काय म्हणावं या पावसाला.....

Submitted by सुमेधा आदवडे on 1 November, 2009 - 04:12

हा पाऊस पण ना...अगदी तुझ्यासारखाच आहे!
आला की तासनतास बोलतच राहतो.
मातीच्या गंधासोबत तुझ्या आठवणी घेऊन येतो.
अरे, पण तुझी आठवण करुन द्यायला
मी अजुन तुला विसरलेच कुठे आहे?
काहीच कळत नाही बुवा याला..
काय म्हणावं ह्या पावसाला?

मग थेंबाथेंबातुन त्या आठवणी माझ्यासमोर फेर धरु लागतात.
जमीनीवर पडण्याआधी माझ्या मनाला शिवुन जातात.
मग बाहेरचा गारवा माझ्या मनातही पसरतो.
त्या गारव्याने तुझ्या आठवणींना सर्दी होऊ नये
म्हणुन मी गरमागरम चहा घेते.
प्रेमाच्या उबीने चहा पोटात गेला की बरं वाटतं,
मलाही आणी आठवणींनाही!
मग आता यावेळेस तू काय करत असशील?
असं उगाच वाटत राहतं मला.
काय म्हणावं ह्या पावसाला?

पाऊस पडतो. मी एखादं जुनं गाणं ऐकत बसलेली असते.
मग कुणास ठाऊक काय होतं...
खिडकीत जाऊन त्या पागोळ्यांच्या धारांखाली माझे हात धरते.
मग अगदी लहान मुलांसारखे शिस्तीत सारे थेंब
माझ्या हातांवर पडतात.
नेमका तेवढ्यात फोन वाजतो.
तुझा असेल का? असं वाटुन मी धावतच आत येते.
ओल्या हातांनी फोन घेते.
आता तुझा आवाज ऐकु येईल या भावनेने उगाच मनात काही हुरहुरतं.
तेवढ्यात कळतं...
पलिकडल्या व्यक्तीला पण हीच वेळ मिळावी
रॉंग नंबर लावायला?
काय म्हणावं ह्या पावसाला?

पाऊस आता कमी झालाय.
पुरेशी हिरवळ पसरवुन घरी परत चाललाय.
तुझ्यासारखंच, "पुन्हा भेटू.." असं सांगतोय.
बघुया...आतापर्यंत तुम्हा दोघांची
वाट पहायची सवय झालीच आहे मला!
काय म्हणावं ह्या पावसाला?

गुलमोहर: 

>>त्या गारव्याने तुझ्या आठवणींना सर्दी होऊ नये
म्हणुन मी गरमागरम चहा घेते.
प्रेमाच्या उबीने चहा पोटात गेला की बरं वाटतं,
मलाही आणी आठवणींनाही!

वा वा.... बहोत खुब!
कश्या सुचतात हो अश्या 'ग्रेट' कल्पना Wink

छान. सुमेधा. अगं पण कवितेसोबत स्वगत नाही टाकले का तुझे..( काय म्हणावं बाई या पावसाला? प्रत्येक वर्षी एकटाच येतो मेला! सोबत घेऊन नाही येत कोणाला...शिष्ट कुठला!)

सप्टेंबर संपला, ऑक्टोबर ही सरला,
आता नोव्हेंबर मध्येही दर्शन दयायला लागला
काय म्हणावं ह्या पावसाला?
(माझं आपलं उगाच काहीतरी)