पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त – १९. धुंद (१९७३)

Submitted by स्वप्ना_राज on 13 October, 2018 - 05:16

‘आपल्या प्रतिभासाधनेत व्यत्यय तर नाही ना आणला मी?’

‘अरे खटणे. या. कसली डोंबलाची प्रतिभासाधना? या बसा. काय म्हणताय?’

‘हे वाचाल का जरा?’ नम्रतेने माझ्या हातात एक वही देत सगाराम खटणे म्हणाला.

‘बघू. काय आहे?’

‘आता हे ललित आहे का परिक्षण ते तुम्हीच सांगायचं आहे.’

‘अरेच्चा! पण आहे काय हे?’

‘घरच्या वडिलधारया माणसांकडून इतकी वर्षं ६० आणि ७० च्या दशकातल्या हिंदी चित्रपटांबद्दल खूप ऐकत होतो. आपणही हे चित्रपट पाहावेत अशी खूप इच्छा होती. व्यस्त दिनक्रमामुळे आजवर हे शक्य होत नव्हतं. पण ह्या वर्षी अगदी दृढनिश्चयच केला की शेंडी तुटो वा पारंबी, हे चित्रपट पाहणारच. चित्रपट पाहताना लक्षात आलं की ह्याबद्दल बाकीच्यांना ही सांगावं. त्यांना ह्यात रस वाटला तर तेही आंतरजालावरून उतरवून घेऊन हे चित्रपट पाहतील. आनंद वाटल्याने वाढतो, नाही का? म्हणून हे सव्यापसव्य. हे वाचून ह्यावर आपले मौलिक मत द्याल का?’

‘का नाही? दुसर्‍याने लिहिलेल्या गोष्टीवर आपलं मौलिक मत देणे हा प्रत्येक मराठी माणसाचा जन्मसिध्द हक्क आहे आणि तो मी बजावणारच'

मी ती वही उघडली. त्यात काय होतं हे सांगण्यापेक्षा ती पानंच तुमच्यासमोर ठेवत आहे. तुम्हीच वाचा.
----

चित्रपट पाहिल्याचा दिनांक: ११ ऑक्टोबर २०१८
स्थळ: मुंबई शहर
वेळ: रात्रौ ९
चित्रपटाचे नाव: धुंद (मराठी अर्थ धुकं)
साल: १९७३
निर्माता व दिग्दर्शक – श्री. बी. आर. चोप्रा
संगीत – श्री. रवी
स्वरसाज - श्रीमती आशा भोसले, श्रीमती उषा मंगेशकर, श्री. मन्नाडे आणि श्री. महेंद्र कपूर
चित्रपटाचा एकूण अवधी - १३० मिनिटे
भाषा: हिंदी
प्रमुख पात्रं - ठाकूर रणजीतसिंग, रानी रणजीतसिंग, चंद्रशेखर, सुरेश सक्सेना, बांकेलाल

कथानक:

चित्रपट सुरु होतो तेव्हा आपल्याला एक विमान आकाशात झेपावताना दिसते. रात्रीच्या गडद अंधारात एक चारचाकी गाडी प्रचंड वेगाने वळणावळणाचा रस्ता कापत जात असते. सगळीकडे दाट धुकं पसरलेलं. अश्यात व्हायचं तेच होऊन गाडी एका झाडावर आपटते. एक तरुण त्यातून विजेरी घेऊन बाहेर पडतो. गाडी बंद पडल्यामुळे त्याला मदत मागण्यासाठी दूरध्वनी करणं आवश्यक असतं. त्याला एक घर दिसतं. तो दरवाजा वाजवतो पण त्याच्या लगेच लक्षात येतं की दरवाजा नुसता लोटलेला आहे. तो आत जातो. आत एक माणूस खुर्चीवर पाठमोरा बसलेला असतो. तो तरुण त्या माणसाला आपली अडचण सांगून दूरध्वनी करायची परवानगी मागतो. पण त्या माणसाकडून काही उत्तर येत नाही. त्याला डुलकी लागली असावी (मलाही रात्रीच्या जेवणानंतर लागते बऱ्याचदा!) या समजुतीने तो तरुण त्याच्या खांद्यावर हात ठेवतो तर काय? तो माणूस समोरच्या मेजावर धपकन पडतो. त्याचा मृत्यू झालेला असतो. (इथे मीही खुर्चीवरून पडलो हे मान्य करणं भाग आहे!)

ह्या धक्क्यातून तो तरुण सावरतो न सावरतो तोच त्याला दुसरा धक्का बसतो. त्या खोलीत कोपर्‍यात एक तरुण स्त्री उभी असते आणि तिच्या हातात एक पिस्तुल असतं. मृत व्यक्ती आपला नवरा असून आपण त्याचा खून केला आहे ह्याची कबुली ती देते आणि त्या तरुणाला पोलीस (इथे मी कोतवाल हा शब्द योजायला हवा का?) बोलवायची विनंती करते. ह्यावर तो काही बोलणार तेव्हढ्यात ती रडायला लागते. स्त्रियांच्या अश्रूसमोर देवांचंही काही चालत नाही म्हणतात. असो. तो तरुण तिची समजूत काढू लागतो तेव्हा ती सांगते की लग्न झाल्यापासूनची ५ वर्षं म्हणजे तिच्यासाठी नरकवास होता. पती सदोदित एखाद्या पशुप्रमाणे वागत असे, भांडण उकरून काढत असे, शिवीगाळ करत असे (हे अतिशय वाईट आहे असं माझं मत आहे). तिने कित्येक वेळा जीव द्यायचाही प्रयत्न केला (अरेरे! आत्महत्या करणं पाप आहे). ती त्या तरुणाला सांगते की आज पतीने जीवे मारायची धमकी दिली तेव्हा झालेल्या झटापटीत गोळी सुटली आणि त्याचा मृत्यू झाला. तो तरुण विचारतो की गोळीचा आवाज कोणी ऐकला नाही का? ह्यावर ती म्हणते की एका वाघाशी झालेल्या झटापटीत दोन्ही पाय निकामी झाल्यापासून तिचा पती खुर्चीत बसून दिवसरात्र बाहेर गोळ्याच झाडत असतो. त्यामुळे त्या आवाजाचं कोणाला काही वाटत नाही. (हा इसम माझा शेजारी नाही ही देवाची कृपाच!)

एव्हाना तिची (ही रानी रणजीतसिंग) कर्मकहाणी ऐकून त्या तरुणाच्या (ह्याचं नाव चंद्रशेखर) हृदयाला पाझर फुटलेला असतो. तो तिला निक्षून सांगतो की मी पोलिसांना बोलावणार नाही. तुझ्या हातून तुझा नवरा ठाकूर रणजीतसिंग मरण पावला आहे हे फक्त तुला आणि मला माहित आहे. तो एक अपघात होता. मग तो तिला चोरीच्या उद्देशाने आलेल्या कोणा अज्ञात व्यक्तीकडून ठाकूर रणजीतसिंग मारला गेल्याचं नाटक कसं करायचं ते समजावून देतो. (हा सत्याचा शुद्ध अपलाप आहे! तीव्र निषेध!) तिजोरीतल्या वस्तू अस्ताव्यस्त पसरून ठेवतो. खोलीतले बोटांचे ठसे मिटवतो. रानी त्याने सांगितलं तसंच वागते. त्यामुळे ठाकूरचा मृतदेह घरातली नोकराणी पाहते तेव्हा रानी स्वयंपाकघरात असते आणि चंद्रशेखर घरात नसतो. नोकराणीची किंकाळी ऐकून रानी, तिची सासू आणि धाकटा दीर धावत येतात. त्याच वेळी बाहेरून मदत मागण्याच्या बहाण्याने पुन्हा चंद्रशेखर येतो. खून झालेला पाहून तोच पोलिसांना बोलावतो.

यथावकाश पोलीस येतात. त्यांना ठाकूरच्या मृतदेहाजवळ एक सिगार आणि मृतदेहाखाली दबलेलं चहा वगैरे ठेवायचं तबक मिळते. चंद्रशेखर त्यांना मी घरात येताना एक माणूस घाईघाईने घराबाहेर पडत होता आणि त्याचा धक्का लागून हे पिस्तुल पडलं असं सांगून रानीकडून घेतलेलं पिस्तुल त्यांच्या स्वाधीन करतो. पण अंधार आणि दाट धुकं असल्याने त्याचा चेहेरा पाहू शकलो नाही त्यामुळे त्याला पुन्हा ओळखू शकणार नाही हेही कबूल करतो. चंद्रशेखर योगायोगाने त्या घरात आलेला असल्याने पोलीस त्याला त्यांच्या परवानगीशिवाय शहर सोडून न जाण्याची समज देऊन जाऊ देतात. तिजोरी तपासल्यावर आतून किरण नावाच्या एका सुंदर तरुणीचं छायाचित्र मिळतं. पण ती कोण आहे हे घरात कोणालाच माहित नसतं. तिजोरीची अवस्था पाहून घराची खडानखडा माहिती असलेल्या कोण्या व्यक्तीचं हे काम असावं अश्या निष्कर्षाप्रत पोलीस येतात. घरच्या लोकांच्या चौकशीत बांकेलाल हा नोकर रोजच्याप्रमाणे ९:३० ला ठाकूरला कॉफी देऊन निघून गेल्याचं समजतं. त्याला शोधत पोलीस छमिया नावाच्या स्त्रीच्या कोठ्यावर जातात.(ह्यापेक्षा बांकेने घरी बसून काही पुस्तकं वाचली असती तर त्याच्या ज्ञानात भर पडली असती असं मी नम्रपणे सुचवू इच्छितो) बांकेच्या कोटात ४००० रुपये मिळाल्याने त्यांचा संशय अधिकच बळावतो. आणि ते त्याला अटक करतात.

पण सकाळी छमिया पोलिसांना सांगते की रात्री १० वाजल्यापासून बांके तिच्या घरीच होता. ठाकूरचा खून त्यानंतर झालेला असतो. त्यामुळे पोलिसांना बांकेला सोडून द्यावं लागतं. ते त्याला ठाकूरचा खून झाल्याचं सांगून त्याचा कोणावर संशय आहे का असं विचारतात तेव्हा तो सांगतो की ठाकूर इतका वाईट माणूस होता की कोणीही त्याला मारू शकतं. आई सावत्र, धाकट्या सावत्र भावाला त्यानेच धाक दाखवून दाखवून वेडं केलेलं आणि बायकोला प्लेट्स फेकून मारायलाही तो मागेपुढे पाहत नसे.

पोलीस ठाकूरच्या घरी पुन्हा चौकशीसाठी येतात तेव्हा त्याची सावत्र आई त्यांना सांगते की तिच्या पतीचा अचानक हृदय बंद पडून मृत्यू झाल्याने तिच्यासाठी आणि तिच्या मुलासाठी खास आर्थिक तरतूद केली नव्हती. त्यामुळे तिला सर्वस्वी ठाकूरवरच अवलंबून राहावं लागतंय. आतल्या खोलीत तिचा मुलगा खेळण्यातल्या बंदुकीने ठाकूरच्या फोटोवर गोळ्या झाडत असतो. पोलीस ह्या सगळ्याचा अर्थ लावताहेत एव्हढ्यात एक उमदा तरुण घरात शिरतो. हा असतो अ‍ॅडव्होकेट सुरेश सक्सेना. तो ह्या कुटुंबाचा मित्र असतो, रोज त्यांच्याकडे येत असतो, फक्त ज्या रात्री ठाकूरचा खून झालेला असतो त्याच दिवशी नेमका तो आलेला नसतो. सुरेशला सिगार पिताना बघून पोलीस सावध होतात. ते त्याच्याकडून बहाणा करून एक सिगार मागून घेतात. पोलीस निघून गेल्यावर रानी सुरेशला चंद्रशेखर त्या दिवशी दूरध्वनी करायला आल्याचं सांगते. ते ऐकून सुरेश चपापतो. चंद्रशेखर ज्या हॉटेलमध्ये उतरलाय तिथे जाऊन तो मुद्दाम काही कारण काढून त्याच्याशी बोलतो. पण चंद्रशेखर त्याला ओळखत नाही. त्याने त्या रात्री आपल्याला पाहिलं नव्हतं हे लक्षात येताच सुरेशचा जीव भांड्यात पडतो

ठाकूरच्या मृतदेहाजवळ मिळालेल्या तबकावर पोलिसांना बांके आणि ठाकूरच्या बोटांच्या ठश्यासोबत आणखी एका अज्ञात व्यक्तीचे ठसे मिळतात. सिगार आणि तबक ह्यावर असलेले ठसे जुळत असल्याने ते ठसे सुरेशच्या बोटांचे आहेत हे पोलिसांच्या लक्षात येतं. ते बांकेकडे चौकशी करतात तेव्हा सुरेशची जवळीक ठाकूरपेक्षा रानीशी अधिक होती हेही त्यांना कळतं. पण खून झाला त्या रात्री सुरेशने सॅव्हॉय नामक उपाहारगृहात ३०० लोकांसाठी एक समारंभ आयोजित केलेला असल्याने त्याच्याकडे संशयित म्हणून पाहता येत नसतं. हॉटेल व्यवस्थापकाकडे विचारपूस केल्यावर मात्र समारंभ चालू असताना सुरेशला रात्री १०-१०:१५ च्या सुमारास कोणा बाईचा दूरध्वनी आला होता, बोलून झाल्यावर तो बाहेर पडला आणि जवळपास एका तासाने परत आला असं तो सांगतो. पोलीस चंद्रशेखरला सुरेशचं छायाचित्र दाखवतात पण तो मी ह्याला फक्त हॉटेलमध्ये पाहिलंय असं सांगतो. चंद्रशेखर ही गोष्ट रानीला सांगतो तेव्हा ती ओळखते की पोलिसांना सुरेशचा संशय आलाय. ती चंद्रशेखरला सांगते की ठाकूरला तिची आणि सुरेशची मैत्री खुपत होती. समारंभाच्या दिवशी तिचं त्याच्याशी भांडण झालं होतं, त्याने सुरेश आणि तिच्या मैत्रीबद्दल तमाशा करायची धमकी दिली म्हणून तिने सुरेशला फोन केला होता. वरच्या मजल्यावर नहाणीघरात असताना तिला सुरेश आणि ठाकूरच्या वादावादीचा आवाज आला होता. पण नंतर सगळं शांत झालं. काही वेळाने पुन्हा भांडणाचा आवाज आला पण त्याच वेळेस वरून एक विमान गेल्याने तिला काही ऐकू आलं नाही. ती खालच्या मजल्यावर आल्यावर तिचं आणि ठाकूरचं भांडण झालं आणि झटापटीत त्याचा जीव गेला. सगळं ऐकून घेऊन चंद्रशेखर तिला म्हणतो की तिला वाचवण्याच्या प्रयत्नात त्याने नकळत सुरेशला खुनाच्या प्रकरणात नाहक गोवलंय. हवालदिल झालेली रानी सुरेशला भेटायला जाते तेव्हा पोलीस त्याला घेऊन जाताना तिला दिसतात.

आता पोलिसांसोबत आपणालाही प्रश्न पडतात - ठाकूरला कोण मारतं? रानी? सुरेश? त्याची सावत्र आई? का धाकटा भाऊ? किरण कोण असते? तिचा ह्या प्रकरणाशी काय संबंध असतो?

पात्रयोजना:
माझ्यावर सर्वात जास्त छाप पडली ती ठाकूर रणजीतसिंग झालेल्या श्री. डॅनी डॅन्झोंग्पा ह्यांची. पुढल्या काही रात्री तरी हा ठाकूर माझ्यावर पिस्तुल रोखतोय आणि मी जीव वाचवायला धुक्यातून सैरावैरा पळतोय अशी भयाण स्वप्नं मला पडणार ह्याची मला खात्री आहे. हा ठाकूर चित्रपटात मधूनमधूनच दिसतो. पण त्याची ती आसुरी नजर चित्रपटभर आपला पाठलाग करत राहते. मी स्त्रियांबद्दल कधीही अवमानकारक बोलत नाही. पण रानी रणजीतसिंग झालेल्या श्रीमती झीनत अमान अतिशय निर्बुद्ध वाटतात हे खेदपूर्वक नमूद करावे लागते. त्यांची ना धड कीव येत ना त्यांच्याबद्दल संशय येत. साडीचा पदर खांद्यावर ठेवावा लागतो हेही त्यांना कोणी कधी सांगितलेले दिसत नाही ही आणखी एक खेदजनक बाब. जीव द्यायला निघाल्याच्या प्रसंगात श्री. सुरेशना त्या ''मै क्या करू?' असं विचारतात तेव्हा 'माते, आधी पदर अंगभर लपेटून घ्या' असं हात जोडून सांगावंसं वाटलं. Sad असो. श्री. नवीन निश्चोल ह्यांनी चंद्रशेखर ही व्यक्तिरेखा चांगली साकारली आहे. अ‍ॅडव्होकेट सुरेश सक्सेनाच्या भूमिकेत श्री. संजय खान उमदे दिसतात (फक्त त्यांच्या डोळ्यांवर ठेवलेला चष्मा थोडा उपरा वाटतो हे जाता जाता सांगावंसं वाटतं). पण इतर भूमिकांच्या मानाने त्यांना फार काही करायला वाव नाही. त्यामानाने पब्लिक प्रॉसिक्युटर मेहता म्हणून ज्येष्ठ अभिनेते अशोक कुमार भाव खाऊन जातात. इतर भूमिकांत उर्मिला भट (ठाकूर रणजीतसिंगची सावत्र आई), देवेन वर्मा (बांकेलाल), मदन पुरी (इन्स्पेक्टर जोशी), जगदीश राज (इन्स्पेक्टर बक्षी), नाना पळशीकर (न्यायाधीश), जयश्री टी, मीना टी आणि पद्मा खन्ना दिसतात.

गीते:
'संसार की हर शयका इतनाही फसाना है' हे गीत माझ्या अत्यंत आवडीचं. त्यातल्या 'हम लोग खिलौने है इक ऐसे खिलाडी के' ह्या ओळी थेट 'आनंद' मधल्या 'हब सब तो रंगमंचकी कटपुतलीया है जिनकी डोर उपरवाले के हाथोमे है' ह्या संवादाची आठवण करून देतात. ‘उलझन सुलझे ना रस्ता सूझे ना' हेही गीत छानच आहे.

कथानकातल्या त्रुटी आणि अनुत्तरित प्रश्न वगैरे:
/** चित्रपट पाहायचा असल्यास कृपया हे सदर वाचू नये */

१. चंद्रशेखर खोलीतले बोटाचे ठसे मिटवतो. म्हणजे त्या काळात हे शास्त्र ज्ञात होतं. मग तो तिजोरीतल्या वस्तू उदा. पैसे ह्यांना हात का लावतो? त्यावर आपल्या बोटांचे ठसे उठतील ही भीती त्याला वाटत नाही का?

२. किरणशी ठाकूरची वर्तणूक पाहता त्याने तिचं छायाचित्र तिजोरीत का ठेवलेलं असतं ह्याचं उत्तर मिळत नाही.

३. रानीला नहाणीघरात असताना दोन्ही वेळेला वादावादीचा आवाज येतो तर घरातल्या उर्वरित सदस्यांना कसा येत नाही?

४. बांके 'बांकेलाल' असून नेपाळी लहेज्यात का बोलत असतो?

५. न्यायालय प्रकाशची निर्दोष सुटका का करते?

अवांतर:
माझ्या आवडत्या लेखिका अ‍ॅगथा ख्रिस्ती ह्यांच्या 'द अनएक्स्पेक्टेड गेस्ट' (अर्थात अनपेक्षित पाहुणा) ह्या पुस्तकावरून ह्या चित्रपटाचं कथानक प्रेरित आहे असं आंतर्जालावरून कळतं. हे पुस्तक अनेक वर्षांपूर्वी वाचलंय. पुन्हा वाचायला हवं.

अंतिम मत:
रहस्यप्रधान चित्रपटांची आवड असेल तर हा चित्रपट एकदा तरी नक्की पहावा असाच आहे.
----
मी वही मिटली.

‘चांगलंच लिहिलं आहे तुम्ही. पण काय हो, संगीत, दिग्दर्शन, कॅमेरावर्क, प्रकाशयोजना इत्यादीबद्दल काही लिहिलं नाहीत ते?’

‘त्यातलं मला काही कळत नाही हे मी विनम्रपणे कबूल करतो. पोटापाण्यासाठी संगणक बडवणारा मी पामर. मला राग-रागिण्या, आलाप, तान, कोमल स्वर, शुध्द स्वर वगैरे काही समजत नाही. एक तर गीत आवडतं नाही तर नाही आवडत. तेच दिग्दर्शनाबद्दल. एक तर चित्रपट आवडतो नाही तर नाही आवडत. पण ज्यांना ह्याबाबतीत कळतं त्यांनी मजकडून त्याबद्दल लिहिण्याची अपेक्षा करण्याऐवजी स्वत:च त्यावर लिहिलं तर मजसारख्या होतकरू लेखकांना मार्गदर्शनच होईल.’

‘अहो पण....हा चित्रपट निर्माण झाला तेव्हाच्या काळातल्या सामाजिक, आर्थिक, भौगोलिक, ऐतिहासिक, धार्मिक, कौटुंबिक, ऐहिक, पारमार्थिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिस्थितीबद्दल काही भाष्य हवं होतं अशी टीका तुमच्यावर होऊ शकते.’

‘मी त्यावर काय भाष्य करणार? हे चित्रपट निर्माण झाले त्या काळात माझा जन्मही झाला नव्हता.’ खटणे अपार खिन्नतेने म्हणाला. जणू ही त्याचीच चूक होती.

‘टीका होईल मान्य आहे. ज्या टीकेने माझं लेखन सुधारेल त्या टीकेचं मी स्वागतच करतो. पण काहीतरी टीका करायची म्हणून परिच्छेद भरभरून लिहिलं असेल तर असल्या टीकेला अर्थ नाही हे वाचणार्‍याच्या लक्षात यायला वेळ लागत नाही. त्याने टीका करणाऱ्याचंच हसू होतं. आणि पुढेही होत राहतं. माझी आजी म्हणायची "शब्द जपून लिहावेत. उगाच नाही त्यांना 'अक्षर' म्हणत.” तो पुढे म्हणाला.

‘कोड्यात बोलताय तुम्ही खटणे'

‘रहस्यप्रधान चित्रपट पाहिल्याचा परिणाम असेल कदाचित. ज्यांना कोडं उलगडायचं आहे त्यांनी एकदा जपानच्या राजधानीला भेट द्यावी. सर्व गोष्टींचा उलगडा "शेवटी" तिथे आहे' Happy

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Lol भारी सुरूवात !
सुरूवात वाचली आणि लगेच प्रतिसाद देतेय. आता बाकीचा लेख वाचते.
--
मस्त लिहील आहेस स्वप्ना. सिनेमा बघितला नाहीये. बघेन आता.
झालेली टीका पॉझिटिव्हली घेऊन विनोदात दिलेलं प्रत्युत्तर आवडलं.

चित्रपट परीचय छान.
जापान च्या राजधानीतुन आधीच जाउन आल्याने कोडं आधीच उलगडलेलं आहे मला Happy

अतिशय सुंदर स्वप्ना !!! तुझ्या ह्या लेखमालेमुळे जुने पण चांगले चित्रपट माहीत होत आहेत . वेळ होईल तसे जरूर पाहणार.

मला वाटलं होतं या चित्रपटात संजय खानची मुख्य भूमिका असेल. तुम्ही आवर्जून पहावा असं लिहीलंय तेव्हा यादीत घेतलाच आहे तर याला वर सरकवतो.
परीक्षण नेहमीप्रमाणे आवडलं.

शोधते तुनळी वर . पूर्वी कधीतरी बघितला होता.

जापान च्या राजधानीत कधी गेले नाही पण काही वर्षे नोबिता आणि डोरेमान चा छळ सहन केल्याने जपान बद्दल थोडी फार माहिती आहे. कोड्याचे उत्तर सापडले Happy .

डुप्लिकेट प्रतिसाद काढून टाकला आहे.

खवचटपणा?? !! Lol

एनिवे लेख छान आहे.

> पण रानी रणजीतसिंग झालेल्या श्रीमती झीनत अमान अतिशय निर्बुद्ध वाटतात हे खेदपूर्वक नमूद करावे लागते. त्यांची ना धड कीव येत ना त्यांच्याबद्दल संशय येत. साडीचा पदर खांद्यावर ठेवावा लागतो हेही त्यांना कोणी कधी सांगितलेले दिसत नाही ही आणखी एक खेदजनक बाब. जीव द्यायला निघाल्याच्या प्रसंगात श्री. सुरेशना त्या ''मै क्या करू?' असं विचारतात तेव्हा 'माते, आधी पदर अंगभर लपेटून घ्या' असं हात जोडून सांगावंसं वाटलं. Sad असो. > अगदी. मलातर या चित्रपटातील पदर पाडून इकडेतिकडे फिरणारी झीनत अमानखेरीज इतर काहीच, कोणीच आठवत नाहीय.

> माझ्या आवडत्या लेखिका अॅगथा ख्रिस्ती ह्यांच्या 'द अनएक्स्पेक्टेड गेस्ट' (अर्थात अनपेक्षित पाहुणा) ह्या पुस्तकावरून ह्या चित्रपटाचं कथानक प्रेरित आहे असं आंतर्जालावरून कळतं. हे पुस्तक अनेक वर्षांपूर्वी वाचलंय. पुन्हा वाचायला हवं. > +१ पुस्तकदेखील वाचलय पण आठवत नाही. आणि चित्रपटाचा शेवट पुस्तकापेक्षा वेगळा+गंडलेला वाटला होता हेमात्र आठवतंय.

Khatane la parikshan masta jamalay ! Ha pahila hota purvi, ani lakshan Danny aani Asha cha 'ulazan sulzena' lakshat rahile hote.

मस्त लिहीलंय, स्वप्ना! हा पिक्चर बहुधा लहानपणी पहिलाय. मध्यंतरी अनासपुरेचा 'दोन घडीचा डाव' नावाचा चित्रपट आला होता. तो याच पिक्चरवरून इन्स्पायर्ड असावा अशी एक शंका आहे Happy

"मध्यंतरी अनासपुरेचा 'दोन घडीचा डाव' नावाचा चित्रपट आला होता. तो याच पिक्चरवरून इन्स्पायर्ड असावा अशी एक शंका आहे" - अनासपुरे ने स्वतंत्र, म्हणजे असे कुठून तरी न 'इन्स्पायर' झालेले - 'अन-इन्स्पायर्ड' सिनेमे केले आहेत का? Happy

पाहीला, बऱ्यापैकी ग्रिप आहे. ट्विस्ट अनपेक्षित वाटला मला.

टायटल सॉंग खूपच वर्षांनी ऐकले, हे गाणे विस्मरणात गेले होते, छान आहे. उलझन सुलझें ना हे गाणे पहिल्यांदा ऐकले, आवडले. बाकी गाणी फाफॉ केली.

मस्त.
पण इतर भुमिकांच्या मानाने फार काही वाव नाही...
असता तर याने काय केलं असत.

छान.
धुंद म्हटलं की सर्वात आधी गाणं आठवतं 'रस्ता सुझे ना'
नंतर ती wheelchair ढकलणारी झिनत अमान आणि सनकी डॅनी Happy