संसार की हर शय का इतना ही फसाना है...

Submitted by अतुल ठाकुर on 14 December, 2019 - 21:30

Dhund_1973_film.jpg

चित्रपटातील टायटल साँग हा एक वेगळाच विषय आहे. मी चित्रपट पाहाताना जर कधी चित्रपटाची टायटल्स हुकली की मला फार चुकल्यासारखे होते. अनेक चित्रपटांमध्ये टायटल्सचा वापर अत्यंत परिणामकारकरित्या केलेला आढळतो. अशा वेळी बी.आर चोप्रांसारखा "बोल्ड" विषयांवर चित्रपट काढणारा निर्माता दिग्दर्शक असेल, लिहिणारा शायर साहिर लुधियानवी असेल आणि संगीतकार रवी असेल तर या त्रिवेणी संगमावर जे काही निर्माण होते ते म्हणजे हे शीर्षक गीत. या निर्मितीला आणखी झळाळी येत असेल तर ती महेंद्रकपूरच्या आवाजामुळे. साहिर, रवि , महेंद्रकपूर आणि बी. आर. चोप्रा यांचे चित्रपट हा एक स्वतंत्र लिहिण्याचा विषय आहे.

१९७३ साली आलेला बी आर चोप्रा यांचा "धूंद" हा काळाच्या फार पुढचा चित्रपट. चित्रपटातील वकील अशोककुमारच्या म्हणण्याप्रमाणे अपंगत्वामुळे "जिंदगी के कुछ खास काम" करण्यासाठी नाकामयाब ठरलेला म्हणून राग, द्वेष, हिंसा, हेवा, असुया, जळफळाट यामुळे आलेली विकृती यांनी भरलेला नवरा डॅनीने उभा केला आहे. डॅनीच्याच काय पण हिन्दी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातसुद्धा मैलाचा दगड म्हणता येईल असा हा रोल आहे. आजही "धूंद" म्हटले की मला पडद्यावर प्लेट फेकून मारणारा व्हिलचेयरवरचा डॅनी आठवतो. अशा तर्‍हेचा रोल डॅनीला पुन्हा क्वचितच मिळाला असेल. पण या सार्‍या पुढच्या गोष्टी. त्याबद्दल वेगळ्याने केव्हातरी लिहेनच. पण आज मात्र लिहायचंय "संसार की हर शय का" वर...

साहिरने हे गाणे शंकराचार्यांच्या "ब्रह्म सत्य जगन्मिथ्या" सिद्धान्त समोर ठेवून लिहिले आहे की काय असे वाटावे इतके त्याने जगाच्या अशाश्वत असण्यावर या गाण्यात प्रभावी भाष्य केले आहे. "संसार की हर शै का इतना ही फ़साना है , इक धुंध से आना है, इक धुंध में जाना है". सुरुवातीलाच माणसाचा आदि अंत कुणालाही माहित नाही हे सांगून शायर पुढे जगात कशाचाच भरवसा नाही हे सांगु लागतात.

ये राह कहाँ से है, ये राह कहाँ तक है
ये राज़ कोई राही, समझा है न जाना है

इक पल की पलक पर है ठहरी हुयी ये दुनिया
इक पल के झपकने तक हर खेल सुहाना है

क्या जाने कोई किस पर किस मोड़ पे क्या बीते
इस राह में ऐ राही हर मोड़ बहाना है

ही वाट दूर जाते...पण स्वप्नामधील गावा नाही तर या वाटेचाही आदी अंत कुणालाही ठावूक नाही असे त्यांना म्हणायचे आहे. एका क्षणाचाही भरवसा नाही हे तर आपण नेहेमीच म्हणतो पण तो क्षण येईपर्यंत सारे काही आनंदात असते यावर नेमके बोट फक्त प्रतिभावंतच ठेवू शकतो. म्हणूनच "इक पल के झपकने तक हर खेल सुहाना है " असे शायर म्हणून जातात. पुढे कुठल्या क्षणी काय होईल हे सांगता येत नाही असे सांगताना शब्द येतात "इस राह में ऐ राही हर मोड़ बहाना है"...येथे गाणे संपते. खरं तर संपत नाही आपल्या मनात रुंजी घालत राहते.

कारण त्यात नूसते शब्दच नाहीत तर सर्वत्र धूके पसरलेले आणि धुक्यानेच वेढलेल्या उंचच उंच वृक्षांचे चित्रीकरण आहे. वातावरणाला आणखी गुढता प्रदान करणारे धूके आणि त्यात दर्‍या खोर्‍यांमध्ये वार्‍याने घुमावे तसा घुमणारा महेंद्र कपूरचा आवाज. या गीताला ही खास चाल लावली आहे रवी यांनी. चाल तर जबरदस्त आहेच. पण शेवटचे महेंद्रकपूरचे "ला ला ला ला ला ला ला ला" हे तर अगदी खास ऐकण्याजोगे. महाभारतासारख्या अफाट, अचाट आणि अजस्र पटावर "अथ श्री महाभारत कथा" म्हणायला महेंद्रकपूरचा आवाज उगाच नाही वापरला गेला. गाण्यातले सारे तत्त्वज्ञान महेंद्रकपूरचा आवाजाने आपल्यापर्यंत पोहोचते. आणि प्रेक्षक खुर्चीत सावरून बसतो. शीर्षक गीत म्हणजे नुसते कुणी काय केलं आहे याची पडद्यावर दाखवायची जंत्री नव्हे तर कथेचे सुतोवाच करणारा सूत्रधारच जणू. आता पुढे काहीतरी वेगळे, कधीही न पाहिलेले असे पाहायला मिळणार आहे त्याची नांदी या शीर्षक गीताने केलेली असते.

अतुल ठाकुर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आहे हे गाणे! हे शीर्षक गीत आहे हेच विसरले होते.
उगाच श्वेतांबरासारखी झीनत अमान धुक्यातून चालते आहे आणि गाडीला लिफ्ट मागते असे काहीतरी अर्धवट आठवत आहे. सिनेमा शोधावा लागेल.