बेस कॅम्प डायरी भाग ५

Submitted by मधुवन्ती on 27 November, 2019 - 00:18

1.JPG

७ ऑक्टोबर २०१४
---------------------

सकाळी heavy breakfast करुन मीनाझचा निरोप घेतला दोन दिवसांनी भेटण्यासाठी! माझा पोर्टर आणि मी परतीच्या वाटेला लागलो.निघाल्यापासूनच मी माझा चालण्याचा वेग वाढवला होता. आज खूप चालायचं होतं आणि सूर्यास्ताच्या आधी पोहोचायला हवं होतं. त्याशिवाय सकाळी जेवढं अंतर कापलं जातं ते नंतर मंदावत जातंच! तिन्ही लेक्स पार करून डाव्या बाजूने डोंगर चढू लागले. माछेर्मो, डोले ही ठिकाणं पलीकडच्या तीरावर उजव्या बाजूला होती. पुढची वाट सरळच होती; परंतु अरुंद आणि निर्जन!आतापर्यंत खूप लोक येता-जाता भेटत होते, पण या वाटेवर मात्र कोणीही नाही.इथून फारसं कोणी जातच नसावं. लवकरच ‘नाला’ या ठिकाणी पोहोचलो. तिथल्या एका घरी शेर्पा स्ट्यू खाऊन पैशांच्या बदल्यात मी माझ्याकडची सूप पॅकेट्स दिली....बार्टर एक्स्चेंज!!

2.JPG

आज रस्त्यात अक्षरश: कोणीच भेटलं नाही!एकूणच आजचा दिवस मी आणि डोंगर यांचा होता.जेवणानंतर ‘थारे’, ’थोर’ अशी गावे पार करत करत संध्याकाळी ‘फोर्चे’ या गावी पोहोचले. हे गावदेखील बऱ्यापैकी मोठं आहे. बरीच लॉजेस असूनही बरीचशी बंद दिसली. त्यामुळे गावात पोहोचूनसुद्धा लॉज शोधण्यात वेळ गेला. शेवटी ‘फोर्चे रिसॉर्ट’ नावाचं एक लॉज दिसलं आणि इतर माणसांचा वावरदेखील!यालॉजचा मालक everester होता. त्यानं चार वेळा एव्हरेस्ट सर केलं होतं. एप्रिल २०१४ मधे झालेल्या हिमवादळातून वाचलेल्यांपैकी हा एक! त्याचे अनुभव ऐकत आणि इतर लोकांशी थोड्या गप्पा मारून रूमवर जायला निघाले आणि बाहेर चंद्राच्या प्रकाशात चमचमणारे पर्वत दिसले. आज कोजागिरी पौर्णिमा!

3.JPG5.JPG6.JPG

८ ऑक्टोबर २०१४
---------------------

आज नाष्टा करून लगेचच निघालो. चालणं फारसं नसलं तरी वेळेत पोहोचायला हवं होतं.थोडा ascent करून मग सरळ वाटेवरुन चालत निघाले. अपेक्षेपेक्षा लवकरच ‘पांगबोचे’ला पोहोचले. शेर्पा स्ट्यूचे जेवण करुन परत माझ्या आजच्या मुक्कामाच्या ठिकाणी- फेरिचेला - निघाले. आज चालताना आकाशात rescue Helicopters देखील खूप दिसत होती. जवळजवळ नऊ हेलिकॉप्टरजाताना दिसली. ‘सोमोरे’ या ठिकाणाहून थोडा चढ आणि मग सरळ वाट चालत फेरिचे इथं लवकरच पोहोचले. इथलं लॉज खूपच छान होतं.अॅटॅच्ड बाथरूम, वॉर्म डायनिंग रूमह्या सगळ्या इथे लक्झरीच होत्या! मी झोपायला जाईपर्यंत तिथेच बसुन कोरियाच्या ‘ली’ व जर्मनीच्याएका जोडप्याबरोबर गप्पा मारल्या. ली तिच्या कुटुंबाला घेउन आली होती; परंतु इथे तिला स्वत:लाच त्रास व्हायला सुरुवात झाली. त्यामुळे तिने परत जाण्याचा निर्णय घेतला होता. आज रूम वर जायचा थोडा कंटाळाच येत होता, परंतु उद्या लोबुचे गाठायचे असल्यामुळे नाईलाजाने रुम वर परतावं लागलं.

7_0.JPG

९ ओक्टोबर २०१४
----------------------

आज उठायला जरा उशीरच झाला होता. पटपट आवरून लोबुचेकडे निघाले.मी निघाले आणि ‘ली’ लगबगीने माझ्याकडे आली आणि म्हणाली,I wish you all the best for your trek! ती आज परत खाली चालली होती. त्यामुळे थोडी निराश असणार, पण मला शुभेच्छा द्यायला मात्र विसरली नाही...तिचा निरोप घेऊन चालायला सुरुवात केली. थोडी सरळ वाट आणि मग चढण,चढ चढून ‘थुकला’ या ठिकाणी lunch साठी थांबले. इतक्या उंचीवर येऊनदेखील मला भूक लागत होती, ही एक चांगली गोष्ट होती. बऱ्याचदा high altitude sickness मुळे भूक कमी होते आणि त्यामुळे energy देखील!
शेर्पा स्ट्यूचा लंच करून लोबुचेच्या चढणीला लागले.
‘थुकला’नंतर एक डोंगर चढून वर पोहोचलो, की त्या छोट्या पठारावर कित्येक स्मारकं दिसतात. काही नावांच्या पाट्या असलेली, तर काही नुसतीच दगडांवर दगड लावून उभारलेली. ‘एव्हरेस्ट’वर चढताना किंवा उतरताना मृत्यू पावलेल्या गिर्यारोहकांची ही स्मारकं! ही स्मारकं बघून आपोआपच डोळे ओलावतात...काही काळ या समाध्यांसमोर नतमस्तक होऊन मग परत चालायला सुरुवात केली.तीन वाजण्याच्या जवळपास लोबुचेला ठरलेल्या लॉजवर पोहोचले. आमच्या आतापर्यंतच्या प्रवासातलं हे सर्वांत वाईट लॉज होतं हे.मीनाझ आलेली होतीच. कविता रेड्डी आणि तिचा ग्रुपदेखील भेटला. थोडावेळ मीनाझशी गप्पा मारत तिचे अनुभव ऐकले आणि मग झोपायला गेलो.

१० ऑक्टोबर २०१४
----------------------

आज आम्ही शेवटच्या कॅम्पवर पोहोचणार होतो.लोबुचेपासुन चालत थोडी उंची गाठल्यावर पलीकडच्या बाजूला मोरेन आणि स्क्री (सुटे दगड आणि रेती)ची वाट होती आणि उजव्या बाजूला ग्लेशियर्स दिसत होती. त्या उतारावरून जरा जपूनच उतरत गोरकशेपला येउन पोहोचले.हॉटेल हिमालयन लॉजमधे आमचा आजचा मुक्काम होता.
बाजूलाच अजून एक बोर्ड दिसला - Highest Statue of Shivaji Maharaj.हा पुतळा ‘गिरिप्रेमी’ने इथे लावला आहे. त्याचबरोबर शेर्पा समाजाच्या उन्नतीसाठी त्यांना आर्थिक मदतीसाठी एक charity fund ची व्यवस्था केली आहे. बऱ्याच दिवसांनी मराठीतला तो माहितीफलक आणि शिवाजी महाराजांचा तो पुतळा पाहून खरंचच खूप छान वाटलं.
maayboli 16.JPG

Restaurant मधे hot lemon मागवलं. पुण्याचे तांबे भेटले. त्यांच्याशी मराठीतून गप्पा मारल्या. थोडी chocolates आणि पाणी भरून घेऊन एव्हरेस्ट बेस कॅम्पचा रस्ता विचारून निघाले. सुरुवातीला सरळसोट वाट लवकरच rocky patches मधून जाणारी, थोडी चढ-उतार असणारी होती. बराच वेळ असं चालून झाल्यावर उजव्या बाजूला ओपन ग्लेशियर्स दिसू लागली. लांबूनच एव्हरेस्ट बेस आणि खूप सगळी माणसं दुरूनच दिसत होती. तिथपर्यंत पोहोचायला मात्र खूपच वेळ लागत होता. शेवटच्या टप्प्यात पॉइंट समोर दिसत असूनही मोरेन आणि ग्लेशियरवाल्या रस्त्यामुळे रस्ता चुकत होता. शेवटी खूपसं मोरेन पार करून जेव्हा पायाखालीच आइस दिसू लागलं आणि काही क्षणांत आम्ही ‘एव्हरेस्ट बेस’ला पोहोचलो...तो क्षण केवळ अविस्मरणीय होता. सगळ्या कष्टांचं अश्रूंमध्ये रूपांतर होऊन ते माझ्याही नकळत वाहू लागले...आता तिथली गर्दी पूर्णपणे संपली होती. तो पॉइंट,आजूबाजूचा परिसर... सगळं डोळ्यांत साठवून घेतलं...!
11.JPG

एव्हरेस्ट बेस कॅम्पची उंची आहे ५३०० मीटर!
खरंतर यापॉइंटच्याही खूप पुढे गेल्यावर खरा बेस कॅम्प लागतो. चढाईच्या मौसमात तिथे जायला बरा रस्ता बनवला जातो.आज मात्र दूरवर एकच छोटा तंबू उभारलेला दिसत होता. तो एका फिल्म बनवणाऱ्या कंपनीचा होता, असं नंतर कळलं.

18.JPG

मी तिथे पोहोचले तेव्हातीन वाजून गेले होते. थोडावेळ तिथेच थांबलो होतो. लवकरच परत निघायला हवं होतं. तेवढ्यात तिथं एक भारतीय कुटुंब आलं. त्यांच्यासोबत त्यांचा गाइडही होता. मी एकटीच आहे, म्हटल्यावर त्यातली मुलगी म्हणाली, you can come along with us! मलासुद्धा कोणी तरी हवंच होतं. मी त्यांच्याबरोबर परतीच्या वाटेला लागले. आम्हाला वाटेतच अंधार झाला होता. पण गाइड अर्जुन रस्त्याचा चांगला माहितगार असल्यामुळे अजिबात न चुकता आम्ही गोरकशेपला परत आलो. अर्थात मला उशीर झाल्यामुळे मीनाझ काळजीत पडली होतीच आणि दिवसभर चालणं झाल्यामुळे मी प्रचंड थकले होते.त्यामुळे थोडं सूप पिऊन लगेच रुमवर गेले

क्रमशः

16.JPG

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users