कर्करोग स्तनांचा

Submitted by सुबोध खरे on 18 December, 2019 - 02:13

कर्करोग स्तनांचा
हा एक महत्त्वाचा वाटणारा विषय मी मांडीत आहे.एक डॉक्टर म्हणून मला जे जे सांगायचे आहे ते.खालील लेख हा harrison's text book of medicine याचा संदर्भ घेऊन लिहिला आहे.
हा लेख केवळ स्त्रियांसाठी नसून पुरुषांना सुद्धा आपल्या आई, बहिण बायको व मुलगी यांच्या स्वास्थ्यासाठी आणि आरोग्य शिक्षणासाठी उपयुक्त ठरेल असे वाटल्याने लिहित आहे. मी लष्कराच्या कर्करोग केंद्रात ७ वर्षे नंतर हिरानंदानी रुग्णालयात २ वर्षे काम केल्याने आलेल्या अनुभवातून आणि केलेल्या अभ्यासातून लिहित आहे. त्यातील काही वर सध्या उलटसुलट चर्चा चालू आहेत यासाठी वरील संदर्भ देत आहे

भारतात स्त्रियांच्या कर्करोगा पैकी सर्वात जास्त प्रमाणात (३० %) कर्करोग हा स्तनांचा असतो तर गर्भाशयाच्या तोंडाचा कर्करोग हा १२ % आढळतो.(पूर्वी हे प्रमाण उलट होते )
साधारण ३.५ % बायकांना आयुष्यभरात स्तनांचा कर्करोग होतो. यापैकी ६०% कर्करोग हे ४० ते ६० या वयोगटात आढळून येतात.

स्तनात येणाऱ्या गाठी पैकी फक्त १०% कर्करोगाच्या असतात.

दुर्दैवाने कर्करोग हा न दुखत नाही त्यामुळे स्त्रिया त्याकडे दुर्लक्ष करतात.

शिवाय संकोच भीती आणि काळजी यामुळे रोग तपासणी करण्याऐवजी तो दडवून ठेवण्याकडे कल असतो.

परंतु वाळवी दडवून ठेवल्यावर जसे घर पोखरते तसेच कर्करोग आत वाढत जातो आणि शेवटी रुग्णाचा बळी जातो.
प्रत्येक ३५ वर्षा पेक्षा जास्त वयाच्या स्त्रीने स्वतःच्या स्तनाची तपासणी मधून मधून करणे हे आवश्यक आहे.आणि त्यात तिला काही फरक आढळला तर ते तज्ज्ञांना दाखवणे आवश्यक आहे.
प्रत्येक स्त्रीच्या स्तनाची ठेवण (consistency )हि वेगळी असल्याने डॉक्टर ला त्याबद्दल माहिती असणे कठीण आहे. म्हणून प्रत्येक स्त्रीने स्वतः च्या शरीराची माहिती ठेवणे स्वतःच्या प्रकृतीच्या दृष्टीने आवश्यक आहे. वेळ नाही किंवा जमले नाही हि कारणे देऊन कोणाचा फायदा होईल?

मासिक पाळीच्या ५-६ दिवसानंतर आंघोळीच्या वेळेस प्रत्येक स्त्रीने स्वतःच्या स्तनाची तपासणी करावी. मासिक पाळी च्या ५-६ दिवसांनी करण्याचे कारण असे कि पाळी च्या अगोदर किंवा पाळीच्या दरम्यान स्तन सुजलेले किंवा दुखरे असतात त्यामुळे हि तपासणी व्यवस्थित होत नाही. रजोसमप्ति नंतर महिन्याच्या कोणत्याही दिवशी ठरवून आपण तपासणी करावी.
दर महिन्याला अशी तपासणी करावी कि नाही याबद्दल सध्या तज्ज्ञांमध्ये मतभेद आहेत. परंतु ठराविक कालावधीनंतर (२-३ महिन्यात एकदा) अशी तपासणी करावी. यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे स्तनात गाठ असेल सूज/ लालसर पणा किंवा निपल मधून द्राव येत असेल. तर लगेच तज्ज्ञांना दाखवणे आवश्यक आहे.

Breast self examination
www.slideshare.net/nashua_08/breast-self-examination.

स्तनाच्या कर्क रोगा बद्दल ची काही उपयुक्त माहिती --
१) बाळाला स्तनपान केल्याने कर्करोग होण्याची शक्यता बरीच कमी होते.
२) नवीन लो डोस गर्भ निरोधक गोळ्या (ORAL CONTRACEPTIVE PILLS) घेतल्याने स्तनाच्या कर्करोगाच्या शक्यतेत कोणतीही वाढ होत नाही. तसेच त्या गोळ्यांनी बीजांड कोश आणी गर्भाशय यांच्या कर्करोगाची शक्यता बरीच कमी होते.या गोळ्यांचे फायदे त्यांच्या तोट्यांपेक्षा नक्कीच खूप जास्त आहेत हे आता सिद्ध झाले आहे.
)लठ्ठ पणा , मद्यपान , तंबाखूसेवन, किरणोत्सार आणि प्रदूषण या घटकांमुळे स्तनांच्या कर्करोगात वाढ होते असे आढळून आले आहे
४) गर्भारपणात स्तनाच्या कर्करोगाची शक्यता १:३००० इतकी असते त्यामुळे त्याकाळात तयार झालेल्या स्तनाच्या गाठीकडे दुर्लक्ष करू नये.

MAMMOGRAPHY हि चाचणी ४० वर्षे वयापासून दर वर्षी केल्यास कर्करोगापासून मृत्यूचे प्रमाण कमी होते विशेषतः ज्या स्त्रियांच्या जवळच्या नातेवाईक स्त्रिया मध्ये स्तनाचा कर्करोग आढळून आला आहे.
परंतु अशी चाचणी कोणतीही गाठ किंवा त्रास नसताना सामान्य सर्व स्त्रियात चाळीशीपासूनच करावी का याबद्दल तज्ज्ञांत एकवाक्यता नाही वयाच्या पन्नाशीनंतर मात्र MAMMOGRAPHY करावी याबद्दल तज्ञांत एकमत आहे.

यात स्तनाचे वरून खाली आणि डावीकडून उजवीकडे असे दोन एक्स रे काढले जातात आणि त्यानंतर सतांची सोनोग्राफी केली जाते या दोन्ही चाचण्या एकमेकांना पूरक अश्या आहेत या चा मुंबईतील खर्च २००० रुपये आहे इतर शहरात तो कमी असावा.या दोन्ही चाचण्यांनी कर्करोग सापडण्याची शक्यता ९०% पर्यंत असते एक महत्त्वाची गोष्ठ हि आहे कि कोणतीच चाचणी १००% नाही म्हणूनच स्वतपासणी मधून मधून करणे आवश्यक आहे.

कर्क रोग लक्षात येण्याअगोदर आपल्या शरीरात साधारण ७ वर्षे असतो आणि mammogrphy केल्याने कर्करोग हा साधारण एक ते दीड वर्ष अगोदर लक्षात येतो आणि या वेळेस केवळ गाठ काढून टाकल्यावर रुग्ण पूर्ण बरा होऊ शकतो. जितका आपण उशीर लावू तितका तो रोग पसरण्याची शक्यता असते यासाठी गाठ लक्षात आल्यास ताबडतोब आपल्या कौटुंबिक डॉक्टर किंवा कर्करोग तज्ञाकडे जावे.

अनुवांशिकता --कर्करोग हा बर्यापैकी अनुवांशिक आहे त्यामुळे ज्या स्त्रीयांची जवळच्या(first degree) नातेवाईक स्त्रीला (आई किंवा सख्खी बहिण) स्तनाचा कर्करोग झाला आहे तिला कर्करोग होण्याची शक्यता दुपटींनी वाढते आणि जिच्या जवळच्या दोन नातेवाईक स्त्रिया (आई आणि बहिण किंवा दोन्ही बहिणी )न कर्करोग झाला आहे त्यांना कर्क रोग होण्याची शक्यता ५ पटींनी वाढते. म्हणून जर आपल्या नातेवाईक ला (आई व बहिण)ज्या वयात कर्करोग होतो त्याच्या ५ वर्षे अगोदरपासून mammography करण्यास सुरुवात करावी.उदा. आई ला जर ४० वयाला कर्करोग निदान झाले तर त्या स्त्री ने ३५ व्या वर्षी हि तपासणी सुरु करावी.

BRCA १ आणि २ जनुके -- काही काळापूर्वी अमेरिकन नटी अँजेलिना जोली हिने आपल्याला अनुवांशिक कर्करोग आहे म्हणून याची तपासणी करून घेतली आणि त्यात तिला कर्करोग होण्याची शक्यता बरीच जास्त वाढल्यामुळे तिने आपले दोन्ही स्तन आणि दोन्ही बीजांडकोश यांची शल्यक्रिया करून काढून टाकले.

या दोन जनुकांची सर्व सामान्य जनतेत आढळून येण्याची शक्यता ०.०७ ते ०.०१० % इतकी कमी आहे त्यामुळे सामान्य जनतेने हि जनुक चाचणी करून घेऊन काहीही फायदा होणार नाही तर ज्यांच्या जवळच्या नातेवाईकांना वयाच्या ३५ व्या वर्षाच्या अगोदर स्तनांचा किंवा बीजांडकोषाचा कर्करोग झाला आहे अशा स्त्रियांनीच हि तपासणी करावी असे तज्ञांचे मत आहे.
हे ज्ञान जालावर सर्वत्र उपलब्ध आहे. आपण आपल्या सर्व नातेवाईक मैत्रिणी मित्र यात ज्ञान पसरवले तर कर्करोगावर विजय मिळवण्यात आपलयाला यश मिळू शकेल.
आपल्यास काही शंका असतील तर मी त्या यथा शक्ती त्यांचे उत्तर देण्याचा प्रयत्न करीन.

कृपा करून (second opinion )विचारू नये.अपुर्या माहितीवर उत्तर देणे अशक्य आहे.

आपला कृपाभिलाषी

सुबोध खरे

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

माहिती चांगली आहे, पण त्या व्हिडिओची लिंक देण्याबाबतीत पुनर्विचार करा. Animation असलेला व्हिडिओ देता आला तर पहा.

खेडेगावात, गरीब किंवा कमी शिक्षित वर्गातील स्त्रियांच्या मनात छातीत उदभवणार्या गाठींबाबत प्रचंड भिती आणि अज्ञान असते. बर्याच महिला याबाबत कुणालाच सांगत नाहीत. बहुतेक वेळा या गाठी कर्करोगाच्या नसतात. दुधाच्या गाठी किंवा इतर कारणामुळे आलेल्या गाठी याबाबत काही सांगू शकाल काय? (उदा. गाठींचे प्रकार, कारणे आणि त्यावरचे उपचार इ.).

अशिक्षित स्त्रियांमध्ये अज्ञान, भीती, संकोच यामुळे हा कर्करोग निदान होईपर्यंत बहुतेक वेळेस चौथ्या स्टेज पर्यंत गेलेला दिसतो. त्यातून स्त्रियांनी त्यागी सोशिक असायाला हवे अशा आपल्या परंपरांचा पगडा त्यांच्या मनावर असल्यामुले स्वतःचे आजार लपवून ठेवण्याकडे त्यांचा कल असतो.

परंतु जेव्हा घरची स्त्री आजारी पडते तेंव्हा घर आजारी पडते यामुळे त्यांचा अज्ञान आणि गैरसमज दूर करणे हे जास्त आवश्यक असते.

एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे दुधाच्या गाठी या स्त्री जेंव्हा आपल्या बालकाला दूध पाजत असते त्यावेळेस होतात आणि त्या वर्षनुवर्षे शरीरात राहत नाहीत.
संत्र्याएवढा कर्करोग घेऊन आलेली एक ४७ वयाची स्त्री ("मला वाटलं कि हि दुधाची गाठ आहे म्हणून दुर्लक्ष केलेलं") मी त्यांना विचारलं कि अहो तुमचा मुलगा २५ वर्षाचा आहे इतकी वर्षे दुधाची गाठ कशी राहील? याला त्यांच्याकडे उत्तर नव्हते.

ज्या वयात बहुसंख्य स्त्रियांना मूल होते म्हणजे वयाच्या ३० वर्षांपूर्वी हा कर्करोग होण्याची शक्यता फारच कमी असते (०.०५ %) .

३५ वयाच्या अगोदर होणाऱ्या गाठींमध्ये कर्करोग असण्याची शक्यता फारच कमी असते. त्यातून ज्या गाठी दुखतात त्यात कर्करोग असण्याची शक्यता नगण्य असते. परंतु आपल्या शरीरात गाठ आहे तर तिच्याबद्दल जागरूक राहणे आणि ती वाढत असेल तर डॉक्टरांना दाखवणे हे आवश्यक ठरते.
लठ्ठ स्त्रियांमध्ये किंवा ज्या स्त्रियांचे स्तन मोठे असतात त्यात आढळणाऱ्या गाठी या बहुतांशी "चरबीच्या" असतात.
यामुळे आपण एकदा तपासणी करून घेतली कि गाठी कुठे आणि कशा आहेत याचा एक आलेख मेंदूत तयार करून ठेवावा आणि त्यात काही "बदल" झाला तरच डॉक्टरांकडे जावे.

आपल्या डोक्यातील किडा गेल्यामुळे मिळणाऱ्या मानसिक शांतीची किंमत अनमोल आहे.

शंभर/दोनशे/तिनशे/वर्षापूर्वींची या रोगाची आकडेवारी उपलब्ध आहे का?
इतर रोगांचे आता प्रमाण कमी झाल्याने याची आकडेवारी वाढल्यासारखी वाटते का?

इसवीसनापूर्वी २००० साली मृत पावलेल्या इजिप्त मधील ममी मध्ये स्तनांचा कर्करोग आढळून आला आहे
https://www.sciencedaily.com/releases/2017/12/171214101215.htm

भारतातील लोकांची आयुर्मर्यादा १९४७ साली ३२ वर्षे होती
Health: Life expectancy in India rose to 65 years in 2012 from 32 years at the time of independence in 1947
https://blogs.wsj.com/indiarealtime/2013/08/15/indias-record-since-indep...

म्हणजेच तेंव्हा सरासरी कर्करोग होण्याची शक्यता ०.०५ टक्के एवढीच होती. आता माणसे जास्त जगू लागली आहेत त्यामुळे हे प्रमाण वाढत गेलेले दिसते.
बाकी पूर्वी सुद्धा माणसे मरत होतीच पण तेंव्हा वैर्याने मूठ मारली, कुणीतरी करणी केली म्हणून माणूस रक्त ओकून मेला किंवा भूताने घोळसल्यामुळे माणूस वाळून गेला आणि मृत्युमुखी पडला असे ऐकिवात येत असे ते यामुळेच.

माझ्या बहिणीला बाळाला दूध पाजणे बंद केल्यानंतर, तीन वर्षानंतर, एकदा गणपती उत्सवाच्या गर्दीत एका बाईचा धक्का लागल्याने छातीत दुखू लागले. दोन दिवसांनी गाठ जाणवली. तपासणी केल्यानंतर रिपोर्ट पाहून डाॅ. नी सांगितले, ती दुधाची गाठ होती.(तपासणी करतेवेळी लॅबमध्येच सिरिंजने गाठीमधील लिक्वीड खेचून घेण्यात आले होते). असे होऊ शकते का? तीन वर्षापर्यंत दुधाची गाठ छातीत न दुखता/जाणवता राहू शकते का? किंवा धक्का लागल्यामुळे नविन गाठ तयार होऊ शकते? (तिचे वय तेव्हा 33 होते).

खूपच चांगला धागा. चांगला उद्देश.
सोबत जो व्हिडीओ दिला आहे त्यात भरपूर टेक्स्ट आहे. पण ते इंग्रजीत का नाही ? फ्रेंच आहे का ?

@ Cuty
बऱ्याच वेळेस दूध येणे बंद झाल्यावर एखाद्या दूध वाहिनीत अडथळा निर्माण झाल्यामुळे त्यात पाण्यासारखा द्रव अडकून राहतो आणि ती दुग्ध वाहिनी त्या द्रवामुळे फुग्यासारखी फुगते (CYST). याला जोराचा धक्का लागला तर ते काही वेळेस दुखू लागते
यात सुई घालून ते पाणी काढून त्याची तपासणी करतात ९९. % पेक्षा जास्त वेळेस त्यात कर्करोग नसतो त्यामुळे त्याला दुधाची गाठ असेच म्हटले जाते. त्यात बहुसंख्य वेळेस दूध नसून चिकट पांढरट पाणीदार द्रवच असतो. यातील पाणी काढून टाकल्यावर नंतर काहीही करायची गरज नसते. यातून कर्करोग उद्भवत नाही.

धन्यवाद सुबोधजी !
स्तनदा मातांना बाळाचे दूध बंद करताना किंवा केल्यानंतर काही काळजी घेता येईल का जेणेकरून दूधवाहिनी बंद पडून (अडथळा येऊन)अशा दुधाच्या/पाण्याच्या गाठी किंवा cyst तयार होणार नाहीत?
किंवा

दूध बंद केल्यावर काही दिवसांनी तपासणी करावी का म्हणजे गाठ लवकर लक्षात येईल?

स्तनदा मातांना बाळाचे दूध बंद करताना किंवा केल्यानंतर काही काळजी घेता येईल का जेणेकरून दूधवाहिनी बंद पडून (अडथळा येऊन)अशा दुधाच्या/पाण्याच्या गाठी किंवा cyst तयार होणार नाहीत?

बाळाचे दूध बंद करताना किंवा केल्यावर स्तनात उरलेले दूध रोज थोडा थोडा दाब देऊन काढून टाकावे यामुळे दूध वाहिन्यांत दूध साठणार नाही आणि त्या कोरड्या राहून त्यात गाठी होणार नाहीत.

काही वेळेस डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध घेऊन दूध येणे बंद करता येते. (याचा हुच्चभ्रू पणाशी संबंध लावू नये)

स्तनात जंतुसंसर्ग झाल्यास किंवा काही वेळेस दुर्दैवने अपत्याचे निधन होते अशावेळेस असे करावे लागते आणि याबाबत (दूध येणे बंद करणे) बऱ्याच स्त्रियांना माहिती नसल्यामुळे त्यांना स्तनांचा दाह किंवा स्तनात गाठी होऊ शकतात.

ज्या भगिनींना या विषयाबाबत काही खाजगी विचारणा करायची असेल पण सार्वजनिक न्यासावर टाकण्याचा संकोच वाटत असेल त्या मला "खाजगीत संदेश" पाठवू शकतात. मी यथामती त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करेन

धन्यवाद सुबोधजी, खूप उपयुक्त माहिती.
बर्याच महिलांना माहिती नसते किंवा गैरसमज असतात. भिती असते. ती दूर होण्यास मदत होइल.

माहितीपूर्ण लेख. धन्यवाद.

मला नुकतीच काही symptoms आणि वेदनेमुळे मॅमोग्राफी करायला सांगितली. रिपोर्टस नॉर्मल आले. Dense breast tissues was the main cause of hard and painful breasts. पण काहीही औषध न घेता परत सगळं ठीक झालं. मी गुगल डॉक्टर असल्याने यावर बरंच काही वाचलं आणि कळालं की dense breast tissue असणाऱ्या स्त्रियांना ब्रेस्ट कॅन्सर होण्याचे चान्सेस जास्त असतात किंवा झाला तर लवकर डिटेक्ट होत नाही. हे खरं का? मी दर वर्षी मॅमोग्राम करून घेणं गरजेचं आहे का?

Touch wood, पण मला प्रेग्नन्सी सोडता कोणा गायनॅक कडे जायची कधीच गरज पडली नाही. मॅमोग्राफीचे रिपोर्टस नॉर्मल आले, म्हणून कोणाकडे रेफर करायला गेले नाही. इथे अनायसे डॉक्टरांकडूनच लेख आला, म्हणून माझे प्रश्न इथेच विचारले.

माहितीपूर्ण लेख.. तपासणी स्वतःची करण्याच्या सुचनेचे पालन करणार आहे व नातेवाईक स्त्रियांना सांगेन. धन्यवाद डॉ. साहेब.

dense breast tissue असणाऱ्या स्त्रियांना ब्रेस्ट कॅन्सर होण्याचे चान्सेस जास्त असतात किंवा झाला तर लवकर डिटेक्ट होत नाही.

या दोन्ही गोष्टी सत्य आहेत

परंतु आपली शक्यता किती आहे ते लक्षात घ्या.जास्त म्हणजे २० % जास्त असलं तरी प्रत्यक्ष हजारात साडे पाच ऐवजी सहा पूर्णांक सात इतकीच आहे म्हणजे त्याबद्दल एवढे चिंताग्रस्त होण्याची गरज नाही

The rates of cancer were 6.7 per 1,000 exams for women with dense breasts and 5.5 for women with non-dense breasts, according to the findings.

आपण ४० नंतर दर वर्षी mammography करून घ्या म्हणजे एक अंतर आपल्याला मानसिक शांतता लाभेल आणि यंदा कदाचित कर्करोग झाला तर त्याचे लवकर निदान होईल.

लक्षात घ्या स्तन जास्त घन असल्यामुळे होणारा कर्करोग जास्त गंभीर असतो असे नाही तर तो लक्षात येण्यास थोडा उशीर लागतो. तेंव्हा आपण जागृत असलो तर चिंता करण्याचे कारण नाही.

माहितीपूर्ण लेख

डॉक्टर माझ्या एका मैत्रिणीला छातीत गाठ असल्याचे कळले, तिने लगेच ब्रेस्ट स्पेशालिस्ट ला दाखविले, त्यांनी म्यामोग्राफी , सोनोग्राफी, बायोप्सी केली त्यात 1.5 cm x 1.8cm ची चरबीची गाठ हे निदान झाले. तेव्हा मैत्रिणीचे वय 36 होते
आता 6 महिन्यांनंतर पुन्हा सोनोग्राफी केल्यावर गाठ वाढल्याचे लक्षात आले 2 cm, मग यात तिला काही धोका असू शकतो का? ती चरबीची गाठ कर्करोगाची गाठ होऊ शकते का?

आता 6 महिन्यांनंतर पुन्हा सोनोग्राफी केल्यावर गाठ वाढल्याचे लक्षात आले 2 cm, मग यात तिला काही धोका असू शकतो का? ती चरबीची गाठ कर्करोगाची गाठ होऊ शकते का?

चरबीची गाठ कर्करोगाची साधारणपणे होऊ शकत नाही. गाठ मुळातच कर्करोगाची असावी लागते.

मुळात सर्वच्या सर्व स्त्रियांना स्तनात चरबी असते. चरबीचा शरीरात उपयोग हा इतर अवयवांना आधार देणे (पॅकिंग मटेरियल) म्हणून असतो.
काही स्त्रियांना याच चरबीच्या गाठी होतात. मग त्या त्वचेखाली असतात त्याला लायपोमा (LIPOMA) म्हणतात. तशाच गाठी स्तनात होतात.( का याचे कारण माहिती नाही). अशा चरबीच्या गाठी लठ्ठ स्त्रियांना अर्थात जास्त होतात. साधारण पणे वय वर्षे ४० च्या अगोदर फक्त सोनोग्राफी ( ४० नंतर मॅमोग्राफी +सोनोग्राफी) करून गाठ कसली आहे हे पाहतात. जर चरबीची गाठ असेल तर काहीच करायची गरज पडत नाही. परंतु जर सोनोग्राफीमध्ये काही शंका असेल तरच। इतर चाचण्या करतात.

स्तनात चरबीच्या गाठी असणे हि सामान्य आणि वारंवार दिसणारी (COMMON) गोष्ट आहे.

Thanku डॉक्टर, तिने बायोप्सी करून चेक केले होते की गाठ कसली आहे, तरी गाठ वाढल्याने काही त्रास होऊ शकतो का आणि यामुळे बाळाला दूध पाजण्यात काही त्रास होऊ शकतो का

लहान असताना गायीचे दूध पिल्याने ह्या रोगाचि शक्यता वा ढ ते असे वाचण्यात आले. ते किती खरे आहे?
ओर्गानिक दूध पिल्याने सुध्धा वाढते का शक्यता ?

बाळाला दूध पाजण्यात काही त्रास होऊ शकतो का
गाठ चरबीचीच असेल तर काहीच त्रास नाही.

आणि चाचण्या होईपर्यंत बाळाला दुसऱ्या बाजूला दूध पाजणे चालू ठेवावे आणि त्या बाजूचे दूध पिळून काढून टाकावे.

म्हणजे दूध साठून स्तनदाह होणार नाही.

लहान असताना गायीचे दूध पिल्याने ह्या रोगाचि शक्यता वा ढ ते असे वाचण्यात आले. ते किती खरे आहे?
ओर्गानिक दूध पिल्याने सुध्धा वाढते का शक्यता ?

सध्या वादात असलेले एक संशीधन म्हणजे गाईचे दूध प्यायल्यामुळे कर्करोगात वाढ होते. हे संशोधन एका विशिष्ट गटामध्ये केलेलं (seventh day adventist) होते आणि त्याबद्दल अजून बराच वाद आहे.

याबद्दल विस्तृत जनतेत संशोधन केल्याशिवाय नक्की अशा अनुमानावर येत येणार नाही.

मुळात अमेरिकेत गाईंचे दूध वाढवण्यासाठी त्यांना अनेक तर्हेची हॉर्मोन्स दिली जातात यामुळे असे होते का हे पण संशोधन करणे आवश्यक आहे.

परंतु हि कर्करोगाची वाढ रजोनिवृत्ती झालेल्या स्त्रियांतच आढळलेली आहे आणि पाळी चालू असलेल्या स्त्रिया आणि लहान मुलीत नाही.

आणि रजोनिवृत्ती झालेल्या स्त्रियांनि रोज दोन कप पर्यंत दूध पिणे हे सुरक्षित समजले जात आहे. इतर स्त्रियांनी दूध पिऊ नये असा कोणताही पुरावा माझ्या नजरेस आलेला नाही

The overall evidence so far has not shown a clear increase or decrease in risk of breast cancer with higher [cow's] milk intake. Thus, this topic needs further examination," Willett said.
https://www.medscape.com/viewarticle/925896#vp_3