणि हत्तींच्या ५ जाती टिकाव्यात म्हणून आपण आटापिटा करतोच ना? मग जेव्हा हाच विचार भाषांच्या बाबतीत होतो, तेव्हाच नाराजी का व्यक्त होते?

३. सर्व जगाची एक भाषा असावी हा विचार उदात्त आहे. Esperanto भाषेची निर्मिती त्यासाठीच केली गेली. (https://en.wikipedia.org/wiki/Esperanto#Achievement_of_its_creator's_goals).
ती १०० देशांत बोलतात असे विकिपेडिआ सांगतो. पण आशियात तरी माझ्या ‘ऐकण्यात’ ती आलेली नाही.

>>>>
सर्व जगाची एक भाषा असावी हा विचार >>>>
तसे मग सर्व जगच एक देश असावा हा विचार इतिहासात नेपोलिअन आणि अन्य काही थोरांनी मांडलेला आहे.

मागे दिवाळी अंकात एका बोटीवरच्या इंजिनीअरची मुलाखत आली होती. त्याने सांगितले की या नोकरीत यायचे असेल तर फक्त इंग्लीशवर भागणार नाही. Spanish शिकावेच लागेल.

सर्व नवीन प्रतिसादकांचे आभार !
चर्चेमध्ये थोडा विरंगुळा:

हा Anagram पाहा:
eleven plus two = twelve plus one
यात भाषा आणि गणित या दोघांचा संगम झाला आहे.
समीकरणाच्या दोन्ही बाजूचे शब्दसमूह एकमेकाचे Anagram आहेत !

छान लेख आणि चर्चा.
बाबा मागच्या वर्षांपर्यंत भरपूर शब्दकोडी सोडवत असत. आईला भारी वैताग येई म्हणून असेल कदाचीत आता नाही सोडवत. पण त्यांची शब्दसंपदा चांगली आहे. पुर्वी मी लोकसत्ता वगैरे मधली रविवारची कोडी बाबांबरोबर सोडवायचे त्याची आठवण आली. बरीच वर्षांत कोड्यात पडलेच नाही हे या लेखामुळे लक्षात आले Happy

मला कोणी 'चर्मचक्षु' चा भावार्थ सांगेल का? एका लेखात वाचला.
शब्दाची फोड समजते. पण भावार्थ नाही समजला.

वेका, धन्यवाद.

साद,
त्या शब्दाचा अर्थ संदर्भाने घ्यावा लागेल असे दिसते. निव्वळ शब्दफोड करून जमणार नाही.

खूप छान सर.
पहिला भाग जास्त आवडला. कारण लहानपणापासून लोकसत्तामधील शब्दकोडी सोडवलीत. सुडोकू आणि शब्दकोडी अतिशय आवडता विरंगुळा. मलाही माझ्या आधी कोणी कोडं सोडवलेलं नाही आवडायचं.
दुसरा भाग माहितीपूर्ण आहे. कॉलेजला असताना इंग्रजीचा प्रयत्न केला होता. पण शब्दकोश घेऊन बसावे लागेल असा अंदाज आल्यावर १-२% उत्तर मिळण्यावर समाधान मानलं. तेव्हा गुगलची मदत घेण्याचा काळ नव्हता. पण हा लेख वाचून परत त्यात उडी मारायची इच्छा होतेय. अभ्यासपूर्वक प्रयत्न करावा लागेल. स्फूर्तीसाठी धन्यवाद.

माऊ, धन्यवाद

पण हा लेख वाचून परत त्यात उडी मारायची इच्छा होतेय. >>>
जरूर मारा ! माझ्या हार्दिक शुभेच्छा !

अंतःचक्षु मतलब
[सं-पु.] - अंतर्चक्षु; भीतरी आँख; मन की आँख; अंतर्दृष्टि।

चर्मचक्षु मतलब
[सं-पु.] - ज्ञान चक्षु या अंतर्दृष्टि के विपरीत भौतिक अर्थात शरीर में स्थित नेत्र जिनसे मनुष्य बाहरी जगत को देखता और समझता है।

ज्ञानचक्षु मतलब
[सं-पु.] - 1. अंतर्दृष्टि 2. विद्वान 3. ज्ञानरूपी नेत्र 4. ज्ञानदृष्टि रखने वाला व्यक्ति।

प्रज्ञाचक्षु मतलब
[वि.] - 1. अपनी बुद्धि से ही सब कुछ जान-समझ लेने वाला; बुद्धिमान 2. जिसकी बुद्धि ही आँखों का कार्य करती हो। [सं-पु.] 1. धृतराष्ट्र 2. बुद्धिमान; ज्ञानी।

ल को,
कबगीर = मोठी पळी
(शब्दरत्नाकर नुसार )
शब्दाचे मूळ अरबी आहे.

एका उर्दूभाषिक व्यक्तीने सांगितले की ते खोलगट झाऱ्याला कबगीर म्हणतात.

एका उर्दूभाषिक व्यक्तीने सांगितले की ते खोलगट झाऱ्याला कबगीर म्हणतात. >>> इंटरेस्टिंग !!

वरील सर्व शब्दप्रेमींना धन्यवाद.
आपल्यातील बरेच जण मराठी कोड्यांचे शौकीन आहेत हे समजले. तसेच काहींना इंग्लीश कोडी सोडवून बघायची आहेत. त्या सर्वांनाही त्यासाठी शुभेच्छा !

ज्याप्रमाणे आपल्याला इंग्लीश पुस्तक किंवा चित्रपट हे एक वेगळा अनुभव देतात, तसेच ती कोडीही वेगळा अनुभव आणि आनंद देतील हे नक्की.
धन्यवाद !

इंग्लिश कोड्यांत आपल्याला गंडवणारी एक शब्दजोडी आहे :
salon & saloon .

आपण बहुतेक दोघांचा उच्चार 'सलून' असाच करतो व त्यानुसार स्पेलिंग करायला जातो.
आता दोन्हीच्या अर्थातला फरक पहा.

salon - दुकान किंवा प्रदर्शनाची खोली.
saloon - मद्यविक्री आणि मद्यपानाचे ठिकाण !

Pages